Thursday, 12 August 2021

Reflection for The Assumption of the Blessed Virgin Mary (15/08/2021) By Bro. Suhas Farrel



पवित्र मरीयेच्या स्वर्गनयनाचा सोहळा


दिनांक: - १५/०८/२०२१

पहिले वाचन: - प्रकटीकरण ११: १९अ- १२: १- ६अ, १०अ ब

दुसरे वाचन: - १ करिंथ १५: २०-२७अ

शुभवर्तमान: - लुक १:३९-५६


“स्त्रियांमध्ये तूं धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!”


प्रस्तावना

        योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय १७:२१ मध्ये आपण वाचतो कि, प्रभू येशूने आपल्या मरणापूर्वी स्वर्गीय पित्याकडे आपल्या शिष्यांसाठी कळकळीची प्रार्थना केली कि, “हे पित्या, जसे आपण दोघे एक आहोत, तसेच माझ्या शिष्यांना, माझ्या अनुयायांना देखील तू सदैव एकत्र ठेव”.

        आज ख्रिस्तसभा पवित्र मरीयेच्या स्वर्गनयनाचा सोहळा साजरा करीत आहे. आजच्या दिवशी पवित्र मरीयेला सदेह स्वर्गात घेतलं गेलं. आणि त्याद्वारे ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. हीच पवित्र मरिया देवाने आपणाला आपल्या सर्वांची आई म्हणून दिली आहे. पवित्र मरिया संपूर्ण जीवनभर प्रभूच्या शब्दाशी एकनिष्ठ राहिली. हीच पवित्र मरिया आपल्या सर्वांसाठी एक उत्तम आदर्श आहे. सार्वकालिक जीवनासाठी ती एक आशा आहे. करण आपण जर मरीये प्रमाणे आपले जीवन जगलो तर आपणालाही एके दिवशी सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.

        आज आपण दोन मातांचा सण साजरा करीत आहोत. एक स्वर्गीय माता आणि दुसरी भारत माता. आपल्या स्वर्गीय मातेप्रमाणे भारत मातेचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडता यावे व त्यासाठी लागणारी कृपा आपणा सर्वांना लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

मनन चिंतन

        एकदा एका माणसाची मोठ्या जहाजाने जलप्रवास करण्याची खूप इच्छा होती. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक अशा जहाज कंपन्यांचा शोध केला. आणि कालांतराने आवश्यक इतके पैसे जमा झाल्यावर तो आणि त्याची बहिण हे दोघेही जलप्रवासासाठी जाणार या विचारानेच ही व्यक्ती इतकी आनंदित होती कि ती आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना त्याविषयी सांगत फिरली. जलप्रवासाला जाण्याच्या महिन्या भर अगोदर रॉयल कॅरीवियन कंपनी कडून ह्या माणसाला एक (DVD) पाठविण्यात आला. त्या (DVD) मध्ये प्रवासाचं नियोजन कस असणार आहे? ते जहाज कुठे-कुठे मुक्कामासाठी थांबणार आहे? असे सर्व काही चित्रीकरण करण्यात आले होते. ती (DVD) पाहताच ह्या माणसाचा आनंद गगनात मावेनासा झाला. (DVD) मध्ये पाहत असलेला देखावा हा इतका रमणीय होता कि तो मनमुक्त झाला. तो एकदम भारावून गेला करण त्याला माहित होते कि, काही दिवसानंतर तो ती सगळी स्थळ स्वतःहून पाहणार आहे.

किती छान संकल्पना आहे ना? ज्या स्थळांना आपण भेट देणार आसतो त्या पहिल्यांदा टीव्ही अथवा कॉम्पुटरवर पाहणे. किंवा दुसरी एखादी गोष्ट जी आपण भविष्यामध्ये करणार आहोत त्याचा आढावा आपल्याला एखाद्या (DVD) द्वारे पाहण्यास मिळाला तर किती छान वाटेल? लग्न म्हणा किंवा एखादी नवीन नोकरी म्हणा कि ज्याच्याविषयी आपल्याला पूर्ण संकल्पना असली की आपली उत्सुकता अजून वाढते.

आज मरीयेच्या स्वर्गनयनाचा सण साजरा करीत असतांना देऊळमाता आपल्याला आपल्या इष्टस्थळाची एक झलक दाखवीत आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, मरिया ही सदेह स्वर्गात घेतली गेली आणि आपणा सर्वांचे ध्येयही स्वर्गात जाणे हेच आहे. आपला प्रभू येशूख्रिस्त खुद्द आपल्याला शाश्वती देतो की, तो आपल्याला स्वर्गाराज्यामध्ये घेऊन जाणार परंतु त्यासाठी आपल्याला प्रभू येशूख्रिस्तामध्ये राहायला लागेल. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आपणामध्ये असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वर्गामध्ये सामील होण्यासाठी पात्र ठरू. करण प्रभू येशू ख्रिस्त हाच आपण सर्वांच्या तारणाचा एकमेव मार्ग आहे. मरीयेचे तारण हे प्रभू ख्रिस्ताद्वारेच झाले. ज्याप्रमाणे आपणा सर्वांना प्रभू येशूख्रिस्ताने स्वर्गाराज्याचे वचन दिले आहे, अगदी त्याचप्रमाणे मरीयेला देखील देवाने वचन दिले होते. मरीयेने देवाचा शब्द तंतोतंत पाळला आणि देवावर संपूर्ण विश्वासाने आपले जीवन समर्पण केले. मरीयेच्या त्या विश्वासाचे फल म्हणजेच आज आपण साजरा करीत असलेला ‘स्वर्गनयनाचा सण’.  मरिया ही तिच्या जन्मापासून परिपूर्ण म्हणजेच तिच्या आईच्या उदरामध्ये असतांनाच देवाने तिला पापांपासून वंचित ठेवले होते. पापाचा अंत हा मृत्यूमध्ये होत असतो. आणि मरिया ही पापांपासून मुक्त असल्याकारणाने ती मृत्यूला सामोरे न जाता परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सदेह स्वर्गात घेतली गेली.

आपली पहिली आई, हेवा, ही पापात पडली आणि स्वर्गाचे द्वार बंद झाले. याउलट आपल्या सर्वांची आई पवित्र मरिया हिने पापांपासून वंचित राहून आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार पुन्हा एकदा उघडे केले आहे. त्यामुळेच आता देवराज्यामध्ये फक्त कुमारी माता, पोपसाहेब, धर्मगुरू- धर्मभगिनी ह्यांनाच नाही तर आपणा प्रत्येकांसाठी जागा निश्चित केली आहे. आजचा हा सोहळा साजरा करीत असतांना मरिया माता ही आपणा सर्वांना अपले जीवन हे प्रभू येशूच्या जीवनाप्रमाणे जगण्यासाठी प्रेरित करीत आहे. तसे केल्यानेच आपण खऱ्या अर्थाने स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी पात्र ठरू.

ज्याप्रमाणे कथेतील माणसाने जलप्रवासास जाण्यासाठी त्याच्या कित्येक महिन्याची कमाई गोळा केली. त्यासाठी त्याने कित्येक अशा गोष्ठी बलिदान केल्या होत्या. आपण स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी काय काय बलिदान करत आहोत? जर एखाद्या जलप्रवासास जाण्यासाठी तो माणूस इतका उत्सुक होता तर स्वर्गराज्यामध्ये जाण्यासाठी आपण किती उत्सुक व्हायला पाहिजे? आज मरीयेच्या जीवनाद्वारे प्रेरित होऊन आपणही आपले जीवन प्रभू ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करूया.        

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू- भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी, म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत, अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये, म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.

४. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी  ठेऊया.

1 comment: