Reflections for the 13th Sunday in Ordinary Time (28/06/2020) by Br.
Roshan Rosario
सामान्य काळातील तेरावा रविवार
पहिले वाचन- २ राजे ४:८-११, १४-१६अ
दुसरे वाचन - रोमकरांस पत्र ६:३-४, ८-११
शुभवर्तमान - मत्तय - १०:३७-४२
परमेश्वरास प्राधान्य
देऊया
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आपल्या जीवनात आपण
कशाला प्राधान्य देतो आपल्या कृतीला की नात्याला ह्या विषयी मनन चिंतन करावयास आजची
उपासना आपणास पाचारण करत आहे.
आजच्या
शुभवर्तमानात प्रभू येशूने कठोर शब्दांचा वापर केला आहे, जर त्या शब्दांचा शब्दशः
अर्थ घेतला, तर आपला गैरसमज होऊ शकतो. प्रभू येशू आपल्याला आपल्या कुटुंबिंयांवर वा
मित्र परिवारावर प्रेम करू नये, अस सांगत नाही, याउलट आपण आपल्या जीवनात नातेवाईकांपेक्षा किंवा आपल्या
मालमत्तेपेक्षा आपण देवाला प्राधान्य देतो का? हा प्रश्न आपणासमोर ठेवत आहे. जर
आपल्या जीवनात आपण देवाला किंवा देवाच्या इच्छेस प्राधान्य दिले, तर तो परमेश्वर आपली सर्व कृत्ये आशीर्वादित
करणार.
पहिल्या
वाचनात शुनेमकरीण स्त्रीने अलिशा प्रवक्त्यावर केलेल्या दयेच्या कृत्याचा
उल्लेख करून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो
की, प्रेमाने केलेले कोणतेही कृत्य, कितीही साधे परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे असेल्यास,
देव ते आशीर्वादित करणार व ते आपल्याला देवाजवळ आणणार. आजच्या मिसा बलिदानात
सहभागी होत असतना आपण स्वतःस प्रश्न विचारुया की, आपल नातं देवावर बरोबर जोडलेलं
आहे का? आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो?
पहिले वाचन- २ राजे ४:८-११, १४-१६अ
शुनेम हे गाव इस्रायलच्या जवळपास कुठेतरी होते. शूनेम गावातील स्त्री याअर्थी
शूनेमकरीण. अलिषाचा पाहुणचार करणाऱ्या स्त्रीचा उल्लेख ‘शूनेमकरीण’ या शब्दांनी केला आहे. तिच्या
नावाचा उल्लेख केलेलाच नाही. राजदरबारात अलिशाचे संबंध एलियापेक्षा फार वेगळे होते.
त्याला तेथे मान होता. तसेच तो एक प्रभावशाली व्यक्ती असे दिसते. तेव्हा या स्त्रीच्यावतीने अलिषाचा सेवक गेहजीने
राजाकडे शब्द टाकले. असंभवनीय परिस्थितीत पुत्र लाभाचे वचन हे देवाने अब्राहम व
सारा यांना दिलेले अभिवचनासारखे आहे. या स्त्रीनेही साराप्रमाणे मनात शंका ठेवून
उत्तर दिले, पण संदेष्ट्याचे वचन विश्वासनीय होते, ते निसंशय खरे ठरले.
दुसरे वाचन - रोमकरांस पत्र ६:३-४, ८-११
येशू ख्रिस्त
बरोबर त्याच्या मरणामध्ये संयुक्त होणे याच साधनाने आम्ही ‘पापाला मेलो आहोत’ हा
मुद्दा ओळ ३-४ मधून मिळाला आहे. याचा अर्थ असा की आपल्यावर पापाची सत्ता किंवा
राज्य आता नाही. पापाचा व आपला संबंध तुटला आहे. आता ख्रिस्ताचे जीवन आपल्याला
प्राप्त झाले आहे व त्या जीवनाने आणि आपण पापाची सत्ता नसलेले जीवन जगू शकतो.
कृपेचा राज्यात पाप सत्तेचे काही चालत नाही. पुढे संत पौल आपल्याला म्हणतो, आपण
ख्रिस्ताच्या जीवनाने येथून पुढे जगणार आहोत. ख्रिस्त युगानुयुगे जिवंत आहे. आपणही
ख्रिस्तामध्ये असेच म्हणावे, ‘मी ख्रिस्ताशी संयुक्त आहे. तो व मी पापाला मेलो
आहोत. बापाचा आम्हावर कसलाच अधिकार नाही, ख्रिस्ताप्रमाणे मी देवाच्या सहवासात व
देवासाठी जगणार आहे.
शुभवर्तमान - मत्तय - १०:३७-४२
मत्तयलिखीत
शुभवर्तमानातील आजच्या उताऱ्यामध्ये येशूख्रिस्त महत्वाच्या दोन मुद्द्यांवर विशेष
भर देत आहे.
१.
येशूचा खरा शिष्य होऊ इच्छीणाऱ्याने स्वत:चे जीवन ख्रिस्ताला संपूर्णत: समर्पित
करावे.
२.
जो कोणी येशूच्या अनुयायांबद्दल आदर आणि दानशूरपणा दाखवेल त्यांस देवाकडून त्यांचे
प्रतिफळ लाभेल.
बोधकथा
पादेरूस्की हा
पोलंड देशातील एक प्रसिद्ध पियानोवादक होता. त्याच्या घरच्या गरीब परिस्थितीमुळे
तो संगीतामध्ये प्रशिक्षण घेऊ शकला नाही. वयाच्या तेविसाव्या वर्षी थोडे पैसे
कमवून तो पॅरिस या शहरात पियानोच्या प्रशिक्षणासाठी गेला. पण तेथील सगळ्या
शिक्षकांनी त्याचे वय बघुन त्याला नाकारले व सांगितले की पियानो शिकायला आता
त्याचे वय निघून गेले आहे. धैर्यहीन न होता, पादेरूस्की दिवस-रात्र एक करून पियानो चा
अभ्यास करू लागला. कधीकधी पियानो वाजवता-वाजवता त्याच्या बोटातून रक्त वाहायचे, पण
त्याने हार मानली नाही. त्याच्या ह्याच निष्ठेमुळे व कष्टामुळे आज तो जगामध्ये एक
मोठा व प्रसिद्ध पियानो वादक म्हणून गणला गेला आहे. अखेरीस आमची अंतिम निष्ठा कोठे
आहे, ते ठरवून तसा निर्णय घेतल्याशिवाय आपल्याला येशूचे अनुयायी होता येणार नाही.
मनन चिंतन:
शिष्यत्वासाठी
मोजावी लागणारी किंमत काय आहे, ह्याविषयी येशु आपल्याला पुन्हा एकदा निर्भीडपणे
परखड शब्दांनी आजच्या शुभवर्तमानात आठवण करून देत आहे. येशूवर निष्ठा ठेवल्याने
कधी कधी घरात संघर्ष होण्याची शक्यता आहे, असे झाले तर येशुवरील निष्ठेला आपण प्राधान्य
दिले पाहिजे. येशूच्या मागे चालण्यासाठी वधस्तंभ उचलून घेणे ह्या भाषेची अधिक फोड
पुढे मत्तय १६:२१-२८ मध्ये केली आहे. येथे येशुने स्वतःच्या मरणा व पुनरुत्थानाविषयी
भाकीत व आत्म त्यागाचे आमंत्रण केले आहे. ही विश्वासासाठी, निष्ठेसाठी प्राण पणास
लावून हुतात्मा होण्याची भाषा आपल्याला कळते, जेव्हा येशू आजच्या वाचनात म्हणतात,
ज्याने आपला जीव राखीला तो त्याला गमाविल आणि ज्यानी माझ्याकरिता
आपला जीव गमावला तो त्याला राखील. ख्रिस्ती निष्ठा व बांधिलकी याकडे कमीतकमी
सहिष्णूतेने पाहणाऱ्या समाजात निर्भयपणे आरामात बसून हे विवेचन वाचले, तर ते
अतिशयोक्तीचे आहे असे कदाचित वाटेल; तथापि आजही जगाच्या काही भागात हे अगदी
अक्षरशः खरे आहे. तेथे प्रत्यक्षात अशीच परिस्थिती आहे आणि जिथे जीवाला काही धोका
नाही अशा ठिकाणीही येशूच्या अनुयायांसाठी त्याने दिलेला हा कौटुंबिक संघर्षाचा व
कुटीचा इशारा अगदी खरा आहे. अखेरीस तुमची अंतिम निष्ठा कोठे आहे ते ठरवून तसा
निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला येशूचे अनुयायी होता येणार नाही.
आजच्या आधुनिक
जगात आपले जीवन सुखमय व आरामदायक असायला पाहिजे, परंतु अशा
खूप काही गोष्टी आहेत ज्यांनी आपले हृदय व आत्मा गरजेच्या वस्तुपासून दूर घेऊन जातात.
येशूची हाक ऐकून त्याला अनुसरून त्याचा अनुयायी होण्यासाठी जी निष्ठा व श्रद्धा येशूच्या
शिष्यांनी दाखवली होती ती आपण आपल्या जीवनात दाखविणे गरजेचे आहे. आज बहुतेक लोक
आपल्या स्वतःच्या प्रगती व सुख समाधानवर लक्ष केंद्रित करतात. ख्रिस्ती म्हणजे मी
जितके कमीत कमी काय करू शकतो त्याच्यानेच आपण संतुष्ट आहोत. आपण स्वतःला सांगतो की,
मी ह्या आठवड्याला मिस्सामध्ये भाग घेतला, मी पाप स्वीकार केला अशाप्रकारे मी माझ्या
धर्माचेपालन केले आहे. आपल्याला वाटते की ख्रिस्तासाठी मला जे काय शक्य होते ते मी
केले. याउलट आपल्या ख्रिस्ती जीवनात आपले विचार असे असायला पाहिजे की ख्रिस्तासाठी
मी आणखी काय करू शकतो किंवा ख्रिस्तासाठी मी काही पण केलं तरी ते कमीच आहे. आपली
खरी श्रद्धा व निष्ठा हीच आहे जी आपण ख्रिस्ताचा अनुयायी ह्या नात्याने आपल्याला जीवनात
ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण येशू ख्रिस्त व त्याच्या शुभवर्तमानाला संपूर्णपणे आपल्या
जीवनात उतरवायचा प्रयत्न करू, तेव्हाच आपल्याला स्वर्गात त्याच्याबरोबर शाश्वत
जीवनाचे फळ मिळेल. येशूने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला दररोज आटोकाट
प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. आपण खऱ्या मार्गावर आहोत ह्याची जाणीव आपल्याला तेव्हाच
होणार, जेव्हा येशूने सांगितले कष्ट आणि त्रास आपल्या वाटेवर येणार. आणि आपणास
दिलासा देण्यास किंवा आपले सांत्वन करण्यास येशुने आपणास हे वचन दिले आहे की माझे जू
सोयीचे व माझी ओझे हलके आहे. (मतय ११:३०) शेवटी आपण येशूचे अनुयायी तेव्हाच होणार
जेव्हा आपण त्याच्यावर संपूर्णपणे प्रीती करू, त्याच्यावर प्रीती असेल तर आपल्याला
कोणतेही कष्ट व अडचणी जड वाटणार नाही.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू
आमची प्रार्थना
१. आपले पोपमहाशय आणि प्रभूच्या सुवार्ता कार्यात त्यांना साथ
देणारे त्याचे विविध पदावरील,
धर्माधिकारी, ह्यांना प्रभूचे राज्य ह्या भूतलावर
स्थापन करण्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराकडून सतत लाभावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भयभीत
झाले आहे. सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. हे भय पवित्र आत्म्याच्या
धैर्याने दूर व्हावे व संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी आपण प्रभूकडे
प्रार्थना करू या.
३. आज लॉक डावन मुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ढासळली
आहे. त्यामुळे कुटुंबांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आश्या कुटुंबांना अनेक
दानशूर व्यक्तीने पुढे येऊन सढळ हस्ते मदत करण्यास त्यांना कृपा दे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. अनेक तरुण-तरुणींनी जे देवापासून लांब गेले आहेत त्यांना
परमेश्वरी दयेने पुन्हा चांगल्या मार्गावर आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment