Reflection for the Homily of Twenty Third Sunday in Ordinary Time (4/9/2016) by Dominic Brahmne.
सामान्यकाळातील
तेविसावा रविवार
दिनांक: ०४/०९/२०१६.
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ९:
१३-१८.
दुसरे वाचन: फिलेमोन ९-१०; १२-१७.
शुभवर्तमान: लुक १४: २५-३३.
“माझे शिष्य
होऊ पाहणाऱ्यांनी सर्वस्वाचा त्याग करावा”
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील तेविसावा रविवार
साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूचे ध्येयनिष्ठ शिष्य, अनुयायी बनण्यास
पाचारत आहे.
शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्यातून
घेतलेल्या पहिल्या वाचनात देवाच्या योजना संपूर्णत: जाणण्यास मानव असमर्थ आहे
ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दुसऱ्या वाचनात संत पौलाच्या सानिध्यात राहून
अनेसिम ह्या त्याच्या मानलेल्या पुत्रात झालेला आमुलाग्र बदल आणि फिलेमोनबरोबर
अनेसिम ह्याचा पौलाने घालून दिलेला समेट ऐकावयास मिळतो. तर शुभवर्तमानात येशू
ख्रिस्त त्याचे अनुयायी होऊ इच्छीणाऱ्यांस सर्वस्वाचा त्याग करण्याचे आव्हान करत
आहे.
परमेश्वराने स्वत:ला ख्रिस्तामध्ये
प्रगट केले आहे. ख्रिस्ताला जो स्वीकारतो तो त्याच्या पित्याला स्वीकारतो म्हणून
ख्रिस्ताला अनुसरून स्वर्गीय पित्याची सुवार्ता घोषाविण्यास आपण ह्या मिस्साबलीत
कृपा मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ९: १३-१८.
आजच्या ह्या प्रस्तुत उताऱ्यात
लेखक, मानव ही देवाने निर्माण केलेली एक परिमित जात आहे असे म्हणतो. आपल्या
सभोवताली अश्या बऱ्याच मर्यादित अडचणी आहेत ज्या आपण पूर्णत: सोडवू शकत नाही, मग
आपण असीम अडचणी कशा सोडवू शकतो. आपण ‘परिमित’ जर पूर्णत: अमर्यादित देवाला किंवा
त्याच्या योजना व विचार ह्यांना जाणून घेऊ शकलो तर तो देव राहणारच नाही. आपण
आपल्या न्यायात खात्रीलायक किंवा अखंडित नसतो कारण आपण नाश पावणारे आहोत.
परमेश्वरापुढे आपली बुद्धी, आपले शहाणपण मर्यादित आहे. आपली बुद्धी आपले शहाणपण हे
आपल्या शारीरिक भावनांवर अवलंबून असते आणि त्यामुळे आपल्याला मर्यादा असतात.
ज्याप्रकारे आपल्या भावनांना
मर्यादा असते त्याचप्रकारे आपल्या ज्ञानाला त्या मर्यादा ओलांडता येत नाही. ह्या
उताऱ्यात ‘आत्मा’ ह्या शब्दाची परिभाषा प्लेटोने सांगितल्याप्रमाणे ‘आत्मा हा
स्वयंपूर्ण आहे’ अशी होत नाही किंवा ‘आत्मा हा शरीरात बंदिस्त आहे अशीदेखील होत
नाही तर आत्मा हा सर्वकाळ टिकतो व शरीर नाश पावते अशी त्याची परिभाषा होते. आपल्या
सभोवताली निसर्गामध्ये घडणारे बदलच आपल्या मानवी आकलनापलीकडचे आहेत तर
परमेश्वरबद्दलच्या बाबींचा अर्थ आपल्याला कसा उलगडणार? असे लेखक म्हणतो.
