पुनरुत्थान
काळातील सहावा रविवार
विषय:
“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला प्रेम किंवा प्रीती ह्या
विषयावर मनन चिंतन करावयास पाचारण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देव पक्षपाती
नसून तो सर्वांना समान लेखतो व सर्वांवर त्याच्या प्रेमभरित दानांचा वर्षाव करतो
हे सांगण्यात आले आहे. योहानलिखित पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात ‘देव प्रेम आहे’ व
त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून त्याने त्याचा पुत्र आपणाखातर दिला, ह्याची घोषणा करण्यात आली आहे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त प्रेम
करण्यासाठी शिष्यांना आज्ञा देत आहे. जे प्रेम पिता आणि येशूमध्ये आहे तेच प्रेम
येशू शिष्यांना देउन इतरांवर करण्यासाठी आवाहन करतो.
खरे प्रेम हे शारीरिक किंवा, अद्भुत रम्य असे
नाही. तर, खरे प्रेम हे समोरच्यात असणाऱ्या, नसणाऱ्या, आहेत, नाहीत, होणार आहेत ह्या
सर्व गोष्टींचा स्वीकार करून आपले जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित करणे होय. समाजामध्ये
आज पैशापेक्षा प्रेमाची गरज जास्त आहे. परमेश्वराच्या प्रेमाचा आपल्याला सखोल
अनुभव यावा व तोच अनुभव इतरांना देण्यास आज ह्या मिस्साबलिदानामध्ये विशेष कृपा
मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
प्रेषितांची कृत्ये १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८
पहिल्या वाचनात संत पेत्र आपल्याला
अशी शिकवण देतो की, ‘देव पक्षपाती नसून तो सर्वांना समान लेखतो व त्याच्या
प्रेमाला सीमा नाही.’ देव आपल्याला
त्याच्या प्रेमात गुंफित असे राहण्यास सांगत आहे. देव हा सर्वांवर समान प्रेम करतो.
तो जसा याहुदिंवर, तसाच परराष्ट्रीयांवर सुद्धा प्रेम करतो. तो समाजाने गलिच्छ,
वाळीत टाकलेल्यांवर प्रेम करतो तसचं प्रेम आपल्या स्वतःच्या शिष्यावर सुद्धा करतो.
त्याची एकच इच्छा आहे की, ह्या प्रेमामध्ये त्याच्या पुत्राच्या बलिदानाने सर्व बचावले
जावे. ह्याचे उत्तम उदाहरण आजच्या उताऱ्यातील परराष्ट्रीय कर्नेलियस आहे.
दुसरे वाचन: १ योहान
४:७-१०
आजच्या दुसऱ्या वाचनात संत योहान आपल्याला
देव प्रेम आहे असे सांगतो. हे प्रेम त्याने मानवजातीच्या उद्धारासाठी व्यक्त केले
आहे. ह्याच त्यागाने व प्रेमाने आपल्याला आज्ञा व जबाबदारी दिली आहे की, आपण
सुद्धा देवाप्रमाणे एकमेकांवर प्रेम करावे. जसे देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केले
आहे, त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्याच्यावर व त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक
जीवावर प्रेम करणे गरजेचे आहे.
शुभवर्तमान: योहान
१५:९-१७
द्राक्षवेल आणि फांद्या
यांचा दाखला झाल्यानंतर प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात त्याच्या शिष्यांना
प्रेमाचा संदेश देऊन त्याप्रमाणे जगण्यास आज्ञा देतो. जसा पिता व पुत्र एक आहेत
तसे आपण सुद्धा एक राहणे गरजेचे आहे. प्रभू येशू आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे एक
नवीन परंतु महान अशी शिकवण देत आहे. ती, म्हणजे आपल्या मित्रासाठी केलेलं सर्वात
महान अर्पण म्हणजे आत्मसमर्पण होय.
मनन चिंतन:
‘देवाने
जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र
मानवाच्या तारणासाठी दिला’ (योहान ३:१६) आणि एवढेच नाही तर
येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपला प्राण समर्पण करून आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजय
मिळवून आपणावरील प्रेम सिद्ध केले, म्हणूनच येशू ख्रिस्त
आपणाला सांगत आहे, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे
मीही तुम्हावर केले आहे, तेच प्रेम तुम्ही एकमेकांवर करा”
(योहान १५:९). जो इतरांवर प्रेम करतो तोच देवाला ओळखतो (१ योहान
४:७) कारण देव प्रेम आहे. ह्या प्रेमाखातर ती व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न
करता निस्वार्थीपणे इतरांसाठी आपला प्राण द्यायला देखील तयार होते (योकान १५:१३).
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय
बंधु आणि भगिनींनो आजच्या उपासनेचा प्रेम हा विषय आहे. हाच विषय आजच्या सर्व
वाचकांना संघटित करीत आहे. कारण हा शब्द आजच्या वाचनात अकरा वेळा वापरण्यात आला
आहे. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आठवण करून देतो की, प्रेमाची
अंतिम अभिव्यक्ती ही आत्मत्यागात आहे. आजचे वाचन हे प्रभू येशूच्या निरोप
प्रवचनांमधून घेतलेलं आहे. (योहान १४-१७) हा निरोप संवाद त्याच्या शिष्यांबरोबरचा
हृदयस्पर्शी संवाद आहे. ह्या संवादामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. प्रेम हा
त्रिवारी संगम आहे: देवाचे प्रेम त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर, येशू
ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांवर आणि शिष्यांचे त्यांच्या गुरूवर असा हा त्रिवेणी
संगम आपल्याला पहावयास मिळतो. पित्याच्या व पुत्राच्या प्रेमात तसेच पुत्राच्या व
त्याच्या शिष्यांच्या प्रेमात काही विभिन्नता नाही. तरीपण प्रभू येशू त्याच्या
शिष्यांना सांगतो की, “माझ्या प्रीतीत राहा” (योहान १५:९) कारण त्याच्या
प्रीतीविना हे प्रेम हरवल्यासारखे किंवा हरवण्याची शक्यता आहे. पुढे त्याच्या प्रितीत
राहण्यासाठी आपल्याला अट घालण्यात आली आहे. की, “जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर,
माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:१०) ह्याद्वारे त्याचे शिष्य आयुष्यभर त्याच्याशी
एक राहतील व त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतील. ह्याद्वारे येशू ख्रिस्ताने आपल्याला
शिष्यांना आदर व स्वातंत्र प्राप्त करून दिले आहे. “जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल
तर, माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:१०) त्याच्याकडे आपल्या पित्याच्या आज्ञेत
राहण्याचे स्वातंत्र्य होते, आणि त्या स्वातंत्र्याचा त्याने गैरवापर न करता, त्याने
आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व हे उत्तम उदाहरण आपल्यासाठी बहाल केले
आहे. त्याच्या पित्याच्या प्रेमात तो सदैव राहिला आणि त्याच्या पित्याच्या आज्ञेत
राहून जो आनंद प्रभू येशूने अनुभवला तोच आनंद प्रभू येशू त्याच्या शिष्यांना देत आहे.
ह्या उताऱ्यातील काहिक ठळक
मुद्द्यांवर आपण आता चिंतन करूया.
नवीन
आज्ञा: प्रभू येशूने जुन्या करारातील दहा आज्ञांचे
दोन आज्ञेमध्ये रूपांतर केले आहे. त्या दोन आज्ञा अशा, “येशूने उत्तर दिले, पहिली
ही की, ‘हे इस्त्राएल, ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; आणि तू आपला
देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बिद्धीने व
संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर
प्रीती कर.” (मार्क १२:२९-३१) ह्या आज्ञेच्या दुसऱ्या पाठाचे रूपांतर ‘जशी स्वतःवर
तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्या ऐवजी फक्त ‘एकमेकांवर प्रीती करा’ अशा
छोट्याशा परंतु महत्वपूर्ण बदलाचा उल्लेख आपल्या ह्या उताऱ्यात आढळून येतो. ह्याद्वारे
प्रभु येशू आपल्याला सांगत आहे की, प्रीती ही सर्वांवर करा व ती सतत करत राहा. जशी
त्याने आपल्यावर केली आहे, करत आहे, आणि पुढे देखील करणार आहे.
आनंद:
आनंद हा विषय येथे आपल्याला अकराव्या ओवीत आढळून येतो. येशू ख्रिस्ताचा आनंद हा
त्याच्या पित्याच्या आज्ञेत राहण्यात असतो. हा आनंद तो आपल्याबरोबर वाटत आहे. हा
आनंद आपण त्याच्या पित्याच्या सहवासात राहिलो तर, पूर्णत्वास येतो. हा आनंद पूर्णत्वास
आणण्यासाठी आपल्याला त्याच्या आज्ञा पाळाव्या लागणार आहेत.
दास
नाही तर मित्र आहात: प्रभू येशू आजच्या
उताऱ्यात म्हणतो की, “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते
दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे.” (योहान १५:१५) बायबलमध्ये
डूलोस (Doulos) म्हणजेच सेवक, दास किंवा देवाचा दास ही उपमा लाज वाटण्यासारखी
नव्हती; तर हा मोठा मान किंवा अभिमान मानला जात होता. ह्याची उदाहरणे आपल्याला
बायबल मध्ये आढळतात: ज्याप्रमाणे मोशे हा देवाचा दास होता. (अनुवाद ३४:५) यहोशवा
देवाचा दास होता. (यहोशवा २४:९) तसेच दावीद हा सुद्धा देवाचा दास होता.
(स्तोत्रसंहिता ८९:२०). ही उपमा संत पौलाने सन्मान म्हणून वापरली आहे. (तिताला
पत्र १:१) तसेच याकोबानेही वापरली आहे. (याकोबाचे पत्र १:१) इतिहासातील सर्व महान
व्यक्ती ‘देवाचा दास’ म्हणून संबोधले गेले होते. परंतु ख्रिस्त आपल्याला फक्त ‘दास
नव्हे तर मित्र म्हणून संबोधतो.’ तो आपल्याला त्याच्या पित्याच्या बरोबरची जवळीकता
बहाल करीत आहे. ही जवळीकता किंवा मैत्री अब्राहामाच्या जीवनात आपल्याला जुन्या
करारात पहावयास मिळते. शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्यात म्हटले आहे की, “ज्ञानाच्या
सानिध्यात राहणाऱ्या माणसावर देव खचितच प्रेम करतो.” (शलमोनाचा ज्ञानग्रंथ ७:२८)
पुरातन काळात जे राजांच्या अधिक जवळचे असत तेच राजांचे मित्र बनत असत. आज ख्रिस्त
आपल्याला मित्र व ते पण देवाचे मित्र म्हणत आहे. ह्या जवळीकतेने त्याने आपल्याला
एकत्र आणले आहे. कारण, याद्वारे तो आपल्यापासून दूर जात नाही तर, एकदम जवळचे मित्र
आपणास बनवत आहे.
शिष्यत्व
ही दैवी निवड: ह्या दैवी मैत्रीच्या गुणाचे पुढे शिष्यत्वामध्ये
रुपांतर केले गेले आहे. कारण, प्रभू येशू पुढे म्हणतो, “तुम्ही मला निवडले नाही,
तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे.” (योहान १५:१६) शिष्यत्व हे दैवी दान
आहे. ते आपल्याला आपल्या कार्याने किंवा गुणवत्तेने प्राप्त करता येत नाही. हे
शिष्यत्व पुढे जाऊन “विपुल असे फळ द्यावे” (योहान १५: १६) हे फळ आपल्याला प्रभू
येशूच्या प्रेमातुन, आणि त्याच्या मैत्रीतून मिळत असते. तेच फळ आपण आपल्या दैनंदिन
जीवनात दुसऱ्यांना देण्यासाठी ख्रिस्त आपल्याला प्रेरणा देत असतो. तसेच त्यासाठी
लागणारी शक्ती ही आपल्याला त्याच्या नावात सामावलेली आहे. कारण तो म्हणतो, “आणि जे
काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.” (योहान
१५:१६) हे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील प्रार्थनेत आत्मसात करत असतो. शेवटी प्रभू
येशू आपल्या शिष्यांना वास्तविक सत्याविषयी सावध करीत आहे. प्रभू म्हणतो, “या जगात
जीवन जगत असताना माझ्या नावामुळे तुमचा द्वेष केला जाईल.” तरीसुद्धा तुम्ही
एकमेकांवर प्रीती करा व त्याहून अधिक आपल्या शत्रूवर किंवा जी व्यक्ती तुमचा द्वेष
करते त्यांच्यावर अधिकरित्या प्रेम करा.
संत पौल म्हणतो,
“मी जरी देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो; पण
माझ्याठायी प्रीति नसली तर मी आवाज करणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे” (१ करिंथ १३:१-२). प्रेमाशिवाय मनुष्यजीवन हे नरका समान आहे. खरं प्रेम करणं म्हणजे यातनांना सामोरे जाणे, स्वतःचा त्याग करणे, स्वतः पडून दुसऱ्यांना उठवणे,
ह्यालाच म्हणतात प्रेम. प्रत्येकाला प्रेम हवं असतं पण द्यायला
मात्र थोडेच तयार असतात. खरं प्रेम धनदौलतीने विकत घेता येत नाही ते इतरांना
देण्यात असते. परत मिळविण्याची आशा न ठेवता जीवन जगणे ह्यातच खरा आनंद असतो.
क्रूसभक्त संत योहान म्हणतात, “प्रेमाच्या आधारावरच ह्या
विश्वाचा न्याय-निवाडा केला जाईल. सर्व मानवजातीचं तारण हे प्रेमावरच आधारित आहे,
‘प्रेम’ हा शब्द मानवजातीच्या इतिहासातील
सर्वात शेवटचा शब्द असेल”. संत पौल प्रमाणे आपण ह्या
प्रेमाने झपाटले गेले आहोत का?
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा,
परस्परावर प्रेम करण्यास आम्हाला सहाय्य कर.”
१. ज्याप्रमाणे पित्याने पुत्रावर प्रेम केले
व पुत्राने आपणावर, तेच प्रेम सर्व भाविकांना व
ख्रिस्तसभेच्या सर्व पुढाकाऱ्यांना एकमेकांवर करण्यास कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. पवित्र आत्म्याचा वर्षाव आपणा प्रत्येकावर
व्हावा व मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा उपयोग स्वत: पुरताच न करता
इतरांच्या व समाजाच्या कल्याणासाठी करावा, म्हणून
आपण प्रार्थना करू या.
३. दु:ख सहन करणारे आपले शेजारी,
विशेषकरून जे आजारी व गरीब आहेत. अश्यांकडे बेपर्वाई व उदासीनतेने न
पाहता, सर्वांनी त्यांची काळजी घ्यावी, ह्या परमगुरुस्वामींच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करू या.
४. यंदाच्या वर्षी पावसाळी मोसमात चांगला
पाऊस व्हावा, शेती-बागायतीसाठी योग्य ते हवामान मिळावे व
शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच त्यांच्या शेतातील भरगोस पिकाने इतरांचेदेखील
पोषण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या
वैयक्तिक,
कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी आपण प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment