प्रभू येशूचे स्वर्गरोहण
दिनांक: १६/०५/२०२१
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ४:१-१३
शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०
विषय: ख्रिस्ताचे सुवार्तिक बनून
ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे नेऊ या
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
आज आपण पुनरुत्थित काळातील सातवा रविवार
तसेच प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा करीत आहोत. आजची उपासना, विशेषत: आजचा
प्रभू शब्दविधी आपणांस ख्रिस्ताचे सुवार्तिक बनून ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे
नेण्यास पाचारण करीत आहे.
प्रभू येशूचे स्वर्गरोहण ‘कष्ट-दुःख सहन करून तो मरण पावला, मरणातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व-समर्थ
देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे.’ ही आमच्या विश्वासाची ‘सत्ये’ आपण प्रेषितांचा
विश्वासांगिकार ह्या प्रार्थनेत मोठया अभिमानाने प्रगट करतो.
पित्याने
दिलेले मिशनकार्य प्रभू येशूने पूर्ण करून, तो स्वर्गात आपल्या पित्याकडे
जाण्यापूर्वी, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याचे कार्य त्याने आपल्या शिष्यांस
दिले.
तेच मिशन
कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची आहे. हे कार्य
पूर्ण करण्यास आपणा प्रत्येकास पवित्र आत्म्याची कृपा व सामर्थ्य ह्या
मिस्साबलीदानात मागूया.
बोधकथा:
लिओनार्डो
दा विन्सी हा एक सुप्रसिद्ध असा चित्रकार होता. एकदा त्याने एक सुंदर असे चित्र
काढावयास सुरुवात केली होती. थोडे दिवस त्या चित्रावर काम केल्यानंतर त्याच्या एका
हुशार शिष्याला बोलवून ते चित्र पूर्ण करण्यास सांगितले. त्याचा शिष्य घाबरून
त्यास म्हणाला, “गुरुजी, तुम्ही काढलेले चित्र पूर्ण करण्यास मी अयोग्य व अपात्र
आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही सुरु केलेले एवढे सुंदर चित्र मी पूर्ण करुच शकत
नाही.” तेव्हा लिओनार्डो दा विन्सी त्यास शांत करत म्हणाला, “माझं काम तुला चांगलं
करण्यास प्रेरणा देणार नाही काय?” (Will not what I have done
inspire you to do your best?)
मनन चिंतन:
प्रभू
येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा आज आपण साजरा करीत आहोत. त्याचे
स्वर्गरोहण आपणा प्रत्येकास त्याने ह्या
जगात असताना सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची प्रेरणा देत आहे. बोधकथेत
सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे संपूर्ण जीवन, त्याने शब्दांनी व कृतीने केलेले
कार्य हे आपणा प्रत्येकासाठी सुवार्तिक होण्यास एक आदर्श आहे.
हे कार्य
पुढे नेण्यास आपणास गरज आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याची. कारण प्रभू येशूने त्याचे
कार्य पवित्र आत्म्याच्या सहाय्याने व कृपेने पूर्ण केले. पवित्र आत्मा तुम्हांवर
येईल व हे कार्य पुढे नेण्यास म्हणजेच ख्रिस्ताचे सुवार्तिक होण्यास सामर्थ्य देईल
म्हणून त्याच्या दानांसाठी प्रार्थना करा असे प्रभू येशू आजच्या पहिल्या वाचनात
आम्हांस सांगत आहे.
२८ मे
२०१७ रोजी, येशूच्या स्वर्गरोहणाच्या सणादिवशी पोप महाशय फ्रान्सिस यांनी असा
संदेश दिला की, प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाने, पुत्राची ह्या पृथ्वीवरील कार्याची
सांत्वना (समाप्ती) झाली आहे आणि पवित्र ख्रिस्तसभेच्या कार्यास आरंभ झाला आहे.
आणि हे कार्य जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. (General
Audience 28/05/2017)
ह्या
मिशनकार्या संबंधात पोप पौल सहावे त्यांच्या Evangelii Nuntiandi ह्या परिपत्रकात ख्रिस्तसभेची अशी शिकवण देतात. ते म्हणतात, ख्रिस्तसभा ही
अस्तित्वात आहे त्याच कारण प्रचार करण्यासाठी/सुवार्ता घोषविण्यासाठी. दुसऱ्या शब्दात
सांगायचं झालं तर पवित्र सभा १. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी २. ती शिकविण्यासाठी
३. कृपेच्या दानांची वाहिनी/स्त्रोत कशी ४. पापी लोकांचा देवाशी समेट घडवून
आणण्यासाठी तसेच ५. ख्रिस्त यज्ञ (मिस्साबलीदान) चिरंतन ठेवण्यासाठी अस्तित्वात
आहे (EN 14).
एवढेच नव्हे, तर Evangelii Gaudeum ह्या परिपत्रकात पोप फ्रान्सिस प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनींना उपदेश
करतात की, सर्व बाप्तीस्मा संस्कार स्वीकारलेल्या ख्रिस्ती जनांवर सुवार्तिक
होण्याची/सुवार्तेचे प्रतिनिधी होण्याची जबाबदारी आहे (EG 120). आणि पोप संत जॉन पौल दुसरे आपल्या Redemtoris
Missio ह्या परिपत्रकात तीन प्रकारे आपण हे मिशन कार्य पुढे नेऊ
शकतो असे शिकवितात (RM 33-34).
१. Evangelization: ज्यांना प्रभूची ओळख नाही अशा सर्वांना घोषवून.
२. Re-Evangelization: ज्यांचा ख्रिस्ती जीवन जगण्याचा जोश/आनंद कमी झाला आहे, त्यांस पुन्हा
एकदा नव्याने सुवार्ता घोषवून.
३. Pastoral Care: जे ख्रिस्ती आहेत, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांची काळजी घेऊन.
प्रत्येक
कुटुंब हे छोटीशी ख्रिस्तसभा आहे. पहिल्या प्रथम आपल्या कुटुंबात ख्रिस्ती मुल्ये
जोपासून, ख्रिस्ती मूल्यांचं बाळकडू पिऊन ते जगणे गरजेचं आहे. जेव्हा ही ख्रिस्ती
मुल्ये आपण आत्मसाद करून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शब्दा व कृत्याद्वारे
उतरविण्याचा प्रयत्न करू तेव्हाचं आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्तिक बनू व सर्व
जगात व संपूर्ण सृष्टीला त्याची सुवार्ता घोषित करू शकू. ती सुवार्ता खंबीरपणे
घोषविण्यासाठी गरज आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याची तर पवित्र आत्म्यास आपल्या
जीवनात आपण आमंत्रण देऊया. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझे सुवार्तिक होण्यास
आम्हांस कृपा दे.
१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ
ह्यांनी संपूर्ण सृष्टीस प्रभू येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी पवित्र आत्म्याचे
सहाय्य त्यांच्यासाठी मागुया.
२. आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी एक चांगलं, न्यायचं व
एकोप्याचं राज्य स्थापन करण्यासाठी झटावं म्हणून त्यांच्यासाठी परमेश्वराची कृपा
मागुया.
३. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या जीवनाद्वारे
ख्रिस्ताची सुवार्ता प्रगट करता यावी व ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनून त्याने दिलेले
मिशनकार्य पूर्ण करण्यास कृपा व सामर्थ्य मिळावं म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. कोरोनामुळे अनेक अश्या समस्या व संकटांना लोकांना
सामोरे जावे लागते. अनेक लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. अशा
सर्वांवर प्रभूने आपली कृपादृष्टी वळवावी व कोरोनाचा समूळ नाश करावा म्हणून आपण
प्रार्थना करू या.
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत
राहून प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment