Wednesday 16 November 2016

Reflection for the Homily of Solemnity of Christ the King (20-11-16) by Br Amit D’Britto



ख्रिस्तराजाचा सण

दिनांक: २०/११/१६.
पहिले वाचन: २शमुवेल ५:१-३.
दुसरे वाचन: पौलचे कलस्सैकरांस पत्र १:१२-२०.
शुभवर्तमान: लुक २३:३५-४३.




तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.


प्रस्तावना:

आज देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. तसेच सामान्य काळातील ह्या शेवटच्या रविवारी प्रभू येशूला राजा म्हणून सन्मानीत करणे हे अतिशय योग्य आहे. येशूला प्रभू-ख्रिस्त, देवपुत्र, तारणकर्ता, रक्षणकर्ता अशा अनेक आध्यात्मिक शिर्षकांनी गौरविले गेले आहे; परंतु ‘पृथ्वीवरील राजा’ हे शिर्षक त्यास समर्पक वाटते. देवाने येशूला मरणातून उठवून आपल्या उजवीकडे बसविले व त्याला स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्वसत्ता मिळवून दिली. ख्रिस्त हा अखिल विश्वाचा व प्रत्येक व्यक्तीचा राजा आहे, अशी भावना आपणामध्ये आजच्या उपसानेद्वारे जागृत केली जात आहे.
आजच्या लूकलिखित शुभवर्तमानात येशु ख्रिस्त एका विश्वासू चोराला त्याच्या स्वर्ग-ऐश्वर्यात तारणाचे आश्वासन देतो. प्रभू येशु ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा राजा व तारणकर्ता आहे. वधस्तंभावरील त्या चोराप्रमाणे आपल्याला सुद्धा तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: २शमुवेल ५:१-३.

दावीद इस्रायल राष्ट्रांचा राजा होतो हे प्रस्तुत उताऱ्यातून स्पष्ट करून दिले आहे. इस्रायलच्या सर्व वंशाकडून दावीदला राजा होण्यासाठी विनंती केली गेली. मग इस्रायलच्या सर्व वडिलजनांनी हेब्रोनात एकत्र येऊन दावीदचा अभिषेक केला आणि त्याला इस्रायलवर राजा म्हणून नेमले.

दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र १:१२-२०.

संत पौलने कलस्सैकरांस लिहिलेल्या बोधपत्रात ख्रिस्ताच्या सर्वाधिकाराचे योग्य रितीने विवरण केलेले दिसून येते. कारण प्रभू येशु ख्रिस्त हा सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. पृथ्वीवर आणि आकाशात असलेले, दृश्य आणि अदृश्य असे सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताला सर्वाधिक प्राधान्य व वर्चस्व प्रदान करण्यात आले.

शुभवर्तमान:  लुक २३:३५-४३.

लूकलिखित शुभवर्तमानात आपल्याला आपल्या विश्वासाचे रहस्याचे दर्शन घडते. येशू ख्रिस्त क्रूसावर मरत असताना त्याला आपला तारणकर्ता व राजा म्हणून घोषित करण्यात येते. लुकलिखित शुभवर्तमानाचा मुख्य विषय हा तारण असा आहे व हेच आज आपल्याला शुभवर्तमानात दर्शनास येते. येशू ख्रिस्त हा राजा आहे पण ही गोष्ट फक्त ज्यांचा दृढ विश्वास आहे तेच मान्य करतात.
येशूला वधस्तंभावर खिळतांना त्याची फार निंदानालस्ती करण्यात आली होती. तसेच त्याला ‘यहुद्यांचा राजा’ असे शिर्षकही त्याचा उपहास म्हणून दिले गेले. वधस्तंभावर खिळलेल्या एका अपराध्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्यास म्हटले कि, “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” त्याच्या विश्वासाचे फळ म्हणून येशु त्यास म्हणतो, “तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील” (लुक २३:४३).

बोधकथा:
एकेकाळी शबीर नावाचा एक राजा ह्या भूतलावर राहत होता. हा राजा फार दयाळू व प्रेमळ होता. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती व त्याला खूप मान व सन्मान मिळत होता.
एकदा देवाला ह्या राजाची परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी देवाने राजाच्या महालात एके दिवशी भर दुपारी, एका कबुतराला पाठवले व त्या पाठोपाठ एक ससाणा सुद्धा तिथे हजर झाला व हा ससाणा त्या कबुतराला आपले भक्ष बनवून त्यावर मेजवानी करणार होता. पण इतक्यात हे सर्व राजाच्या लक्षात येते व तो त्या कबुतराला पकडतो व ससाण्याला म्हणतो, “कृपया ह्या कबुतराला मारू नकोस.” तेव्हा ससाणा उत्तरतो, “जर मी ह्या कबुतराला खाल्ले नाही तर मी उपवासाने मरून जाईन. मी सुद्धा एक पक्षी आहे व हे कबुतर माझे अन्न आहे तर मग तुझा दयाळूपणा फक्त ह्या कबुतरासाठीच का? व माझ्यावर असा अन्याय कशासाठी?”
तेव्हा दयाळू राजा विचारपूर्वकतेने म्हणाला, “मी तुला तुझ्या भोजनापासून हिरावून घेणार नाही; त्यामुळे मी तुला ह्या कबुतराऐवजी दुसरे मांस देतो. तेंव्हा ससाणा म्हणाला, “मला तुमची अट मान्य आहे, परंतु दुसरे मांस देण्यासाठी तुम्हाला दुसरा जीव घ्यावा लागेल”. परंतु राजा म्हणाला “नाही, मी तुला माझे स्वत:चे मांस देईन”. मग राजाने एक तराजू मागवला व एका पारड्यात कबुतराला ठेवले व दुसऱ्या पारड्यात त्याने स्वत:चे मांस कापून ठेवले परंतु राजाच्या असे लक्षात आले कि, पारड्यातील कबुतराचे वजन कितीही मांस ठेवले तरी कमी होत नव्हते. तेव्हा प्रेमळ राजा स्वत: तराजूच्या दुसऱ्या पारड्यात चढला व म्हणाला, “तू त्या काबुतराऐवजी मला खा”. त्याचवेळी स्वर्गातून देव हे सर्व पाहत होता. तेव्हा देवाने राजावर पुष्पांचा वर्षाव करून त्यास शाबासकी दिली व त्याना आशीर्वाद दिला.
     ह्या कथेतील राजा दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी आपला स्वत:चा जीव देण्यास तयार होता. आज आपण ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत आहोत. ह्या ख्रिस्त राजाने सुद्धा आपल्या सर्वांच्या तारणासाठी वधस्तंभावर मरण पत्करले. येशु ख्रिस्त हा अतिशय प्रेमळ, दयाळू व क्षमेचे जीवन जगून आपल्याला योग्य असा आदर्श देत आहे.

मनन चिंतन:
     आज आपण ख्रिस्त राजाचा सण साजरा करत आहोत. जेव्हा आपण ‘राजा’ हे शिर्षक ऐकतो तेव्हा आपल्यासमोर कोणती प्रतिमा झळकते: आपल्या समोर विशेषत: रत्नजडीत वस्त्रे, मुकुट, सामर्थ्य, अधिकार, श्रीमंती तसेच अनेक शाही वेष परिधान केलेले सैनिक असे चित्र निर्माण होते.
     परंतु आज आपण ज्या राजाचा सण साजरा करीत आहोत तो ह्या प्रकारचा राजा नव्हता. आपला राजा येशु ख्रिस्त दोन अपराध्यांबरोबर क्रुसावर टांगून मरण पावला. येशु ख्रिस्ताजवळ रत्ने, सोने, सैनिक, नोकर व श्रीमंती असे काहीएक नव्हते.
येशु ख्रिस्त ह्या जगात राजकीय अधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक साम्राज्य पसरविण्यासाठी आला होता. ख्रिस्ताचे साम्राज्य हे धार्मिक व मूल्यांनी भरलेले होते. जेव्हा पिलाताने येशूला विचाले, “तू यहुद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती” (योहान १८:३३,३६) येशु ख्रिस्ताचे साम्राज्य हे भौगोलिक नसून ते अध्यात्मिक व सार्वकालिक आहे. त्याची सत्ता सर्व लोकांवर व सर्व राष्ट्रांवर पसरली आहे. ख्रिस्ताचे सार्वभौमत्व हे फक्त ख्रिस्ती लोकांवरच नव्हे तर साऱ्या पृथ्वीवर पसरलेले आहे.
     प्रभू येशु ख्रिस्त ह्या पृथ्वीवर त्याचे साम्राज्य पसरवण्यासाठी आला आहे. आपण सर्वांनी ह्या प्रभूच्या साम्राज्याचे प्रजा-जन व्हावे असा येशूचा हेतू होता कारण त्याद्वारेच आपल्याला तारणाचे दार उघडणार होते. प्रभू येशूच्या साम्राज्यात विलीन होण्यासाठी आपल्याला येशूने दिलेल्या शिकवणुकीचे योग्य असे अनुसरण करावे लागेल. येशूने दिलेल्या प्रीतीचा व क्षमेचा मार्ग आपणास अवलंबावा लागेल. कारण त्याद्वारेच आपणास मोक्ष प्राप्त होईल.
     येशूचे राजेपद हे सौम्यता, नम्रता, प्रेम व सेवा ह्या मूल्यांनी भरलेले होते. तो स्वत: जरी राजा असला, तरी तो सेवक म्हणून जीवन जगला. प्रभू येशु त्याच्या प्रजेवर खूप प्रेम करतो. तो त्यांच्यावर मरेपर्यंत प्रेम करतो कारण त्याचा हेतू व स्वप्न हे, आपण नेहमी त्याच्याबरोबर असावे असा आहे. ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो; किंवा एखादा पक्षी आपल्या पिल्लांना एकत्र जमवून त्याच्या पंखाखाली उब देतो किंवा एखादी आई आपल्या बाळाचे पालनपोषण करते ह्या सर्वांपेक्षा अधिकतम रितीने येशु ख्रिस्त त्याच्या प्रजा-जनांवर  प्रेम करून त्यांना जवळ करीत असतो.
     जर आपला राजा आपल्यावर इतके प्रेम करीत असेल तर आपण सुद्धा त्याला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. कारण हे प्रेमाचे दळण-वळण फक्त ऐकेरी मार्गाने होत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. ‘जी आई आपल्या मुलांवर प्रेम करते तीच आई वृद्धावस्थेत तेच प्रेम परत मिळण्याची वाट पाहत असते’.
     आज शुभवर्तमानात आपण पाहतो कि, एक अपराधी येशूची निंदा करीत होता. परंतु दुसरा अपराधी ह्याने येशुवरील विश्वास प्रकट करून स्वत:चे तारण करण्याची विनंती केली. येशु ख्रिस्ताने त्याला त्याच्या विश्वासाचे प्रतिफळ म्हणून स्वर्गराज्याचे सुख बहाल केले. आज आपण ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत असताना आपणाला सुद्धा स्वर्गराज्याचा अनुभव यावा यासाठी प्रभूला आपल्या हृदयाचा राजा बनवूया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझे राज्य येवो.

१. आपले पोप फ्रान्सीस सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे, त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व राजकीय अधिकारी व नेते ह्यांनी सर्वत्र प्रभू येशुप्रमाणे सुखा-समाधानाचे व आनंदाचे साम्राज्य पसरवावे म्हणून प्रार्थना करूया.
३. जे लोक आजारी व दुःखी आणि संकटांनी ग्रासलेले आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज आपण ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत असताना प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याच्या राज्याचा आपल्या जीवनात स्वीकार करण्यासाठी प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.








1 comment: