Reflections for the Homily of Most Holy
Trinity Sunday (07-06-2020) By Dn. Robby Fernandes.
पवित्र त्रैक्याचा सण
दिनांक: ०७/०६/२०२०
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र
१३:११-१३
शुभवर्तमान: योहान ३:१६-१८
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा पवित्र त्रैक्याचा
सण साजरा करीत आहे. ख्रिस्ती श्रध्देचा गाभा असलेले पवित्र त्रैक्य आपल्या
सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे, “परमेश्वर
दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व
सत्याचा सागर आहे” असा महान परमेश्वर जगावर एवढी प्रिती करतो की, त्याने आपल्या सर्वांच्या तारणासाठी त्याच्या पुत्राला भूतलावर पाठविले.
संत पौलाने दुसऱ्या
वाचनात म्हटले आहे, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची
प्रिती आणि पवित्र आत्म्याची सह्भागिता तुम्हा सर्वांसह असो.” तसेच आजच्या
शुभवर्तमानात आपण ऐकतो की, देवाने आपल्या पुत्राला जगाचा
न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण
व्हावे म्हणून पाठविले आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये
तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात
सह्भागी होत असताना, पवित्र त्रैक्याने आपली श्रद्धा बळकट
करावी व त्याच श्रद्धेद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनात एकता, शांती,
प्रेम प्रस्तापित व्हावे म्हणून आपण पवित्र त्रैक्याकडे विशेष
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
देवाने मोशेला दुसऱ्यांदा
सिनाय पर्वतावर बोलावले जेणेकरून पुन्हा एकदा पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडांवर
सर्व आज्ञा लिहाव्या कारण मोशे जेव्हा सिनाय पर्वतावरून खाली आला होता तेव्हा
लोकांच्या पापी कृत्यामुळे त्यांनी पहिल्या आज्ञा मोडल्या होत्या. देव स्वतः
मोशेला प्रकट झाला व देवाच्या स्वरूपाचे हे अनन्य प्रकटीकरण पाहून मोशेने देवाला
विनवून सांगितले की, प्रभूने लोकांच्या बरोबर रहावे, त्यांच्या पातकांची क्षमा करावी आणि आपले वतन म्हणून त्यांचा स्विकार
करावा. मोशेची विनंती देवाने मान्य केली व त्यांच्याबरोबर कराराचे नाते पुन्हा
स्थापन केले.
दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र
१३:११-१३
पौलाने आपल्या वाचकांना
उद्देशून अखेर उत्तेजनपर शब्द लिहिले आहेत. त्यांचे कल्याण असो, त्यांना
पुर्णता लाभो, समाधान मिळो, ते एकचित्त
होवोत अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. येथील संदर्भाला अनुसरून याचा अर्थ असा होतो:
पौलाच्या विरोधकांनी आणलेली वेगळी सुवार्ता त्यांनी नाकारावी (११:४) त्याचा
प्रेषित असण्याचा पौलाचा यथार्थ व रास्त हक्क मान्य करावा (१०:१३-१८, ११:२१-२३), त्यांच्यामध्ये कोणीही
कसलेच अनैतिक आचरण, स्वैराचार करीत नाही याची खात्री करून
घ्यावी (१२:१९-२१) आणि परस्परांशी एक दिलाने, एकमेळाने
राहावे.
शुभवर्तमान: योहान ३: १६-१८
वचन (३:१६), “देवाने
जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अश्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो
त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." मधील
विधानातून सत्याचे तीन मुद्दे थोडक्यात, मार्मिकपणे सांगितले
आहेत:
१. देवाच्या प्रीतिचे
सार्वत्रिक स्वरूप,
२. त्या प्रीतिचा
समर्पणात्मक स्वभाव आणि
३. तिचा सार्वकालिक नित्य
उद्देश
‘एकाच
वचनात शुभवर्तमान’ असे यांचे वर्णन केले आहे. जुन्याकरारात
देव हा फक्त इस्रायलवरच प्रीति करत होता असे त्यांना वाटायचे, पण नव्याकरारात इतरत्र आढळणारी विश्वव्यापी प्रीति या संकल्पनेशी जुळणारीच
आहे. येशू जगाचा न्याय निवाडा करून दोषी ठरवण्यास नव्हे तर सुटका करण्यास का आला
तेही येथे स्पष्ट होते. खर तर जग हे अगोदरच दोषपात्र ठरलेल्या अवस्थेत आहे आणि
देवाच्या पुत्रावर विश्वास न ठेवल्याने ही स्थिती अधिकच ठळक झाली. देवाचा पुत्र
ह्या नात्याने येशू हीच अंतिम कसोटी आहे. ही कसोटी लावल्याने जगाचे विश्वासणारे
आणि विश्वास न ठेवणारे असे सरळ दोन भाग पडतात.
“देवाने
जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” परुश्यांपैकी
निकदेम नावाच्या एका मनुष्याला येशूने स्वतः जगामध्ये का आला ह्याचे कारण स्पष्ट
करून दिले आहे. मनुष्यरूप धारण करून येशू ख्रिस्त देवाचे मानवांवर असलेले
सार्वकालिक प्रेम दर्शविण्यास ह्या धरतीवर आला होता. “जो कोणी त्याच्यावर विश्वास
ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
येशूख्रिस्तावर
परिपूर्ण विश्वास हाच सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. ह्याचा
अर्थ असा नाही की आपण कधीच मरणार नाही, तर जरी आपण देहाने मरण पावलो
तरीपण आत्म्याने सर्वकाळ जगणार. येशू दुस-यांचा नाश करण्यास आला नाही तर जे कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांचा नाश स्वतःमुळेच होईल.
मनन चिंतन:
जेव्हा आपण Trinity किंवा पवित्र
त्र्यैक्याविषयी बोलतो, तेव्हा आपण रहस्याविषयी बोलतो; त्याच्या गुढाविषयी बोलतो,
किंबहुना हे न उलगडणारे कोडं आहे. ते समजण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या नात्याची
किंवा संबंधांची गरज असते, व फक्त परमेश्वरचं ते कोड समजू शकतो. असे म्हणतात की,
जे आपल्याला समजत नाही किंवा कळत नाही, ते आपल्या बुद्धी स्मृतीपटलाच्या पलीकडे
आहे. अशा गोष्टी आपण विश्वासाने समजून घ्यायला पाहिजेत.
पवित्र शास्त्रामध्ये Trinity किंवा
पवित्र त्र्यैक्याविषयी कित्येक असे संदर्भ (References) दिलेले आहेत. योहान लिखित
शुभवर्तमानामध्ये शुभवर्तमानकार आपल्या सर्वांना येशूचा पिता व पवित्र आत्माविषयी सांगत
आहे. पवित्र त्र्यैक्याविषयीचे चांगले संदर्भ आपल्याला मत्तय लिखित शुभवर्तमानामध्ये
आढळून येतात. मत्तय ह्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना सांगतो, “तुम्ही जाऊन
सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र
आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” (मत्तय २८:१९). तर मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये
पवित्र त्र्यैक्याची सुचित्रीत प्रतिमा येशूच्या बाप्तिस्मा वेळी रेखाटलेली
आपल्याला आढळते. “आणि लागलेच पाण्यातून वर येताना, आकाश उघडले आहे व आत्मा
कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले; तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की,
“तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” (मार्क १:१०-११).
“वाणी, कबूतर आणि येशू” ह्या तीन प्रतिमा आपल्याला पवित्र त्र्यैक्याची आठवण करून
देतात.
तसेच संत पौल सुद्धा पवित्र
त्र्यैक्याविषयी आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवाची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागीता तुम्हा सर्वांवर असो” (२ करिंथ १३:१४).
