पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार
दिनांक: १८/०४/२०२१
पहिले वाचन:
प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५, १७-१९
दुसरे वाचन: १ योहान
२:१-५
शुभवर्तमान: लूक
२४:३५-४८
तुम्हास शांती असो
प्रस्तावना:
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या या आधुनिक काळात आपण खूप अशी प्रगती केलेली आहे. सर्वच क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत. परंतु आपणामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती म्हणजे ‘शांती’. ‘शांती’ या विषयावर मनन चिंतन करण्यास आजची उपासना आपणास पाचारण करीत आहे. प्रत्येक व्यक्ती हा शांतीचा भुकेला व तहानलेला आहे. परंतु खरी शांती ही ख्रिस्ताकडून आपणास मिळते. तीच शांती देण्यासाठी ख्रिस्त पुनरूत्थित होऊन आपणामध्ये आलेला आहे. थोडा वेळ शांत राहून आपले संपूर्ण आयुष्य पुनरूत्थित ख्रिस्तास अर्पण करूया. त्याला आपल्या जीवनात आमंत्रण देऊया व त्याच्या शांतीचा अनुभव घेऊ या.
बोधकथा:
एकदा एक राजा आपल्या राज्यात ‘शांती’ या विषयावर
चित्रकलेची स्पर्धा आयोजित करतो. आणि सर्वात उत्कृष्ट चित्रास उत्तम असे बक्षीस
देण्याचे घोषित करतो. भरपूर असे चित्रकार या स्पर्धेत भाग घेतात. ‘शांती’ ह्या विषयावर खूप आकर्षक अशी वेगवेगळ्या
प्रकारची चित्रे काढून ते राजासमोर घेऊन येतात. ह्या सर्व चित्रांमधून राजा फक्त
दोन चित्रे निवडतो. पहिल्या चित्रात अतिशय शांतपणे डोंगरातून वाहणारी सुंदरशी नदी
दाखवलेली असते व सर्व वातावरण अतिशय शांत स्वरूपाचं असतं. सगळीकडे प्रसन्नतेच व
शांत असं वातावरण पाहून लोकांना वाटलं की, ह्याच चित्राला ‘उत्तम चित्र’ असे राजा घोषित करील. दुसऱ्या चित्रात
शांततेचं तसं काही दृष्य रेखाटलेलं नव्हतं. किंबहुना वादळ-वाऱ्याचं दृश्य या
चित्रात चित्रित केलेलं होतं. तसेच कडाक्याचा मुसळधार पाऊस व विजा चमकत होत्या आणि
सोसाट्याचा वारा सुटलेला असं ते चित्र चित्रित केलं होतं. संपूर्ण चित्र शांततेचं
नसून, अशांततेचं ते एक प्रतीक होतं. परंतु त्याच चित्रात
डोंगराजवळ एक छोटंसं झाड होतं व त्या झाडाच्या फांदीवर एक छोटसं घरट होतं व त्या
घरट्यात एक पक्षी अतिशय शांतपणे बसलेला होता. हे दृश्य पाहून त्या राज्यांने या
दुसर्या चित्रास सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून घोषित केलं.
याचं कारण राजाने सांगितलं की, शांतता म्हणजे संघर्ष व हिंसा, लढाया व मारामाऱ्या यांचा अभाव नव्हे, तर
आंतरिक स्वास्थ्य होय. जे आपणास कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्यास शक्ती
देते. तीच खरी शांती होय.
