Wednesday 2 November 2016

Reflection for the Homily of 32nd Sunday in Ordinary Time (06-11-2016) By Sadrick Dapki



सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

दिनांक: ०६/११/२०१६.
पहिले वाचन: २मक्काबी ७: १-२, ९-१४
दुसरे वाचन: दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५
शुभवर्तमान: शुभवर्तमान: लुक २०:२७-३८.


“तो मेलेल्यांचा नव्हे तर जीवितांचा देव आहे”

 

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास जीवंत देवावर विश्वास ठेवण्यास आमंत्रित करत आहे.
     आयुष्याची सुरुवात जन्म व अंत मरणाने होतो. ह्या दोन्ही घटना अटळ आहेत परंतु त्यास सामोरे जाणे आपणास कठीण जाते. साधारणत: मरणाने जीवनाचा शेवट होतो असा प्रत्येकाचा विश्वास आहे. परंतु आपला ख्रिस्ती विश्वास आपणास शिकविते कि, मरण हा आयुष्याचा शेवट नसून ख्रिस्तामध्ये जाण्याची हि नवीन सुरवात आहे.
     आजची तिन्ही वाचने आपणास जीवितांच्या देवावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपला देव हा मृतांचा देव नसून जीवितांचा देव आहे. तो आपणास मरण नव्हे तर नवीन जीवन देण्यासाठी आला आहे आणि हे नवजीवन आपल्याला ख्रिस्ताद्वारे प्राप्त होत असते. म्हणून आजच्या उपसानेद्वारे आपण जीवितांचा देव प्रभू येशु ख्रिस्त ह्याच्याकडे मरणावर विजय मिळवण्यासाठी विशेष कृपा करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन:  २मक्काबी ७: १-२, ९-१४

     आजच्या पहिल्या वाचनात आपण सात भाऊ व त्यांची विधवा आई ह्यांच्याबद्दल ऐकतो. एक विधवा आई व तिची सात मुले ह्यांस राजाने बंदिस्त करून ठेवले होते. हे कुटुंब धार्मिक असल्यामुळे त्यांच्या धर्माला काळिमा फासण्यासाठी चाबकाचे फटके मारून निषिद्ध असलेले डुकराचे मांस त्यांस खावयास सांगितले परंतु मुलांनी त्यांच्या वडिलांनी दिलेल्या नियमशास्त्राचा आज्ञाभंग न करता मरण पत्करले. कारण त्यांचा विश्वास होता कि, ‘जीवनाच्या अनंत नुतनीकरणासाठी विश्वाचा राजा आम्हाला उठवील.’

दुसरे वाचन:  थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५

     प्रस्तुत उताऱ्यात संत पौल थेस्सलनीकाकरांस त्यांचा दृष्ट शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थनेसाठी विनंती करत म्हणतो कि, ‘आम्हासाठी प्रार्थना करीत रहा यासाठी कि जसा तुमच्या मध्ये प्रभूच्या संदेशाचा प्रसार झाला तसा इतरांमध्येही तो व्हावा आणि ते गौरविले जावे. संत पौलाचादेखील असा विश्वास होता कि, ‘आपला ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व दुष्टांपासून आपल्याला राखील व श्रद्धेत स्थिर करील.

शुभवर्तमान: लुक २०:२७-३८.

     संत लुकलिखीत शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, परमेश्वर हा मृतांचा देव नसून जीवीतांचा देव आहे नव्या करारात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते कि, ख्रिस्ताला पकडण्यासाठी शास्री, परुशी व सदुकी योग्य वेळेची वाट पाहून त्यास संभ्रमात टाकण्यासाठी वेग-वेगळे प्रश्न विचारत असत आणि अशातलाच एक प्रश्न आजच्या शुभवर्तमान आपल्याला ऐकावयास मिळतो. येशू ख्रिस्त त्याला विचारलेल्या पुनरुत्थानाच्या प्रश्नाला परलोकविद्येने अचूक उत्तर देतो.

बोधकथा:

     एकदा बिशप फुल्टन शीन एका गावात भेट देण्यासाठी गेले होते. घरांना भेटी देत असताना ते एका छोट्याश्या झोपडीकडे आले; तेव्हा त्या गावाच्या अधिकाऱ्याने बिशप महाशयांना सांगितले कि, ‘कृपया त्या घरात जाऊ नका, कारण त्या घरात एक कुष्ठरोगी स्री राहते. तिचे संपूर्ण शरीर घायाने भरलेले असून त्यातून दुर्गंधी व रक्त येत आहे. ते ऐकून बिशप फुल्टन शीन ह्यांनी निर्धार केला कि, ते त्या कुष्टरोगी स्त्रीला भेट देणारच. जेव्हा बिशप महाशय तिच्या झोपडीत गेले, तेव्हा त्यांनी पहिले की, तिच्या शरीराच्या घायातून रक्त वाहते व संपूर्ण घराला दुर्गंधी पसरलेली आहे. परंतु ह्या परिस्थितीत सुद्धा तिचा चेहऱ्यावर स्मित हास्य व एक वेगळाच आनंद होता. हे पाहून बिशप महाशयांना आश्चर्य वाटले व त्यांनी विचारले, ‘तुमचे शरीर रक्ताने वाहत आहे आणि तुम्हांला वेदना होत आहे तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद कसा?’ ह्यावर त्या स्त्रीने उत्तर दिले, “जरी माझे शरीर घायांनी भरलेले असले आणि त्यातून रक्त वाहत असले तरी प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मृत्यनंतर शेवटच्या दिवशी तो मला पुन्हा उठवील व ह्या कुष्ठरोगी शरीराचे रुपांतर अविनाशी व निरोगी शरीरात करील आणि मी प्रभू येशुच्या पुनरुत्थानाच्या विजयामध्ये सहभागी होईन.”

मनन चिंतन:

            शुभवर्तमानात आपण पाहतो कि, काही सदुकी जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीत ते येशू समोर येऊन त्याची परीक्षा पाहण्यासाठी पुनरुत्थानाबद्दल प्रश्न विचारून एक दाखला सांगतात कि, ‘एका घरात सात भावांनी एका पाठोपाठ एका स्रीशी लग्न केलं, आता जेव्हा ते सर्व मरण पावले तेव्हा पुनरुत्थानावेळी ती स्री कोणाची बायको असणार?’
            हा दाखला काही नवीन नव्हता तर एक परंपरा होती कि, मुल-बाळ न होता मोठा भाऊ मरण पावल्यास त्याच्या पत्नीला धाकट्या भावाने घ्यावे व मुले वाढवावीत; असे मोशेने दिलेला नियमशास्र बोध होता. दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मुलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा पुरुषाशी लग्न करू नये तर दिरानेच तिला पत्नी म्हणून स्विकारावे व दिराचे कर्तव्य निभवावे (अनुवाद २५:५). अशी परंपरा आपण उत्पत्ती ह्या पुस्तकात सुद्धा पाहतो जेथे यहूदा ह्याने तर त्याचा भाऊ ओनानह्या त्याच्या मरण पावलेल्या भावाच्या बायाकोपाशी झोपून तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वागण्याचे सांगितले व तिच्यापासून वंश चालविण्याचे सांगितले (उत्पत्ती ३८:८).
     हे सदुकी शिकलेले असल्या करणाने त्यांना नियमशास्र ठाऊक होते. म्हणून जेव्हा प्रभू येशु पुनरुत्थानाबद्दल बोलतो तेव्हा हे सदुकी असा फसवा प्रश्न विचारतात व येशूच्या उत्तराची वाट पाहतात. येशूचे पहिले उत्तर हे लग्नाबद्दल होते कि, लग्न करणे व लग्न करून घेणे हे फक्त पृथ्वीवरच आहे. नाती-गोती हि फक्त ह्या जगाची आहेत. आईवडील, भाऊ-बहिण, मामा-मामी इत्यादी सर्व ह्या युगाचे आहे. ह्या युगात अशी नाती होतात व मरणानंतर नाहीशी होतात, पण येणाऱ्या सार्वकालिक युगात असे चालत नाही. कारण सदुकी लोकांना वाटले कि, ह्या युगातले संबंध येणाऱ्या युगात चालू राहतील. दुसऱ्या वेळेस येशु ख्रिस्त पुनरुत्थानाबद्दल म्हणतो कि, ‘येणारे युग जिथे मी आणि माझा स्वर्गीय पिता आहे ते युग सार्वकालीक आहे तिथे सर्वजण हे देवदुताप्रमाणे असतात, तेथे नाती-गोती चालत नाही. तिथे भूतलासारखे कोणतेही संबंध नाहीत. तिथे फक्त एकच संबंध आणि तो म्हणजे आपण ख्रिस्ताप्रमाणे एक आहोत. देव मेलेल्यांना सुद्धा उठवतो असे आपणास मोशेने नियमशास्रात लिहिल्याप्रमाणे पहायला मिळते. कारण देव मेलेल्यांचाच नव्हे तर जिवंतांचा देव आहे आणि सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत (लुक २०:३७).
     आपला पुनरुत्थित येशूवर विश्वास आहे का? आपण जीवंतांचा देव ह्याच्यावर विश्वास ठेवतो का? कि सदुकी प्रमाणे ह्या युगातील नाती गोती करण्यामध्ये गुंतलेले आहोत?  येशू म्हणतो, ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल’ (योहान ११:२५). ज्यांनी विश्वास ठेवला ते आज ख्रिस्तामध्ये सार्वकालिक आनंद भोगत आहेत काहीजण संतगणांमध्ये सहभागी झालेले आहेत, म्हणून आज एकत्र जमले असताना त्या पुनरुत्थित येशू ख्रिस्ताकडे याचना करूया कि आपला त्यावरील विश्वास वाढावा व आपणालाही त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होण्याची कृपा मिळावी.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझ्या पुनरुत्थानात सहभागी कर.


१. आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात अहोरात्र कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी आपल्या कार्याद्वारे बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोत, निराशेने बरेच लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशांना ख्रिस्ताच्या आशेचा शुभसंदेश प्राप्त व्हावा व त्यांना नवचैतन्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. काही लोक हे पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाहीत व दुसऱ्यांना विश्वासू लोकांचा विश्वास उध्वस्त करून त्यांस येशुपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment