संत पेत्र आणि पौल प्रेषित सोहळा
दिनांक:
२९/०६/२०२०
पहिले वाचन:
प्रेषितांची कृत्ये १२:१-११
दुसरे वाचन: २
तिमथी ४:६-८, १७-१८
शुभवर्तमान: मत्तय
१६:१३-१९
विषय: ख्रिस्तसभेचे खडक
प्रस्तावना:
साधु-संत
येती घरा तोची दिवाळी-दसरा ह्या पंक्ती प्रमाणे ख्रिस्तसभा आज आपणाला संतांच्या
सहवासात राहण्यास सांगत आहे. संत पेत्र व पौल प्रेषित ह्यांचा आज आपण सोहळा साजरा
करीत असताना, आपण त्यांच्या जीवनाचे, गुणांचे, व साक्षीदाराचे अनुकरण करु या.
सम्यक विवरण:
पहिले
वाचन: प्रेषितांची कृत्ये १२:१-११
प्रेषितांची
कृत्ये ह्यातून घेतलेल्या पहिल्या वाचनात पहिल्या ख्रिस्तसभेचे अत्याचार, मारहाण,
तुरुंगवास, अटक करणे, छळ होणे ह्याचे वर्णन करत आहे. पेत्र तुरुंगात असताना
देवाजवळ लोक तनमयतेने आणि एकाग्रतेने प्रार्थना करत होते. कारण, ज्याप्रमाणे
याकोबाचा हेरोद राजाने तलवारीने वध केला होता; त्याप्रमाणे पेत्राच्या जीवाला धोका
होता. पण देवाचे मार्ग वेगळेच असतात. देवाचा साक्षात्कार पेत्राला होतो. देव
आपल्या दूताद्वारे पेत्राचे संरक्षण करून तुरुंगातून त्याची सुटका करतो. होय
परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचे तो संरक्षण करीत असतो.
दुसरे
वाचन: २ तिमथी ४:६-८, १७-१८
संत
पौल आपल्याला दिलेले मिशनकार्य पूर्णतेस नेतो. समाधानी मनाचा आणि अंतःकरणाचा पौल
जेव्हा जीवनातील अंतिम क्षण जवळ आला आहे; हे जाणून अतिमहत्वाचे शब्द वापरतो: “मी
माझे युद्ध लढलो आहे. मी माझी धाव धावलो आहे. मी माझा विश्वास राखला आहे. आता जे
राहिले आहे ते हेच की; माझ्यासाठी नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे. मरणाने माणसाच्या
जीवनाचा शेवट होत नसतो; तर पुनरुत्थानाचाद्वारे आपणास नितीमत्वासाठी आणि अनंतकाळच्या
सुखासाठी पाचारण केले आहे.” हे आपण या वाचनात ऐकतो.
शुभवर्तमान:
मत्तय १६:१३-१९
येशू
कोण आहे? त्याचा शिष्यांना काय अनुभव आला आहे? त्यांचा येशूविषयी काय अभिप्राय आहे?
हे जाणण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना दोन प्रश्न विचारले: मनुष्याच्या पुत्राला
लोक कोण म्हणून संबोधतात? आणि तुम्ही मला कोण म्हणून संबोधता? पहिल्या प्रश्नाचे
उत्तर सोपे असल्यामुळे प्रेषितांनी त्याचे उत्तर सहजगत्या दिले. पण, दुसऱ्या
प्रश्नाने त्यांची तारांबळ उडाली. परंतू, आत्म्याने परिपूर्ण असलेला पेत्र “आपण
ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात!” असे म्हणाला. ह्या त्याच्या विश्वास प्रकटीकरणामुळे
येशूने स्वतःने त्याच्यावर ख्रिस्तसभेची जबाबदारी टाकली व अधिकाराने भरून टाकले.
मनन चिंतन:
लहानपणापासून
आपण खडक ह्या उपमेशी जोडलेले आहोत. लहान मुलं असताना आपण दगडाशी खेळलो आहोत. शाळेत
गेल्यावर आपण शिक्षक-शिक्षिकेच्या तोंडातून शब्द ऐकले आहेत. आपल्याला किंवा
दुसऱ्याविषयी, ‘हा ठोमब्या, नुसता दगड ह्याच्या डोक्यात काही शिरत नाही.’ खडकाचे
अनेक उपयोग व दुरुपयोग आपण वाचले आहेत. खडक उचलून दुसऱ्यावर फेकले आहेत. तर, ह्याचा
वापर चांगल्या गोष्टीसाठी सुध्दा केला जातो. अनेक इमारती उभारल्या जातात, रस्ते
बनवले जातात, घराला शोभा आणली जाते, इत्यादी.
असिसिकार
संत फ्रांसिस हा उमरिया विरुद्ध लढाई करण्यासाठी व असिसिचा बचाव करण्यासाठी
युद्धाला निघाला असता; स्पोलेटो नावाच्या
ठिकाणी स्वप्नात त्याला देवाची दर्शन घडते. ‘धन्याची की; चाकराची, देवाची की;
मानवाची सेवा करायला तुला आवडेल? असे प्रश्न त्याला विचारण्यात आले त्यावर त्याने
प्रतिसाद दिला की; ‘मला धन्याची आणि देवाची सेवा करायला आवडेल’. ‘मग असिसिला परत
जा.’ असा आदेश त्याला देवाने स्वप्नात दिला होता त्याच्यावर तो विचार करत असता; एक
दिवस असाच प्रार्थनेत मग्न असलेला फ्रान्सिसला पुन्हा देवाचे दर्शन झाले. त्याने देवाचा
आवाज ऐकला तो असा; ‘फ्रान्सिस! फ्रान्सिस! संत डामियानचे मंदिर पडतीस आले आहे; ते
तू दुरुस्त कर.’ देवाच्या वाणीला प्रतिसाद देऊन त्याने संत डामियानचे मंदिर
दुरुस्त करायला सुरुवात केली. मंदिर उभारणीसाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा व
मालमत्ता नव्हती. म्हणून त्यांने मंत्र काढला तो म्हणजे; ‘देवाच्या मंदिरासाठी एक
धोंडा कोणी देईल त्याला देव शंभरपटीने आशीर्वादित करील.’ आणि काय चमत्कार; देवाचे
मंदिर उभारण्यात आले. मंदिर उभारत असता फ्रान्सिसला कळून चुकले की; देवाने त्याला दगड-मातीचे
मंदिर उभारण्यासाठी सांगितले नव्हते. तर, जिवंत माणसाचे घडवण्यासाठी पाचारण केले
होते.
खरोखर
ग्रीक भाषेत खडकाला पेत्र म्हटले जाते. ‘तु सायमन होतास पण तुझे नाव बदलून तुला
नवीन जबाबदारी व अधिकार दिला आहे’. ‘तू पेत्र आहेस! आणि ह्या खडकावर मी माझी ख्रिस्तसभा
उभारणार आहे. तु भक्कम असला पाहिजे. तुला तडा जाता कामा नये. आणि आज पर्यंत येशूने
दिलेल्या अधिकारावर व जबाबदारीवर ख्रिस्तसभा उभारलेली व भक्कम आणि स्थिर आहे. ज्या
खडकावर ती उभारली आहे तिच्यासाठी त्याच पेत्राने प्रामाणिकपणे तिची सेवा केली व
शेवटी तिच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
दुसरा
खडक म्हणजे पौल. त्याला जिवंत येशूचे दर्शन दमस्काच्या वाटेवर झाले. ख्रिस्ताने
त्याला निवडले तो ख्रिस्तसभा परराष्ट्रीयांत व परलोकांत प्रकट करण्यासाठी हनान्या नावाच्या
याहुद्याला बाप्तिस्मा देण्यासाठी सांगितले असता; त्याने आक्षेप घेतला. ‘तो तर
तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा जीव घेवू इच्छितो! आणि त्याची निवड तु केली आहेस
काय?’ ‘ज्या ख्रिस्तसभेचा व ख्रिस्ताचा तो छळ करत आहे; तीच ख्रिस्तसभा उभारण्यासाठी,
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी, लागणारे अनेक छळ भोगण्यासाठी त्याला मी
आमंत्रित केली आहे.’
संत
पौल ख्रितासाठी जगला, ख्रिस्तसभेसाठी मेला आणि मुकुटाचा पात्र झाला. त्याने ख्रिस्तासाठी
आपले सर्वस्व वाहिले. आज आपण ह्या दोन प्रेषितांचा सोहळा साजरा करीत असताना सर्वात
प्रथम आपण त्यांच्याप्रमाणे खडक, भक्कम, व स्थिर झाले पाहिजे. आपल्या ख्रिस्ती
जीवनात, आपल्या विश्वासात, जसा त्यांनी ख्रिस्तासाठी व ख्रिस्तसभेसाठी छळ सोसला व
आपल्या प्राणाची आहुती दिली; त्याचप्रमाणे आपण ख्रिस्तासाठी, त्याच्या वचनासाठी छळ,
अन्याय, दुःख-कष्ट सहन केले पाहिजे. दररोजच्या जीवनात ख्रिस्तासाठी व ख्रिस्तसभेसाठी
आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे. शेवटी ख्रिस्ताप्रमाणे व दोन प्रेषितांप्रमाणे
आपण आपले जीवन कोनशिला झाले पाहिजे. जगाच्या दृष्टीतून नाकारलेला व ख्रिस्तासाठी आणि
ख्रिस्तसभेसाठी अतिमुल्य खडक झाले पाहिजे. जेणेकरून ख्रिस्तसभा सदोदित भाविकांच्या
खडकावर उभी राहील.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः “हे प्रभो, आमच्या
प्रार्थना स्विकारून घे.”
१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी
व सर्व प्रांपचिक त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख
संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपण संत पिटर व संत पौल ह्यांचा सण साजरा
करीत असताना, जे लोक मिशन भागात काम करीत आहेत त्यांची आपण विशेष आठवण करूया. त्यांना
देवाची विशेष कृपा मिळावी व संत पिटर व पौल प्रमाणे त्यांची श्रध्दा बळकट होऊन
त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या
परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने
पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना
दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.