मनन चिंतन:
कधीकधी ‘शांती
मिळेल का बाजारी?’ ‘शांती मिळेल का शेजारी?’ अशी आपणा प्रत्येकाची परिस्थिती झालेली असते. प्रत्येक माणसाला शांतीची
नितांत गरज असते. चांगली झोप हवी असेल, तर आपणास शांत
वातावरण लागते. जीवनात चांगला निर्णय घ्यायचा असेल, तर
शांततेची, एकांतवासाची गरज असते. चांगला अभ्यास करून
परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल, तर आपणास
शांतीची गरज असते. सर्वच गोष्टीत, किंबहुना, परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आपणास शांततेची गरज असते. स्तोत्रात
सांगितलं आहे, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव
आहे!” (स्तोत्र ४६:१०). म्हणूनच जेव्हा एलिया परमेश्वराला
शोधण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी गेला, तेव्हा
त्याच्या समोरून सोसाट्याचा वारा गेला व भूकंप झाला त्यात परमेश्वर नव्हता, भूकंपानंतर मोठा अग्नी प्रगट झाला त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता, त्या अग्नी नंतर शांत व मंद वाणी झाली. त्या शांतते मध्ये त्याला
परमेश्वराचा अनुभव आला. (१राजे१९:१०-१४).
जर सर्व गोष्टीत शांतीच गरज आहे, तर ‘शांती’ म्हणजे नक्की काय? बोधकथेत सांगितल्याप्रमाणे, शांती म्हणजे फक्त संघर्ष व हिंसा, लढाई व
मारामाऱ्या या गोष्टींचा अभाव नव्हे. खरी शांती म्हणजे आंतरिक स्वास्थ्य किंवा
प्रसन्नता होय. आणि ही शांती आपणास फक्त पुनरूत्थित येशू ख्रिस्त देऊ शकतो. कारण
देवा ठायीच आपणास शांती मिळते. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, “आपली हृदये परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत आणि ती
त्याच्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाहीत.”
आंतरिक स्वास्थ्य किंवा शांती मिळविण्यासाठी आपणास भीतीवर, रोगावर, संकटावर, पापावर किंबहुना मरणावर मात करणे
गरजेचे आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने कष्ट, मरण व
पुनरुत्थान यांद्वारे भितीवर, रोगावर, पापावर, संकटावर व मरणावर विजय मिळविला आहे.
आणि म्हणून तोच पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपणास खरी शांती देऊ शकतो जी शांती
जगावेगळी आहे. योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, “मी
तुम्हास शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास
देतो. जसे जग देते, तसे मी तुम्हाला देत नाही.” (योहान १४:२७). हीच शांती प्रभू येशू ख्रिस्त जगाला देण्यासाठी या पृथ्वीवर
आला. म्हणून त्याच्या जन्मासमयी स्वर्गातील दूतगणं मोठ्या सुरात परमेश्वराची
स्तुती करीत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि
पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती!” (लूक २:१३-१४).
पुनरुत्थानानंतर जेव्हा-जेव्हा प्रभू येशू शिष्यांस भेटला, तेव्हा-तेव्हा त्या
पुनरुत्थित ख्रिस्ताची प्रथम वाणी किंवा शब्द होते ते म्हणजे, “तुम्हास शांती असो.” आजचे शुभवर्तमान देखील या
अभिवादनास अपवाद नाही. आजच्या शुभवर्तमानात आपणास सांगितले आहे की, यहुद्यांच्या भितीमुळे शिष्य दारे बंद करून खोलीत बसले होते. एवढेच नव्हे,
तर प्रभू येशूच्या दुःख व कष्टाच्या समयी त्याला साथ न देता
मरणाच्या ताब्यात सोडून आपण पळून गेलो, आपल्या गुरूला
नाकारले, त्याचा घात घेतला, अशा
सर्व विचारांमुळे शिष्यांची मने व अंत:करणे फार खचून गेली होती. ते स्वतःला दोषी
ठरवत होते. अशा या भीतीजनक परीस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये यशया
प्रवक्त्याने भाकीत केल्याप्रमाणे ‘शांतीचा अधिपती’ (यशया ९:६) कसा त्यांनी हरवलेली शांती त्यास पुन्हा बहाल करण्यास
त्यांच्यामध्ये येतो व म्हणतो, “तुम्हास शांती असो.”