परमेश्वराचे ज्ञान त्याने स्वत:ने
प्रकट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ‘देवाचा पवित्र आत्मा’ ह्या शब्दांत
देवाच्या शहाणपणाची ओळख पटते. पवित्र आत्म्याचा सिद्धांत जुन्या करारात फारसा
प्रकट होत नाही परंतु त्यासंबंधी बरेच निर्देश केलेले आपणास आढळतात. ‘देव स्वत:ची
ओळख त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे करतो’ हा निर्देश जुन्या करारात आढळणाऱ्यांपैकीच
एक होय. ह्या उताऱ्याच्या शेवटच्या ओळीतून लेखक स्पष्ट करू इच्छितो की, देवाने
त्याच्या चांगुलपणामुळे स्वत:ला मानवापुढे प्रकट केले व त्याच्या योजना त्यांस
कळविल्या (पवित्र आत्म्याच्याद्वारे) आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्याचा
मानवास्तव असलेला हेतू व मार्ग त्यास पवित्र आत्म्याच्या कृपेने दर्शविले; नाहीतर
मानव हा अंधारात चाचपडत बहकला असता असे लेखक सांगत आहे.
दुसरे वाचन: फिलेमोन ९-१०; १२-१७.
पौलाने लिहिलेल्या पत्रांपैकी फिलेमोन हे सर्वात छोटे पत्र
आहे. परंतु हे पत्र त्याचे खूप वैयक्तिक, संवेदनशील आणि हृद्यस्पर्शी असे पत्र
मानले जाते. पौलाला जेंव्हा पहिल्याच वेळेस रोमच्या कारागृहात बंदिस्त केले होते (इ.स.नंतर
६१-६२) तेंव्हा अनेसिम नावाचा, कलैसे गावचा रहिवासी असलेला व्यक्ती त्यास तेथे
भेटला. अनेसिम हा फिलेमोन नावाच्या ख्रिस्ती व्यक्तीकडे गुलाम म्हणून काम करत असे
परंतु काही कारणास्तव तेथून त्याने पलायन केले होते. तो जेंव्हा पौलाला भेटला
तेंव्हा पौलाच्या सानिध्यात राहून त्याचे मनपरिवर्तन होऊन त्याने ख्रिस्ताला
स्वीकारले. त्याच्यात झालेल्या आमुलाग्र बदलानंतर पौल त्याला परत त्याचा मालक
फिलेमोन ह्याच्याकडे पाठवतो आणि अनेसिम ह्याला नवीन स्वरुपात जुने ते विसरून
स्वीकारण्यास विनंती करतो.
संत पौल ह्या उताऱ्यात त्याच्या
इतर शिष्यांना अनेसिम ह्या त्याच्या प्रितीपुत्राला स्वीकारण्यास विनंती करत आहे.
पौलाला भेटण्यापूर्वी अनेसिम हा निरुपयोगी वर्तुणुकीचा व व्यर्थ गेलेला असा होता
परंतु पौलाच्या संगतीने तो आता सुदृढ आणि देवाच्या सुवार्ताकार्यासाठी उपयुक्त असा
बनला होता. पौल येथे विशेषरीत्या नमूद करू इच्छितो, की, देव निरर्थक असलेल्या
व्यक्तींना नवजीवन प्राप्त करून देतो व त्यांस देवापयुक्त असे बनवतो. संत पौल अनेसिम ह्यास
स्वत:चे ‘लेकरू’ असे संबोधतो. ज्यू-पंथीयांमध्ये एखाद्या शिक्षकाने त्याच्या
शेजारच्या मुलांस धर्मशास्र शिकवले तर त्यास तो त्याचे मूल असे संबोधू शकतो. एखाद्या
व्यक्तीला ख्रिस्ताच्या शिकवणुकीची जाणीव किंवा ओळख करून देणे हे सर्वोत्कृष्ट बाब
होय. ते त्यांस नव्या जगाची ओळख करून देण्यासारखे आहे. अनेसिम बरोबर पौलाचे घनिष्ठ
नाते जमले होते. त्याला परत पाठवणे पौलाला असहाय्य होते तो जणू त्याच्या हृदयाचा
एक भाग पाठवत आहे असे त्याला भासत होते. पौलाला, अनेसिमला स्वत: सोबत ठेवणे
अत्युच्च वाटले असते परंतु त्याने त्याला फिलेमोनकडे पाठवणे पसंत केले. अनेसिमच्या
जीवनात पौलाच्या सहवासात राहून आमुलाग्र असा बदल झाला होता. एक विधर्मी गुलाम पौलाच्या
सहवासामुळे ख्रिस्तबंधू बनला. फिलेमोनला अनेसिम ह्याला त्याचा भाऊ म्हणून
संबोधण्यास विचित्र वाटत होते परंतु पौलाच्या आज्ञेपुढे त्याचा नाईलाज होता. पौल
म्हणतो, ‘ख्रिस्तकार्यात मी तुझा सहकारी आहे व अनेसिम मला मुलासारखा आहे म्हणून ज्या
विश्वासात तू मला स्वीकारशील अगदी त्याच विश्वासाने त्याला तू आश्रय दे; त्यात कोणतीही
दिरंगाई करू नको.
