Reflections for the homily for 2nd Sunday
of Easter
(28-04-2019) by Br. Jameson
Munis
पुनरुत्थान
काळातील दुसरा रविवार
दैवी
दयेचा रविवार
दिनांक: २८/०४/२०१९
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६
दुसरे वाचन: प्रकटीकरण १:९-११, १२-१३, १७-१९
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१
“पाहिल्यावाचून विश्वास
ठेवणारे ते धन्य!”
प्रस्तावना:
आज आपण पुनरुत्थान काळातील
दुसरा रविवार तसेच दैवी करुणेचा सण साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला
विश्वास, श्रद्धा व भक्ती ह्या विषयांवर मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात,
प्रेषितांनी केलेल्या अदभूत कृत्यांचा उल्लेख केला आहे. येशूचे शिष्य चमत्कार
करतात, ते एकत्र येतात आणि देवाचे कार्य मोठ्या जोमाने व उत्साहाने पुढे नेतात.
आजच्या दुसऱ्या वाचनात, संत योहानला झालेल्या येशूच्या प्रकटीकरणाविषयी आपण ऐकणार
आहोत. योहानाने जे काही स्वर्गात पाहिले, त्या घटनेचा उल्लेख केला आहे. आजच्या शुभवर्तमानात
आपण विश्वासाविषयी ऐकणार आहोत. येशू सांगत आहे की, “पाहिल्यावाचून जे विश्वास
ठेवतात, ते धन्य आहेत.”
आज आपण दैवी दयेचा सण साजरा
करीत आहोत. आपणा सर्वांची आपल्या विश्वासात व श्रद्धेत वाढ व्हावी व पुनरुत्थित
ख्रिस्ताची शांती आपण अनुभवावी म्हणून ह्या मिसा बलिदानात भाग घेताना विशेष प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६
पहिल्या वाचनात प्रेषितांनी
केलेल्या अदभूत कृत्यांविषयी आपण ऐकणार आहोत. हे सर्व लोक व प्रेषित एक चित्ताने
शलमोनच्या देवळात जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास कोणाचे धैर्य होत नसे, तरी
लोक त्यांना महान मानीत असत. ते सर्वजण आपली संपत्ती प्रेषितांच्या जवळ ठेवत. येशू
ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर शिष्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. अनेक पुरुष व
स्त्रिया प्रभूला शरण गेल्या. लोक आपली दुःखे व अडी-अडचणी घेवून शिष्यांकडे येत.
आपण प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात वाचतो की, पेत्र येत असता, त्याची सावली,
तरी त्यांच्यातील काही जणांवर पडली तरी ते बरे होत. शिष्य चमत्कार करीत होते. येशूने
दिलेल्या पवित्र आत्म्याच्या दानाने ते देवाचे कार्य पुढे नेत होते. हे आपल्याला
आजच्या पहिल्या वाचनात ऐकावयास मिळते.
दुसरे वाचन: प्रकटीकरण १:९-११, १२-१३, १७-१९
दुसऱ्या वाचनात
संत योहान, मनुष्याच्या पुत्राचा संत योहानला झालेल्या साक्षात्कार विषयी सांगत
आहे. योहानाने जे काही स्वर्गात पाहिले, ते सर्व त्याला लिहिण्यास प्रवूत्त केले
आहे. योहानाने सर्व प्रथम वाणी ऐकली. जे काही बघून लिहिणार होता, ते सर्व सात चर्च
किंवा मंडळासाठी पाठविण्यास त्यास सांगितले. योहान सात सोन्याच्या समया बघतो, त्याबरोबर
मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र घातलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला
योहानास दृष्टीस पडतो. जेव्हा योहानाने हे दृष्य पाहिले, तेव्हा तो मेलेल्यासारखा
मनुष्याच्या पुत्राच्या पायाजवळ पडला. मग त्या मनुष्याच्या पुत्राने त्यास म्हटले,
भिऊ नकोस जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी
युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. असे सर्व
दृष्य योहान आजच्या दुसऱ्या वाचनात सादर करतो.
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१
आजच्या शुभवर्तमानात येशूने
प्रेषितांना, विशेष करून थोमाला दिलेल्या दर्शनाविषयी आपण ऐकणार आहोत. यहुद्यांच्या
भीतीमुळे शिष्य भयभीत झाले होते. त्यांना समजत नव्हते की, पुढे काय कराव? अशावेळी
दरवाजे बंद असताना येशू ख्रिस्त त्यांच्या मध्ये येऊन उभा राहतो व दर्शन देतो आणि
म्हणतो, “तुम्हास शांती असो.” असे बोलून तो आपले हात व कूस त्यांना दाखवतो. तेव्हा
प्रभूला पाहून शिष्यांस खूप आनंद होतो, त्यांना चांगले वाटते. त्यांची भीती नाहीशी
होते. परंतु थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. जेव्हा दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले,
तेव्हा त्याने आपाली मनोवृत्ती स्पष्ट केली व सांगितले, “त्याच्या हाताच्या
खिळ्याचे व्रण पाहिल्यावाचून व तेथे बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात
घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही. त्यानतंर येशू थोमाला दर्शन देतो, तेव्हा
थोमाची श्रद्धेत वाढ होते व तो उदगारतो, “माझ्या प्रभू, माझ्या देवा.” तेव्हा येशू
म्हणतो, “पाहिल्यावाचून विश्वास ठेवतात ते धन्य.” अशाप्रकारे अनेक वेळा दर्शन देऊन
येशू आपल्या शिष्यांचा विश्वास बळकट करतो.
मनन चिंतन:
आज आपण पुनरुत्थान काळातील
दुसरा रविवार साजरा करीत आहोत. त्याचबरोबर दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. आजची
उपासना आपल्याला विश्वास या विषयावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे.
आपण प्रभू येशू ख्रिस्तावर
विश्वास ठेवणारे लोक आहोत. हा विश्वास जर आपल्याला उचित किंवा योग्य प्रकारे समजून
घ्यायचा असल्यास परमेश्वर सगळ्या सृष्टीचा कर्ता आहे आणि आपण त्याची मुले आहोत हे
सत्य आपण आपल्या हृदयात कोरले पाहिजे.
थोमाच्या दृष्टीने,
ख्रिस्ताचा क्रूसावरील मृत्यू अनपेक्षित होता. त्याची येशुवरील माया भरपूर होती.
परंतु, जेव्हा प्रत्यक्षात ही घटना घडली तेव्हा थोमाला ही घटना पेलवली नाही.
येशूच्या मृत्युच्या घटनेने त्याचा विश्वास व धीर खचला होता. तो दुःखाने कोसळलेला
होता. आणि म्हणून तो एकटा राहायला लागला होता. तो आपल्या मित्र परिवाराबरोबर
राहायला पाहिजे होता. अन्य शिष्य मित्रांचे त्याने सहाय्य घ्यायला पाहिजे होते,
परंतु त्याने तसे काही केले नाही. तो एकटाच त्याच्या दुःखाशी सामना करू लागला
होता. त्यामुळे पुनरुत्थित येशू जेव्हा इतर शिष्यांना भेटतो, तेव्हा थोमा तेथे
नसतो. त्याला ख्रिस्ताची भेट झाली नाही. आणि नवजीवनाचा अनुभव तो घेऊ शकला नाही. कारण
तो आपल्या स्वतःच्या जगात घुटमळत राहिला होता. म्हणून तो त्याला सांगितलेल्या
ख्रिस्त पुनरुत्थित झाला असल्याचे सत्य त्याला खोटे वाटू लागले, म्हणून त्याने
विश्वास ठेवण्यास नकार दिला. ज्यावर आपला विश्वास नाही, त्यावर विश्वास आहे असे
उगीच सांगण्याचा दुबळेपणा त्याने दाखवला नाही. तो आपल्या मनाशी व विचाराशी
प्रामाणिक होता. त्याने आपल्या मनातील विचार स्पष्टपणे बोलून दाखवण्याचं धैर्य
त्यान दाखवलं. आपल्याला पटो किंवा न पटो, आपल्याला समजो किंवा न समजो. दुसरा
सांगतो म्हणून मान हालवायची त्याची वृत्ती नव्हती. त्याला सत्याची खात्री करून
घ्यायची होती. त्याला अंधविश्वास नको होता. त्याला चांगला व खरा विश्वास हवा होता.
त्याच्या ह्या प्रवूत्तीमुळे त्याला खऱ्या विश्वासाचे ज्ञान झाले. त्यानंतर तो
थांबला नाही. त्याने स्वतःला सत्याच्या म्हणजेच ख्रिस्ताच्या पायी झोकून दिले. आता
अर्धवटपणे नाही, तर संपूर्ण विश्वासाने तो
उद्गारला, “माझ्या देवा, आणि माझ्या स्वामी!”
अशा प्रकारे तो प्रभूला शरण गेला.
आज दैवी दयेचा सण आपण साजरा
करीत आहोत. दया म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी
सहानुभूती. दुसऱ्यांची दुःखे, संकटे, आपत्ती आपल्याच आहेत असे जो मानतो व त्या
नाहीशी करण्याचा प्रयत्न करतो तो खरा दयाळू. येशू ख्रिस्त हा खरा दयाळू होता. तो
ममतेने व करुणेने भरलेला होता. अनेक अशी ख्रिस्ताची उदाहरणे आपल्या समोर शुभवर्तमानात
ठेवण्यात आली आहेत, लूकच्या शुभवर्तमानात पंधरावा अध्याय आपणास येशूच्या दयेविषयी
व करुणेविषयी सांगत आहे.
संत फौस्तीनाला झालेल्या
दर्शनात येशू हा दैवी दयेचा व करुणेचा महासागर अखिल मानवासाठी ओसांडून वाहताना
त्याने अनुभवला. म्हणूनच दैवी दयेची प्रार्थना आपल्या सर्वाना येशुवरील श्रद्धेत
वाढण्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रभू येशूच्या हृदयातून दयेचा व कृपेचा झरा
अखंडितपणे वाहत आहे. त्या दैवी दयेचा आपणा प्रत्येकास अनुभव यावा व आपली
ख्रिस्तावरील श्रद्धा व विश्वास मजबूत बनावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
बोधकथा:
एक विद्वान प्रोफेसर होता. जे
बुद्धीला पटेल, तेच मी मानणार अशी त्याची विचारधारणा होती. एकदा रस्त्यात जात
असताना त्याला एक शेतकरी शेतामध्ये काम करताना दिसला. त्याने त्या शेतकऱ्याला
प्रश्न केला, “काय रे, शेतकऱ्या तुझ्या बुद्धीला जे पटत नाही त्यावर तू विश्वास
ठेवतोस काय? शेतकरी म्हणाला, “होय, साहेब. मी विश्वास ठेवतो. तुम्ही विश्वास ठेवता
काय?” प्रोफेसर म्हणाला, “माझ्या बुद्धीला जे पटत नाही, त्यावर मी मुळीच विश्वास
ठेवत नाही.”
शेतकऱ्यान त्या प्रोफेसरला
प्रश्न केला, “प्रोफेसर साहेब, ह्या माझ्या शेतात एक गाय, एक कोंबडी आणि एक मेंढरू
हे तीन प्राणी चारत आहेत. एकाच कुराणावर व एकाच अन्नावर तिघे चरत आहेत, हे तुम्ही
पाहता ना, मग मला सांगा हे तिन्ही प्राणी एकाच कुराणावर चरत असताना, गायीच्या
अंगावर केस, कोंबडीच्या अंगावर पिसे आणि मेंढऱ्याच्या अंगावर लोकर हे कस काय? ह्या
प्रश्नाच उत्तर तो प्रोफेसर देऊ शकला नाही. तो मान खाली घालून तेथून निघून गेला.
तात्पर्य: सर्वच गोष्टी
आपल्याला कळल्याच पाहिजेत हे विश्वासाचे लक्षण नाही.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो, आमची श्रद्धा दृढ कर.
१. आपले परमगुरु फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांच्यावर
सोपविलेल्या जबाबदाऱ्या विश्वासुपणे पूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या कार्याद्वारे
लोकांना दैवी दयेचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जगभरात ज्या संघटना कार्यरत आहेत, त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूचा
आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ज्या कुटुंबात शांती, प्रेम व दया नाही, अशा सर्व कुटुंबांना दैवी दयेचा,
शांतीचा व प्रीतीचा अनुभव मिळावा आणि त्यांची प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४. आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असलेल्या आपण सर्वांनी देवाच्या दयेचा अनुभव
घेऊन, आपल्या कार्याद्वारे तो इतरांना देण्यास तत्पर राहण्यास कृपा व पवित्र
आत्म्याचे सहाय्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. श्रीलंकेत झालेल्या बोब्म हल्ल्यात जे आमचे बंधू-भगिनी मरण पावल्यात,
त्यांच्या प्रत्येकांच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी, स्वर्गीय नंदनवनात
त्यांच स्वागत कराव. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व्हावे व श्रद्धेत वाढ व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून, आपण आपल्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू
समोर ठेवूया.