इब्री भाषेत शांती या शब्दास ‘शालोम’ म्हणतात. ‘शालोम’ म्हणजे, परिपूर्ण
भरभराट, कल्याण, स्वास्थ्य व
ऐक्य होय. म्हणून पूनरूत्थित ख्रिस्ताची शांती सर्वप्रथम त्या शिष्यांस त्यांनी
केलेल्या कृत्यांची शिक्षा न करता क्षमा करते व प्रेमाने आपलेसे करून पुन्हा एकदा
आपले मित्र व शिष्य बनवते. एवढेच नव्हे, प्रभू येशू त्यांना
त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा सर्व राष्ट्रांना घोषित करण्यास व त्याच्या
शांतीचे दूत व साक्षीदार बनण्यास आमंत्रण देतो.
प्रभू येशू आपणा प्रत्येकास त्याचे कार्य पुढे नेण्यास पाचारण करतो.
प्रत्येक मिस्साबलिदानात धर्मगुरू आपणास प्रभूची शांती देत असतो व ती शांती
दुसऱ्यांना देण्यास आमंत्रण करीत असतो व मिसाच्या शेवटी ‘जा! ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास
पाठविण्यात येत आहे’ असे सांगून शांतीचे दुत असे आपणास
समाजात पाठवीत असतो.
आज कोरोना ह्या रोगामुळे अनेक लोक आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, शैक्षणिक अशा समस्यांना सामोरे जात आहेत. शिष्यांप्रमाणे आपण देखील
घाबरलेलो आहोत. सगळीकडे लॉकडाउन ची परिस्थिती आहे. अशा ह्या भितीजन्य परिस्थितीत
ख्रिस्ताने दिलेली शांती इतरांपर्यंत पोहोचविणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य
आहे.
असिसिकर संत फ्रान्सिसने एक सुंदर अशी शांतीची प्रार्थना लिहिलेली
आहे ती प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनात जगून आपण ख्रिस्ताची शांती इतरांना देऊ
शकतो व त्याच्या शांतीचे साक्षीदार होऊ शकतो. ती प्रार्थना,
हे प्रभो, मला
तुझ्या शांतीचे साधन बनव.
जेथे द्वेष आहे, तेथे मला प्रेम पेरू दे.
जेथे दुखावलेली मने आहेत, तेथे मला क्षमा करू दे.
जेथे संशय आहे, तेथे विश्वास निर्माण करु दे.
जेथे वैफल्य आहे, तेथे आशा निर्माण करू दे.
जेथे अंधार आहे, तेथे प्रकाश निर्माण करू दे.
हे दिव्य स्वामी, मला अशी कृपा दे की,
सांत्वनाची अपेक्षा करण्याएवजी मीच सांत्वन करावे.
इतरांनी मला समजून घेण्याऐवजी, मीच त्यांना समजून घ्यावे.
इतरांनी माझ्यावर प्रेम करण्याएवजी, मीच त्यांच्यावर प्रेम करावे.
कारण प्रेम देण्यातच, आम्ही प्रेम मिळवत असतो.
क्षमा करण्यातच, आम्हाला क्षमा होत असते, आणि मरण्यातच
आम्ही चिरंतन जीवनात जन्मत असतो. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझी शांती दे.
१.
आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू,
व्रतस्थ आणि इतर ख्रिस्ती लोकांनी आपल्या आचरणाद्वारे प्रभूची शांती
मिळविण्याचा प्रयत्न करावा व ती शांती इतरांना देण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून
आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२.
आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कार्याद्वारे देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी
झटावे, स्वतः
शांतीचे साधन बनावे तसेच त्यांनी शांती प्रस्थापित करणारे प्रकल्प हाती घ्यावेत
म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३.
अनेक लोक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झाले आहेत. अनेक लोक कोरोना ह्या महामारीचा
सामना करीत आहेत अशा लोकांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व प्रभूची शांती
अनुभवता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर व्हाव्यात व पुनरुत्थित प्रभूच्या शांतीचा आपणास अनुभव यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment