Tuesday, 17 April 2018


Reflection for the Homily of 4th  Sunday Of Easter 

(22-04-2018) By Br  Lavet Fernandes. 





पुनरुत्थान काळातील चौथा रविवार

दिनांक: २२/४/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२
शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८





प्रस्तावना:

     आज देऊळ माता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास दृढ करण्यास आव्हान करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संत पेत्राने कश्याप्रकारे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यास बरे केले व त्यांना चांगले आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की “जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.
तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेरित करत आहे की, “येशू ख्रिस्त हा आपला उत्तम मेंढपाळ आहे”. ज्या प्रमाणे एखादा मेंढपाळ त्याच्या मेंढरावर प्रीती करतो, त्यांचा सांभाळ करतो व त्यांचा संकटापासून बचाव करतो त्याचं प्रमाणे येशू ख्रिस्त एक मेंढपाळ असून आपल्या मेंढरावर म्हणजेच आपल्यावर प्रिती करतो,  आपला सांभाळ करतो व आपले  संरक्षण करतो.
     आज आपण सर्वजण येथे ह्या पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

     पेत्राने मंदिराच्या अंगणात जमलेल्या लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे आव्हान केले. पुष्कळांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु मेलेले जिवंत होतील यावर लोकांचा विश्वास नव्हता. म्हणूनच येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे हे एकूण त्यांना राग आला व त्यांनी पेत्र व योहान ह्यांना अटक केले.
     दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धर्म सभेसमोर आणले व विचारले की, तुम्हाला ह्या पांगळ्याना बरे करण्याचे सामर्थ कोठून मिळाले व कोणत्या व्यक्तीने तुम्हाला हा अधिकार दिला? त्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दरडावून विचारताच पेत्राला ख्रिस्ताविषयी सांगण्याची नामी संधी मिळाली.
     ज्या व्यक्तीने आम्हाला हा अधिकार दिला ती दुसरी कोणी नसून तो येशू ख्रिस्त आहे. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याचं येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही लोकांना बरे करीत आहोत. येशू मरणातून उठला आहे व जिवंत आहे. त्याला तुम्ही नाकारले पण तोच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. ज्याच्याकडून तारण मिळाले असा येशू हा आजही एकच आहे. या शब्दांत पेत्राने येशू ख्रिस्ताची श्रेष्ठता सांगितली.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

     ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना ‘देवाची मुले’ हे नाव देवाने दिले आहे. यावरून देवाने किती प्रिती केली आहे ते आपणास समजते. परंतु जगातल्या लोकांना हे कळत नाही व ते लोक तारण पावलेल्या देवाची मुले म्हणून ओळखले जात नाहीत कारण जगातले लोक ख्रिस्त कोण आहे हे ओळखत नाहीत.
     जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा देवाची मुले बदलली जातील, त्यांना नवे शरीर प्राप्त होईल व ख्रिस्ताला पाहून हा बदल घडून येईल.

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

     येशू ख्रिस्त हा चांगला मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त हा आपल्या मेंढरांवर प्रीती करतो. आपल्या मेंढरांचे रक्षण करण्यासाठी तो मेंढरंबरोबर असतो. एखादा चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांचे कसे संरक्षण करतो याचे उदाहरण आपल्याला येशू ख्रिस्त देतो.
 मेंढरांचे संरक्षण करताना मरण पत्करण्यास मी तयार आहे असे तो म्हणत नाही. मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. कारण मनुष्याला सार्वकालिक जीवन देता यावे यासाठी येशू ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला ही पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे तर येशू ख्रिस्ताला आपला प्राण परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्त मरण  पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून उठला व जिवंत झाला.

बोधकथा:

     एका माळरानात ३.४ फुट उंचीच गवत पावसाच्या दिवसात वाढल होत आणि पावसाळा संपल्यावर ते उन्हामुळे सुकून गेल होत. सततच्या वाऱ्याच्या झुलकीबरोबर ते डावीकडे-उजवीकडे हलायचं आणि हलून वाकायचं व परत सरळ उभं व्हायचं. जेथे हे गवत वाढलं होत त्याचं जागी एक झावळ्यांनी आकारलेली एक झोपडी होती. त्या झोपडीत एक बाळंत झालेली, दोन महिन्याचं बाळ असलेली एक गरीब आदिवासी बाई राहत होती. कधी कधी ती बाई बाळ झोपल्यावर अर्धा तासभर जवळपास काटवऱ्या गोळा करायला जायची.
     एक दिवस संध्याकाळी बाळाला झोपलेलं पाहून ती बाई रानात काटक्या गोळा करायला गेली. तरी पण “घार हिंडे आकाशी, लक्ष तिचं पिलापाशी”.  काही अंतरावरून झोपडीच्या शेजारी तिने धुराचे लोट पाहिले आणि ती धावत धावत घरी पोहोचली. पाहते तर जीवघेण संकट पुढ्यात असल्याचं तिने पाहिलं. झोपडीच्या समोर असलेलं उभं सुक गवत विरुद्ध बाजूने पेटलं होत आणि १०-१२ मिनिटाच्या आत ते पेटत पेटत झोपडी देखील पेटून राख होणार होती. झोपडीत तर तिचं सोनुल बाळ झोपलेलं होता, बाळाला वाचवण्याचा एकच मार्ग तिच्यापुढे शिल्लक राहिला होता. तो म्हणजे आगीबरोबर संघर्ष करणे. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी ती बाई ह्या संघर्षाला सज्ज झाली.
     कारण वेळ कमी होता. वाऱ्याने ते गवत लवकर लवकर तडतड करीत पेटत राहिलं आणि त्या बाईपर्यंत पोहोचलं आणि लवकरच विझल देखील परंतु ती असमर्थ बाई बाळाला वाचवण्यासाठी तेथे पडूनच राहिली. ती बाई भाजली गेली, त्या जीवघेण्या आगीत किंचाळली आणि गतप्राण झाली. तेवढ्यात अंधार पडून रात्र सुरु झाली होती.
     सकाळी काही आदिवासी तेथून जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज एकू आला व ते त्या दिशेने धावून घेले. बार्ई तर आडवी होऊन मेली होती आणि तिच्या अंगाखालुन रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी त्या बाईचा मुडदा हाताने हलवून बाजूला केला तर खड्ड्यामध्ये त्यांना जिवंत बाळ सापडलं. त्या बाईने बाळाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान केले हे त्यांना दिसले आणि ते आश्चर्यचकित झाले.

मनन चिंतन:

     येशू ख्रिस्त हा एक उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांना ओळखतो कारण आपण त्याची मेंढरे आहोत. येशू ख्रिस्तामध्ये व आपल्यामध्ये एक अतूट असे नाते आहे. हे नाते साधे सुधे नाही तर ते नाते पवित्र आत्म्याने जोडलेले आहे. मेंढपाळला त्याची मेंढरे कोणती, हे माहित असते. येशू ख्रिस्त, आपला मेंढपाळ, आपल्याला नावानिशी ओळखतो. कारण आपण त्याचे मेंढरे आहोत, म्हणून आपला प्रतिसाद मेंढरासारखा असायला पाहिजे. आपण मेंढपाळाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहण्याचा व जवळ जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बायबल वाचन होय.
मेंढपाळाचे मेंढरावर खूप प्रेम असते व त्यांच्यासाठी प्राणदेखील देण्यास तो तयार असतो. त्यांचे विशेष कार्य म्हणजे सर्व मेंढरांचा साभांळ करणे व त्यांचे सर्व संकटापासून संरक्षण करणे.
     प्रभू येशू हा आपला मेंढपाळ आहे. प्रभू येशू आपल्यावर नितांत प्रेम करतो व आपण त्याच्या सानिध्यात राहून त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतो. राजा दाविदाच्या शब्दात आपण देखील आत्मविश्वासाणे म्हटले पाहिजे की, देव माझा मेंढपाळ आहे व तोच माझा साभांळ करीतो.
     आपला उत्तम मेंढपाळ आपली कधीच दिशाभूल करीत नाही, कितीही महाभयंकर संकटाची रांग आपल्या जीवनात आली तरी तो कधीही आपणास सोडून जात नाही, तो आपले आपुलकीने, प्रेमाने संरक्षण करतो. येशू आपल्या जीवनात केवळ रक्षणाचे कार्य करीत नाही तर आपल्याला हिरव्या कुरणात घेऊन जातो. जीवनात  आनंद, कृपा, विविध कला आणि देणग्यांचा आपल्यावर तो वर्षाव करीत असतो. आपल्या मेंढरांचा विकास व्हावा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना सुवर्ण काळाचा अनुभव यावा, शांती, समाधानाने त्यांना जगता यावे म्हणून तो झटत असतो. त्यांच्या मनाचा हृदयाचा, बुद्धीचा, इच्छेचा, भावनेचा, विचारांचा व आत्म्याचा विकास व्हावा ह्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना हिरव्या कुरुणात नेतो.
     उत्तम मेंढपाळ तोच आहे जो त्याच्या मेंढरांना जेव्हा बोलावतो तेव्हा मेंढरे त्याच्या मागे जातात. खरा मेंढपाळ हा कळपाच्या मागे न जाता त्यांच्या पुढे चालतो व त्यांचा साभांळ व संरक्षण करतो.
     आज पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला त्यांच्या मागे येण्यास बोलावत आहे. कारण तो आपल्या मेंढराचा वास घेत असतो. जो आपल्या सर्वांचा उत्तम व श्रेष्ठ मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणास आपल्याला प्रत्येकाच्या नावे हाक मारीत असतो. कारण आपण ह्या आधुनिक काळाच्या व जगाच्या मोह मायामध्ये न गुरफटता व न अडकता, आपण एकनिष्ठेने व स्वच्छेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकुया व सदा-सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.

1.     ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया
2.     आपल्या कुटुंबातील गैरसमज दूरराखून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
3.     जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी  मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4.     जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
5.     आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment