Tuesday 16 April 2019


Reflections for the homily for Maundy Thursday (18-04-2019) by Br. Robby Fernandes






आज्ञा रविवार

दिनांक: १८/०४/२०१९
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५





‘मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे’

प्रस्तावना:
          प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळमाता ‘आज्ञा गुरुवार’ साजरा करीत आहे. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने तीन गोष्टींची स्थापना केली. पहिली पवित्र मिस्साबालीदान, दुसरी याजक पद किंवा धर्मगुरूंची स्थापना आणि तिसरी म्हणजे त्याने आपणा प्रत्येकासमोर एक सेवेचे, प्रेमाचे आणि नम्रतेचे उदाहरण ठेवले आहे. आजच्या तिन्ही वाचनात ह्या तीन गोष्टींविषयी नमूद केले आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण यहुदी लोकांनी आपल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा केलेल्या वल्हांडण सणाविषयीचे वर्णन ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल, पवित्र मिस्सा बलिदानाबद्दल आपले विचार मांडतो. तसेच शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर केलेले अखेरचे भोजन, धर्मगुरूपदाची आणि पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना ह्या दोन अतिशय महत्वपूर्ण घटनांचा संदर्भ येतो.
          अखेरचे भोजन घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांना सेवेची आज्ञा दिली. ही ख्रिस्ताची आज्ञा आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने आचरणात आणावी म्हणून आपण ह्या पवित्र प्रभू भोजनात विशेष प्रार्थना करूया. आज सर्व धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करूया की, प्रभूने त्यांना त्यांच्या कार्यात त्यांना सतत साथ द्यावा.

 सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
          निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपल्याला व्हलांडण सणाविषयी सांगितलेले आहे. व्हलांडण सणासाठी आपण कशा प्रकारे तयारी करायला हवी ह्याविषयी आपणास ऐकावयास मिळते. तसेच परमेश्वर कशाप्रकारे इस्राएल लोकांबरोबर आहे ह्या विषयीसुध्दा आपणास ऐकावयास मिळते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ११:२३-२६
          संत पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र ह्यातून आजचे दुसरे वाचन घेतलेले आहे. ह्या वाचनात आपल्याला प्रभू भोजनाविषयी ऐकावयास मिळते. “जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो परत येईपर्यंत घोषणा करता.” असे संत पौल आपणास सांगत आहे.

शुभवर्तमान: योहान १३:१-१५
          योहानकृत शुभवर्तमानात आपल्याला येशूने दिलेल्या प्रेमाच्या, नम्रतेच्या आणि सेवेच्या शिकवणुकीविषयी सांगण्यात आले आहे. येशूने स्वतःहून शिष्यांचे पाय धुतले. आणि आपल्या प्रत्येकासाठी तो एक प्रेमाचा, नम्रतेचा आणि सेवेचा आदर्श बनला. जसे मी केले, तसे तुम्ही करा अशी आज्ञा त्याने आपणास दिलेली आहे. कारण तो एक आगळावेगळा गुरु होता.

मनन चिंतन:
          ह्या आधुनिक जगात माणसाचे जीवन हे एवढे गतिमान झालेले आहे की, त्याला दुसऱ्या माणसाची पर्वा नाही. ह्यामुळे तो खऱ्या मानवी जीवनाचा अर्थ हरवून बसला आहे आणि म्हणून  माणुसकी ही कुठेतरी दूर निघून गेल्याचा आभास आपल्याला होत असतो. माणसाने स्वतः ला आधुनिक गोष्टीमध्ये गुंतून ठेवलेले आहे. परमेश्वरापासून तो अधिकाधिक दूर गेलेला आहे.
          आज देऊळमाता आपणा सर्वांना आमंत्रण करत आहे. जे कोणी त्यांच्याच जीवनात गुंतलेले आहेत, व्यस्त झालेले आहेत त्यांना सेवाभावी व प्रेम भावनेने जीवन जगण्यास आजची उपासना बोलावत आहे. आज आपण आज्ञा गुरुवार साजरा करीत आहोत. इंग्रजी मध्ये आज्ञा गुरुवार ला Maundy  Thursday असे म्हटले जाते. Maundy हा शब्द लॅटीन भाषेतून घेतलेला आहे. याचा अर्थ command म्हणजे ‘आज्ञा’ असा होतो. कारण ह्या दिवशी प्रभू येशूने येशूला आज्ञा केली. ही आज्ञा इतरांची सेवा व इतरांवर प्रेम करण्यासाठी होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन हे एक उत्तम असे ह्या दोन मुल्यांचे उदाहरण आहे. प्रभू येशूने शिष्यांचे पाय धुवून झाल्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले.” योहान १३:१५.
          आजची तिन्ही वाचने आपल्याला ‘सेवा’ व ‘प्रेम’ ह्या दोन गोष्टींविषयी सांगत आहेत. कशा प्रकारे आपण सेवा केली पाहिजे किंवा प्रेम केले पाहिजे हे ख्रिस्ताने स्वतः आपणासमोर एक उदाहरण ठेवले आहे. तो देव असूनही त्याने मनुष्याचे पाय धुतले. ज्या देवाने आपली निर्मिती केली तो परमेश्वर आपल्या प्रेमाखातर मनुष्य होऊन आपला सेवक झाला. आणि योहान १३:१४ मध्ये येशू म्हणतो, “म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे.” याचा अर्थ आपण येशूने दिलेला सेवेचा, प्रेमाचा व नम्रतेचा कित्ता आपल्या जीवनात गिरवला पाहिजे. जरी आपण ह्या जगात जगत असलो, तरी जगाच्या शिकवणुकीनुसार न जगता आपण ख्रिस्ताने शिकविलेल्या मार्गावर चालले पाहिजे.
          आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन गोष्टींची आठवण करून देत आहे.
१. ख्रिस्ताने मिस्सा बलिदानाची स्थापना केली:
          लूक २२:१९-२० येथे आपण वाचतो की, ख्रिस्ताने स्वतःचे शरीर आणि रक्त आपणा सर्वांच्या तारणासाठी दिले व सांगितले की,माझ्या स्मरणार्थ हे करा. तेव्हा मिस्साबलिदानाची स्थापना झाली. प्रत्येक मिस्सा बलिदानामध्ये आपण येशू ख्रिस्ताचे कष्ट व मरण यांचे स्मरण करतो. मिस्सा बलिदानाच्या स्थापनेमध्ये येशूने याजकपणाची सुध्दा स्थापना केली. त्याद्वारे आपणसुद्धा परमेश्वराच्या तारणकार्यांमध्ये सहभागी झालो.  २. ख्रिस्ताने शिष्यांना प्रेम करण्यास दिलेली नवीन आज्ञा:
          येशूने प्रीतीचा किंवा प्रेमाचा महामंत्र शिष्यांना दिला. जरी ख्रिस्ताला सर्व ठाऊक होते, कोण त्याचा घात घेणार, कोण त्याला नाकारणार, सर्व शिष्य त्याला सोडून पळून जाणार तरी सुध्दा येशूने त्यांच्यावर प्रीती केली. योहान च्या शुभवर्तमान १३:३४ मध्ये आपण वाचतो की, “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे, तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.” 
३. ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुवून नम्रतेचा आणि शिकवलेला प्रेमाचा धडा:
          अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपण जे बोलतो ते कृतीत आणणे. सर्व लोक आपल्याला प्रेमाबद्दल सांगू शकतात, बोलू शकतात. पण ते कृतीत दाखविणे फार कठीण असते. येशूने फक्त बोलून नव्हे, तर आपल्या संपूर्ण जीवनाद्वारे कशाप्रकारे इतरांवर प्रीती आपण केली पाहिजे किंवा कशाप्रकारे नम्रतेचे किंवा सेवेचे जीवन जगले पाहिजे हे दाखविले आहे. तो नम्र होऊन त्याच्याच शिष्यांचे पाय धुतो. आणि उत्तम असा नम्रतेचा आणि सेवेचा धडा आपणास शिकवितो. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले त्याप्रमाणे आपणही एकमेकांची सेवा करण्यासाठी तयार असलो पाहिजे.
          ह्या आज्ञा गुरुवारी ख्रिस्तसभा आपल्याला प्रेम करण्यास, सेवा करण्यास आणि नम्रतेने येशू सारखे जीवन जगण्यास बोलावत आहे.

बोधकथा:
          एका गावामध्ये एक मठ होता. त्या मठात फक्त वृध्द मठवाशी राहत होते. मठाचे प्रमुख किंवा मठाधिपती सुध्दा खूप वायोस्कर होते. एकदा हे मठाधिपती त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जातात. ते बोलत असता त्यांचा मित्र त्यांना म्हणतो, फादर आज तुम्ही फार दुःखी दिसता? काय कारण आहे? तेव्हा त्या मठाधिपतीणे त्यांची सर्व दूरदशा त्यांना सांगितली. ते म्हणाले, आमच्या मठात सर्व मठवाशी हे वायोस्कर झालेले आहेत व गेली कित्येक वर्षे कोणीही तरुण आमच्या मठात मठवाशी, होण्यासाठी आलेला नाही. काही वर्षानंतर अशी सुध्दा वेळ येईल की, आमचा मठ रिकामी होईल व कोणीही मठवाशी मठात दिसणार नाही. 
          ही सर्व कथा ऐकून झाल्यानंतर त्या मित्राने सांगितले की, फादर मी तर एक संसारी माणूस आहे. मला तुमच्या जीवनाबद्दल फारस काही समजत नाही. पण मला माहीत आहे की तुमच्या पैकी एक जन ख्रिस्त आहे. मग त्या मठाधिपती म्हणाला, तो ख्रिस्त कोण आहे ते मला सांग. मग तो मित्र म्हणाला, “तो ख्रिस्त कोण आहे ते मला ठाऊक नाही. पण तो तुमच्या मधला एक आहे हे मात्र नक्की.”  थोड्यावेळ बोलून झाल्यानंतर मठाधिपती मठात आले व सर्व गोष्ट त्याने त्या मठवाश्यांना सांगितली. सर्व मठवाशी अगदी आश्चर्यचकित झाले. सर्वाना वाटलं की माझा हा मठवाशी बंधूच ख्रिस्त असेल. म्हणून प्रत्येकजण एकमेकाचा आदर करू लागले, सर्वांना प्रेमाने व आदराने वागवू लागले.
          थोड्या दिवसानंतर त्यांच्या जीवनात भरपूर असा बदल घडून आला होता. तेथे प्रेमाचे, प्रार्थनेचे आणि देवाच्या वात्सल्याचे वातावरण निर्माण झाले होते. ही गोष्ट हळूहळू सगळीकडे पसरली आणि अनेक तरुणांनी मठात भरती केली. कारण प्रत्येक मठवाशी हा प्रेमाने व आदराने जीवन जगात होता. ह्या प्रेमाच्या मार्गामुळे त्या मठाला नवीन रूप मिळाल होत.       

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक व तुझी सेवा करण्यास प्रेरणा दे.
१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, आणि व्रतस्थ ह्यांनी लोकांना दुःख, यातना व मृत्यू यांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्यास शिकवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण अंतःकरणाने परमेश्वराकडे येऊन आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची तत्त्वे समाजामध्ये पसरावीत म्हणून आपण प्रार्थाना करूया.
३. येशूने शिष्यांचे पाय धुवून नम्रतेचा, प्रेमाचा व सेवेचा कित्ता आपल्यासमोर मांडला आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनात हा संदेश कृतीत उतरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या सर्व भारत देश वासियांनी ख्रिस्ता प्रमाणे बंधू प्रेमाची भावना जोपासून आपापसात असलेले गैरसमज, वाद विसरून चांगले जीवन जगण्यास परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजा परमेश्वराजवळ मांडूया.    

No comments:

Post a Comment