Reflection for the Homily of Second Sunday Of Easter (08-04-2018) By Br Brandone Noon
पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार
दिनांक: ०८-०४-२०१८
पहिले
वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५
दुसरे
वाचन: १ योहान ५:१-६
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१
प्रस्तावना:
आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार व दैवी दयेचा सण साजरा करीत
आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, श्रद्धावतांचा समुदाय एकदिलाचा व
एकजीवाचा होता व त्यांना कधीही काहीही कमी पडत नव्हते. दुसरे वाचन आपल्याला सांगते
की, जो व्यक्ती ‘येशू हा ख्रिस्त आहे’ असा जो विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला
आहे व तो जगावर विजय मिळवितो. शुभवर्तमानात आपण ऐकतो की थोमा येशूवर विश्वास ठेवतो
आणि म्हणतो “माझ्या प्रभू, माझ्या देवा”. येशू पुनरुत्थित झाल्यावर आपल्या
शिष्यांना भेटून त्यांचा आत्मविश्वास वाढवतो; तसेच पवित्र आत्मा त्यांच्यावर
पाठवून दुसऱ्यांना क्षमा करण्यास त्यांना आदेश देतो व देवाचे राज्य सर्वत्र
पसरविण्यास त्यांना प्रोस्ताहन देतो. ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना परमेश्वराकडे
प्रार्थना करूया आणि आपल्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवूया, जेणेकरून आपणालाही पवित्र
आत्म्याद्वारे परमेश्वराची कृपा लाभेल.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५
सर्व शिष्य आपली सर्व संपत्ती प्रेषितांच्या चरणाशी ठेवीत व त्यांना
काहीही उणे पडत नसे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात ख्रिस्ती धर्माचा व ऐक्याचा
उगम कसा झाला याबाबत आपणास ऐकायला मिळत आहे. येशूच्या स्वर्गरोहनानंतर शिष्यांना
अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना छळ, अडचणी व मनस्ताप सहन करावा लागला परंतु
त्याची प्रभूवरील श्रद्धा दृढ असल्यामुळे हा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता.
ख्रिस्तामुळे त्यांच्यात ऐक्य होते आणि त्यामुळेच त्यांना जगातील कुठलीही शक्ती
ख्रिस्तापासून दूर करू शकली नाही.
दुसरे
वाचन: १ योहान ५:१-६
संत योहान विश्वासू लोकांना सांगतो की, देवाच्या आज्ञा कठीण नाहीत.
आपण देवावर प्रीती करतो म्हणून आपण त्या पाळल्या पाहिजेत. संत योहानाला माहित होते
की, ख्रिस्ती समूदयाना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या मनात प्रश्न
निर्माण होत होते. आम्ही कोणावर विश्वास ठेवावा व का ठेवावा ? म्हणून या प्रश्नाचे
उत्तर संत योहान देतो. जो व्यक्ती ‘येशू हा ख्रिस्त आहे’ असा जो विश्वास धरतो तो
देवापासून जन्मलेला आहे व तो जगावर विजय मिळवितो. जग तुम्हाला आनंदी करील. पण हा
आनंद सर्वकाळ टिकणार नाही; म्हणून देवावरील विश्वासाने देवाच्या प्रीतीचा अनुभव
घ्या.
शुभवर्तमान:
योहान
२०:१९-३१
आपल्या गुरुनंतर आपले काय होईल? ह्या
प्रश्नाने ते भयभीत झाले होते. घरात लपून बसलेले असताना पुनरुत्थित प्रभू
त्यांच्याकडे येऊन उभा राहतो व दर्शन देताना म्हणतो, “तुम्हास शांती असो”. थोमा हा
त्यांच्यामध्ये नव्हता व त्यामुळेच तो म्हणाला “त्याच्या हातात ख्रिस्ताचे व्रण
पाहिल्यावाचून व खिळे होते त्याजागी आपले बोट घातल्यावाचून मी विश्वास धरणाच नाही”.
आपल्या
बंधूबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरूत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली
नाही. तरीही विशेषरीत्या येशू पुन्हा थोमाला दर्शन देतो. थोमाचे हृदय प्रीती व
भक्तीने ओसंडून वाहते म्हणूनच तो उद्गारतो, “माझ्या प्रभू, माझ्या देवा”.
मनन
चिंतन:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो आज आपण ‘दैवी दयेचा’
म्हणजेच दयावंत येशूचा सण साजरा करीत आहोत.
एकदा एक राजा होता व त्याचे भरपूर सैनिक होते.
एके दिवशी एका सैनिकाने गुन्हा केला. जेव्हा हे राजाला कळले तेव्हा त्याने त्याला
काहीही न बोलता माफ केले. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा त्याच सैनिकाने गुन्हा केला
तेव्हा तो राजा चिडला. त्याचा राग मस्तकात शिरला व राजाने त्या सैनिकास मरणदंडाची
शिक्षा फर्मावली. जेव्हा ही गोष्ट त्या सैनिकाच्या आईला कळली की तिच्या मुलाला
मरणदंडाची शिक्षा फर्मावली आहे तेव्हा ती आई मात्र अगदी खोळबून व खचून गेली. ती
राजाकडे येऊन गयावया करते व मुलाची शिक्षा रद्द करण्यासाठी विनवणी करते
परंतु राजा तिला सांगतो की एकदा नाही तर दोन वेळा तुझ्या मुलाने गुन्हा केला आहे.
तो मरणदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. तेव्हा ती आई राज्याला म्हणाली, “मी तुमच्याकडे
दयेची भिक्षा मागते, माझा हा एकुलता एक मुलगा आहे व तोच माझ्या म्हातारपणाचा एक
मेव सहारा आहे.” राजाने तिला उत्तर दिले की, तुमचा मुलगा दयेस पात्र नाही तेव्हा
ती आई म्हणाली होय महाराज मला ठाऊक आहे की माझा मुलगा दयेस पात्र नाही आणि म्हणूनच
तर मी द्येची भिक मागते, नाहीतर मी भिक मागितलीच नसती. त्या बाईच्या सततच्या
रडण्याने व गयावया करण्याने राज्याचे हृद्य भरून आले व राजा त्या आईच्या उत्तराने
डगमगला व तिला द्या दाखवून त्या सैनिकाची
शिक्षा रद्द केली.
होय माझा प्रिय भाविकांनो दयेसाठी आपणही
पात्र नाही आहोत परंतु आपला परमेश्वर इतका प्रेमळ व दयाळू आहे की आपण कितीही मोठा
गुन्हा केला, पाप केले, परमेश्वरापासून दूर गेलो तरीही परमेश्वर आपणास द्या दाखवत असतो.
आज देऊळ माता ‘दैवी दयेचा’ म्हणजेच दयावंत
येशूचा सण साजरा करीत आहे. संत जॉन पोल दुसरे यांनी ३० एप्रिल २००० मध्ये संत
फॉस्तीना हिला संत पद बहाल केले. कारण संत फॉस्तीनाला प्रभुने दर्शन देऊन दयावंत
येशूच्या प्रतिमेचे चित्र दाखवले होते. ज्यामध्ये येशूच्या खुशीतून रक्त व पाणी
येत आहे. परमेश्वराची किंवा ख्रिस्ताची द्या अपार आहे जर ह्या दयेस आपण पात्र नसलो
तरी येशू ह्या दयेचा झरा आपणासाठी सतत वाहत
आहे. ह्या दयेच्या झऱ्याने आपण वाचले जाणार आहोत आपणा सर्वांचे तारण होणार आहे.
म्हणूनच संपूर्ण जगभर द्यावंत येशूचा सण साजरा केला जातो व आपणा सर्वाना द्या
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करीत आहोत.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले आहे की, येशू
पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना दर्शन देतो परंतु तेथे संत थॉमस हजर नव्हता.
आपणास कोणालाही ठाऊक नाही की संत थॉमस कुठे गेला होता. यदाकदाचित सर्व शिष्य
घाबरून बंद खोलीत लपले होते म्हणून संत थॉमस त्यांना अन्न आणावयास गेला असेल किंवा
बाहेर फेरफटका मारायला गेला असेल. परंतू जेव्हा थॉमस परत येतो तेव्हा शिष्य त्याला
सांगतात की येशू आला होता. येशू पुनरुत्थित झाला आहे, थॉमस विश्वास ठेवत नाही व
म्हणतो “जो पर्यंत मी येशूच्या खिळे ठोकलेल्या जागी बोट घातल्यावाचून विश्वास
ठेवणारच नाही”. शेवटी एक आठवड्यानतंर येशू पुन्हा संत थॉमसला आपल्या शिष्यासमोर
दर्शन देतो, मग संत थॉमस विश्वास ठेवतो व त्यांच्या तोंडातून उद्गार येतात “माझ्या
देवा, माझ्या प्रभू.” हेच उद्गार जेव्हा धर्मगुरू भाकर व रक्ताचा प्याला उंच करतात
तेव्हा उच्चारले जातात व आजही मी शांतपणे हे शब्द उच्चारतो परंतु मला ठाऊक नाही
आपणापैकी कितीजण उद्गारतात. ही तर संत थॉमसने दिलेली विश्वासाची साक्ष आहे.
जर आपण
पाहिले तर ख्रिस्ताला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु आपण विश्वासाने
ख्रिस्ताला पाहत असतो. संत थॉमसचा पहिला अविश्वास ख्रिस्त पुनरुत्थित झालेला नाही असा होता. देऊळमातेने आपणास पवित्र संस्कार व
चिन्हे दिलेली आहेत की आपणही परमेश्वरावर विश्वास ठेवू. आताही पुनरुत्थित ख्रिस्त
आपणामध्ये हजर आहे. ख्रिस्त आपणा सर्व ख्रिस्ती बांधवात आहेत आणि आज या इस्टरच्या
जळत्या मेणबतिच्या रुपात येशू आपणामध्ये हजर आहे. ही जळती मेणबत्ती ख्रिस्त नसून मेणबत्तीच्या रुपात आज ख्रिस्त हजर
आहे परंतु आपण विश्वासाने पाहणे गरजेचे आहे, आध्यात्मिक दृष्टीने पाहणे गरजेचे
आहे. थॉमसची दुसरी शंका येशूचे पाच घाय होती आणि या मेणबत्तीवरील पाच खुणा
येशूच्या पाच घायांची आपल्याला आठवण करून देत आहेत की येशू पुनरुत्थित झालेला आहे,
घाबरून बसण्याची गरज नाही आहे. परमेश्वराने
त्याची शांती आपणास दिलेली आहे व पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे म्हणून देवाची
सुवार्ता सर्वत्र पसरविणे आपले कर्तव्य आहे.
पहिल्या वाचनात आपण ऐकले आहे की
श्रद्धावनतांचा समुदाय एकदिलाचा व एक जीवाचा होता. सर्वजण एक दुसऱ्याविषयी काळजी
करत होते. एक दुसऱ्याच्या बरोबर मिळून मिसळून राहत होते परंतु आज आपल्या घरात,
गावात, शेजोळात, चर्चमध्ये काय चालले आहे हे आपण सर्वाना ठाऊक आहे म्हणून दैवी
दयेचा आदर्श घेऊन आपण आपल्या विश्वासात वाढ करावी व आपल्यावर केलेल्या
ख्रिस्ताच्या दयेप्रमाणे आपणही दुसऱ्यावर द्या करावी व ख्रिस्ती समुदयासारखे एकदिलाने
व एकजीवाने राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो आमची श्रद्धा वाढव.
१. आपले परमगुरु पोप
फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या
विश्वासूपूर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी
म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी
प्रथम ख्रिस्तसभेसारखे एक दिलाचे व एक जीवाचे व्हावे, एक-दुसऱ्याच्या अडी-अडचणीत व
सुख:दु:खात मदतीचा हात पुढे करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. जे लोकं निराश
होऊन देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभुने स्पर्श करून त्यांच्या जीवनात
परिवर्तन घडून आणावे व त्यांनी पुन्हा एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे
म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
४. जगात शांती
निर्माण करण्यासाठी व समेट आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत त्यांना
त्यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी, दैवी कृपेचा व देवाचा आशीर्वाद मिळावा
म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment