Thursday, 29 April 2021

                 Reflection for the Fifth Sunday of Easter (02/05/2021) By Br. Suhas Ferrel


पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार



दिनांक: ०२/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ९: २६-३१

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३: १८-२४

शुभवर्तमान: योहान १५: १-८




प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविला आहे. पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. या पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारेच आपणा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे आपण ऐकणार आहोत की शौलाला दिमिष्काच्या मार्गावर असताना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडले आणि तदनंतर त्याने पौल बनून धैर्याने येशूची सुवार्ता सर्व जगाला पसरविण्याचे काम हाती घेतले. पौल हा नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे पुनरुत्थित येशुमध्ये राहिला. आजचे दुसरे वाचनही आपल्याला येशूवर पुरेपूर विश्वास ठेवून एकमेकांवर प्रेम करण्याचा उपदेश करत आहे. आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहिलो तर आपले तारण होईल आणि जर का आपण प्रभू येशू पासून दूर गेलो तर आपला नक्कीच ऱ्हास होईल. एखादी फांदी ज्याप्रमाणे झाडाला चिटकून असते तेव्हा भरपूर फळ देते अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण ख्रिस्ताशी एकरूप होतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चांगली कृत्ये करतो आणि आपले जीवन नेहमी फलदायक बनत असते. हेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकणार आहोत.

          आपण नेहमी प्रभू येशूच्या सानिध्यात राहावे आणि त्याची सुवार्ता सर्व जगाला बिनधास्तपणे प्रकट करावी म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

बोधकथा:

          एकदा एका राजाने गाढवाचं पिल्लू घरी आणले आणि त्या पिल्लाला स्वच्छ आंघोळ घातली, त्याच्यावर चांगली वस्त्रे चढविली आणि त्या गाढवाचा वापर तो गावामध्ये फिरण्यासाठी करू लागला. जेव्हा जेव्हा राजा गाढवावर बसून गावाचा फेरफटका मारण्यासाठी निघत असे तेव्हा तेव्हा लोक आनंदाने त्याच्यापुढे नाचत-गाजत असत. हे दृश्य पाहून गाढव अतिशय आनंदित झालं; गाढव मनातल्या मनात विचार करू लागलं की, मी काही साधारण गाढव नाही. नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी असाधारण गुण सामावलेले आहेत. हळूहळू हे गाढव गर्वाने फुगत चालले होते. जेव्हा जेव्हा राजाचे नोकर ह्या गाढवाला घेऊन जाण्यासाठी येत तेव्हा तेव्हा ते गाढव नखरे करू लागलं. त्यामुळे ऐके दिवशी राजाने वैतागून आपल्या नोकरांना त्या गाढवाला बाहेर रस्त्यावर हाकलून देण्यास सांगितले. गाढवाला रस्त्यावर हाकलून दिल्यावर गाढव दारोदारी हिंडू लागले. गाढवाला वाटलं की लोकं त्याचा आनंदाने स्वीकार करतील, त्याच्यापुढे नाचतील. परंतु लोकं त्या गाढवाला हाकलू लागले. त्याच्यावर दगड फेक करू लागले. आता त्या गाढवाला कळले की त्याची किंमत, त्याचे महत्त्व हे त्याच्यावर सवारी करणाऱ्या राजामुळे त्याला प्राप्त झाले होते. क्षणभरातच त्याचा गर्व मातीस मिळाला.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे, दुःखे, अडथळे, अडीअडचणी येतात परंतु अशा परिस्थितीमध्ये देवाच्या जवळ येणे म्हणजेच खरा ख्रिस्ती धर्म होय. जेव्हा-जेव्हा आपण अंधकारमय जीवनामध्ये एकटे पडले असतो. तेव्हा-तेव्हा आपला परमेश्वर आपल्यासोबत नेहमी खंबीरपणे उभा असतो.

          आज पुनरुत्थान काळातील पाचव्या रविवारी ख्रिस्तसभा आपणा सर्वांना देवामध्ये एकनिष्ठ राहण्याचा सल्ला देत आहे. संत पौल हा त्याच्या जीवनामध्ये नेहमी कायद्याला धरून जीवन जगत होता. नियम हा त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच जे नियम पाळीत नव्हते त्यांचा तो छळ करीत होता. पौलाला कळत नव्हते की जो प्रभू येशू ख्रिस्त ख्रुसावर टांगलेला आहे, जो स्वतः दयनीय परिस्थितीमध्ये आहे तो इतरांचा उद्धार, इतरांचे तारण काय करणार? परंतु जेव्हा पौलाला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन घडते तेव्हा त्याला खऱ्या सत्याची ओळख येते आणि तेव्हापासून जो छळणारा होता तो आता ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना पसरविणारा बनतो. आपल्याही जीवनामध्ये अनेकदा आपण इतरांची निंदा-नालस्ती, तसेच इतरांविषयी वाईट गोष्टी बोलून त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला अजून खऱ्या ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. जेव्हा आपल्याला खरोखर पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख होईल त्यावेळी आपोआपच आपण इतरांना देवाचे प्रेम, आपुलकी, दया दाखवून आपले जीवन अर्थमय बनविण्याचा प्रयत्न करू.

          संत योहान येशूचा अतिजवळचा शिष्य आपल्याला येशूच्या प्रेमाविषयी बोध करीत आहे की जर आपण खरोखरच इतरांवर प्रेम करीत असाल तर ते आपल्या कृतीद्वारे प्रकट व्हायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त प्रेमाचा धडा संपूर्ण जगाला शिकविला नाही तर त्या प्रेमापोटी स्वतःचा प्राण क्रुसावर अर्पण केला. ह्याला म्हणतात खरे प्रेम. त्याच प्रेमामुळे आज आपण सर्वजण ख्रिस्ती म्हणून नवीन जीवन जगत आहोत. कारण हे जीवन ख्रिस्ताने आपणास दिलेले आहे. त्यामुळेच ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ राहणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

          जोपर्यंत एखादी फांदी झाडाशी एकरूप असते तोपर्यंत ती चांगली, ताजीतवानी राहते आणि फळे देत असते. परंतु जेव्हा ती फांदी कापून झाडापासून वेगळी केली जाते तेव्हा तिचा उपयोग जाळण्यासाठी केला जातो. तिचा नाश होतो. तिचे अस्तित्व नाहीशे होते. आज येशू ख्रिस्त आपल्याला एकच बोध करत आहे, की जसा मी माझ्या पित्यामध्ये आहे तसे तुम्हीही माझ्यामध्ये राहा. संत मदर तेरेजा म्हणतात की जर तुम्हामध्ये ख्रिस्त असेल तरच तुम्ही इतरांना ख्रिस्त देऊ शकता. नाहीतर विहिरीत नाही पाणी तर पोहऱ्यात कुठून येणार? जर आपल्याकडे ख्रिस्त नसेल, ख्रिस्ताचा अनुभव नसेल तर आपण इतरांना ख्रिस्त कसा देणार? त्यामुळे ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ असणे फार गरजेचं आहे. अनेकदा आपण जागतिक सुखात इतके धुंद होतो की आपल्याला आपल्या तारणकर्त्या येशूचा विसर पडतो. क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला जास्त महत्त्वाच्या वाटू लागतात. आणि कालांतराने आपण आपल्या जीवनाची दिशा विसरून आपले जीवन हे अर्थहीन बनू लागते. त्यामुळेच आपण नेहमी ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगून इतरांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याद्वारे आपणाला सार्वकालीन जीवन प्राप्त होईल. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:        

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे पुनरुत्थित दर्शन घडवून दे.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व तसेच प्रापंचिक ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्यासाठी जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जी लोकं देऊळमातेपासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि तसेच त्यांना त्याच्या अपराधांची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. जी लोकं दुःखी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्याचा आत्मविश्वास ढासळत आहे अशांना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करू या.

४. जी लोकं आजारांनी ग्रस्त आहेत. विशेषतः करोना आजाराने पिडीत असलेल्या लोकांना पुनरुत्थित येशूचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आता थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजीक व वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करू या.       

No comments:

Post a Comment