संत लूक ह्याच्या प्रेषितांची कृत्ये व शुभवर्तमानामध्ये तारणाचा इतिहास हा त्रिमूर्त
दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो.
जुना करार काळ हा पित्याचा काळ आहे,
शुभवर्तमानाचा कालावधी हे पुत्राचे युग आहे व शुभवर्तमानानंतरचा काळ हा पवित्र
आत्म्याचा काळ आहे. तर Creed किंवा प्रेषितांचा विश्वासांगीकार जे आपण विश्वासाने
दर रविवारी म्हणतो; त्यामध्ये सुद्धा आपण हाच नमुना (Pattern) किंवा संरचना जोपासतो
व त्याची सुरुवात देव पिता - निर्मानकर्ता व नंतर देवपुत्र - संरक्षण करतात व ह्याची
सांगता किंवा समाप्ती देव पवित्र आत्म्याद्वारे होते, जो जीवन देणार आहे. पण आपण
हे विसरून चालणार नाही की, जेथे-जेथे पिता परमेश्वर आहे त्या-त्या ठिकाणी पुत्र व
पवित्र आत्मा हजर असतो. पवित्र त्र्यैक्य हे अगम्य असे एकता व विविधतेचे रहस्य व गुढ
आहे.
जेव्हा-जेव्हा फ्राँन्क शिड लोकांना पवित्र
त्र्यैक्यावर प्रबोधन करायचा तेव्हा पवित्र त्र्यैक्य समजवण्यासाठी पावसाच्या
पाण्याच्या उपमेद्वारे लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत असे. तो म्हणायचा की, जे
पावसाचे पाणी पडते ते तीन वेगवेगळ्या स्वरुपात अस्तित्वात असू शकते: वायू (Gas), घन
(Solid) व द्रव्य (Liquid) म्हणजेच वाफ (Steam), बर्फ (Ice) आणि पाणी (Water) ह्या वरून असे दिसून
येते की, हे काही तीन प्रकारचे पाणी नाही. पाणी फक्त एकच आहे, परंतु ते तीन भिन्न
स्वरूपात अस्तित्वात असते.
ह्याच प्रकारे लोयोलाचे संत इग्नाती असे
म्हणतात की, “पवित्र त्र्यैक्य हे संगीताच्या तीन स्वराच्या स्वरूपात आहे, ते जरी
तीन असले, तरी त्यांचा आवाज मात्र एक येतो.” त्याचप्रमाणे संत पॅट्रिक असे म्हणतात
की, “हे तीनपाती गवताप्रमाणे आहे.” त्याचप्रमाणे संत जोसेफ कुपरतीनो असे म्हणतात
की, “पवित्र त्र्यैक्य हे सुर्याच्या तेजाप्रमाणे आहे: प्रकाश (Light), उष्णता (Heat)
व किरणे (Rays).” अशा प्रकारे कित्येक संतांनी पवित्र त्र्यैक्य समजवण्यासाठी
त्यांच्या परीने प्रयत्न केले आहेत. ह्या उदाहरणाद्वारे आपण कदाचित पवित्र
त्र्यैक्याचा विचार करून समजण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पवित्र त्रैक्याचरणी
आपल्याला त्याचे रहस्य समजून घेण्याची शक्ती प्राप्त व्हावी, जेणेकरून आपला
त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट व्हावा.
विश्वासू लोकांच्या प्रार्थंना:
प्रतिसाद: “हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या
कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.”
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू
भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची
त्रैक्यावरील श्रद्धा बळकट असावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ असण्यास त्यांनी
योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्यांच्यातील समन्वयातून आपण
प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ती ह्या नात्याने जी
श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला कृपा मिळावी व
हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. लवकरच मुले नवीन शैक्षणिक
वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने अभ्यास करून त्यांना
त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा
प्रभूचरणी मांडूया.
आपणा सर्वास पवित्र त्र्यैक्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment