Reflection for 24th Sunday in Ordinary Time (12/09/2021) By Bro. Pravin Bandya
सामान्य काळातील चोविसावा रविवार
दिनांक
१२/०९/२०२१
पहिले
वाचन: यशया ५०:५-९
दुसरे
वाचन: याकोबाचे पत्र २:१४-१८
शुभवर्तमान:
मार्क ८:२७-३५
प्रस्तावना
आज देऊळमाता सामान्य
काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वरावरील विश्वासात दृढ होण्यास
पाचारण करीत आहे. ‘माझ्याठायी
विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्याच्यापासून काय लाभ’
असं संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे. ज्या प्रमाणे एका नाण्याला
दोन बाजू म्हणजे छापा आणि काटा असतो, त्याप्रमाणे विश्वासाच्या दोन बाजू आहेत,
त्या म्हणजे कृती आणि शब्द. आजच्या शुभवर्तमानात देखील आपण पाहतो कि, पेत्राने
प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास फक्त शब्दाने प्रगट केला नाही तर,
ख्रिस्ताच्या मरण, पुनरुत्थान आणि स्वर्गरोहणानंतर देखील त्याने प्रभू येशूख्रिस्तासाठी आपला प्राण देऊन,
कृतीद्वारे विश्वास प्रगट केला. आपणाला देखील प्रभू येशूख्रिस्ताने अशा विश्वासाच्या दानाने परिपूर्ण करावं,
म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले
वाचन
आजच्या पहिल्या
वाचनामध्ये परमेश्वर यशया संदेशाद्वारे, आपण दुःखामध्ये विश्वासात कशा प्रकारे
टिकून राहावे, याविषयी आपल्याला
शिकवत आहे. प्रभू
परमेश्वर माझा सहाय्यक आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? अशा पवित्र
शब्दांमध्ये यशया संदेष्टा आपलं सांत्वन करत आहे.
दुसरे
वाचन
आजच्या दुसऱ्या
वाचनात संत याकोब म्हणतो, कि विश्वासाला
जर कृतीची जोड नसेल तर तो विश्वास
निर्जीव आहे. आपल्या चांगल्या कृत्याद्वारे आपला विश्वास सजीव करण्यास प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना
करूया.
शुभवर्तमान
आजच्या
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कि जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ
उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. दुःखामध्ये देखील आपला ख्रिस्तावरिल विश्वास
प्रगट करण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला पाचारण करीत आहे.
मनन-चिंतन
विश्वास या विषयावर
आज आपण मनन चिंतन करीत असताना, विश्वासाच्या तीन भागांवर म्हणजे ‘अपूर्ण विश्वास’,
‘अंधविश्वास’ आणि ‘पूर्ण विश्वास’ ह्या विषयांवर चिंतन करणार आहोत.
‘अपूर्ण
विश्वास’ म्हणजे, आपण कधी-कधी प्रार्थना करतो पण आपल्या मनात शंका असते की, माझी प्रार्थना परमेश्वर नक्की ऐकत
आहे का? किंवा मी प्रार्थनेला बसलो असताना प्रभू
परमेश्वर माझ्या बरोबर उपस्थित आहे का? परमेश्वर माझ्या
प्रार्थनेचे उत्तर देईल का? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आपल्या मनामध्ये
निर्माण होतात. परंतु इब्री लोकांस पत्र ११:१ मध्ये
प्रभुचे वचन आपणाला सांगत आहे कि, “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरवसा
आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे”. म्हणून जरी आपल्याला ख्रिस्त दिसत नसला तरीपण तो आपल्या बरोबर आहे; हा विश्वास आपण बाळगणे गरजेचे आहे. कारण पुढे अध्याय ११: ६ मध्ये आपण
वाचतो कि, “विश्वासावाचून त्याला आनंदित करणे अशक्य आहे”. म्हणून कोणत्याही
परिस्थितीत आपण परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.
Ø दुसरा भाग आहे, अंधविश्वास
अंधविश्वासाविषयी
यिर्मया संदेष्टा अध्याय १७:५ आणि ६ म्हणतो,
“जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण
परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो वैराणांतल्या झुडपासारखा होईल व जे
कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यांतील वृक्ष स्थळें, क्षारभूमी व निर्जन
प्रदेश यांत तो वस्ती करील”.
आजच्या शुभवर्तमानात
आपण पाहतो की, पेत्राने जिवंत देवाचा पुत्र, प्रभू येशूख्रिस्तावरील आपला विश्वास प्रगट
केला कि, आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहा. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया कि, आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत? जिवंत देवावर कि
इतर गोष्टींवर? जर आपण
परमेश्वराला सोडून इतर गोष्टींवर विश्वास ठेवत असू,
तर आपण देखील अंधविश्वासामध्ये अडकलेले आहोत.
Ø तिसरा भाग आहे, पूर्ण विश्वास
ह्या तिसर्या
भागावर मनन-चिंतन करीत असताना मी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण विश्वासात टिकून
राहण्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे.
एकदा एका
कुटुंबामध्ये एक सुंदरशी मुलगी जन्मास आली. ती लहानाची मोठ्ठी झाली. लग्नाच्या
वयाची झाली असताना तिच्या आई-वडिलांनी विचार केला कि, आता आपण मुलीचं लग्न करूया
आणि म्हणून त्यांनी तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधलं; व तिचा साखरपुडा करण्याचा दिवसही ठरवला. तो महान दिवस उगवताच मुला-मुलीने एकामेकाच्या
बोटामंध्ये अंगठ्या घातल्या. अचानक साखरपुडाच्या दुसऱ्याच दिवशी त्या मुलाला
आपल्या कंपनीतून पत्र आलं की, परदेशामध्ये आपल्या कंपनीतील काही ऑफिसमध्ये काम
करणारे कर्मचारी कमी आहेत, म्हणून तुला काही महिन्यासाठी परदेशातील ऑफिसमध्ये
जायचं आहे. त्या मुलाला दुःख झालं कि, कालच माझा साखरपुडा झाला; मी माझ्या प्रेयसी बरोबर कधी शॉपिंग मॉल किंवा सिनेमा पहायलासुद्धा गेलो नाही, कधी
कुठे फिरायला गेलो नाही. आपल्या काळजावर
दगड ठेवून हा मुलगा परदेशामध्ये गेला. त्या वेळेला मोबाईल नव्हते, फोन नव्हते, कधी
पत्र पाठवलं तरच एकमेकांविषयी कळत असे. मुलगा परदेशामध्ये जाऊन एक वर्ष निघून गेले;
दुसरे वर्ष देखील निघून गेले आणि असे करून जवळ-जवळ चार ते पाच वर्ष निघून गेली. तरी देखील ह्या
मुलाचा काय पत्ता नाही. आता पत्र देखील
नाही. त्या मुलीबरोबरच्या दुसऱ्या मुलींची लग्न झाली. घरची माणसं व सर्व लोक तिला म्हणायला
लागली की, तू दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करून घे,
पण ती एकच शब्द म्हणत होती, “ज्या दिवशी त्याने माझ्या बोटामध्ये अंगठी
घातली, त्या दिवशी त्याने मला वचन दिलं की, मी तुला घेण्यासाठी पुन्हा येणार, म्हणून
माझा विश्वास आहे कि, तो माझ्यासाठी नक्की येणार”. आणखी पाच वर्षे निघून गेली; म्हणजे या गोष्टीला
तब्बल दहा वर्षं निघून गेली. आणि दहा वर्षानंतर तो मुलगा परदेशातून संपूर्ण वैभव
घेऊन पुन्हा आला. तिला लग्न न केलेले पाहून, तिचा त्याच्यावरील विश्वास बघून
त्याला आनंद झाला. त्याने तिच्या बरोबर लग्न केलं आणि पुढील आयुष्य सुखामध्ये
घालवलं.
जुन्या करारामध्ये
होशेयाच्या पुस्तकातील अध्याय २:१९-२० मध्ये परमेश्वर होशेयास म्हणतो. “तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन. मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील”.
परमेश्वरावर
विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर परमेश्वराने एक करार केला आहे. परमेश्वर आपला देव आहे आणि
आपण त्याची लोकं आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्माच्या दिवशी आपल्या
प्रत्येकाच्या हातामध्ये कराराची अंगठी घातलेली आहे आणि तो शेवटच्या दिवशी
आपल्याला घ्यायला नक्की येणार आहे. तेव्हा आपला विश्वास कसा असेल? गोष्टीमधल्या त्या मुली प्रमाणे
पूर्ण विश्वास असेल की, अपूर्ण विश्वास असेल? किंवा अंधविश्वास असेल? या गोष्टीवर
आज आपण मनन-चिंतन करूया. आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया व परमेश्वराने आपल्याला
पूर्ण विश्वासाने परिपूर्ण करावं, म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना.
प्रतिसाद:
हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.
१) आपले महागुरू पोप, बिशप्स, कार्डीनल, धर्मगुरू-धर्मभागिनी
तसेच ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन सेवाकार्य करणाऱ्या या सर्व लोकांना प्रभूचे कार्य व्यवस्थितरित्या
पुढे नेता यावे व त्यांना चांगले आरोग्य, कृपा व शक्ती मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) सध्या जगामध्ये
अशांतता दिसून येत आहे. घातकी संकटे कोसळत आहेत. राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक
क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) सर्व ख्रिस्ती बांधवात
एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांना समजून घ्यावं, आप-आपसातली वैर-भावना
या गोष्टींचा त्यांग करून प्रेम, सदभावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४) जे लोक आजारी आहेत, ज्याचं मरण जवळ येऊन
ठेपल आहे त्यांनी जीवनात निराश न होता त्यानां प्रभूची प्रेरणा मिळावी व धैर्याने जीवन
जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) देव प्रीती आहे, तो आपली प्रार्थना
ऐकतो म्हणून आता आपण आपल्या स्थानिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.
Very Nice message Br
ReplyDeleteGod Bless you
Praise the Lord