Thursday, 26 August 2021

                                         

   Reflection for 22nd Sunday in Ordinary Time (29/08/2021) By Bro. Brijal Lopes



सामान्य काळातील बाविसावा रविवार


दिनांक: २९/०८/२०२१

पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८  

दुसरे वाचन: याकोबाचे पत्र १: १७-१८,२१-२२,२७  

शुभवर्तमान: मार्क ७: १-८, १४-१५,२१-२३  


बाहेरून माणसाच्या आंत जाऊन त्याला भ्रष्ट करील असें काहीं नाहीं. तर माणसाच्या आंतून जे निघतें तेंच त्याला भ्रष्ट करितें. 



प्रस्तावना

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास नियम शास्त्राचे पालन करून त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करून, पवित्र व सुजानतेचे जीवन जगण्यासाठी बोलावत आहे. परमेश्वराने आपली निर्मिती एकमेकांना मदत करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी व इतरांबद्दल आपुलकी ठेवण्यासाठी केलेली आहे. आजची तिन्ही वाचणे आपणास नियमांचे पालन करून, इतर व्यक्तींना व समाजव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी बोलावत आहे.

सम्यक विवरण

पहिले वाचन

आजच्या पहिल्या वाचनात आपण आज्ञा पाळून व त्यांचे पालन करण्यासाठी, आपणास मोशे उपदेश करत आहे. त्याचप्रमाणे आजचे वाचन त्याच्या उपस्थितीची जाणीव व देवाचे ज्ञान ह्या आज्ञेद्वारे आपणासमोर व्यक्त केलेली आहेत.

दुसरे वाचन

आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब आपणास देवाचा शब्द ऐकून तो कृतीमध्ये उतरविण्यासाठी व त्याद्वारे गरजवंतांना मदत करण्यासाठी सांगत आहे.

शुभवर्तमान

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणास अंतःकरणापासून देवाची भक्ती, व त्याद्वारे आपले अंतकरण शुद्ध ठेवून निर्जल व निर्मळ जीवन कशाप्रकारे जगावे ह्या विषयी आपणास सांगण्यात येत आहे.

मनन चिंतन

विल्यम बाकले नावाचे एक स्कॉटीश ईशज्ञानी विचारवंत त्यांनी एक सुंदर अशी कथा लिहिले आहे की, ज्यामध्ये परुशी धर्मगुरू व त्यांचे अनुयायी कशाप्रकारे नियम व कायदे पाळत असत. त्या कथेमध्ये ते सांगतात की, रब्बी एक परुशी धर्मगुरू रोमन कारागृहात बंदिस्त होते. तुरुंगात असताना त्याच्या सर्व गोष्टीची व्यवस्थितपणे काळजी घेतली जायची. त्यांना वेळोवेळी पाणी जेवण व त्यांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थितपणे घेतली जायची. दिवसामागून दिवस जात असताना रब्बींची प्रकृती हळूहळू कमजोर होत गेली आणि अचानक त्यांची प्रकृती खालावली. अधिकाऱ्याने ताबडतोब वैद्यांना बोलावले. वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना डीहायड्रेट (dehydrate) आहे; म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर, डोकेदुखी सारखे समस्या होतात. हा अहवाल समोर आल्यावर कारागृहातील प्रशासक विचारात पडू लागले की, हे असे का घडले? वेळोवेळी सर्व गोष्टींची दखल घेऊन सुद्धा अशा समस्या का निर्माण होऊ लागल्या? व ताबडतोब कारागृहातील प्रशासकांनी काही शिपाई त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पाठविले शिपायांनी निरीक्षण करून, योग्य ती तपासणी करून त्यांचा अहवाल अधिकाऱ्यासमोर ठेवला. अहवाल वाचल्यानंतर त्यांना धक्काच बसला की जे पाणी त्यांना पिण्यासाठी दिले होते, त्या पाण्याचा वापर ते त्याच्या धार्मिक रीतीरीवाजासाठी वापरत होते. प्रार्थनेपूर्वी हात धुणे, तसेच जेवणाअगोदर हात धुणे याचा परिणाम त्यांना थोडे पाणी त्यावेळेस मिळत असे.

आजची उपासना आपणास हाच संदेश देत आहे की, रीतीरिवाज व कायदे पाळणे हा धर्माचा मध्यभाग नाही, तर देवावरील प्रीती; त्याचबरोबर शेजार धर्मावर प्रीती, हा मध्यभाग आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना हात न धुता, कणसे खातांना पाहून परुशांना भीती वाटली व ते स्तब्ध झाले. येशू ख्रिस्तामध्ये व परुशांत वाद -विवाद निर्माण झाला. देवाने दिलेले नियम खूप चांगले आहेत व त्याची मानवाला खूप आवश्यकता आहे; कारण नियम हे देवाने मानवाशी असलेले प्रेमळ संबंध व देवाची मानवात असलेली हजेरी किंवा देवाला मानवाशी असलेले अतूट नातं आहे. त्या नियमाद्वारे आपल्याला विश्वासू राहायचं आहे, आणि ते केवळ त्यावर प्रेम करून, कारण देवाचे प्रेम हे मूळ आहे व त्यावर केलेली प्रीति हे त्याचे फळ आहे. देवाचे नियम पाळणे म्हणजे आपण त्याच्याजवळ येणे. आपण आपल्या अंतःकरणापासून त्याच्या जवळ येणे व आपल्या समोर इतरांना त्याच्यासमोर सोबत घेऊन येणे, त्याच्याजवळ देणे. मानवजातीची निर्मिती ही देवाची मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. आणि प्रत्येक मानव एकमेकांविषयी आपुलकीचे नाते संबंध प्रस्थापित करण्यासाठी व त्या त्याला जीवनात ईश्वराचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगले व प्रेमळ जीवन जगणे आवश्यक आहे. स्वतःला जपण्यासाठी व इतरांना जपण्यासाठी काही गोष्टी किंवा मार्गदर्शन आपल्याला पाळावी लागतात. पण त्याचा उपयोग मानवाला देवाकडे घेऊन जाण्यासाठी असावा ज्याला केवळ एक सुंदर जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी व इतरांना येशू ख्रिस्ताच्या कार्याची दिशा दाखवून त्यांना जीवन देण्यासाठी नियम पाळावे लागतात. जीवनात सुंदर गोष्टी करायच्या असतील तर त्या फक्त हृदयाने घडू शकतात, कारण देव माणसाच्या हृदयाकडे पाहतो, त्याला बाहेरून केलेल्या कृतीवर नाही. विश्वास, आशा, प्रीती ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. संत जेम्स आपणास आठवण करून देत आहे की, सर्व काही पित्याकडून येते की, त्यांनी आपणास त्याची लेकरे बनवली कारण आपण त्याला प्रेमाने साक्षीदार व्हावे; त्यामुळे आपण फक्त देवाचा शब्द ऐकून पाळणार नाही, तर त्या शब्दाचा वापर कृतीमध्ये करावा व आपल्या जीवनात अंगीकारावा. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपण देवाने दिलेल्या आज्ञेचा उपयोग अंतरित जीवनासाठी करावा, बाह्यरुपी नाही. आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण निश्चय करूया की, आपण ह्या आज्ञेचा पालन, मानसन्मान करून व त्या आपल्या हृदयात ठेवून त्याला मानवी जीवनाचे कल्याण व त्यांना ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी करूया.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपले उत्तर:  हे परमेश्वरा आम्हाला मदत कर

१. अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप फ्रान्सिस व इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांना पवित्र       आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून त्याचा वापर ख्रिस्तसभेसाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आज विशेष करून जे भाविक Covid-19 या विषाणूने ग्रासलेले आहेत. जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांना वेळोवेळी उपचार मिळत नाही, अशा सर्वांना देवाने बरे करावेत व त्यांना चांगले आरोग्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. डॉक्टर्स, नर्सेस ह्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांच्याद्वारे लोकांना परमेश्वराचा स्पर्श जाणावा व जे डॉक्टर्स नर्सेस लोकांच्या दबावाखाली घाबरत आहेत, त्यांना योग्य ती शक्ती, सामर्थ्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे भाविक लोकांपर्यंत मदतीचा हात देत आहेत. जे या महामारीचा सामना करत आहेत. अशा सर्वांना पवित्र आत्म्याने बळ द्यावे व त्यावर परमेश्वराची कृपा असावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या जीवनाद्वारे आपण इतरांना देवाचे प्रेम व एकमेकांविषयी आदर बाळगावा व त्याद्वारे आपण देवाच्या प्रेमात वाढावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.


Friday, 20 August 2021

                                           


Reflection for 21st Sunday in Ordinary Time (22/08/2021) By        Bro. Brian Motheghar


सामान्यकाळातील एकविसावा रविवार


दिनांक: २२/०८/२०२१

पहिले वाचन: यहोशवा २४:-२अ,१५-१८

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ५:२१-३२

शुभवर्तमान: योहान ६:६०-६९


"प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? कारण सार्वकालिक जीवनाची वचनें आपणांजवळ आहेत"



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला जीवनात देवाची निवड करण्यासाठी आवाहान करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यहोशवा इस्राएली लोकांना देव किंवा त्यांच्या पूर्वजांनी ज्या देव देवतांची किंवा ज्या जागेत आहेत ते म्हणजे आमोरीच्या लोकांचे देव ह्यांच्या मधिल देव निवडण्याची मोकळीकता देतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल हा वैवाहिक जीवनाचा जीवनक्रम कसा असावा ह्याविषयी आपणास माहिती करून देत आहे. आजच्या शुभवर्तमानात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याचा पाठलाग करण्यासाठी किंवा ज्याप्रमाणे दुसरे अन्य शिष्य ज्यांना प्रभू येशूची शिकवण पचली किंवा आवडली नाही, त्यांच्या प्रमाणे त्याला सोडून जाण्याची मोकळीकता देतो. परंतु आपल्याला पेत्राने केलेली कबुली ही वाचावयास मिळते.

पेत्राप्रमाणे आपल्याला सुद्धा समजले पाहिजे की, आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी सर्वकाळी जीवनाचे रहस्ये ख्रिस्ताठायी आहेत आणि आपल्या जीवनाचा जीवनक्रम सुरळीत चालावयाचा असेल तर ख्रिस्ताचीच निवड करणे योग्य आहे. आजच्या उपासनेत सहभागी होत असतांना ख्रिस्त आपल्या जीवनात सदैव असावा व नेहमी ख्रिस्ताचीच निवड आपल्या जीवनात आपण करावी म्हणून प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन:

आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक पावला पावलावर निर्णय घेणे गरजेचे असते. परंतू ते निर्णय घेत असताना आपल्याला दोन जीवनातील किंवा दोन गोष्टींमधील एकाची निवड करावी लागते. त्याचप्रमाणे आजची उपासना सुद्धा आपणाला जीवनातील सर्वात मूलभूत पर्याय सादर करीत आहे; देव किंवा वाईट तत्व किंवा उपयुक्तता ह्यामध्ये निवड करण्यास सांगत आहे. कारण हेच आपल्या जीवनाचा मार्ग व त्या मार्गावर चालण्यास त्याचे अंतिम परिणाम निर्धारित करतात.

आजच्या पहिल्या वाचनात यहोशवा लोकांना एकदाच पण सर्वकाळसाठी देवाची निवड किंवा अन्य देव-देवतांची निवड करण्यास सांगत आहे. परंतु लोकांनी अन्य देव-देवतां ऐवजी प्रभू परमेश्वर जो जीवंतांचा देव आहे त्याची निवड केली. आपण जर जुन्या कराराची पाने पडताळली तर आपल्याला कळून चुकते की, ह्या लोकांची प्रभु परमेश्वरावर किती निष्ठा होती आणि ती निष्ठा किती डगमगणारी आणि क्षणभंगुर होती. आपल्याला हे ही माहित आहे कि ही लोकं परमेश्वरापासून किती वेळा दूर गेलेली होती. तसेच आपणाला हे ही ठाऊक आहे की परमेश्वर हा किती दयाळू व प्रेमाळू आहे, ज्याने आपल्या लोकांचा कधीही साथ सोडला नाही.

चार शुभवर्तमानापैकी योहान लिखित शुभवर्तमानात आपल्याला विशेषतः जीवनात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात किंवा अंत:करणात चाललेल्या निर्णयाचा संघर्ष ह्याविषयी सांगण्यात आले आहे. संघर्ष तो म्हणजे प्रकाश आणि अंधकार, चांगले आणि वाईट, आणि जर आध्यात्मिकरित्या पहायचे झाले तर प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्याचे किंवा जीवनात होणारी तडजोड यापैकी एक निवडण्याचे संघर्ष. आणि हा संघर्ष सर्वात कठीण आहे.

आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला समजते की, ख्रिस्ताने दिलेल्या जिवंत भाकरी व रक्ताच्या शिकवणीने काही शिष्यांना त्याची शिकवण पटली नाही. कारण कोण कोणाचे मांस खाणार आणि रक्त पिणार? या शिकवणुकीमुळे काही शिष्यांनी ख्रिस्ताचे अनुयायी होण्याचा मार्गच सोडून दिला व ह्या कारणाने ख्रिस्ताने त्यांना जबरदस्ती केली नाही, तर ते त्याला सोडण्यास मोकळे होते. येशूची सेवक होणे हा निर्णय क्षण कधी कधी आपल्याला जीवनात वेदनादायक क्षण सुद्धा होऊ शकतो. तरीही येशू त्याच्या शिकवणुकीवर किंवा त्याच्या निर्णयावर कधीही तडजोड करीत नाही, उलट त्याने घेतलेल्या निर्णयावर तो ठाम असतो. म्हणूनच म्हणतात कि, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले! अनेक अशा शिष्यांनी सोडून गेल्यानंतर येशू त्याच्या निवडलेल्या बारा जणांकडे वळतो व त्यांनासुद्धा निवड करण्याची मोकळीकता देतो. हे पाहण्यासाठी कि, ते त्यांच्या निर्णयावर कोठे उभे आहेत?, किंवा कोणता निर्णय घेतील? प्रभू त्यांना सुद्धा विचारतो की तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?”(योहान ६:६७) शिष्यांच्या अंत:करणात सुद्धा हा गोंधळ चाललेला असणार की, त्याचे अनुकरण करायचे की त्याला सोडून जायचे? परंतु पेत्राने दिलेले उत्तर हे येशूसाठी फार मोलाचे होते. “प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार, सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत” (योहान ६: ६८). ‘प्रभुजी तुम्हीच आमच्यासाठी एक नवीन दृष्टी उघडली आहे. ज्यामुळे आमच्या जीवनाला अर्थ आणि दिशा मिळाली आहे’.

पेत्राने निष्ठेने केलेली भव्य कबुली ही शतकानुशतके प्रतिध्वनी आहे आणि तीच भव्य कबुली आपल्यासाठी एक प्रेरणा आणि एक आव्हान सुद्धा आहे. या कोरोनाच्या काळात आपण अनेक अशा नाना प्रकारच्या अडचणींचा किंवा संकटांचा सामना केला आहे. उदाहरणार्थ गंभीर आजार, आर्थिक संकट किंवा आपल्या आप्त गणांचे निधन, इत्यादी. ह्याच अडचणी, समस्या काही लोकांसाठी एका भव्य धोंड्या सारख्या होत्या, ज्या त्यांच्या जीवनातील आनंद, आशा, प्रयत्नांना आणि देवावरील प्रेमळ विश्वासाला चिरडून टाकतात; तर काही जणांनी ह्याच समस्यांच्या दगडांची पायरी करून जीवनात वृद्धी केली आहे; तर काहींनी जीवनाची नवीन वाटचाल सुरू केले आहे. अशा दोहोंमधील निवड एखाद्याला वातील तितक्या दुर्मिळ असतात आणि कधी त्याच आपल्यालासुद्धा तशाच दुर्मिल वाटत असतात.

अशाच एका तामीळनाडूतील तुर्तीकोडी धर्म प्रांतातील फादर अन्थोनी नावाच्या धर्मगुरूची गोष्ट आहे. त्यांच्या गुरुदीक्षाविधीच्या दहाव्या वर्षी त्यांच्या डोळ्याचा प्रकाश त्यांच्यापासून दुरावला होता. आणि हा त्यांच्या जीवनातील एक गंभीर असा धक्का होता. हेच त्यांना त्यांच्या जीवनात त्यांना निष्क्रिय बनवण्यास कारण बनले असते. परंतु प्रार्थना आणि चिंतनाने त्यांनी हे दुःखदायक अपंगत्व धैर्याने स्वीकारले. आणि त्यांच्या जीवनात त्यांच्यासारख्या वंचित लोकांसाठी त्यांनी आपले हृदय आणि आत्मा समर्पित केला. आणि १९८२ मध्ये (All India Federation of Blind) सर भारतीय अंध लोकांसाठी संघाची स्थापना केली.

आपण स्वतःला प्रश्न विचारू या की, या सगळ्यात आपण कुठे उभे आहोत? आपले सर्वकाही येशुच्या सहवासात आहे का? आपल्या जीवनातील सर्व ताणतणाव, संकटे, निराशा या सर्वांचे सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी आपल्याला शिष्यांप्रमाणे किंवा प्रेषितांप्रमाणे येशू ख्रिस्ताशी खोळ, वैयक्तिक संलग्नता असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण पेत्राप्रमाणे म्हणू शकतो,सर्वकाली जीवनाची वचने आपणाजवळ आहेत”, आणि हीच वचने आमच्या अंतःकरणातील तीव्र इच्छा पूर्ण करू शकतात आणि चिरस्थायी शक्ती आणि आनंद देऊ शकतात.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१.     आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगात पसरावी व ती आपल्या आचरणात आणावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. 

२.     प्रत्येक व्यक्तीने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. 

३.     आपल्या अवती-भौती असलेल्या आजारी माणसांना चांगले आरोग्य मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.   

४.     ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय होत आहेत, अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. 

५.     थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.