Reflection for the Homily of 1st Sunday in Advent season (27-11-16) by Br Alfred Rodrigues
आगमन काळातील पहिला रविवार
दिनांक: २७-११-२०१६
पहिले वाचन: यशया २:१-५
दुसरे वाचन: पौलचे रोमकरांस पत्र १३:११-१४
शुभवर्तमान: मत्तय २४:३७-४४
“तुमचा
प्रभू येत आहे, म्हणून तुम्ही तयार असा"
प्रस्तावना:
आजपासून ख्रिस्तसभा
उपासनेच्या नविन वर्षात पदार्पण करीत आहे आणि ही सुरुवात आपण आगमन काळाने म्हणजे
येशूच्या येण्याच्या तयारीने करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूच्या
येण्यानिमित्त जागृत करीत आहे.
आजच्या पहिल्या
वाचनात यशया संदेष्टा येरुशलेमच्या नगरीत वैभवाविषयी उल्लेख करीत आहे. येरुशलेम
नगरी जशी देवाची आहे तशीच ती आपलीसुद्धा आहे. रोमकरांस पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या
वाचनात संत पौल आपणास काळ व समय ओळखून चांगल्या प्रकाशाची कृत्ये करण्यास सांगत
आहे. आणि मत्तयलिखित शुभवर्तमानात आपल्याला ख्रिस्ताच्या येण्याने जागृत
राहण्यासाठी सांगितले आहे. कारण त्याचे येणे आकस्मित असेल.
सदैव जागृत राहून
प्रभूच्या आगमनाची चांगल्या प्रकारे आध्यात्मिक तयारी करता यावी म्हणून आजच्या
मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.
पहिले
वाचन: यशया
२:१-५
या संदेशामधून यशया
संदेष्टा येरुशलेम नगरीच्या अंतिम वैभवाचा उल्लेख करीत आहे. सिओनाची खरी महानता
दिसून येते, देव तिच्यामध्ये आहे तेच गौरव आहे. अधिक उंच शिखरांना तिचा हेवा
वाटतो. लोकांना आपल्याकडे ओढून घेणे हे तिचे कार्य आहे व त्यांना फक्त शरण आणणे हे
तिचे काम नाही. देवाचे निःपक्षपाती सत्य आणि सत्ता हे त्यांना हवे असते. प्रभुने
स्वतःला उंच केले तर आपणा सर्वांना तो स्वतःकडे ओढून घेऊ शकेल. (योहान १२:३२) हे
भाकीत केले तेव्हा त्याच्या मनात हीच वाचने असावीत.
दुसरे वाचन: पौलचे रोमकरांस
पत्र १३:११-१४
आपण शेजाऱ्यावर
प्रिती का करावी? कारण ख्रिस्ताचे परत येणे नजीक आले आहे. आपण ख्रिस्तावर विश्वास
ठेवला तेव्हा पापाच्या शिक्षेपासून आपले तारण झाले. देवाने आपल्याला पापक्षमा
दिली. ख्रिस्त येईल तेव्हा आपल्याला नवीन शरीर मिळेल तेव्हा आपण परिपूर्ण तारणाचा
अनुभव घेऊ. ख्रिस्त येईल तेव्हा आपण बेफिकीर सापडू नये. आपण त्याची वाट पाहत
जीवनक्रम कंठूया. (इफिस. ५:११; १थेस्स ५:६)
या जगाच्या स्तिथीला
रात्रीची उपमा दिली आहे. ख्रिस्त येईल तेव्हा सर्व काही नवीन दिवसाप्रमाणे होईल.
आपण जगातील पापकर्म करू नयेत तर त्याचा त्याग करून देवाच्या इच्छेप्रमाणे जगावे.
देवाची इच्छा देवाच्या वचनाने व पवित्र आत्म्याद्वारे कळते. ख्रिस्ताच्या
प्रभुत्वाखाली राहा. ही प्रकाशाची शस्त्रसामुग्री आहे. आपले आचरण पाहून देवाची
निंदा करण्याचे कारण कोणाला मिळू नये ह्याची खबरदारी घ्या. देहवासनेची हाव
तुम्हाला एकसारखी सतवीत राहील तिला कसलाच वाव देऊ नका. तर, प्रभू येशूचे गुण
परिधान करा.
शुभवर्तमान: मत्तय २४:३७-४४
प्रभू येशूचे परत
येणे हे नोहाच्या जीवनाशी तुलनात्मक आहे. नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा
त्याने अकस्मात सर्वस्व वाहून नेले. ख्रिस्त अकस्मात येणार आहे. ख्रिस्त या जगावर
राज्य करण्यासाठी केव्हा येणार आहे ती घटका फक्त पित्याला ठाऊक आहे. त्या वेळी
जगातील लोक नेहमीप्रमाणे खातपीत व जगत असतील. जगातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे
चालले असतील.
ख्रिस्त येईल तेव्हा
तो अकस्मात न्याय करील ज्यांनी राजाची सुवार्ता मानली नाही ते घेतले जातील (म्हणजेच
ते मरतील) व ज्यांनी राजाची सुवार्ता मानली ते ठेवले जातील आणि हे राहिलेले लोक
ख्रिस्ताबरोबर राज्य करतील.
ख्रिस्ताच्या
येण्याने आपण तयार व जागृत नसलो, तर आपलेही नोहाच्या दिवसात झाले तसे होईल.
लोकांची तयारी झालेली नसेल. तेव्हा फक्त दोन गट असतील : तयारीत असलेले लोक
(तारलेले आहेत ते) आणि तयारीत नसलेले लोक (हरवलेले आहेत ते). ओवी ४०,४१ मध्ये
दिल्याप्रमाणे रोजच्या जीवनातील स्पष्ट उदाहरणांनी मुलभूत विभाजन कसे असेल, तसेच
एरवी समान स्थितीत असलेले वेगळे कसे होतील ते दाखवले आहे. सिद्ध असण्याची रीत
म्हणजे हिशोब करून काळवेळ ठरवणे नव्हे, कारण कोणताही चोर आपण केव्हा येणार याची
सूचना देत नाही. जागृत राहणे, नेहमी ख्रिस्ताच्या येण्याचा विचार मनी बाळगणे हीच
तयारी असण्याची रीत आहे.
मनन चिंतन:
आमच्या जीवनात आगमन
काळ म्हणजे काय ते प्रथम समजावून घेऊया. त्यासाठी आगमनकाळाचा पूर्व इतिहास जाणून
घेणे महत्वाचे आहे. देवाची योजना फार चांगली होती परंतु आदाम आणि हेवा यांनी
देवाची आज्ञा मोडून पाप केले व हे पाप आणखी काही दिवसांनी वाढत गेले हे यशया
संदेष्टा २४:४-६ ह्या अध्यायात दाखवत आहे. “पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे. जग
झुरून कृश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठित जण जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या
रहिवाशाकडून भ्रष्ट झाली आहे. कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. ह्यास्तव
पृथ्वी शापाने ग्रासली आहे.” त्यासाठी देवाने अनेक संदेष्टे पाठविले. त्यांनी
भविष्यवाणी केली कि, तारणारा येणार आहे जो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होय. यशया
ह्या संदेष्ट्याने ही वाणी प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आठशे वर्षाअगोदर केली
होती. येशु देवाचा पुत्र होय, तो पापी माणसाच्या उद्धारासाठी येणार आहे.
यशया ९:६-७ मध्ये
म्हटले आहे, आम्हामध्ये बाळ जन्मला आहे. आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या
खांद्यावर सत्ता राहील. त्याला अदभूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा
अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या
सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व
धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
यशया
७:१४.मध्ये म्हटले आहे, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल
(आम्हाबरोबर देव) असे ठेवील व हे शास्त्रलिखित वाचन पूर्ण झाले व खुद्द देवच
येशूचे नाव घेऊन ह्या जगात आला. हाच आगमनाचा काळ आजपासून पुन्हा आपण एक नव्या
उमेदीने साजरा करीत आहोत.
आपल्याला
मनुष्याच्या पुत्राच्या येण्याची वेळ व काळ ठाऊक नाही परंतु तो एक दिवस येणार असा
आपला विश्वास आहे. आणि येणे हे आकस्मित व अचानक असणार आहे म्हणून आपण येण्याची
तयारी केली पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना
करीतो मी याचना.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस व सर्व
महागुरू धर्मगुरू, धर्मभगिनी तसेच ख्रिस्ताठायी सेवाकार्य करणाऱ्या सर्व
व्यक्तींना प्रभूचे कार्य करण्यासाठी प्रार्थना करूया.
२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आपण सर्व
सदैव तत्पर असावे व पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या
आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताचे स्वागत करणे म्हणजे
गोरगरिबांच्या स्विकार करणे ख्रिस्ताला आपणास दीन-दलित व गरीबांमध्ये पाहण्यास
परमेश्वराची दैवी शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपल्यामधील
असलेला अहंकार, स्वार्थीपणा दूर सारून एकजुटीने समजण्यासाठी कार्य करावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत
व चंगळवाद, मौज-मजेमध्ये गुरफटलेले आहेत अशांना ख्रिस्त सापडावा व त्यांचे
मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.