Friday, 22 February 2019



Reflection for the Homily of 7th SUNDAY IN ORDINARY TIME (24-02-19) By Br. Robby Fernandes 



 सामान्य काळातील सातवा रविवार


दिनांक: २४/०२/२०१९
पहिले वाचन: १ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:४५-४९
शुभवर्तमान: लूक ६:२७-३८




"तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा"


प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करीत आहोत. देव दयाळू व कनवाळू आहे. आजची उपासना आपल्याला हे गुण अवगत करून, ख्रिस्ती जीवन जगण्यास आमंत्रण करीत आहे. जरी आपले जीवन हे कष्टाचे, दुःखाचे व ताणतणावाचे असले तरी परमेश्वर सांगत आहे की, आपले संपूर्ण जीवन हे ख्रिस्ताप्रमाणे प्रीतीचे व प्रेमाचे असले पाहिजे.
पहिले वाचन हे शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले आहे. परमेश्वराने दावीद राजाचा शत्रू शौलाला त्याच्या हाती दिला होता. पण त्याने त्याला जीवे मारले नाही, कारण त्याला देवाने अभिषिक्त केले होते व त्याचा न्याय हा देवच करेल म्हणून शौलाला न मारता ते निघून जातात. तर दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, पहिला आदाम हा मातीचा आहे व दुसरा आदाम हा स्वर्गातून आलेला आहे. जसे आपण पहिल्या आदामाचे प्रतिरूप झालो, त्याचप्रमाणे दुसऱ्या आदामचे सुध्दा प्रतिरूप व्हायला पाहिजे. तसेच लुककृत शुभवर्तमानात आपल्यला सांगितले आहे की, येशूने जसे त्याच्या वैऱ्यावर किंवा शत्रूवर प्रीती केली, तीच प्रीती आपल्या शत्रूवर करण्यास आजचे वाचन आपल्याला आव्हान करीत आहे.
ज्याप्रमाणे सूर्योदयाचा व पावसाच्या सरीचा अनुभव आपल्या जीवनात होतो त्याचप्रमाणे देवाची दया व माया आपल्याला विनामुल्य लाभत असते. तर ह्या मोफत कृपेचा अनुभव प्रीतीद्वारे आपल्या जीवनात घेण्यासाठी परमेश्वराची कृपा मागुया.     

सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३

          ह्या पुस्तकामध्ये आपल्याला शमुवेल दाखवून देत आहे की, परमेश्वर सर्वांचा राजा आहे. जेव्हा शौल दावीदला मारण्यासाठी शोधत होता; खुद्ध परमेश्वर शौल राजाला दावीदच्या हातामध्ये देतो. पण दावीद शौल राजाला काही करीत नाही. पण त्याला समजावे म्हणून त्याच्या जवळचा भाला व पाण्याचा चंबू एक चिन्ह म्हणून ठेवून जातो. याचे एकच कारण की, परमेश्वराने शौल राजाला त्याच्या हातामध्ये दिले होते. पण हे घृण कृत्य त्याने केले नाही; कारण शौलाला परमेश्वराने राजा म्हणून अभिषिक्त केले होते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:४५-४९

      संत पौल आपल्या पत्रात दोन आदामांची तुलना करीत आहे. पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी असा झाला व शेवटचा आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला आदाम हा मातीचा आहे, तर दुसरा स्वर्गातून आहे. तसेच पौल सांगतो की, ज्याप्रमाणे आपण पहिल्या आदामाचे प्रतिरूप धारण केले त्याचप्रमाणे जो स्वर्गातील आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण केले पाहिजे, म्हणजेच आपण ख्रिस्ताचा स्वभाव अंगिकारला पाहिजे किंवा ख्रिस्ताचे गुण अवगत केले पाहिजेत.

शुभवर्तमान: लूक ६:२७-३८
लुकलिखित शुभवर्तमानात आपणांस सांगण्यात आलेले आहे की, आपण आपल्या शत्रूवर प्रीती, प्रेम करायला शिकलं पाहिजे. जे शाप देतात त्यांना आशीर्वाद द्यायला शिकलं पाहिजे. तसेच जे निर्भत्सना करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. आजचे वाचन दयावंत व उपकारवादी बनण्यास आपल्याला आमंत्रण करत आहे. वैऱ्यावर प्रीती करा, त्यांचे बरे करा व निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ हे मोठे असेल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण परमेश्वर सर्वांवर दया करतो. तो दयाळू आहे व आपण त्याच्या सारखे दयावंत व्हायला बोलावत आहे.
 मनन चिंतन: 
हात त्याचे, पाय त्याचे, खिळे मात्र माझ्या पापाचे,
मस्तक त्याचे, पण त्या मस्तकावर काट्यांचा मुकुट मात्र माझ्या पापांचा
शरीर त्याचे, श्वास त्याचा, घाव त्याचे, घाम त्याचा, तारण मात्र माझे.

       ख्रिस्ताने मानव जातीवर एवढे प्रेम केले की, त्या खातर त्याने स्वताःचे सर्वस अर्पण केले. त्याने प्रेम केले व प्रेम करायला शिकविले, त्याने दया केली व दया करायला शिकविले व शेवटी क्रुसावरून त्याच्या मारेकऱ्याना माफ केले व माफ करायला पण शिकविले आणि हे सर्व त्याला साध्य झाले त्याचे एकच कारण म्हणजे मनुष्य जातीवर त्याने अफाट असे केलेले प्रेम.
       येशू ख्रिस्त हा वास्तववादी माणूस म्हणून या भूतलावावर जगला. येशू ख्रिस्ताला माहित होते की, आपण डोळ्यासाठी-डोळा व दातासाठी-दात ह्या पद्धतीने जगलो तर संपूर्ण जग हे आंधळे  व दाता विना होणार. हे सर्व थांबवण्यासाठी आपल्या जवळ एकच मात्र उपाय आहे तो म्हणजे; ख्रिस्ताच्या नियमाचे अनुसरण करणे, तर हे ख्रिस्ताने बोलूनच दाखवलं नाही तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणले. त्याने त्याच्या मारेकराना माफ केले. त्याने त्याच्या शत्रूचां द्वेष केला नाही तर त्याच्यासाठी प्रार्थना केली. आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्तामध्ये आपण राहिलो पाहिजे, तेव्हाच आपल्याला जीवन प्राप्त होईल. तेव्हाच आपल्या जीवनाच नुतनीकरण होईल, आपल जीवनात नवचैतन्य येईल. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये, तो नवचैतन्याचा झरा बनला; त्याच नवचैतन्याने आपण सुद्धा त्या झऱ्याचे पाणी लोकांपर्यत पोहचवल पाहिजे. परमेश्वर हा जेव्हा पाऊस पाठवतो, तेंव्हा तो पाहत नाही. कोण शत्रू व कोण चांगले व कोण वाईट. तो सर्वाना समानतेने देतो. कारण त्याचं प्रेम हे सिमापलीकडचे असते. त्याच्या प्रेमाला आपण सीमित करू शकत नाही.
       येशूच्या कारकिर्दीमध्ये शास्त्री, परुषी व धर्मपंडीत ह्यांना खूप मान होता. त्यांचा वरचढपणा होता, त्यामुळे त्यांनी अनेक नियम लोकांवरती लादले होते. त्या कारणास्तव लोक धर्माच्या ओझ्याखाली दडपली होती. धर्माचे नियम पाळने हे सक्तीचे केले होते. व जो कोणी धर्माच्या नियमाचे उल्लंघन करील, त्याला शिक्षा होत असे. धर्माच्या नावाखाली लोकांची खूप पिळवणूक होत होती. पण ख्रिस्ताने लोकांसाठी नवा मार्ग खुला करून दिला. जे नियम लोकांना देवापासून वंचित करत असत त्या विरुद्ध त्याने आवाज उठवला. शिष्यांना  प्रत्यश मार्गदर्शन दिले. त्याने स्वतः दाखवून दिले की शत्रूवर कसे प्रेम करावे.  लूक ६ : २७: २८ मध्ये येशू सांगतो कीतुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचे द्वेष करितात त्यांचे बरे करा. तुम्हास शाप देतात, त्यांस आशीर्वाद द्या व जे तुमची निंदा करतात त्यासाठी प्रार्थना करा.आणि ह्या साध्या व सोप्या पद्धतीने तो लोकांना मार्गदर्शन करत असे.
                शिष्य व पहिले ख्रिस्ती ह्यांनी येशू ख्रिस्ताची शिकवणूक त्यांच्या कार्यातून दाखवून दिली. त्याचप्रमाणे जे परधर्मप्रांतांतील आहेत त्यांनी सुद्धा ख्रिस्ताची शिकवण जी प्रेमाच्या व प्रितीच्या स्तंभावर उभारली होती; ही शिकवण त्यांनी आत्मसात केली. पण जस जशी वर्षे उलटली, तसतशी ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये सुद्धा बदल करण्यात आला कारण माणसाने स्वतःच्या सुखाला प्रथम प्राधान्य दिले व अशा प्रकारे ख्रिस्ताला आणि त्याच्या शिकवणुकीला दुय्यम स्थान दिले.
       मानवजात ही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या व भाषेच्या नावाखाली खूप काही धर्मयुद्धे, जातीवाद करून लोकांच्या मनावर त्यांनी ह्या सर्व विचारांचा पडदा घातला होता. त्यामुळे लोक त्यांच्या जातीपुरते, त्यांच्या धर्मापुरते व भाषेपुरते मर्यादित राहिले. अशामुळे मानवधर्म नष्ट होत गेला. येशूख्रिस्त हा मानवधर्म स्थापन करण्यासाठी आला होता व ह्या मानवधर्माचा मुलभूत पाया होता तो म्हणजे प्रेम होय. म्हणून संत पौल करिंथ करांस पहिले पत्र १३:१३ मध्ये सांगत आहे की, “विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे.
       आपण सर्वजण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे मानवजातवाचविण्याची. ही फक्त प्रेमाने, क्षमेने आणि दयाळूपणानेच बचावली जाऊ शकते. त्यासाठी आपण स्वतःपासून ख्रिस्ताचे कार्य सुरु ठेवायला देऊळमाता आपणा सर्वांना प्रेमाने आमंत्रण करीत आहे.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी ह्यांना आपल्या कार्याकडे देवाच्या नजरेतून पाहण्याचे धैर्य लाभावे आणि त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या सेवाकार्यात सतत बदल करत राहावे म्हणून प्रार्थना करूया.
२) आपल्यावरील दुःखामुळे, अडीअडचणी आणि संकटांमुळे आपण निराश न होता येशूच्या कृपेने जीवनाकडे अधिक आशेने पाहावे आणि तसे इतरांना आपल्या कृतीद्वारे शिकवावे म्हणून प्रार्थना करूया.
३) आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, जेणेकरून या धर्मग्रामातील प्रत्येक भाविकाला प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून कार्य करावे म्हणून प्रार्थना करूया.
४) जे आजारी आहेत, यातनेत आहेत, अन्याय, अत्याचार, हिंसा यांना बळी पडलेले आहेत अशा सर्वांनी स्वर्गीय भाकरीत कृपेचा अनुभव घ्यावा म्हणून प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत राहून स्थानिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.      

No comments:

Post a Comment