पवित्र त्रैक्याचा सण
दिनांक: ३०/०५/२०२१
पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४, ३९-४०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१४-१७
शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०
प्रस्तावना:
आज देऊळमाता
पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. महान संत ग्रेगरी म्हणतात, “जुना करार हा
देव पित्याचा काळ, तर नवा करार हा देव पुत्राचा काळ व आधुनिक काळ हा पवित्र
आत्म्याचा काळ आहे”. आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वराने पृथ्वीवर
मानवाला निर्माण केले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो कि, आपण परमेश्वर
पित्याला, बाबा, बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा आपणाला मिळाला आहे व
प्रभू येशूख्रिस्ता बरोबर आपण त्याचे वारस झालो आहोत. पुढे शुभवर्तमानात प्रभू
येशू म्हणतो, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या,
पूत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आपणा प्रत्येकाचा
बाप्तिस्मा पवित्र त्रैक्याच्या नावाने झालेला आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला
निर्माण केले, ज्या प्रभू येशूख्रिस्ताने आपलं तारण केलं आणि जो पवित्र आत्मा
आपल्या सोबत असून, पवित्र जिवन जगण्यास आपणाला कृपा देत आहे, त्या त्रैक्याने आपल्याला
दिलेली जबाबदारी आपण पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४, ३९-४०
आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि,
परमेश्वराने मानवाला निर्माण केले म्हणून परमेश्वर सांगतो कि, वर आकाशात व खाली
पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून परमेश्वर जो देव आपणाला
निरंतराचा देत आहे, त्यात आपण चिरकाळ राहावे, म्हणून परमेश्वर आपल्याला देत असलेले
विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन करण्यास सांगत आहे.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१४-१७
आजच्या दुसऱ्या
वाचनात आपण वाचतो कि, देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आपण त्याचे पुत्र आहोत.
आपल्यामध्ये दास्यत्वाचा नाही तर पवित्र आत्मा आहे. आणि तो आत्मा स्वतः आपल्या
आत्म्याबरोबर साक्ष देतो कि, आपण देवाची मुलें आहोत; आणि जर मुलें तर वारसही आहों,
म्हणजे आपणसुद्धा ख्रिस्ताबरोबर देवाचे वारस आहोत.
शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०
येशू ख्रिस्ताच्या पुन:रुत्थानानंतर
काही दिवसांनी ११ शिष्य गालील प्रांतातील डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची
व त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. त्या डोंगरावर त्यांनी ख्रिस्ताला नमन केले.
तरी कितेकांच्या मनांत संशय होता. प्रभू येशूला त्यांच्या मनातील संशय समजला. तो
त्यांच्या जवळ त्यांच्याशी बोलू लागला. त्यांची दुर्बळता व भय प्रभूला माहित होते, कारण पुनरुत्थित प्रभू त्यांच्याबरोबर पूर्वीप्रमाणे राहत नसे. ख्रिस्ताने
त्यांना स्व:ताच्या अधिकाराविषयी सांगितले. तो स्वर्गाचा व संपूर्ण पृथ्वीचा अधिकारी
आहे. कैसर राजा किंवा सर्व धर्मपुढारयापेक्षा तो श्रेष्ठ अधिकारी आहे.
या अधिकाराने, ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली की शिष्यांनी सर्व लोकांस ख्रिस्ताचे
अनुयायी करावे. हे काम, शिष्य, फक्त
ख्रिस्ताची सुवार्ता सांगून पार पाडू शकतात. आणि जे ख्रिस्ताचे अनुयायी होण्याची
इच्छा ठेवतात त्यांना पाण्याने बाप्तिस्मा देणे हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले
होते. देव जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा या
त्रैक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची ही साक्ष आहे. ख्रिस्त त्यांच्याबरोबर आत्म्याने
सदासर्वदा राहणार.
मनन-चिंतन:
आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत
आहोत. देव एकच आहे पण त्याचं अस्तित्व तीन व्यक्तींमध्ये आहे. (१) स्वयम् परमेश्वर
पिता (२) पूत्र म्हणजे प्रभू येशूख्रिस्त आणि (३) पवित्र आत्मा. हे अस्तित्व जाणण्यासाठी
आपणाला पवित्र शास्त्राचा आधार घेऊन त्याच्यावर मनन-चिंतन करण्यास आजची उपासना
बोलावत आहे.
पवित्र
त्रैक्याच रहस्य एवढं मोठ्ठ आहे की, ते मानवजातीच्या विचारांच्या आकलनापलीकडे आहे.
म्हणूनच रोमकरांस पत्र ११:३३ मध्ये संत पौल म्हणतो, “देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची
संपत्ती किती आघात आहे; त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत”. तसेच जुन्या करारात, अनुवाद ह्या पुस्तकात २९:२९ मध्ये मोशेद्वारे
परमेश्वर म्हणतो, “गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत”.
आपण हे जग
पाहतो. सुंदर असा निसर्ग पाहतो. झाडं-झुडपं, समुद्र, नदी-नाले, दगड, डोंगर, आकाश,
सूर्य, चंद्र, तारे, पक्षी, प्राणी हे सर्व पिता परमेश्वर निर्माण करीत असताना
प्रभू येशू आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होते. पवित्र त्रैक्याद्वारेच ह्या
सर्वस्वाची निर्मिती झाली आहे. उत्पत्ती १:१- ३ मध्ये आपण वाचतो कि, “प्रारंभी
देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहीत व शून्य होती, आणि
जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.
तेव्हा देव बोलला प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला”.
पिता परमेश्वर
सर्वकाही निर्माण करीत असताना पवित्र आत्मा जलावर तळपत होता आणि परमेश्वराने शब्द
उच्चारला प्रकाश होवो आणि तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच योहान
लिखित शुभवर्तमानात १:१ मध्ये आपण वाचतो, “प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह
होता आणि शब्द देव होता”. तसेच, “शब्द देही झाला आणि त्याने आम्हा मध्ये वस्ती
केली” (योहान १:१४). नवीन करारात त्या शब्दाचे रुपांतर शरीरामध्ये झालं आणि प्रभू
येशू ख्रिस्ताने (शब्दाने) आम्हामध्ये वस्ती केली” (योहान १:१).
देव एक असून
त्याचं अस्तित्व तीन व्यक्ती मध्ये आहे; म्हणूनच प्रभू येशूख्रिस्त आजच्या
शुभवर्तमानामध्ये म्हणतो, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस
पित्याच्या, पूत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” (मत्तय २८:१९). पवित्र त्रैक्याचा उल्लेख
पवित्र शास्त्रामध्ये भरपूर ठिकाणी आपणास पहावयास मिळतो. जुन्या करारात यहेज्केल पुस्तकात
३६:२६ मध्ये यहेज्केल संदेषट्याद्वारे परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हास नवे हृदय देईन,
तुमच्याठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास
मासमय हृदय देईन. यहेज्केल संदेष्ट्याद्वारे नवे हृदय म्हणजे प्रभू येशुख्रिस्त
आणि नवा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा होय.
एकदा एक
धर्मगुरू पवित्र साक्रामेन्ताच्या खोलीमध्ये प्रार्थना करीत असता पवित्र आत्म्याने
त्यांना एक दृष्टांत दाखवला ज्यात पवित्र आत्मा त्यांना सांगतो कि, पिता म्हणजे
मस्तक आहे; पुत्र म्हणजे हृदय आहे; आणि पवित्र आत्मा म्हणजे हात आहेत. यहेज्केल
संदेषट्याद्वारे दिलेल्या ह्या वचनामध्ये आपण पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र
आणि पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्ती एकत्र पाहतो.
नवीन
करारामध्ये देखील भरपूर ठिकाणी पवित्र त्रैक्याचा उल्लेख केलेला आपणास आढळतो.
मत्तय ३:१६ मध्ये आपण वाचतो, “मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर
आला आणि पहा आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व
आपणावर येताना पाहिला”. तसेच प्रेषितांची कृत्ये १०:३८ मध्ये आपण वाचतो कि, नासोरी
येशुला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला तो सत्कर्मे करीत व
सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्या बरोबर
होता”. बाप्तिस्मा संस्कार आपणाला पवित्र त्रैक्यावर खोलवर मनन चिंतन करण्यास
बोलावत आहे.
तसेच पेत्राचे पहिले
पत्र १:२ मध्ये संत पेत्र म्हणतो कि, पवित्र त्रैक्याद्वारेच आपण शुद्ध व पवित्र
झालो आहोत. म्हणजे पवित्र आत्म्याद्वारेच आपल्या प्रत्येकाचे शुद्धीकरण किंवा तारण
झालेल आहे.
जसं संत पौल करिंथकरास
पहिले पत्र १३: १४ मध्ये म्हटल्या प्रमाणे आपण पवित्र मिस्साबलीदानाची सुरुवात ही
पवित्र त्रैक्यानेच करतो: “प्रभू येशुखिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र
आत्म्याची सहभागीता तुम्हा सर्वासह असो”. म्हणून आपण कोणतेही काम पिता, पुत्र आणि
पवित्र आत्म्याच्याच नावाने सुरुवात करतो.
तीन व्यक्ती पण एकच देव, ह्या रहस्यावर
आपण विश्वास ठेवतो का? पिता जो उत्पन्न करता, पुत्र जो तारणारा आणि पवित्र आत्मा
जो शुद्ध करणारा आहे, ह्या पवित्र त्रेक्यावर आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवावा
म्हणून प्रार्थना करूया.
Praise the
Lord!!!
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता
वाढविण्यास मदत कर.
१. ख्रिस्तसभेचे
अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू
व व्रतस्त बंधू-भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत,
त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट व्हावी व इतरांनाही त्याच
श्रद्धेत दृढ करण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करू
या.
२. आज पवित्र
त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्रैक्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या
कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे
म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. लॉकडाऊनमुळे
अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे कुटुंबांत अनेक समस्या
निर्माण झाल्या आहेत अश्या कुटुंबांना अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हस्ते
मदत करण्यास त्यांना कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. अनेक
तरुण-तरुणी जे देवापासून दूर गेले आहेत त्यांना परमेश्वरी दयेने पुन्हा चांगल्या
मार्गावर आणावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
आपणा सर्वांस पवित्र त्रैक्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!