Thursday 11 April 2019


Reflections for the homily for Palm Sunday (14-04-2019) by Br. Jackson Nato

 झावळ्यांचा रविवार

दिनांक: १४/०४/२०१९
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६






‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज देऊळमाता झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. आज आपण येशूचे यरुशलेमेत जल्लोषात झालेल्या स्वागताची आठवण करतो. येशू हा दावीदपुत्र परमेश्वराच्या नावाने आला आहे. म्हणून त्याच्या स्वागतास सर्व यरुशलेमवासीय वाटेवर आले. झावळ्या उंचावून, वाटेवर कपडे टाकून व फुले उडवून येशूला गाढवावर बसवून होस्साना गात जल्लोष करीत ते शहरात आले. परमेश्वराच्या नावाने येणारा ख्रिस्त किंवा मसीहा आज आपल्यामध्ये आला आहे, म्हणून ते त्याला शरण गेले.
          आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया आपल्याला सांगत आहे की, परमेश्वराचा सेवक परमेश्वराशी एकनिष्ठ राहील व त्याने दिलेले कार्य पूर्णत्वास नेईल. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात आपणास ख्रिस्ताच्या नम्रपणाविषयी सांगत आहे. त्याने स्वतःचे दैवीपण सोडून, स्वतःला रिक्त करून सेवक झाला व क्रुसावर मरेपर्यंत तो आज्ञेत राहिला. आजचे शुभवर्तमान आपल्याला येशूच्या दुःखसहनात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे.
          जल्लोषात प्रवेश केलेल्या येशूला लोकांच्या तिरस्काराला सामोरे जावे लागले. तो क्रुसाच्या भाराखाली चिरडला गेला. कारण तो परमेश्वराच्या योजनेस विश्वासू राहिला. येशू परमेश्वराच्या नावाने आपणास पापमुक्त करण्यास आला. त्याचे आपल्या जीवनात स्वागत करण्यासाठी व त्याला पूर्णता शरण जाण्यासाठी कृपा मिळावी म्हणून ह्या मिसाबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.   

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:४-७
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, परमेश्वराचा सेवक परमेश्वराशी एकनिष्ठ राहिल व दुःखात तसेच क्लेशात परमेश्वराने सोपविले कार्य पूर्णतेस नेईल. परमेश्वराने त्याच्या सेवकास कार्य नेमुन दिले आहे आणि ते म्हणजे परमेश्वराची ओळख, तसेच त्याच्या दयेची ओळख लोकांना करून द्यावी. त्यासाठी त्याने त्यास प्रशिक्षित केले आहे. त्याच्या जिभेला कौशलीत केले आहे. पण हे कार्य काही सोपे नव्हे, परमेश्वराचा सेवक म्हणतो की, त्याच्या शब्दांची कदर मात्र सज्जन करतात, पण त्यावेळी दृष्टसुद्धा त्याच प्रमाणात त्याला विरोध करतात. त्याची चेष्टा करून त्याचा उत्साह कमी करतात पण परमेश्वराच्या सेवकाला ह्या गोष्टी थांबवू शकत नाहीत. कारण त्याच्याबरोबर परमेश्वर आहे आणि परमेश्वराचे कार्य हे विरोधकांच्या निंदेपेक्षा मोठे असल्यामुळे ह्या सर्वांचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, तर तो आपली भिस्त परमेश्वरावर ठेवील व परमेश्वर आपणास सहाय्य करेल ह्या आशेने तो आपल्या कार्यास पुढे सरसावत राहील.

दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणांस उद्देशून सांगतो की, येशू ख्रिस्त हा देव असूनही त्याने आपली समानता देवाबरोबर मानण्यास लाभ मानला नाही, तर तो नम्र होऊन पृथ्वीवर आला व सेवक झाला. स्वतःच्या वैभवास झिडकारले व एक साधारण मनुष्य म्हणून ह्या पृथ्वीवर जगला. जरी त्याने मानवरूप धारण केले, तरीसुद्धा मानवाच्या पापांत तो सहभागी झाला नाही. ह्याचा प्रत्यय  ‘तो मरणापर्यंत आज्ञेत राहिला’ ह्या ओवीत पहावयास मिळतो. ज्या कार्यासाठी तो ह्या भूतलावर आला होता, त्या कार्यात त्याने स्वतःला झोकून दिले अगदी क्रूसावरील मरणापर्यंत, म्हणून परमेश्वराने त्याला सर्वोश्रेष्ठ नाव बहाल केले. सर्वोच्च पद बहाल केले, ते म्हणजे आपल्या उजवीकडे बसविले. ह्या सर्वांचा हेतू हाच की, भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्र मनुष्य सजीव व निर्जीव त्याच्या समोर गुडघे टेकतील व येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे हे जाहीर करतील.

शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६
          आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या दुःखसहनाचा अनुभव घेतो. ह्या दुःख सहनात येशूचा यहुदा इस्कारयोत ह्याने केलेला विश्वासघात, पेत्राचे येशूला नाकारणे, व्हल्हांडणाचे भोजन, येशूला अटक, येशूने कालवरी पर्वतावर वाहिलेला वजनी क्रूस, त्याला क्रुसावर खिळणे व त्याचे मरण ह्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतात. हे सर्व प्रसंग येशूला असहाय्य करतात. त्याला एकटे पडतात व ह्या सर्व क्रूर प्रसंगातून जाण्यास भाग पडतात. ह्या सर्व गोष्टींमागचा हेतू म्हणजे येशू हा देव आहे. ज्याने मानवरूप धारण केले. जेणेकरून पापांत अडकलेल्या मानवजातीची सुटका होईल व त्यासाठी त्याला आपल्या मरणाने किंमत मोजावी लागली. ह्या सर्व प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी येशूने यरुशलेम शहरात प्रवेश केला तेव्हा सर्व लोकांनी त्याला ‘राजा’ म्हणून घोषित केले पण येशूने आपले राज्य हे ह्या जगाचे नव्हे, तर स्वर्गाचे आहे हे लोकांना आपल्या मरणातून येशूने पटवून दिले.           

मनन चिंतन:
          आज आपण झावळ्यांचा रविवार किंवा प्रभू येशूच्या दुःख सहनाचा रविवार  साजरा करत आहोत. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज आपण पवित्र आठवड्यात पदार्पण करत आहोत पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे जल्लोषमय वातावरणात यरूशलेमेत झालेले येशूचे पदार्पण आणि त्याच तीव्रतेने त्याचा झालेला धिक्कार ह्या दोन गोष्टींच्या विरोधाभासावर मनन चिंतन करतो.
          आज आपण झावळ्या उंचावून येशू हा दावीदपुत्र आहे आणि प्रभूच्या नावाने जो येणार होता तोच ख्रिस्त आहे ह्याची घोषणा करतो. हे आपले बोल नव्हेत, तर येशूने जेव्हा यरुशलेमेत प्रवेश केला, तेव्हा  यहुद्यांनी उद्गारलेले हे जल्लोषमय बोल आहेत आणि त्याच शब्दांचा आपण पुनरुच्चार करतो. ह्या प्रसंगावर जर आपण प्रकाश टाकाला, तर आपल्या लक्षात येते की, येशूला यरुशलेमेतून जेव्हा हाकलण्यात आले होते, तदनंतर पहिल्यांदाच येशूने यरुशलेमेत पाऊल टाकले आणि हा त्याचा अखेरचा प्रवेश होता. आपण पाहतो की, येशूने पूर्वेकडील प्रवेशद्वाराने यरूशलेमेत प्रवेश केला. पूर्व दिशा ही महत्त्वाची आहे, कारण यहेजकेल संदेष्ट्याच्या भविष्यवाणीनुसार मसीहा हा पूर्वीकडून येणार आहे आणि ह्याच आशेने सर्व यहुदी यरूशलेमेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराशी मसिहाच्या स्वागतासाठी उभे होते.    
          ‘येशू हा मसीहा आहे’ हे यहुद्यांनी कसे ओळखले? जर आपण शुभवर्तमानाचा सखोल अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येते की, जेव्हा येशूने यरुशलेमेत प्रवेश केला, तेव्हा त्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. कनान प्रदेशातील सर्व भागात येशूची ख्याती पसरली होती. कारण त्याने अनेक अपंग, आजारी ह्यांना बरे केले होते. अनेकांना त्याने मरणातून उठविले होते. अनेकांच्या जीवनात त्याने बदल घडवून आणले होते. ह्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून यरुशलेमवासीय थक्क झाले होते म्हणून येशू हाच मसीहा आहे व रोमी लोकांच्या गुलामगिरीतून आपणांस सोडवून, इस्राएलात राजकीय स्थगिती आणेल ह्या भ्रमाने ते येशूच्या स्वागतास आले होते. त्यासाठी त्यांनी येशूला एका गाढवावर बसविले. हातातील झावळ्या उंचावून ‘होस्साना’, ‘प्रभूच्या नावाने येणारा दावीदपुत्र धन्यवादीत असो’ ह्या घोषवाक्यांनी जल्लोष केला. लोकांनी आपल्या कंबरेचे कपडे काढून वाटेवर पसरविले. ह्या सर्वांचा अर्थ असा की, येशू हा राजा आहे आणि आम्ही त्याला शरण जातो. १ राजे १:४३ ह्या अध्यायात आपण पाहतो की, शलमोनचा जेव्हा राज्याभिषेक झाला, तेव्हा शलमोन सुद्धा गाढवावर बसून आला, लोकांनी त्याचा झावळ्या उंचावून स्वीकार केला; तसेच आपण पुढे पाहतो की, शलमोनाने इस्राएल व शेजारील राष्ट्रांमध्ये शांतता पसरविली. येशूचे सुध्दा ह्याचप्रकारे स्वागत करण्यात आले होते आणि येशूचे मिशन हे शांती प्रस्थापित करण्याचे होते. जखऱ्या अध्याय ९ व पुढे आपणांस मसिहाचे राज्य कसे असेल, ह्याचे स्पष्टीकरण मिळते. ह्या सर्व गोष्टीत आपणास एकच संदेश मिळतो, प्रभूच्या नावाने येणारा दावीदपुत्र हा युद्ध करण्यासाठी नव्हे, राजकीय उलथापालथ किंवा जगाच्या मुल्यानुसार राज्य प्रस्थापित करण्यासाठी नव्हे, तर लोकांना पापांच्या गुलामगिरीतून सोडवून देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. यहुदी लोक दैवी मसिहाला नव्हे, तर राजकीय उलथापालथ करणाऱ्या मसिहाला शरण गेले आणि म्हणूनच त्यांनी त्याला आठवड्याभरात कृसाच्या भाराखाली आणले आणि त्या दुःखसहनास बळी पाडले म्हणूनच आपण ह्या दिवसाला ‘झावळ्याचा रविवार’ जिथे येशूला जागतिक राजाचा दर्जा दिला, व ‘येशूच्या दुःखसहनाचा रविवार’ जिथे येशूने कृसाचे दुःखसहन पत्करले ह्या दोन प्रसंगाचा विरोधाभास पहायला मिळतो.
          यहुदी लोकांचे येशूला शरण जाणे, हा जरी देखावा असला, तरी गाढवाने मात्र मसीहाला ओळखले व आपल्या पाठीवर त्या ख्रिस्ताला वाहून तो शरण गेला. झावळ्या मात्र लोकांनी उंचावल्या असल्या, तरी दैवी व खऱ्या राजाच्या स्वागतास त्यांनी जल्लोष केला. कपडे जरी लोकांचे असले, तरी ख्रिस्तासमोर त्यांनी लोटांगण घातले. यरुशलेमेने सुध्दा तारणाऱ्याला स्वीकारण्यास वाट दिली. आज आपणसुद्धा ह्या द्विधा परिस्थितीसमोर उभे आहोत आणि समोर असलेला प्रश्न म्हणजे, ‘मी खरोखर ख्रिस्ताला शरण जातो का?’ कारण ख्रिस्ताला शरण जाणारा त्यावर उलटा फिरणार नाही. त्याचे राज्य हे शांतीचे आहे, हे जाणून ते प्रस्थापित करण्यासाठी झटले पाहिजे ह्यात काही शंका नाही.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१) आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केलेले आपले पोप, बिशप व सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कामात प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना विरोधास तोंड देऊन ख्रिस्ताप्रमाणे ठाम उभे राहावे व त्यांना पवित्र आत्म्याचे पाठबळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशुच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.

४) जे तरूण-तरूणी देवापासून दूर गेली आहेतजे नोकरीच्या शोधात आहेत व ज्यांना जीवन नकोस झालंय ह्या सर्वांवर देवाचा आर्शिवाद असावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

५) आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.  
               

No comments:

Post a Comment