Tuesday, 27 September 2016

                                                
Reflection for the Homily of 27th Sunday in Ordinary Time (02-10-2016) By Brandon Noon



सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


दिनांक - ०२/१०/२०१६
पहिले वाचन - हबक्कूक १:२-३;२:३-४
दुसरे वाचन - २तिमथि १:६-८; १३-१४
शुभवर्तमान - लूक १७:५ -१०



विश्वासाचे सामर्थ्य



प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. ‘विश्वास’ हा आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे. विश्वास म्हणजे केवळ भक्ती नाही तर प्रेम आणि मानवसेवा हि त्या विश्वासाची अविभाज्य घटक आहेत. विश्वास हा मानव व देव ह्यामधे घनिष्ट नात जोडतो आणि आजची तिन्हीही वाचने आपल्याला मानव व देव ह्यामधील नातं कशी टिकवायला हवी ह्याविषयी सांगत आहे. म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना प्रभूकडे शिष्यासारखी विनवणी करूया कि, ‘प्रभू आमचा विश्वास वाढव.’

सम्यक विवरण

पहिले वाचन (हबक्कूक १:२-३;२:३-४)

बहुतेक संदेष्ट्यानी देवाचे संदेश लोकांपर्यंत पोहचविले आहेत पण हबक्कूकने मात्र खुद्द देवालाच दोन प्रश्न विचारले आहेत : १. हे परमेश्वरा मी किती वेळा ओरडू? २. मला आधार पहावयास का लावितोस किंवा विपत्ती मला का दाखवतोस?
संदेष्ट्यांचा काळ हा इस्रायलच्या इतिहासात महत्वाचा होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुऊन काढावा तसे हे संदेष्टे समाज धुऊन काढीत होते. लोकांना कराराची आठवण करून देणे आणि हृदयातून परमेश्वराचे नाते जोडणे ह्याकडे त्यांचे लक्ष होते.
आजच्या पहिल्या वाचनात आपण बघतो कि,  हबक्कूक गोंधळला होता परंतु, देवाने प्रामाणिकपणे त्याला प्रतिसाद दिला आहे. ह्यावरून दिसून येते कि देव प्रामाणिक प्रश्न विचारात घेतो. देवाने दिलेले उत्तर फक्त हबक्कूकच्या समाधानासाठी नाही तर बाबेलकडून क्लेश भोगणाऱ्या सर्वासाठी आहे. म्हणून परमेश्वर सांगतो, घाबरू नकोस व अंतिम सुटकेचा शुभसंदेश स्पष्टपणे ठळक अक्षरात लिहून काढ जेणेकरून येणाऱ्याला व जाणाऱ्याला स्पष्ट दिसेल. तसेच हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच कारण धार्मिक मनुष्य आपल्या विश्वासानेच वाचेल.

दुसरे वाचन (२तिमथि १:६-८; १३-१४)

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि, “विझणारे निखारे पुन्हा वारा घालून पेटव” येथे संत पौल तीमाथीला उत्तेजन व धैर्य देतो जेणेकरून त्याला मिळालेल्या कृपादानाचा पूर्णपणे उपयोग देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी करील. हे कृपादान पवित्र आत्म्याशी निगडीत आहे परंतु याला चैतन्य येण्यासाठी मानवी सहकार्य आवश्यक आहे. तीमथी हा लाजरा बुजरा होता हे स्पष्ट दिसते परंतु पवित्र आत्मा तर सामर्थ्य, प्रीती व संयम देणारा आहे. म्हणून संत पौल आवर्जुन सांगत आहे कि, ख्रिस्तसभेने आपला विश्वास गमवू नये. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे म्हणून येशुख्रिस्ताठायी असलेला विश्वास व प्रीती दृढ ठेवण्यास तो आपणास आव्हान करतो आणि आत्माचा सत्याचा खरा रक्षक आहे.

शुभवर्तमान (लूक १७:५ -१०)

प्रभू येशुख्रिस्त हाच आपल्या समस्या सोडवू शकतो म्हणून त्याच्यावरती विश्वास वाढावा हाच संदेश संत लुक लोकांना सांगतो कि येशु ख्रिस्त हा विश्वासाचा गुरु आहे व जर आपण संपूर्ण मनाने त्याच्या वर विश्वास ठेवला तर आपण कधीच अंधारात चालणार नाही किंवा पडणार नाही.
अल्प-स्वल्प विश्वासानेही मोठमोठी कार्य साध्य होत नाहीत म्हणून शिष्य म्हणतात “आमचा विश्वास वाढवा.” आपले कर्तव्य, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा, नोकरांना ठरलेल्या वेतनापेक्षा अधिकाची अपेक्षा करण्याचा कोणताही हक्क नाही. ‘प्रौढी’ मिरवण्यास त्यांना काहीच आधार नाही या अर्थाने ते निरुपयोगी आहेत आणि स्वतः आपल्या शिष्याची सेवा करून प्रत्यक्ष येशूख्रिस्ताने उदाहरण दिले आहे. (योहान १३:१-१६; लूक १२:३५-३८; २२-२७)
येशूख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याची तुलना विश्वासाबरोबर केली आहे. माणसाचा विश्वास जर मोहरीच्या दाण्या एवढा उत्तम दर्जेचा असेल तर त्याची कामगिरी भक्कम राहील. ख्रिस्ताने प्रेषिताच्या विनंतीला मोठ्या विश्वासाने आश्वासन दिले नाही, कारण विश्वासाची विपुलता महत्वाची नसून त्याचा दर्जा महत्वाचा आहे. ह्यावरून असे स्पष्ट होते कि, आपण सेवेच्या मोबदल्यात विचार न करता आपण सेवा करणारे दास बनलो पाहिजेत. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात दासाविषयीचा दाखलाही दिलेला आहे.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची उपासना आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासावर मननचिंतन करण्यास आमंत्रण करीत आहे.
एकदा एक माणूस उंच डोंगरावर चढत असतो. तेव्हा त्याचा पाय घसरून तोल जातो आणि तो खाली पडत असताना नशिबाने त्याच्या हातात झाडाची फांदी लागते व तो त्या फांदीला लटकतो. तेथे लटकलेला असताना तो मनात विचार करतो कि मी जर हात सोडला तर खाली पडेन. म्हणून तो वर आकाशात पाहून ओरडतो, “कोणी आहे का वर?” “मला कोणी वाचवेल का?” तेव्हा अचानक देवाचा आवाज त्यास म्हणतो, “मी तुझा परमेश्वर आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? मग तो व्यक्ती उत्तरतो, “होय, माझा खूप विश्वास आहे.” मग परमेश्वर म्हणतो, “जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू ती फांदी सोड, मग मी तुला खालती झेलून वाचवीन.” मग तो मनुष्य पुन्हा विचार करतो आणि ओरडतो, “आणखी येथी कोणी मला वाचवण्यास आहे का?”
माझ्या प्रिय भाविकानो हा माणूस विश्वासू नव्हता का? तो विश्वासु आणि श्रद्धाळू होता. तो देवाच्या अस्तित्वावरही विश्वास ठेवत होता. त्याचा प्रार्थनेच्या शक्तीवर विश्वास होता. परंतु जर त्याचा एवढा विश्वास होता मग त्याने देवाच्या शब्दावर का नाही विश्वास ठेवला? त्याने ती झाडाची फांदी का नाही सोडली?
कदाचित आपण ह्या व्यक्तीवर हसत असू, पण आपणही ह्या व्यक्तीसमानच आहोत. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो परंतु जेव्हा जीवनात संकटे, दुःखे आणि समस्या येतात तेव्हा आपला देवावरील विश्वास डळमळून जातो. आपल्याला ठाऊक आहे कि येशूचे शिष्य हि त्यांच्या विश्वासात गडबडले होते. त्यांचा विश्वास इतका दृढ नव्हता. त्यांनी ख्रिस्ताचा पाठलाग केला व त्याच्यावर विश्वास ठेवला परंतु गेथसेमनी बागेत शिपायांना बघून ते येशूला सोडून पळून गेले.
शिष्यांचा विश्वास इतका दृढ नव्हता म्हणून आजच्या शुभवर्तमानात ते प्रभूला म्हणतात, “प्रभू आमचा विश्वास वाढव.” शिष्यांना माहित होते कि त्यांचा विश्वास पुरेसा नाही म्हणून त्यांनी प्रभूकडे विनवणी केली. आपण कधी आपला विश्वास वाढवा म्हणून विनवणी केली आहे का? आपण प्रत्येक रविवारी मिस्साला जातो, धार्मिक पुस्तके वाचतो, विविध तप-साधना करतो, परंतु आपल्या विश्वासात वाढ झाली आहे का?
‘प्रभू आमचा विश्वास वाढवा’ या प्रश्नाचे उत्तर येशुख्रिस्त एका दाखल्याने देतो. कोणी एक निरर्थक दास होता तो शेतात काम करून घरी जातो व सरळ स्वयंपाकघरात जातो व आपल्या मालकाला जें बनवतो व जोपर्यंत मालक जेवत नाही तोपर्यंत दास खात नाही. या दाखल्याद्वारे येशुख्रिस्त आपणाला संदेश देतो कि, जर आपला दृढ विश्वास असेल तर आपण पहिली देवाशी जी इच्छा आहे ती पूर्ण करु. देवाची कार्य करण्यास आपण कुरकुर करणार नाही व त्यासाठी जास्त वेळ देण्यास तयार असू.
आपला विश्वास फक्त आपल्या स्वार्थासाठी व आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी नव्हे तर देवाच्या कार्यासाठी किंवा त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी हवा. तसेच आपण आपला विश्वास वाढवण्यासाठी परमेश्वराकडे शिष्याप्रमाणे विनवणी करूया कि, “हे प्रभू आमचा विश्वास वाढव.” तसेच आपण आपला विश्वास बळकट होण्यासाठी रोज प्रार्थना केली पाहिजे. येशुख्रिस्त आपल्या दैनंदिन जीवनात हजर आहे ह्याची आपणास जाणीव व्हायला हवी. जेव्हा आपण जीवनात सुखी, समाधानी व आनंदी असतो तेव्हा आपण देवाला विसरत असतो. आपणामधील खूप जण चांगले आरोग्य, नोकरी व जीवन मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानत असतात.
आपण फक्त अडचणीत किंवा समस्यावेळीच देवाकडे धाव घेत असतो. जेव्हा येशूचे शिष्य बोटीत होते तेव्हा ते किती मासे भेटले आहेत ह्याविषयी बोलत होते, परंतु येशुख्रिस्त त्यांच्या बरोबर आहे ह्याची त्यांना जाणीव नव्हती. परंतु जेव्हा वादळ येते तेव्हा ते येशूला उठवतात (मार्क ५:३७). आपणही जीवनात तसेच करतो जर आपण येशुख्रीस्ताला पहिले स्थान दिले तर आपल्याला दुःखांना व संकटाना सामोरे जायला अवघड वाटणार नाही. पहिल्या वाचनात आपण ऐकले आहे कि, संदेष्टा हबक्कूकला वाटत आहे कि देव त्याचे ऐकत नाही परंतु जेव्हा आपण प्रामाणिक असतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकत असतो.
ज्याप्रमाणे संदेष्टा हबक्कूक व शिष्यांचा विश्वास दृढ झाला त्याप्रमाणे आपणही आपला विश्वास बळकट व्हावा व ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देऊन हा ख्रिस्त अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहचवावा म्हणून आपण देवाकडे कृपा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आमचा विश्वास वाढव.


१.      ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.
२.      कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.      आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.      आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५.      आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment