Reflections for the
homily of 8th
Sunday of ordinary Time (03-03-2019) by: Br. Jameson
Munis
सामान्य काळातील आठवा रविवार
दिनांक – ०३-०३-१९
पहिले वाचन – बेनसिरा २७:४-७
दुसरे वाचन – पौलाचे करिंथकरास पहिले पत्र १५:५४-५८
शुभवर्तमान – लुक ६:३९-४५
“अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार”
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील आठवा रविवार साजरा करीत आहोत. आजची
उपासना आपल्याला चांगुलपणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे. आजची
वाचने सुद्धा चांगल्या झाडांची उपमा समोर ठेवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला
सद्गुणांची फळे यावीत म्हणून सांगत आहे.
जशी कुंभाराच्या मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची
परीक्षा त्याच्या संभाषणात होते. कारण माणसाच्या बोलण्यावरून त्यांची मनोवृत्ती
कळून येते. म्हणून आजचे पहिले वाचन आपल्याला कोणत्याही माणसाचे मत ऐकल्याशिवाय
त्याची स्तुती कर नये असे उद्देशून सांगत आहे.
देवाने आपल्या प्रभू येशू खिस्ताद्वारे आपणाला जय दिला आहे.
तसेच प्रभू देव आपल्या लोकांना मरणाच्या मुखातून सोडून घेईल असे अभिवचन आजच्या
दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात करत आहे. आजच्या
लूकलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त लहानश्या दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन
आपल्या शिष्यांचा स्वभाव चांगल्या झाडासारखा व प्रेमळ अंतःकरणाचा असावा असे सांगत
आहे. आपली जीवनशैली व वागणूक चांगली व प्रेमळ बनावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात
भाग घेऊन लागणारी शक्ती व कृपा आपण परमेश्वराकडे मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिरा
२७:४-७
बेनसिरा
आपल्या पुस्तकात चांगल्या संभाषणाचे कौशल्य दाखवतो. जसे सूप हलवल्याने त्यातील
कचरा दिसतो, तसेच माणसाचा दृष्टपणा त्याच्या भाषेतून दिसून येतो. तसेच ज्याप्रमाणे
कुंभाराच्या मडक्याची परीक्षा जशी भट्टीत होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा संभाषणात
होते. जेव्हा माणूस चांगले बोलतो, तेव्हा त्याच्या हृदयात चांगुलपणा आहे हे दिसून
येते. परंतु जर एखादी व्यक्ती वाईट बोलत असेल, तर त्यांच्या मनात कडूपणा असतो.
म्हणून माणसाच्या बोलण्याच्या प्रकारावरून त्यांची मनोवृत्ती कळून येते. भाषा ही
देवाने दिलेली देणगी आहे. म्हणून आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना व आपणाला सुध्दा
लाभ झाला पाहिजे. आपण चांगले, सत्य व खरे बोलायला हवे. असा संदेश पहिल्या वाचनात
आपल्याला ऐकावयास मिळत आहे.
दुसरे वाचन: करिंथकरांस
पहिले पत्र १५:५४-५८
आजच्या दुसऱ्या वाचनात, संत
पौल होशेय १३:१४ ह्या भविष्यवादाचा उल्लेख करत आहे. तो म्हणजे, “देवाने आपल्या
प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला जय दिला आहे. तसेच, प्रभू देव आपल्या लोकांना
मरणाच्या मुखातून सोडवून घेईल असे अभिवचन भाकीत केले आहे. पाप हे मरणाचे कारण आहे.
ख्रिस्ताने मरणाच्या अधिसत्तेवर आक्रमण करून त्याची नांगी मोडून टाकली. हा सर्वात
महान विजय आहे. यासाठी देवाची स्तुती करून त्याचे उपकारस्मरण केला पाहिजे. अश्या
प्रकारचा संदेश दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो.
शुभवर्तमान: लूक ६:३१-४५
लूकलिखित शुभवर्तमानत येशू ख्रिस्त लहानशा दाखल्यासारखी काही
बोधवचने देऊन आपल्या शिष्यांचा स्वभाव चांगल्या झाडासारखा असावा असे दाखवत आहे.
मनुष्याच्या अंतःकरणात जे भरले आहे, तेच त्याच्या मुखातून निघते, हे सुध्दा येशू
ख्रिस्त ह्या शुभवर्तमानात सांगत आहे. ह्या सुवचनांच्या पहिल्या समुहात आध्यात्मिक
दृष्टी ठेवण्याचा मुद्दा दिला आहे. म्हणजे आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही,
नाहीतर दोघेही खाली पडतील. असा प्रयत्न मूर्खपणा ठरतो. दुसऱ्या समूहात, शिष्यांनी
शिक्षक होऊन दुसऱ्यांना शिक्षण देण्याअगोदर स्वतः शिकले पाहिजे. तिसऱ्या समुहात
दुसऱ्यांचे दोष दाखविण्यापूर्वी शिष्यांनी स्वतःकडे स्पष्टपणे पहावे, आपले परीक्षण
करावे. त्यानंतर दुसऱ्यांच्या डोळ्यातले मुसळ काढावे. चौथ्या समूहात चांगले झाड व
वाईट झाड म्हणजे शुद्ध अंतःकरणातूनच सदाचरण होणार असे ऐकतो. दृष्टांकडून चांगल्या
कृतींची अपेक्षा करणे हे वाईट झाडापासून चांगले फळ मिळविण्यासारखे खुळेपणाचे लक्षण
आहे. ज्यांच्या अंतःकरणात उत्तोमोत्तम गोष्टींचा साठा आहे, त्यालाच चांगले शिक्षण
देता येईल. असे येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे.
बोधकथा:
विनीत शेमकी पदवी पास करून आला. त्याने आजूबाजूला पाहिले.
कुणीच शेती करीत नव्हते. त्याने आपल्या शेतात नव्या जातीची आंबे, पेरू, चिकू, फणस
ह्या फळांची कलमे आणून लावली. थोड्या वर्षानंतर त्याना भरपूर व मोठ्या प्रतीची
रसाळ, चवदार, फळं येऊ लागली. फळं पाहून गावातील अनेक माणसांनी विनीतचे कौतुक केले.
शेतात आपण सोनं पिकवू शकतो, असे गावातील माणसांना वाटू लागले. त्यांनी विनीतची मुलाखत
घेतली. जॉन्सन विनीतच्या नर्सरीमध्ये गेला. त्याने चांगली चिकू, पेरू, हापूस
आंब्याची, नारळाची, पपयांची इत्यादि फळांची कलम आणली व जमिनीत लावली. काही काळानंतर
जॉन्सनची प्रगती झाली. त्याला आनंद झाला. अशाप्रकारे अनेकांनी अनुकरण केले व त्या गावाची
प्रगती झाली. विनीताला सुद्धा बरे वाटले.
तात्पर्य: माणसाचा न्याय त्याच्या कृत्यांवरून केला जातो. माणसाच कर्म
त्याचं जीवन दर्शविते. आपण सर्वच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे तसे करीत असतो.
मनन
चिंतन :
आज आपण चांगुलपणा यावर मनन चिंतन करणार आहोत. आजची उपासना आपल्याला सांगत
आहे की, जे आपल्या अंतःकरणात भरले आहे, तेच मुखावाटे निघते. ज्या परमेश्वराने संपूर्ण विश्वाची व मानवजातीची
निर्मिती केली आहे तोच परमेश्वर सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की, आपल्या जीवनात चांगली फळे यावीत. आपण ख्रिस्ती असून सुध्दा आपली वागणूक ही
ख्रिस्ताच्या शिकवणुकीला साजेशी नसते. आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे आपण आपले व
आपल्या धर्माचे चित्र इतरांसमोर उभ करतो.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या कृत्याने व वागणुकीद्वारे आपली परीक्षा
केली जाते. मराठी भाषेत एक सुंदर अशी म्हण आहे, ‘मनी वसे ते
स्वप्नी दिसे, तसेच हृदी असे ते वचनी दिसे.’ म्हणजेच आपल्या शब्दाद्वारे व कृत्यांद्वारे आपण आपले मन लोकांसमोर मांडत
असतो. आपल्या मनातले आपल्या कृतीद्वारे आपण इतरांना दाखवत असतो. ज्यांच्या हृदयात प्रेम,
दया, क्षमा आहे तो मनुष्य इतरांना क्षमा करतो.
तो दीनांना दया दाखवतो. कोणत्याही जातीधर्माच्या माणसांना तो प्रेम दाखवतो.
त्याच्याठायी निंदानालस्ती नसते. तो सूड घेत नाही, तिरस्कार
करत नाही. जो कष्टाळू आहे तो आळशीपणाचे दर्शन घडवत नाही. तो शिस्तप्रिय व जबाबदार
वाटतो व जो निस्वार्थी असतो तो स्वार्थी वृत्ती दाखवत नाही.
आजच्या तिन्ही वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला एक चांगली अशी सूचना करीत
आहे. ती म्हणजे आपला जीवनवृक्ष चांगला असू द्या म्हणजे त्याला चांगली फळे येतील.
आपले ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताच्या शिकवणुकीवर व ख्रिस्ती मूल्यांवर आधारित असले
पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात ऐकले की, जसा कुंभाराच्या
मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा
त्याच्या संभाषणातून होते. म्हणून आपले बोलणे, वागणे व चालणे
चांगले पाहिजे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, जेव्हा
आपण चांगले जीवन जगतो म्हणजेच पापाच्या मोहाला बळी पडत नाही तेव्हा देव
आपल्याबरोबर असतो, तोच आपला सांभाळ करतो. तसेच शुभवर्तमानात
येशू ख्रिस्त लहानशा दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन आपले जीवन, स्वभाव, बोलणे व चालणे चांगली असावीत असे सांगतो.
ख्रिस्त हाच मार्ग, सत्य व जीवन आहे. ख्रिस्ताच्या
हाती आपले जीवन सोपवले तर आपण ख्रिस्ताप्रमाणे बनू शकतो. ख्रिस्ताप्रमाणे आपण नम्र
व प्रेमळ असले तर आपल्या जीवनात चांगली फळे येतील. प्रत्येक पालकाला असे वाटते कि,
आपली मुले चांगली असावीत. प्रत्येक धर्मगुरूला असे वाटते कि आपल्या
धर्माग्रामातील लोक ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे वागवीत. प्रत्येक व्यक्तीला
वाटते कि मी चांगला आहे असे लोकांच्या मुखातून ऐकावे. म्हणूनच आपल्या जीवनात
चांगली फळे यावीत म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा आमच्या जीवनाला चांगली फळे येऊ दे.
१) आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस आध्यात्मिक मेंढपाळ, ह्यांना त्यांच्या कार्यात प्रभूचा सतत वरदहस्त लाभावा, त्यांना प्रभुणे चांगले आरोग्य बहाल करावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्त सभेची प्रगती होत रहावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)आपल्या देशातील राज्यकर्ते व अधिकारी ह्यानी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) ज्या कुटुंबात स्त्री-पुरुषात व मुला-मुलीत जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे त्यांचे जीवन चांगल्या झाडासारखे बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतःकरणे उघडून येशू ख्रिस्ताचा संदेश समजून तो आपल्या जीवनात जगण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मागुया तसेच त्यांच्या इच्छा व हेतु सफळ व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)जे कोणी आजारी आहेत, अश्या सर्व व्यक्तीना देवाच्या सुखद हाताचा स्पर्श व्हावा व त्यांना चांगले आरोग्य मिळावे, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.
६) आपण आता आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment