Tuesday, 24 April 2018

 Reflection for the Homily of 5th  Sunday Of Easter 
(29-04-2018) By Br. Cedrick Dapki






पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार

दिनांक: २९/४/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ९: २६ -३१
दुसरे वाचन: १ योहान: ३: १८-२४
शुभवर्तमान: योहान: १५: १-८






“जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो.”

प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आज आपण पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपणास फक्त एकच संदेश देत आहे आणि तो म्हणजे आपण ख्रिस्ताचे आहोत आणि नेहमी ख्रिस्तामध्ये राहिलो पाहिजे. आपले ध्येय व आपला केंद्रबिंदू फक्त ख्रिस्तच राहिला पाहिजे. आपण जर त्याच्यात राहिलो तरच आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की शौल ह्यास दिमिष्का(Damascus) मध्ये येशूचे दर्शन झाले व तद्नंतर कसे त्याने पौल बनून धेर्याने येशू बद्दल भाषण केले व म्हणूनच त्यास शिष्यामध्ये गणण्यात आले.
     दुसऱ्या वाचनात संत योहान सांगतो की देवाने आपणास एक आज्ञा केली आहे. आपण सर्वांनी येशूवर विश्वास ठेवावा व एकमेकांवर प्रेम करावे. आपण येशू ख्रिस्तामध्ये राहिल्या शिवाय आपला बचाव होऊ शकत नाही.
     पुढे शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने द्राक्षवेलीचा दाखला देत म्हटले आहे की, तो एक द्राक्षवेल आहे आणि आपण सर्व त्याच्या फांद्या आहोत आणि जर ह्या फांद्या तुटून गेल्या तर त्याचा नाश होतो. म्हणूनच येशूख्रिस्त सांगत आहे, तुम्ही मला चिटकून रहा, माझ्या बरोबर रहा, म्हणजे तुम्हास सार्वकालिक जीवन लाभेल.
     आज ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना प्रभूकडे विशेष प्रार्थना   करूया की आपल्याला नेहमी येशूच्या सानिध्यात राहण्यास व त्याच्या नावाने सुवार्ता  संपूर्ण जगभरात पसरविण्यासाठी कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ९: २६ -३१

     शौल हा यहुदी धर्मियाचा परुषी असल्या कारणाने तो सतत ख्रिस्ती बांधवांचा छळ करीत असे. परंतु अचानक जेव्हा त्याला येशूचे दर्शन झाले तेव्हा त्याच्यात बद्दल झाला. त्याने ख्रिस्ती बांधवांचा छळ करण्यास बंद केले व तो पुनरुत्थित येशूची सुवार्ता सर्व लोकांना सांगू लागला. हे जेव्हा येशूच्या शिष्यांना माहित पडले तेव्हा त्यांना हे पटले नाही. कारण त्यांना माहित होते की शौल कोण होता. पंरतु बर्णबा ह्याने येशूच्या शिष्यास सांगितले की शौलाला येशू ख्रिस्ताचे दर्शन झाल्यानंतर येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान वेगवेगळ्या ठिकाणी विशेष करून येरुसलेमेत त्याने सांगावयास सुरुवात केली आहे व तो ख्रिस्ताचा खरा शिष्य बनला आहे अशी आहुती दिली तेव्हा त्यांना बर्णबाचे मनने पटले व त्यांनी शौलाला शिष्यगणात सामील करून घेतले व ह्या नंतर पौल येशूची सुवार्ता आधिक हिमंतीने लोकांस सांगू लागला.


दुसरे वाचन: १ योहान: ३: १८-२४

     संत योहान हा येशूचा प्रिय शिष्य होता आणि नेहमी तो येशू बरोबर असे म्हणूनच त्यास खूप काही येशू बद्दल माहीत होते आणि तो ते शुभवर्तमानाद्वारे व त्याच्या पत्राद्वारे आपणास जाहीर करतो.
योहान आपणास सांगत आहे की दुसऱ्यासाठी आपले प्रेम हे नेहमी कृतीद्वारे प्रकट केले पाहिजे. तरच ते खरे प्रेम असते. येशू ख्रिस्ताने फक्त म्हटले नाही की मी जगावर प्रेम करतो तर त्याने ते कृतीत आणले. ते प्रेम आपण पवित्र शुक्रवारी पाहिले जेव्हा त्याने आपल्या प्रेमा खातीर क्रुसावर मरण पतकारले.
आपण ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगत आहोत कारण हे जीवन त्याने आपणास दिले आहे. म्हणून हे आपले आद्य कर्तव्य आहे की आपण आपले देवा वरील प्रेम  कृतीद्वारे प्रकट केले पहिले. जर आपण हे स्वच्छ हृदयाने व मनाने केले तर त्यासाठी लागणारी ताकद व धेर्य येशू ख्रिस्त खुद्द आपणास देतो व आपले फळ सार्वकाळीक  जीवन म्हणूनच बहाल करतो.

शुभवर्तमान: योहान: १५: १-८

     शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणास द्राक्षवेलाचा दाखला देत आहे. तो येथे स्वतःला द्राक्षवेल व आपण त्याच्या फांद्या असे संबोधतो. जो पर्यंत एखादी फांदी झाडाला चिकटलेली असते तो पर्यंत ती फलद्रूप असते व माळीतर्फे त्याची काळजी घेतली जाते परंतु जेव्हा ती फांदी फळे देण्यास थांबते तेव्हा मात्र ती कापली जाते.
हा दाखला आपल्या जीवनासाठी खूप अपायकारक आहे व आपल्या जीवनाशी खूप निघडित आहे. जर आपण येशू ख्रिस्ताशी जुळलेलो राहलो नाही तर आपला सुद्धा नाश होऊ शकतो. आपण जर फलद्रूप राहीलो नाही तर आपणास सुद्धा येशू जवळून काढले जाऊ शकते. म्हणूनच येशू ख्रिस्ताशी जूळलेले राहण्यासाठी आपणास फक्त एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे विश्वास. विश्वासाने येशूख्रिस्त आपल्या बरोबर आहे आणि आपल्या ह्या विश्वासाने दुसऱ्यांना देखील आपण येशूख्रिस्ता जवळ आणू शकतो.

बोधकथा:

     एकदा एक मनुष्य असाच जगलात फिरत असताना त्याला एक गरूडाचे अंड भेटले, तो ते अंड घेऊन घरी आला व त्याच्या घरी असलेल्या कोंबडी खाली उबत असलेल्या अंड्यात ठेवले. काही दिवसांनी त्या सर्व अंड्यातून पिल्ले बाहेर आली. तसेच ते गरुड पक्षी ही, छोट्या अवस्थेत सर्व पिल्लान सारखेच दिसत असल्या कारणाने त्यांच्यात काही बद्दल दिसत नव्हता. ते गरुड पक्षी कोंबडीच्या पिल्लाबरोबर त्या पिल्ला सारखेच वाढू लागले व कोंबडीच्या पिल्लासारखेच वागू लागले. जे अन्न कोंबडीचे पिल्ले खात असत तेच अन्न गरुड पक्षी ही खात असे. जेव्हा ते गरुडपक्षी वाढले तेव्हा त्याच्या शरीर रचनेत अनेक बद्दल झाला होता पण त्याने स्वतःला कधीच विचारून घेतले नाही की माझे खरे अस्तित्व काय आहे ते आणि संपूर्ण जीवन तसेच घालवले.
एक दिवस त्याने निळ्या आकाक्षात एक पक्षी त्याची सुंदर पंखे पसरवून भरारी घेत असताना पहिले. हे दृष्य पाहून त्याने एका दुसऱ्या कोंबडीला सांगितले की ते बघ किती सुंदर पक्षी आहे. तेव्हा ती कोंबडी त्यास म्हणाली की तो एक गरुडपक्षी आहे व आपण त्याच्या सारखे कधीच होऊ शकत नाही. अशा ह्या नकारत्मक उतराणे तो गरुडपक्षी जो कोंबडी बरोबर वाढला त्याने उडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि असेच कोंबडी सारखे जीवन जगून शेवटी मरण पावला.

मनन चिंतन:

     आपले जीवन ही कधी त्या पक्षा सारखे असते. आपण कोण आहोत आपले अस्तित्व काय आहे, आपला परीचय काय हे सर्व प्रथम जाणून घेणे खूप गरजेचे आहे व महत्त्वाचे आहे. मनुष्य हा एक झाडाच्या फांद्या सारखा आहे आणि हे आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणत्या झाडाच्या खोडाला चिकटलेले आहोत. काटेरी झाडाला काटे येतात, फुलांच्या झाडाला फुले व फळांच्या झाडाला फळे येतात. आपण कोणते झाड निवडतो?
येशू ख्रिस्त सांगत आहे की जसा मी माझ्या पित्यामध्ये आहे तसे तुम्हीही माझ्यामध्ये रहा, मला निवडा तेव्हाच तुम्ही फलद्रूप होऊ शकता, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना माझा अनुभव देऊ शकता. संत मदर तेरेजा म्हणतात, “तुमच्याकडे जेव्हा काही असेल तरच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता, परंतु तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही काहीच देऊ शकत नाही.” जर तुमच्याकडे ख्रिस्त नसेल, ख्रिस्ताचा अनुभव नसेल तर दुसऱ्यांना ख्रिस्त कसा देणार? त्यामुळेच आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणे फार गरजेचे आहे.
     येशूख्रिस्त सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे आणि खरा म्हणजे सत्य, अस्सल, वैध्य असा ही होतो. म्हणजे आपणासाठी येशू ख्रिस्तच सत्य अस्तित्व आहे. ज्याच्याविणा आपण शून्य आहोत. आपण ख्रिस्ताशी जुळण्याचा प्रयत्न खूप करतो परंतु काहीजण आपल्या जीवनात अशा व्यक्ती येतात ज्या आपणास ख्रिस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या मुळे आपली परिस्थिती एखाद्या अशा फांदी सारखी होते जिथे आपण ख्रिस्ताशी जुळलेले आहोत पंरतू अशा नकारात्मक व्यक्तीमुळे फलद्रूप होत नाही. आपण दुसऱ्याच्या कामी पडत नाहीत.  दुसऱ्यांना ख्रिस्त देऊ शकत नाहीत. आपली स्थिती त्या कोंबडी बरोबर वावरलेल्या गरुड पक्षा सारखी होते. जर त्या पक्षाला प्रोत्साहित केले असते तर त्या पक्षाने आकाक्षात उंच भरारी मारली असती व त्याचे अस्तित्व जाणून घेतले असते. परंतु त्यास परावृत्त केल्याने ते मरण पावले. अशा ह्या पक्षा प्रमाणे आपणही मरून जातो व आपणास ख्रिस्ता पासून दूर केले जाते. अशा मुळे आपल्या जीवनाचा नाश होतो व आपले अस्तित्व नष्ट होते.
     या उलट जर आपण त्याच्याशी एक निष्ठ राहीलो, त्याला चिकटलेले राहीलो तर आपण फलद्रूप होऊ शकतो. आपली काळजी घेतली जावू शकते. आपल्याला नवजीवन मिळू शकते. आपणामध्ये ख्रिस्त वास करु शकतो व तो ख्रिस्त आपण दुसऱ्यांच्या  जीवनात देऊ शकतो, म्हणून आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी शिकले पहिजे, त्याच्या सारखे जीवन जगलो पाहिजे म्हणजेच आपला नाश न होता आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे पुनरुत्थित दर्शन घडवून दे.

1.     ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी तसेच प्रापंचिक ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्यासाठी जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण  प्रार्थना करूया.
2.     जे लोक देऊळमाते पासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि तसेच त्यांना त्याच्या अपराधांची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.     जे लोक दुःखी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्याचा आत्मविश्वास ढासळत आहे अशांना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.
4.     जे कोणी आजारी आहेत, विविध आजारांनी त्रासलेले आहेत, खाटेला खिळलेले आहेत अशा सर्वांना पुनरुत्थित प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांना चागले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.     आता थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजीक व व्यक्तीक गरजासाठी प्रार्थना करूया.    




Tuesday, 17 April 2018


Reflection for the Homily of 4th  Sunday Of Easter 

(22-04-2018) By Br  Lavet Fernandes. 





पुनरुत्थान काळातील चौथा रविवार

दिनांक: २२/४/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२
शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८





प्रस्तावना:

     आज देऊळ माता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास दृढ करण्यास आव्हान करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संत पेत्राने कश्याप्रकारे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यास बरे केले व त्यांना चांगले आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की “जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.
तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेरित करत आहे की, “येशू ख्रिस्त हा आपला उत्तम मेंढपाळ आहे”. ज्या प्रमाणे एखादा मेंढपाळ त्याच्या मेंढरावर प्रीती करतो, त्यांचा सांभाळ करतो व त्यांचा संकटापासून बचाव करतो त्याचं प्रमाणे येशू ख्रिस्त एक मेंढपाळ असून आपल्या मेंढरावर म्हणजेच आपल्यावर प्रिती करतो,  आपला सांभाळ करतो व आपले  संरक्षण करतो.
     आज आपण सर्वजण येथे ह्या पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

     पेत्राने मंदिराच्या अंगणात जमलेल्या लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे आव्हान केले. पुष्कळांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु मेलेले जिवंत होतील यावर लोकांचा विश्वास नव्हता. म्हणूनच येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे हे एकूण त्यांना राग आला व त्यांनी पेत्र व योहान ह्यांना अटक केले.
     दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धर्म सभेसमोर आणले व विचारले की, तुम्हाला ह्या पांगळ्याना बरे करण्याचे सामर्थ कोठून मिळाले व कोणत्या व्यक्तीने तुम्हाला हा अधिकार दिला? त्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दरडावून विचारताच पेत्राला ख्रिस्ताविषयी सांगण्याची नामी संधी मिळाली.
     ज्या व्यक्तीने आम्हाला हा अधिकार दिला ती दुसरी कोणी नसून तो येशू ख्रिस्त आहे. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याचं येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही लोकांना बरे करीत आहोत. येशू मरणातून उठला आहे व जिवंत आहे. त्याला तुम्ही नाकारले पण तोच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. ज्याच्याकडून तारण मिळाले असा येशू हा आजही एकच आहे. या शब्दांत पेत्राने येशू ख्रिस्ताची श्रेष्ठता सांगितली.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

     ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना ‘देवाची मुले’ हे नाव देवाने दिले आहे. यावरून देवाने किती प्रिती केली आहे ते आपणास समजते. परंतु जगातल्या लोकांना हे कळत नाही व ते लोक तारण पावलेल्या देवाची मुले म्हणून ओळखले जात नाहीत कारण जगातले लोक ख्रिस्त कोण आहे हे ओळखत नाहीत.
     जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा देवाची मुले बदलली जातील, त्यांना नवे शरीर प्राप्त होईल व ख्रिस्ताला पाहून हा बदल घडून येईल.

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

     येशू ख्रिस्त हा चांगला मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त हा आपल्या मेंढरांवर प्रीती करतो. आपल्या मेंढरांचे रक्षण करण्यासाठी तो मेंढरंबरोबर असतो. एखादा चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांचे कसे संरक्षण करतो याचे उदाहरण आपल्याला येशू ख्रिस्त देतो.
 मेंढरांचे संरक्षण करताना मरण पत्करण्यास मी तयार आहे असे तो म्हणत नाही. मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. कारण मनुष्याला सार्वकालिक जीवन देता यावे यासाठी येशू ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला ही पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे तर येशू ख्रिस्ताला आपला प्राण परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्त मरण  पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून उठला व जिवंत झाला.

बोधकथा:

     एका माळरानात ३.४ फुट उंचीच गवत पावसाच्या दिवसात वाढल होत आणि पावसाळा संपल्यावर ते उन्हामुळे सुकून गेल होत. सततच्या वाऱ्याच्या झुलकीबरोबर ते डावीकडे-उजवीकडे हलायचं आणि हलून वाकायचं व परत सरळ उभं व्हायचं. जेथे हे गवत वाढलं होत त्याचं जागी एक झावळ्यांनी आकारलेली एक झोपडी होती. त्या झोपडीत एक बाळंत झालेली, दोन महिन्याचं बाळ असलेली एक गरीब आदिवासी बाई राहत होती. कधी कधी ती बाई बाळ झोपल्यावर अर्धा तासभर जवळपास काटवऱ्या गोळा करायला जायची.
     एक दिवस संध्याकाळी बाळाला झोपलेलं पाहून ती बाई रानात काटक्या गोळा करायला गेली. तरी पण “घार हिंडे आकाशी, लक्ष तिचं पिलापाशी”.  काही अंतरावरून झोपडीच्या शेजारी तिने धुराचे लोट पाहिले आणि ती धावत धावत घरी पोहोचली. पाहते तर जीवघेण संकट पुढ्यात असल्याचं तिने पाहिलं. झोपडीच्या समोर असलेलं उभं सुक गवत विरुद्ध बाजूने पेटलं होत आणि १०-१२ मिनिटाच्या आत ते पेटत पेटत झोपडी देखील पेटून राख होणार होती. झोपडीत तर तिचं सोनुल बाळ झोपलेलं होता, बाळाला वाचवण्याचा एकच मार्ग तिच्यापुढे शिल्लक राहिला होता. तो म्हणजे आगीबरोबर संघर्ष करणे. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी ती बाई ह्या संघर्षाला सज्ज झाली.
     कारण वेळ कमी होता. वाऱ्याने ते गवत लवकर लवकर तडतड करीत पेटत राहिलं आणि त्या बाईपर्यंत पोहोचलं आणि लवकरच विझल देखील परंतु ती असमर्थ बाई बाळाला वाचवण्यासाठी तेथे पडूनच राहिली. ती बाई भाजली गेली, त्या जीवघेण्या आगीत किंचाळली आणि गतप्राण झाली. तेवढ्यात अंधार पडून रात्र सुरु झाली होती.
     सकाळी काही आदिवासी तेथून जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज एकू आला व ते त्या दिशेने धावून घेले. बार्ई तर आडवी होऊन मेली होती आणि तिच्या अंगाखालुन रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी त्या बाईचा मुडदा हाताने हलवून बाजूला केला तर खड्ड्यामध्ये त्यांना जिवंत बाळ सापडलं. त्या बाईने बाळाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान केले हे त्यांना दिसले आणि ते आश्चर्यचकित झाले.

मनन चिंतन:

     येशू ख्रिस्त हा एक उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांना ओळखतो कारण आपण त्याची मेंढरे आहोत. येशू ख्रिस्तामध्ये व आपल्यामध्ये एक अतूट असे नाते आहे. हे नाते साधे सुधे नाही तर ते नाते पवित्र आत्म्याने जोडलेले आहे. मेंढपाळला त्याची मेंढरे कोणती, हे माहित असते. येशू ख्रिस्त, आपला मेंढपाळ, आपल्याला नावानिशी ओळखतो. कारण आपण त्याचे मेंढरे आहोत, म्हणून आपला प्रतिसाद मेंढरासारखा असायला पाहिजे. आपण मेंढपाळाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहण्याचा व जवळ जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बायबल वाचन होय.
मेंढपाळाचे मेंढरावर खूप प्रेम असते व त्यांच्यासाठी प्राणदेखील देण्यास तो तयार असतो. त्यांचे विशेष कार्य म्हणजे सर्व मेंढरांचा साभांळ करणे व त्यांचे सर्व संकटापासून संरक्षण करणे.
     प्रभू येशू हा आपला मेंढपाळ आहे. प्रभू येशू आपल्यावर नितांत प्रेम करतो व आपण त्याच्या सानिध्यात राहून त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतो. राजा दाविदाच्या शब्दात आपण देखील आत्मविश्वासाणे म्हटले पाहिजे की, देव माझा मेंढपाळ आहे व तोच माझा साभांळ करीतो.
     आपला उत्तम मेंढपाळ आपली कधीच दिशाभूल करीत नाही, कितीही महाभयंकर संकटाची रांग आपल्या जीवनात आली तरी तो कधीही आपणास सोडून जात नाही, तो आपले आपुलकीने, प्रेमाने संरक्षण करतो. येशू आपल्या जीवनात केवळ रक्षणाचे कार्य करीत नाही तर आपल्याला हिरव्या कुरणात घेऊन जातो. जीवनात  आनंद, कृपा, विविध कला आणि देणग्यांचा आपल्यावर तो वर्षाव करीत असतो. आपल्या मेंढरांचा विकास व्हावा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना सुवर्ण काळाचा अनुभव यावा, शांती, समाधानाने त्यांना जगता यावे म्हणून तो झटत असतो. त्यांच्या मनाचा हृदयाचा, बुद्धीचा, इच्छेचा, भावनेचा, विचारांचा व आत्म्याचा विकास व्हावा ह्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना हिरव्या कुरुणात नेतो.
     उत्तम मेंढपाळ तोच आहे जो त्याच्या मेंढरांना जेव्हा बोलावतो तेव्हा मेंढरे त्याच्या मागे जातात. खरा मेंढपाळ हा कळपाच्या मागे न जाता त्यांच्या पुढे चालतो व त्यांचा साभांळ व संरक्षण करतो.
     आज पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला त्यांच्या मागे येण्यास बोलावत आहे. कारण तो आपल्या मेंढराचा वास घेत असतो. जो आपल्या सर्वांचा उत्तम व श्रेष्ठ मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणास आपल्याला प्रत्येकाच्या नावे हाक मारीत असतो. कारण आपण ह्या आधुनिक काळाच्या व जगाच्या मोह मायामध्ये न गुरफटता व न अडकता, आपण एकनिष्ठेने व स्वच्छेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकुया व सदा-सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.

1.     ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया
2.     आपल्या कुटुंबातील गैरसमज दूरराखून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
3.     जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी  मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4.     जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
5.     आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.



Wednesday, 11 April 2018


 Reflection for the Homily of 3rd  Sunday Of Easter 
(15-04-2018) By Br Camrello D'Mekar. 





 पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार

दिनांक: १५/४/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ३:१३-१५; १७-१९
दुसरे वाचन: १ योहान: २:१-५
शुभवर्तमान: लुक: २४:३५-४८



“मीच तो आहे”
प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनों, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची तिन्ही पवित्र वाचने आपल्याला देवाच्या करुणेची, त्याच्या शांतीची आणि प्रेमळ उपस्थितीचे वर्णन करून देत आहेत. देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा एकदा देवाचे आपल्यावर असलेले प्रेम येशूख्रिस्ताच्या पुनरुत्थानद्वारे आपणास अनुभवण्यास मिळाले.
     पहिल्या वाचनात पेत्र लोकांना सांगत आहे की, ‘पश्चाताप करा’ त्यामुळे पापांची क्षमा होऊ शकते. तसेच ह्या वाचनात येशूचे शिष्य त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष पसरविण्यास मग्न दिसत आहेत.
तर योहानाने लिहिलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की, ख्रिस्त आपल्या पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि आपल्या पापांचे प्रायश्चित ख्रिस्ताने त्याच्या आत्मसमर्पणाद्वारे केले.
शुभवर्तमानकार लुक आपल्याला येशूख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी ची घटना कथन करत आहे. येशू ख्रिस्त प्रथम त्यांना ‘आपल्या शांतीचे वरदान देतो’ आणि ‘तोच पुनरुत्थित ख्रिस्त आहे’ ह्याची खात्री करून देतो व आपल्या शिष्यांना प्रभूच्या नावाने पश्चाताप व क्षमा घोषित करण्याचे कार्य सोपवितो.
आज जर का आपण समाजाकडे जरा निरखून पाहिलं तर आपल्याला समजून येते की जगाला शांतीची, प्रभूयेशूच्या उपस्थितीची आणि क्षमेची नितांत गरज आहे.  ह्या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्ताच्या पुरुत्थानाद्वारे भेटल्या आहेत. ह्या ख्रिस्तयागामध्ये सहभागी होत असताना आपल्याला प्रभूची शांती, त्याची उपस्थिती आणि त्याचे कार्य इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. 
  
सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ३: १३-१५; १७-१९

     खालील उतारा पेंटेकॉस्टच्या भाषणात सुद्धा आढळतो. तसेच येथेही आपणास पहावयास मिळते की ‘लोकांनी येशूला उघड उघड नाकारले’, हा मुद्दा ठामपणे मांडला आहे आणि देवाने त्याचे समर्थन केल्याची ग्वाही दिली आहे. येथे असलेले लोक आरोग्यदानाच्या सामर्थ्याचे साक्षी आहेत तसे शिष्यही येशू संबंधिच्या सर्वच गोष्टींचे साक्षी आहेत. तसेच तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारिले पण देवाने तर त्याला मेलेल्यांमधून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहोत.’
      आपण पाहतो आहोत की, येशुला नाकारणारे लोक अतिशय भयानक होते असे न म्हणता, पेत्राने, ‘त्यांनी जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे’ असे म्हटले. ‘पश्याताप करा व वळा; हे आव्हान त्यांच्या सर्वसाधारण पापांच्या संबंधात केले आहे ते अज्ञानी होते, त्यांना समजले नव्हते असे मुळीच नाही! तसेच येशूला दोषी ठरवण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असलातरी त्यामुळे ते तारण उद्धाराच्या कक्षेत येत नाही असेही नाही.

दुसरे वाचन: १ योहान: २: १-५

     पाप सह्भागिता बिघडवते आणि नष्ट करते. पाप आणि ख्रिस्ती विश्वास यांची जोड आजवरही जमतच नाही. एक आहे तेथे दुसरे नसते. परंतु, ख्रिस्ती लोक पापांमध्ये राहत नसले तरी या जीवनात ते कधीच पूर्णपणे पापमुक्त होत नाहीत. आपण जेव्हा देवाच्या अधिक जवळ येतो तेव्हा  आपली विवेकबुद्धी अधिकाअधिक  संवेदनशील होते आणि आपण पापी आहोत हे आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवते. आपल्या पापी अवस्थेत आपण आपल्या पवित्र देवाकडे जाण्यास सर्वस्वी अपात्र आहोत हे आपणाला समजते, आपल्याला हवे असलेले सहाय्य उपलबद्ध आहे असे आश्वासन योहानाने दिले आहे. ‘आपण पाप केले तर.....पित्याजवळ आपला कैवारी म्हणजे वकील, या शब्दात न्यायालयीन अर्थभाव आहे- बचाव करण्यात प्रतिवादीचा वकील असा त्याचा अर्थ होतो. हे रुपक असे आहे. राजाच्या दरबारी न्यायालयात प्रतिवादी अर्जध्यायला आपली बाजू मांडणारा, राजाशी कानगोष्ट करणारा असा आपल्या स्वतःपेक्षा अधिक थोर असा कैवारी हवा.
     सर्व पापांवर देवाचा क्रोध आहे आणि क्षमा करणे म्हणजे या क्रोधाकडे दुर्लक्ष करणे नव्हे. प्रायश्चित करणे, क्रोध दूर करणे एवढेच ख्रिस्ताचे कार्य नाही तर त्याचे अर्पण सर्व जगाच्या पापांसाठी आहे. प्रायश्चिताच्या या कार्यात पिता आणि पुत्र एक आहेत. ते सर्व दृष्टतेविरुद्ध क्रोधीत आहे; पण पापी लोकांना क्षमा करायची तर प्रथम या क्रोधाला निपटास केला पाहिजे. देव क्षमा करतो त्यात पापावरचा त्याचा क्रोध हाही एक पैलु असतो.

शुभवर्तमान: लुक: २४: ३५-४८

     आपण खरीखुरी व्यक्ती पाहत आहोत आणि ती खरीखुरी व्यक्ती येशूच आहे याची खातरी शिष्यांना पटवून देण्याचे अगत्य होते, तसेच या अलौकिक दर्शनाने त्यांना वाटणारी भीतीही घालवणे जरूर होते. याच कारणाने येशूने त्यांना आपले हाडा मासांचे भौतिक शरीर आणि खिळयांचे व्रण असलेले हात पाय देखील दाखवले. आपल्या उपस्थितीची खात्री करून देताना त्यांच्या बरोबर असताना त्याने काही अन्नपदार्थही सेवन केले.
     सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्याताप व पापक्षमा मिळेल ही घोषणा करण्याची आज्ञा देण्यात आली व ही आज्ञा जुन्या करारातील भाकितांवर आधारली असल्याचेही दाखवण्यात आले.
     त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होते त्या सर्वाना येशूची साक्ष देता यावी म्हणून देवाचे सामर्थ्य मिळेल असे अभिवचन देण्यात आले आहे.

मनन चिंतन:

     आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूख्रिस्ताने दिलेल्या दर्शनाविषयी आपणास ऐकावयास मिळते. पुनरुत्थित झाल्यानंतर येशू खिस्ताने दिलेल्या प्रत्येक दर्शनानंतर प्रभूयेशू शिष्यांना आणि त्याच्या प्रेषितांना सांगतो की, तुम्ही इतरांना सुद्धा सांगा की, ‘प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे. तो पुनरुत्थित झाला आहे. प्रभू येशू त्याच्या दुःखसहन आणि मृत्युद्वारे हादरलेल्या लोकांना एकत्र करीत आहे आणि त्यांच्या समक्ष पुनरुत्थानाच्या गुढीत सत्याचा उलघडा करून देत आहे.
     आजच्या शुभवर्तमानात रेखाटलेली प्रभूयेशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यासमोर महत्वाचे वैशिष्ट निदर्शनात आणत आहे. हे वैशिष्टय प्रत्येक ख्रिस्ती समुद्यात, ख्रिस्ती लोकांमध्ये जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे आणि ते म्हणजे – ‘ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची उपस्थिती आणि ख्रिस्ताचे विचार (हेतू) ह्या तिन्ही गोष्टी ख्रिस्ती समुद्यात वास करतील.
     येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दर्शन दिले तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले पहिले शब्द होते, ‘तुम्हास शांती असो.’ प्रभू येशू त्यांना शांती देतो कारण त्याचे शिष्य गोंधळून गेले होते आणि यहुद्यांच्या भितीमुळे ते भयभीत झालेले होते. त्यांच्या हृदयात पापांची भावना निर्माण झालेली होती कारण त्यांनी येशूख्रिस्ताचा नकार केलेला होता. येशूख्रिस्ताने निवडलेल्या अनुयायांनी त्याला एकटे सोडले होते; जरी त्यांनी मोठ्या प्रखरतेने सांगितले होते की, त्याच्या बरोबर ते अखेरपर्यंत राहणार- त्यांनी मात्र वेगळेच केले. त्यांना समजले होते की, त्यांनी त्यांचा मालक येशू ख्रिस्त ह्याचा विश्वासघात केला होता. त्यांना त्यांच्या कृती बद्दल दुःख झाले होते. मात्र, आता त्यांना घड्याळाचे काटे परत मागे फिरवता येउ शकत नव्हते. मात्र येशूख्रिस्ताला त्यांना झालेल्या पश्चातापाची कल्पना झाली होती. त्यामुळे तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.” ज्यामुळे त्यांना समजेल की, त्यांच्या पापांची त्यांना क्षमा झालेली आहे. ह्या येशूच्या अपार दयेमुळे आणि करुणेमुळे त्यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांच्या आनंदाला उधान आले.
     हाच प्रभूयेशूचा शांतीचा व क्षमेचा संदेश आपल्याला प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये अनुभवयास मिळतो; तसेच प्रत्येक साक्रमेंतामध्ये येशूख्रिस्त देत असतो. क्षमा आणि पश्चाताप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येऊ शकत नाही. ज्या प्रमाणे क्षमा आणि पश्चाताप ह्यंचा संगम एकनिष्ठ आहे. कारण आत्मा शरीराला जिवंत ठेवत असतो आणि शरीरामुळे आत्म्याची अनुभूती आपणास मिळत असते.
     काही व्यक्ती पश्चातापावर विश्वास ठेवतात आणि वेळोवेळी पापकबुलीसाठी धर्मगुरूकडे जात असतात. मात्र खेदाची गोष्ट हीच की, त्यांना त्यांच्या पापांची पूर्णक्षमा झाली नाही, ह्याची त्यांच्या मनात चल-विचल होत राहते. कित्येकांना क्षमेची गरज असते पण त्यांना पश्चाताप करायला आवडत नाही. म्हणूनच जेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टी अनुभवतो तेव्हा आपणास पुनरुत्थानाच्या सत्याची चव कळून येते.
     आपण ह्या भूतलावर/ पृथ्वीवर माणसे (मानव) आहोत. आपण स्वर्गातून उतरलेले दूत नाही. सर्व संत आणि पवित्र स्त्री-पुरुष ह्यांनी त्यांचे जीवन ह्या पृथ्वीवर घालवले आणि समाजात कार्य केले. त्यांना सुद्धा मोह झाले होते, काहीजण तर पापांच्या कहात असताना देवाच्या मदतीने पापांपासुन मुक्त झाले (संत अगस्टीन).  आपणसुद्धा मानव आहोत; आपल्या हातून सुद्धा कळत आणि नकळत कित्येक चुका झाल्या असतील. काहिक चुकांची तिव्रता प्रबल असेल आणि त्याचा परिणाम दुःखदायक असतो. आपण लहानाचे मोठे होत असताना कित्येक अनावश्यक गोष्टींच्या आहारी गेलो असाल; आपण काही दृष्ट कृत्ये केली असतील पण प्रकाशात काळोख नाहीसा होतो, आनंदात दुःख हरवून जाते आणि पाण्यात साखर विरघळून जाते त्याच प्रकारे पश्चातापामुळे आपल्याला नवीन पवित्र जीवन, आध्यात्मिक मुक्ती, क्षमा आणि शांतीचे वरदान मिळते आणि वाईट गोष्टी नाहीशा होत असतात.
     योहान त्याच्या दुसऱ्या पत्रात आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो, ‘जर कोणी पाप केले तर नीतिमान असा तो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. पेत्र आजच्या पहिल्या वाचनातून सांगत आहे की, ‘तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा’. पुनरुत्थानाची एक मौल्यवान भेट जी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आणि आपल्या सर्वांना दिली आहे, ती म्हणजे प्रभूची शांती आणि ही शांती आपल्याद्वारे येशूख्रिस्ताने दिलेल्या क्षमेमार्फत मिळत असते.
तद्नंतर येशूख्रिस्ताची उपस्थिती व प्रचिती आपल्याला आजच्या शुभवर्तमानातून मिळते. येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “तो मीच आहे”. खरोखरच, आज येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे. विश्वासात आपण जेव्हा एकत्रित येऊन प्रार्थना करतो तेव्हा येशूची उपस्थिती आपण अनुभवत असतो. येशू ख्रिस्ताची उपस्थित प्रत्येक वेळी जेव्हा आपण ख्रिस्तयागासाठी एकत्र येतो तेव्हा होत असते. प्रभूयेशूची उपस्थिती सध्याच्या काळात फक्त आपल्याला त्याची आठवण म्हणून होत नाही, येशूख्रिस्त हा एक आदर्श व्यक्ती म्हणून होत नाही  तर ज्याप्रमाणे येशूख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता त्याच प्रमाणे त्याची उपस्थिती आपल्याला पवित्र मिस्साबली दानामधून होत असते.
     येशूख्रिस्ताची उपस्थिती ही अतिमौल्यवान भेट आहे. आपण ह्या रविवारच्या दिवशी एकत्रित जमलो असताना येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती येशुख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे ह्याची कबुली देतात. आज आपण सर्वजण आपल्या गरजा, इच्छा-आकांक्षा घेऊन प्रभूकडे आलो आहोत. येशुख्रिस्त प्रत्येक ख्रिस्तयागात आपल्या विनंत्या, आपल्या गरजा जाणून घ्यायला आणि आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करायला येत असतो.
आपल्यामधील कित्येकांनी उपवास काळामध्ये काही निर्णय घेतले असतील, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात- रोज मिस्साला जाणे, घरात रोजरीची प्रार्थना करणे, बायबल वाचन करणे, गरजवंताना मदत करणे अशा अनेक गोष्टी तुम्ही उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळ येतो आणि उपवासकाळात जातो, आपण चांगल्या व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतो. तर उपवास काळाप्रमाणेच पुनरुत्थान काळातसुद्धा नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ते म्हणजे येशूची शांती आणि त्याची उपस्थिती ह्याचा अनुभव दुसऱ्यांना सांगितला तर महत्त्वाचे ठरेल. सत्याचे बी पेरणे, दुसऱ्यांविषयी आपुलकी, प्रामाणिकपणाचे जीवन जगणे आणि समाजात इमानदाराचे जीवन जगणे ह्या गोष्टी आपल्याला इतरांच्या जवळ जाण्यास मदत करतील. ह्या पेरलेल्या बियांचे उदया चांगल्या वृक्षामध्ये रुपांतर होऊन त्याची फळे, त्याची सावली आपण इतरांना देऊ शकतो.
     येशूख्रिस्ताचे पुनरुत्थान हे त्याने दिलेले एक महत्त्वाचे चिन्ह आणि एक प्रकारची हमी (Guarantee) होती. ह्याच चिन्हाद्वारे ख्रिस्तसभा एखाद्या भाताच्या शेताप्रमाणे भरून जाईल. ही पिके आपल्याला क्षमा, शांती आणि प्रभूयेशुची उपस्थिती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि येशूख्रिस्ताचे मिशन इतरांना पोहोचविण्यासाठी आपल्याला कार्यक्षम करील.
     पुनरुत्थानाची गोष्ट (story) येशूच्या स्वर्गरोहणाने संपलेली नाही तर आज प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनींनी पुनरुत्थानाची ही गोष्ट पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या प्रकाशाची लेकरे बनव.

1.     आपले महागुरू पोप फ्रान्सिस, कार्डीनस्ल, बिशप्स, धर्मगुरु आणि प्रापंचिक ह्या सर्वांना ख्रिस्ताची तत्वे आणि त्याची शिकवण इतरांपर्यंत पोहचविण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.  ख्रिस्तयागासाठी जमलेल्या सर्व भाविकांना प्रभूयेशूने चांगले आरोग्य द्यावे, त्यांच्या कामाधंद्यात भरभराट यावी आणि त्यांनी पुनरुत्थित येशुख्रिस्ताचे अनुयायी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे, शांतीचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे; पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश एकमेकांवर पसरावा व समाजात ख्रिस्ताची उपस्थिती निर्माण करावी म्हणून आपण प्रार्थाना करूया.
4.  संपूर्ण जगात शांतीचे वातावरण निर्माण होऊन प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचे रूप पाहून इतरांना आदराने वागवण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.  थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.