शुभवर्तमान: लुक १४: २५-३३.
प्रस्तुत उताऱ्याची पार्श्वभूमी या अगोदरच्या दाखल्यात दडली
आहे (लुक १४:१६-२४). ह्या दाखल्यात कोणी एका माणसाने अवाढव्य खर्च करून प्रतिष्ठित
व्यक्तींना भोजनासाठी आमंत्रित केले. परंतु त्या सर्वांनी कोणती ना कोणती सबब
सांगून त्याचे आमंत्रण फेटाळले. मग त्या माणसाने रस्त्यावरील आंधळ्या, पांगळ्या
आणि गरिबांना जेवावयास बोलावून आणले. हा दाखला स्वर्गराज्य संबोधित करतो.
निवडलेल्या लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांनी आमंत्रणास नकार दिला.
परुश्यांच्या दृष्टीने जे पापी, दलित आणि विधर्मी आहे अशा लोकांना स्वर्गराज्यात
प्रवेश मिळणार नव्हता परंतु येशू त्यांच्या पुढ्यात काही वेगळाच अनुभव ठेवत आहे.
म्हणून ख्रिस्त त्याचा पाठलाग करून स्वर्गराज्यात येऊ पाहणाऱ्यांसाठी काही अटी
घालत आहे.
येशूचा खरा शिष्य होण्यासाठी प्रत्येकाने त्याच्या अतिशय
जवळ असलेल्या गोष्टींचा किंबहुना त्याच्या नातलगांचा त्याग करावा जर ते त्याला
ख्रिस्ताचा पाठलाग करण्यापासून परावृत्त करत असतील. आई वडिलांचा किंवा
नातेवाईकांना पाठमोरे होणे म्हणजे त्यांना सोडून देणे किंवा त्यांना कायमचे
विस्मृत होणे असा अर्थ होत नाही. तर त्यांच्यावर अधिक अवलंबून न राहता पूर्णपणे
ख्रिस्तमय होणे होय. पॅलेस्तीन शहरात सुरवातीला तसेच इतर शहरांत ख्रिस्ती धर्म
स्वीकारणे हे धोका पत्करण्यासारखे होते त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा
लागे. ज्यू-पंथीय अशा लोकांना, व्यक्तींना, कुटुंबाना वाळीत टाकत. विधर्मी लोकांना
सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडून, शेजारी व समाजाकडून छळ सहन करावा लागत असे.
ह्यासंबंधी येशुख्रिस्त त्याचा पाठलाग किंवा त्याचे अनुयायी होऊ पाहणाऱ्यांना अगदी
सुरुवातीस ताकीद देऊ इच्छितो.
बोधकथा:
१. जॉन नावाच्या एका गर्भश्रीमंत मुलाची सरदार होण्याची फार तीव्र इच्छा होती.
परंतु ती त्याची ईच्छा, त्याला झालेल्या देव-दर्शनाने मोडकळीस निघाली. जो मुलगा श्रीमंतीच्या
त्याच्या वागणुकीतून बढाया मारत असे तोच आता त्याचा धिक्कार करू लागला. आणि त्याने
हे त्याचे सर्व एैश्वर्य दीन-दलितांमध्ये वाटून दिले. जेंव्हा त्याच्या स्वत:च्या
पित्याने त्याला ह्याचा जाब विचारला व क्रोध केला तेंव्हा त्याने स्वत:ला निवस्र
केले व सांगितले की, ‘आजपासून माझा स्वर्गीय पिताच माझे सर्वस्व आहे’. तोच जॉन
नावाचा मुलगा पुढे संत फ्रान्सिस असिसिकर ह्या नावाने उदयास आला आणि त्याने
केलेल्या त्यागाची महती आजतागायत सर्वत्र प्रचलित आहे.
२. सॉक्रेटस हा एक थोर विचारवंत, तत्वज्ञानी होता. तो आपल्या शिष्याची निवड
एका विशिष्ट पद्धतीने करीत असे. तो त्याचा शिष्य होऊ पाहणाऱ्याला त्याच्या पुढ्यात
असलेल्या डबक्यात डोकावून पाहण्यास सांगे व त्यात त्याला काय दिसते हे विचारत असे.
जर तो शिष्य त्या डबक्यात डोकावून म्हणाला की, ‘मला ह्यात माझे प्रतिबिंब दिसते’ तर
त्याला तो स्वत:चा शिष्य बनवण्यास नाकारत असे. आणि जर एखादा शिष्य म्हणाला की,
‘मला ह्यात त्या डबक्याचा तळ दिसतो तर तो त्याचा आनंदाने स्वत:चा शिष्य म्हणून
स्वीकार करत असे.
असे असता एका शिष्याने त्याला ह्या निवडीबद्दलचे कारण
विचारले तेंव्हा त्याने उत्तर दिले की, ‘मी जी विद्या तुम्हांस शिकवणार आहे ती
तुमच्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी तिचा तुम्ही वापर करावा. म्हणून
जेंव्हा तुम्ही त्या डबक्यात तुमचे स्वत:चेच प्रतिबिंब पाहिलेत तेंव्हा तुम्ही स्व-केंद्रित होता असे
माझ्या लक्षात आले आणि मी तुमचा नकार केला. त्याउलट जेंव्हा तुम्ही तुमच्या ऐवजी
डबक्याचा तळ पाहिला म्हणजे तुम्ही इतर केंद्रित होता असा त्याचा अर्थ झाला’.
मनन चिंतन:
आज येशू ख्रिस्त आपणाला त्याचे ध्येयनिष्ठ शिष्य बनण्यास
पाचारण करीत आहे तसेच त्याचे शिष्य होऊ पाहणाऱ्यांसाठी तो त्याच्या अपेक्षा मांडत
आहे. तो असे का करतो ह्याची पार्श्वभूमी आपल्याला बायबलमधील आजच्या शुभवर्तमानापूर्वीच्या
(लुक १४:१६-२४) दाखल्यात मिळते. कोणाएका मनुष्याने मेजवानी दिली परंतु निमंत्रित
व्यक्ती आलेच नाही; म्हणून त्याला आंधळ्या, पांगळ्या, वाटसरूंना बोलवावे लागले जे
अनपेक्षित होते. ह्याचीच पुनरावृत्ती त्याचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये होऊ नये आणि
परमेश्वराने केलेल्या पाचारणाला त्यांनी स्वत:हून प्रतिसाद द्यावा म्हणून तो खालील
अटी मांडत आहे.
१)
सर्वस्वाचा त्याग करावा आणि स्वत:चा क्रूस घेऊन येशूच्या
मागे यावे.
२)
आई वडिलांचा निरोप घ्यावा किंवा त्याग करावा.
त्याग हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्याग आणि प्रेम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
असे म्हणता येईल.
सर्वस्वाचा त्याग करणे किंवा क्रूस वाहणे म्हणजे नि:स्वार्थी
जीवन जगणे. जसे आपण वर दिलेल्या दुसऱ्या बोधकथेमध्ये ऐकले (सॉक्रेटसने त्याच्या
शिष्याची केलेली निवड). ख्रिस्त आपले जीवन इतरांसाठी अर्पण करण्यास पाचारण करत
आहे. आईवडीलांचा त्याग करणे (शब्दशः) म्हणजे त्यांचा द्वेष करणे नव्हे तर त्यांहून
देवाला अधिक प्राधान्य देणे होय. येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेमाखातर स्वत:चे बलिदान
केले म्हणून आपण त्याच्यायोगे दाखवलेली प्रिती ही त्याचीच प्रतिकृती होते. खऱ्या
प्रेमासाठी सर्वस्वाची किंमत मोजावी लागते. त्याचे उदाहरण म्हणजे, आपल्या स्वर्गीय
पित्याने आपल्यावर एवढी प्रिती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या
तारणासाठी अर्पण केला (योहान ३:१६). ह्याच प्रेमाची अनुभूती पहिल्या वाचनात अनेसिम
ह्या गुलामाला संत पौलाच्या सानिध्यात राहून आली असावी, म्हणून त्याने ख्रिस्ताचा स्वत:हून,
स्व-इच्छेने स्विकार केला. फक्त पित्याची आज्ञा पाळावी म्हणून नव्हे तर आपल्यावरील
करुणामयी प्रेमाखातर स्व-इच्छेने येशूने क्रूसाचा मार्ग स्विकारला. त्यासाठी त्याला
त्याच्या आप्तेष्टांचा, प्रियजनांचा त्याग करावा लागला. येशू ख्रिस्ताला ज्ञात
होते की, त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही तर त्याद्वारे पित्याचे तारणाचे कार्य
पूर्णत्वास येणार होते. त्याने आत्म-त्यागाने त्याची आपल्यावरील प्रेमाची किंमत
मोजली म्हणून आपणही त्याच्याखातर आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा आणि आपल्या वैयक्तिक
क्रुसाद्वारे त्याच्या तारणकार्यात सामील व्हावे ह्यात ईश्वराची इच्छा हेच प्रमाण
मानणे यथायोग्य ठरते कारण आपण देवाच्या प्रेमाची परतफेड कधीच करू शकत नाही.
येशूचे शिष्य होण्यापूर्वी तो
आपल्याला पूर्वविचार करण्यास सांगत आहे आणि हे समजावून सांगण्यासाठी तो दोन उचित
दाखल्यांचा संदर्भ देतो.
१)
बुरुज बांधणारा: येशूच्या समकालीन युगात जमीनदार संरक्षणासाठी
त्याच्या मालमत्तेच्या भोवताली एक भक्कम बुरुज बांधून त्यावर पेरणी-कापणीच्या
काळात पहारेकरी नेमत असे जेणेकरून त्याच्या उपजाचा कोणताही भाग चोरीला जाणार नाही.
जर ह्यात कोणतीही कमतरता आढळून आली किंवा हा बुरुज पैशाअभावी, भविष्यकालीक
नियोजनाअभावी अपूर्ण राहिला तर पूर्ण गावावर संकट ओढवून इतरांसमोर हासे होत असे.
त्यामुळे बुरुज बांधणाऱ्याला ही सर्व पूर्वकल्पना लक्षात घेऊन यथायोग्य नियोजन करून
तो बुरुज बांधावा लागे.
२)
युद्ध पुकारणारा राजा: ज्या राजाला त्याच्या
शत्रूवर आक्रमण करायचे आहे. त्याविरुद्ध त्यास योग्य ते नियोजन करावे लागे. त्याचा
दारुगोळा, शस्रसाठा, सैन्याची संख्या इ. आणि जर त्याने नियोजनबद्ध आक्रमण केले
नाही तर त्याला त्याचा आणि त्याच्या सैन्यांचा प्राण गमावून स्वत:च्या राज्यालाही
मुकावे लागे.
अगदी त्याच प्रकारे येशू त्याचा पाठलाग करू पाहणाऱ्यांना पुर्वाविचार, योग्य
तो निर्णय आणि त्याच्या अटींचे पालन करण्यास पूर्वकल्पना देत आहे.
कारण नांगराला हात घातल्यावर मागे
पाहणारा त्याचा अनुयायी होण्यास उपयुक्त नाही. पहिल्या वाचनात, देवाच्या योजना
पूर्तत: जाणण्यास परिमित मानव असमर्थ आहे असे लेखक म्हणतो. येशू देवाचे प्रतिरूप
आहे (तो देवच आहे). म्हणून येशुद्वारे देवाच्या योजना त्याच्या शिष्यांना प्राप्त
होत आहेत. येशू म्हणजे ‘इमॅन्यूएल’ ‘आम्हाबरोबर देव’. येशुनेच आम्हांला आपल्या
प्रेमाखातर स्वत:चे रक्त सांडून विकत घेतले आणि देवाचे प्रेम आम्हांस दाखविले आहे.
येशूने जसे स्वत:चे रक्त इतरांसाठी सांडले त्याचप्रकारे आपणही इतरांसाठी जगावे,
प्राण अर्पण करावा म्हणून तो आपणाकडून सर्वस्वाचा त्याग करण्याची अपेक्षा करतो. ‘बऱ्याचदा
क्रुसाविना ख्रिस्त आणि ख्रिस्ताविना क्रूस आपल्याला मोहक वाटतात कारण क्रूसावरील
मलीन, रक्तबंबाळ, रक्तरंजित येशूख्रिस्त आपणास विद्रूप, हिनवाना, केविलवाणा वाटतो
म्हणून आपण त्यास स्विकारण्यास धजत नाही’ असे आर्चबिशप फुल्टन शीन म्हणतात. परंतु
क्रुसाचे आणि ख्रिस्ताचे नाते हे अतूट आहे. क्रुसात ख्रिस्ताचा विजयोत्सव दडलेला
आहे. म्हणूनच येशू आपल्याला प्रथमतः स्वत:चा क्रूस वाहण्यास सांगत आहे जेणेकरून
स्वत:च्या स्वार्थीपणावर मात करून आपण इतरांचा क्रुसभार हलका करू शकू.
जर येशू आपले धन असेल तर आपले मनही
त्याच्याकडे लागेल.
असं म्हणतात की,
‘जगाशी बोलायला फोन लागतो
तर देवाशी बोलायला मौन लागते,
फोनवर बोलायला धन लागते आणि
देवाशी बोलायला मन लागते,
पैशाला महत्व देणारा भरकटतो
तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो’.
आपल्या दैनंदिन जीवनात सर्वस्वाचा त्याग करून, स्वत:चा
क्रूस घेऊन येशूच्या मागे चालण्याचा आपण प्रयत्न करूया. तसेच शाश्वत जीवनाचा ध्यास
हाती घेऊया व इतरांची सेवा करून ख्रिस्तमय होऊया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. अखिल ख्रिस्ती विश्वाची काळजी वाहणारे आपले पोप व त्यांचे विविध पदांवर ख्रिस्तसेवेत
असणारे प्रतिनिधी ह्यांनी अखिल मानवजातीला ख्रिस्तसेवक बनण्यास त्यांच्या
ख्रिस्तमय वागणुकीने पाचारण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या ह्या स्पर्धात्मक व चंगळवादाच्या युगात मानव देवापासून दूर जाऊ
लागला आहे. फक्त अडचणीत देवाचा धावा करावा हा त्यांचा युक्तिवाद नष्ट व्हावा व
देवाने केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. अनेक तरुण तरुणी उच्च पदवीधर असूनही नोकरीसाठी इतरत्र भटकंती करत आहे
त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरी मिळावी व त्यांच्या कुटुंबासाठी ते भक्कम
आधारस्तंभ बनावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. गरजवंत कुटुंबाना हवी असलेली मदत मिळावी तसेच मुलांचा आरोग्य व शांततेत
सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ज्या स्थानिक लोकांचे अस्तित्व व ओळख धोक्यात आहे त्यांना योग्य तो सन्मान
मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण शांतपणे आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment