Friday, 30 September 2022

  Reflections for the homily of 27th Sunday in Ordinary Time (02-10-2022) by Br. Roshan Nato.
सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


























दिनांक: ०२/ १०२०२२
पहिले वाचन:    हबक्कुक  १:२-३;२:२-४              
दुसरे वाचन तीमथी १:६-८,१३-१४
शुभवर्तमान: लुक १७:५-१०
प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सत्तावीसावा रविवार साजरा करित आहोत आणि आजची उपासना आपल्याला ख्रिस्तावरील विश्वास दृढ  करण्यास पाचारण करीत आहे. आजचे पहिले वाचन आपल्याला धार्मिक मनुष्याच्या तारणप्राप्ती विश्वासाबद्धल सांगते. त्याच प्रमाणे आजच्या दुसरया वाचनात संत पौल आपल्याला संतत प्रभू ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ ठेऊन पवित्र आत्म्याने दिलेले हे विश्वासाचे दान जपून ठेव आणि प्रभूविषयी साक्षदेण्यास लाज धरू नकोस. त्याच प्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपल्याला प्रेषितांच्या नम्रतेचे आणि प्रभूकडे आपला विश्वास वाढवण्याचा आग्रहाबद्धल सांगत आहे. तर आपण सुद्धा आपल्या जीवनात ह्याच ख्रिस्ती विश्वासाची ज्योत तेवत ठेवण्यास पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

विश्वास एक छोटासा शब्द आहे, वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो, विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागते, आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जाते.

ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकानो आज देऊळमाता सामान्यकाळातील सत्तावीसावा रविवार साजरा करत आहे, आणि आजची उपासना आपणाला विश्वासाचे कानमंत्र देताना सांगते की “जर तुम्हा मध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर या तुतीच्या झाडाला तू मुळासगट उपटून समुद्रात लावले जा, असे तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल”. होय माझ्या प्रिय भाविकानो म्हणूनच म्हटले आहे की आयुष्य खूप सुंदर आहे, पण स्वप्न थांबली की आयुष्य थांबते, विश्वास उडला की आशा संपते! काळजी घेण संपलं की प्रेम संपते! म्हणूनच स्वप्न पहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे.

तर माझ्या प्रिय भाविकानो हा विश्वास म्हणजे काय? आणि त्याचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण प्रभू शब्दाचा आधार घेऊया. विश्वास म्हणजे, आश्या धरलेल्या गोष्टीविषयींचा भरवसा आणि नं दिसणाऱ्या गोष्टींबद्धलची खात्री आहे (इब्री ११:१).

तर माझ्या प्रिय भाविकानो, आपण आपले ख्रिस्ती जीवन जगत असताना किती तरी गोष्टींवर विश्वास ठेवतो. परंतु त्या सर्वच गोष्टी आपल्याला भेटतातच अस नाही. विशेषकरून जेव्हा आपण आपल्या जीवनात परमेश्वराला दुय्यम स्थान देऊन ऐहिक गोष्टींची आशा बाळगतो तेव्हा ह्या ऐहिक गोष्टी कधी कधी आपल्याला फसवतात. तर कधी त्या  आपल्या जीवावर उठतात. परंतु आपण जेव्हा आपल्या जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान देतो, त्याचा आज्ञा पाळतो, त्याचे गुण अंगीकारतो तेव्हा फक्त परमेश्वर आपल्याला पाहिजे असलेल्याच गोष्टी पुरवत नाही तर आपल्याला सार्वकालिक जीवनाचा ठेवा उपलब्ध करून देत असतो, आणि ह्याच गोष्टीची कितीतरी उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये जुन्या आणि नव्या करारामध्ये वाचायला मिळतात.

प्रिय भाविकांनो आपण जेव्हा जुना करार वाचतो तेव्हा सर्वात प्रथम विश्वासाचं उदाहरण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आबेल ह्याची प्रतिमा आपल्यासमोर येते. कारण आबेलाने आपल्या देवावरच्या विश्वासामुळे आपल्या शेतातील चांगल्यात चांगले उत्पन्न परमेश्वराला अर्पण केले आणि ते स्वीकारले गेले. दुसरी व्यक्ती म्हणजे नोहा परमेश्वराने नोहाला त्याच्या नीतिमानामुळे आणि त्याच्या न डगमगणाऱ्या विश्वासामुळे त्याला जलप्रवाहातून वाचवले. तिसरी व्यक्ती म्हणजे विश्वासाचा पिता म्हणून संबोधलेला आब्राहाम ज्याला आपल्या परमेश्वरावरील विश्वासाने संपूर्ण मानव जातीचा पिता होण्याचा मान प्राप्त झाला. त्याचप्रमाणे आपण जेव्हा नव्या करारात वाचतो तेव्हा आपल्याला विश्वासाचं सुंदर असं उदाहरण आपल्यासमोर येते ते म्हणजे आपल्या येशू ख्रिस्ताची आई आपल्या संपूर्ण मानव जातीला तारण प्राप्त करून देणारी मरिया माता होय. माझ्या प्रिय भाविकांनो मरिया मातेने परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या कार्यात भाग घेण्यास संपूर्ण मनाने आपली तयारी दाखवून आपणा सर्वांना येशू ख्रिस्तत्त्व प्राप्त करून दिले. अशी कितीतरी विश्वासाची उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये वाचायला भेटतात परंतु आपण ह्या विश्वासाचे उदाहरण असलेल्या व्यक्तिमत्त्वाकडून काही शिकतो का? त्याच्यप्रमाणे आपण आपला ख्रिस्ती विश्वास दृढ ठेवतो का?

होय माझ्या प्रिय भाविकांनो आपल्या घट्ट किंवा दृढ विश्वासाविषयी प्रभू येशूने म्हटले आहे की तुमचा विश्वास एवढा पक्का असला पाहिजे की त्या विश्वासाने तुम्ही तुमच्या समोर असलेल्या एका मोठ्या झाडाला सांगाल की तू आता तुझ्या जागेवरून उपटून जवळच्या समुद्रात जाऊन पड, आणि ते झाड तुमच्या जबरदस्त विश्वासामुळे आपल्या जागेतून उपटून समुद्रात जाऊन पडेल.

तर भाविकांनो अशाच एका सामान्य स्त्रीने देवळातल्या धर्मगुरूंकडे जाऊन विश्वासाबद्दल येशूने दिलेल्या उदाहरणाविषयी शंका बालगली होती. त्यावर धर्मगुरू तिला म्हणाले येशूने आपल्या चमत्कारातून अशक्य गोष्टी शक्य केल्या, उदाहरणार्थ: पाण्याच रूपांतर द्राक्षरसामध्ये, मेलेल्या लाजरसला किंवा विधवेच्या मेलेल्या मुलाला जिवंत करणे. खाटेवर आणलेल्या पश्चातापी माणसाला बरे केल्यावर आपली खाट उचलून घेऊन जाण्याचा आदेश वैगेरे जर ह्या गोष्टी चमत्काराने बदलल्या तर झाड उपटून समुद्रात का पडू नये?

तेव्हा ती बाई आपल्या घरी गेल्यावर त्याच रात्री तिला हा विश्वासाचा प्रयोग करायचा होता. तेव्हा रात्री झोपण्या अगोदर तिने दहा वाजता तिच्या बिछान्याजवळ गुडघे टेकले आणि खिडकीबाहेर झाड पाहिले तिने डोळे बंद करून प्रार्थना सुरू करत म्हटले, हे प्रभू, मी आता डोळे बंद करून खिडकी बाहेर दिसणारे झाड माझ्या विश्वासाने गायब व्हावे म्हणून संपूर्ण रात्र प्रार्थना करणार आहे, आणि सकाळी सहा वाजता डोळे उघडून ते झाड गायब झाले की नाही हे आजमावणार आहे. मग तिने आठ तास गुडघ्यावर रात्रभर प्रार्थना केली, आणि सकाळी सहा वाजता डोळे उघडून झाड आहे की नाही ते पाहिले. तिला ते झाड आहे तेथेच दिसले. नंतर तिने पुढील उद्गार काढले की मी रात्री दहा वाजता डोळे बंद केले त्या झाडाला गायब होण्यासाठी त्याच्या पूर्वीच मी मनात म्हटले होते की ते झाड कधीच अदृश्य होणार नाही. असे मी प्रार्थना सुरू करण्या अगोदर जाणले होते ह्या तिच्या उद्गारावरून आपण एक मराठी म्हण आठवू शकतो की जर “विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कसं येणार”.

तर मग भाविकांनो ह्या बाईच्या हलक्या स्वरूपाच्या विश्वासावरून आपण सुद्धा शिकायचं आहे की परमेश्वराला कुठेही काहीही अशक्य होत नसते आणि परमेश्वराला काही गोष्टी शक्य नसल्याचं नियंत्रण जर आपण आणत राहिलो तर तो परमेश्वर असू शकत नाही. वयोवृद्ध झालेल्या आब्राहामाला व साराला जखायरस  व एलिझाबेथ ह्याना उतार वयात परमेश्वर लेकरांची देणगी देतो ह्याच प्रमुख कारण म्हणजे तो सर्व शक्तिमान आहे. स्वर्ग आणि पृथ्वी ह्याचा उत्पन्न करता सर्व शक्तिमान पिता यावर माझा विश्वास आहे. आणि हाच विश्वास दृढ करण्यासाठी आज आपले प्रेषित आपल्या  प्रभू ख्रिस्ताला अगदी नम्र होऊन सांगतात की प्रभुजी आमचा विश्वास वाढवा.

म्हणूनच प्रिय भाविकांनो आपण सुद्धा आपल्या प्रेषितांप्रमाणे नम्र होऊन आपल्या ख्रिस्तावरील विश्वास दृढ व भक्कम व्हावा  म्हणून विनंती करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

 प्रतिसाद: हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

 

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशयसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.

२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारीदुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

Thursday, 22 September 2022

Reflections for the homily of 26th Sunday in Ordinary Time (25-09-2022) by Br. Jordan Dinis

सामान्य काळातील सव्विसावा रविवार


दिनांक: २५/०९/२०२२
पहिले वाचन:  अमोस: ६:१,४-७
दुसरे वाचन: १तीमथि: ६:११-१६
शुभवर्तमान: लूक: १६:१९-३१

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील २६ वा रविवार साजरा करीत आहोत. जिथे न्याय, प्रीती, निती व बंधुप्रेम आहे तिथे परमेश्वराची शांती नादेल असा संदेश आपल्याला आज ख्रिस्त सभा देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आमोस हा संदेष्टा त्याने विलासी लोकांचा अधिकार केला आहे. विलासी म्हणतात उद्याचं मरण आहे तर आज जीवनाचा उपभोग का घेऊ नये? सर्वसामान्य माणसे थोर लोकांशी तुलना करून आपल्या मोज मजेचे समर्पण करू पाहत होते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपला शिष्य नियमित शोध करीत आहे की आपण प्रभू येशू पुन्हा येईपर्यंत निष्कलंक व निर्दोष राहावे. आजच्या शुभवर्तमानात आपणास श्रीमंत मनुष्य व दारिद्र्य लाजरस याचा दाखला ऐकावयास मिळतो.

माणसाला विनाशाकडे नेण्याची क्षमता धनात आहे. म्हणून आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला देवाने ज्या काही देणग्या दिल्या आहेत त्या सर्व देणग्याचा योग्य वापर सुवार्ता पसरविण्यासाठी केला पाहिजे. आपण या हा महाबलीदानामध्ये भाग घेत असताना प्रभू येशूची कृपा आणि आशीर्वाद मागूया.

बोधकथा:

एकेकाळी एक राजा होता. त्याच्याकडे अपाट संपत्ती होती. परंतु त्याची प्रजा गरीब होती. तो त्याच्या संपत्तीला खूप प्रेम करत असे. तो त्याची संपत्ती कोणालाही देत नसे. एका दिवशी त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते. ती युक्ती म्हणजे माझ्याजवळ सोने, चांदी आणि हिरे हे धन माझ्याजवळ प्रचंड प्रमाणात आहे. या मौलवान धनाला मला कुठेतरी ठेवायचे आहे. तर मग राजा जागा शोधायला लागतो. जागा शोधताना त्याला एक गुहा दिसते आणि त्या गुहेमध्ये शिरतो. त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर त्याला एक खोली दिसते त्या खोलीला एक दरवाजा असतो. मग राजा विचार करतो की माझे धन मी या खोलीमध्ये ठेवायला पाहिजे. जर मी माझे धन या खोलीमध्ये ठेवले की कोणालाही त्याचा पत्ता लागणार नाही. एका रात्री तो त्याच्या जिवलग नोकराला बोलावतो आणि सर्व धन राजा आणि नोकर त्या गुह्याच्या खोलीमध्ये नेघून ठेवतात. या धनाविषयी राजाला आणि त्याच्या जिवलग नोकराला माहीत असते. दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. राजा आपल्या नोकराला खोलीच्या चाव्या देतो आणि खोलीची देखभाल करायला सांगतो. नोकर त्या खोलीची दररोज पाहणी करतो. एका दिवशी राजा त्याचे धन बघण्यासाठी गुहेच्या खोलीत शिरतो तो बघतो की खोलीचा दरवाजा नोकराने उघडा ठेवला आहे. माझे सर्व धन व्यवस्थित असणार की नाही अशी प्रचंड भीती त्याच्या मनात खळबलते. तो काही क्षणातच खोलीमध्ये जाऊन धनाची देखणी करतो. परंतु त्याच्या पाठीमागे राजाचा नोकर येतो आणि दरवाजाला कुलूप लावून बंद करतो. राजा खोलीतच राहतो. तो आरडा ओरड करतो पण कोणीही दरवाजा उघडत नाही. तो त्या खोलीमध्ये जेवण शोधतो पण त्याला काही भेटत नाही. तेथे सोने-चांदी आणि हिरे असतात पण तो ते खाऊ शकत नाही आणि तो त्या खोलीमधे मरून जातो

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याला जर अंतकाळाचा प्रवास चालू ठेवायचा असेल तर आपणाला दुसऱ्यांची सेवा करायला किंवा मदत करायला हवी आहे. आपल्याला धन थोड्यावेळे पर्यंत आनंद देऊ शकते परंतु सर्वकालिक आनंद आपण आपल्या गुणावरून प्राप्त करू शकतो.

मनन चिंतन

इतिहासामध्ये खूप काही राज्यांनी राज्य स्थापन केली. परंतु राज्यामध्ये फक्त मानाचे स्थान धनवानाना मिळाले होते. ते आपले जीवन एशोआरामात जगत होते. त्यांना कुठल्याही वस्तूची कमी नव्हती. त्यांना धार्मिक स्थळावर प्रथम स्थान होते. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त या भूतलावर आला तेव्हा त्याने देवराज्याचे दरवाजे गरिबांसाठी उघडले. तो गरिबा सारख्या या जगामध्ये आला. आणि त्यांनी गरिबा सारखा जन्म घेतला. तो गरिबांमध्ये राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताला दारिद्र्य विषयी एकदम जवळून अनुभव होता.

आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की दारिद्र्य लाजरस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामाच्या उराशी नेवून ठेवले. श्रीमंत ही मेला व तो अधोलोकांत यातना भोगत राहिला. श्रीमंत व्यक्तीने लाजरससाठी काहीही चांगले कृत्य केले नाही तसेच काही वाईटही केले नाही तरीही त्याला नरकात जावे लागले. खरे तर श्रीमंत माणसाने काहीही केले नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली. समाजातील अन्याय भ्रष्टाचार मिळवणूक गरिबांची दूरदर्शन याविषयी काहीही न करणे सुद्धा पाप आहे अशी शिकवणूक संत लोक देत आहे.

आजच्या घडामोडी च्या जीवनामध्ये माणूस हा स्वार्थी झाला आहे. तो केवळ आपल्या स्वतःचा विचार करत आहे. तो आपले डोळे चादरीने झाकून तो श्रीमंती तीकडे धावून जातो. या श्रीमंतीकडे किंवा पैशाकडे धावत असताना त्याला देव कोण आहे किंवा या जगामध्ये त्याची येण्याचे कारण काय आहे त्याला ठाऊक नाही. आजच्या शुभवर्तमानात श्रीमंत माणूस देखील त्याचे सुखी आणि आनंददायी जीवन जगत होता. परंतु त्यांनी कधीही विचार केला नाही की मेल्यानंतर त्याचे जीवन कोणत्या जीवनामध्ये दुभागले जाईल. गरीब लाजरस हा खूप गरीब होता पण त्याला जे काही खावयास मिळायचे तो खाऊन तृप्त होऊन देवळात धन्यवाद देत असे. आपले या भूतलावर जीवन दीर्घकालासाठी आहे. परंतु अंतकाळाचा प्रवास आपला मेल्यानंतर चालू होतो. जसे सोन्याला चमकदार करण्यासाठी अग्नी मधून जायला लागते तसेच माणसाला देखील या जगाच्या परीक्षेतून पार पडायला लागते.

या जगामध्ये जीवन जगणे सोपे नाही. कितीतरी अडीअडचणीला सामोरे जावे लागते. आज प्रभू येशू यादृष्टांताद्वारे आपल्याला गरीबावर प्रेम दया क्षमा आणि मदत करावयाला आव्हान करत आहे. आज आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारू या. माझ्या आजूबाजूला अनेक गोरगरीब आहेत काहींना उपाशी पोटी राहावे लागते, बरेच काबाड कष्ट करावे लागतात. मला त्याची दया येते पण मी माझ्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो का? त्याचप्रमाणे आपण आपले जीवन आयुष्य आरामात घालवताना आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या कष्टाची आपण जाणीव ठेवली पाहिजे.त्यांनी बऱ्याच हाल अपेक्षा सहन करून ख्रिस्ती विश्वास जिवंत ठेवला. मात्र आपण ह्या विलासी जगात राहून ही श्रद्धा टिकवून ठेवण्याऐवजी नष्ट करीत आहोत का? त्या श्रीमंत माणसाप्रमाणे जगात राहून विलासी जीवन जगायचे व शेवटी मरणानंतर क्लेश भोगायचे  की देवावर श्रद्धा ठेवून जीवन जगायचे  व शेवटी स्वर्गात जायचे? ह्यावर चिंतन करूया

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

 

प्रतिसाद: हे प्रभूतुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’

 

१. आपले परमगुरुमहागुरूसर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यातऐकीची भावना निर्माण होऊनती इतरांना देता यावी व इतरांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करता यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू  येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवूनत्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावेम्हणून आपण प्रार्थना.

३. "त्यांनी सर्वांनी एक व्हावे" अशी ही प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट व्हावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जे कोणी देवापासून दुरावलेले आहेतत्यांनी मागे वळून परत येशूला आपला राजा म्हणुन स्विकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण ख्रिस्ताला स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर आपले जीवन जगूनतोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्याचा सदैव प्रयत्न करावाम्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिकसामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.






 

Friday, 16 September 2022

Reflection for the Homily of 25th SUNDAY IN ORDINARY TIME (18-09-2022) By Br Jostin Pereira .



सामन्य काळातील पंचविसावा रविवार



दिनांक: १८/०९/२०२२                          

पहिले वाचन:  अमोस ८:४-७

दुसरे वाचन: तीमथ्यीला दुसरे पत्र २: १-८

शुभवर्तमान: लुक १६: १-१३

 

प्रस्तावना:

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपण सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला सांगत आहे. "जो अगदी थोड्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो तो पुष्कळानविषयी विश्वासू आहे".

देवाने प्रत्येक व्यक्तीला निर्माण करून या जगात पाठवले आहे. देवाने प्रत्येक व्यक्तीला कार्य दिली आहेत. परंतु आमच्या कार्यात आम्ही सर्वकाळ जबाबदारीने राहून देवाची सेवा केली पाहिजे तसेच आपल्या सर्वांना देवाने त्याच्या कार्यासाठी बोलावले आहे. परंतु थोड्या लोकांना समर्पणाचे जीवन जगण्यासाठी निवडले आहे. तसेच आई-वडिलांनी मुलांना धार्मिक शिकवण देऊन त्यांना देवाची हाक ऐकू यावी म्हणून आपण या मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करूया.

 

बोधकथा:

एका चोराच्या हुशार प्रवृत्तीची सुंदर कथा आहे. तो  चोर एकदा मोठी चोरी केल्यामुळे पकडला गेला. त्या राज्याच्या राजाने त्या चोराला मरण दंडाची शिक्षा दिली. ज्या  दिवशी त्या चोराला शिक्षा देणार होते त्या दिवशी त्यांनी त्या  राजाच्या राज्यपालाला सांगितले की त्याला आंब्याच्या झाडाचे एक रहस्य माहिती आहे की ज्यामुळे एखाद झाड भरपूर जन्मभर फळ देईल. परंतु ते रहस्य फक्त तो राज्याला सांगेल त्याला राजाकडे नेण्यात आले. त्याने राजाला विनंती केली की त्याला शेतात नेण्यात यावं. शेतात गेल्यावर त्या चोराने आंब्याचं रोपट लावण्यासाठी खड्डा खनल्ला. मग तो चोर राजाला इतर अधिकाऱ्यांना म्हणाला की हे रोपटे अशा एका व्यक्तीने लावावे की ज्याने जन्मभर कधीच कुणाचं काही घेतलं नाही चोरीही केली नाही तरच ते झाड जन्मभर नेहमी भरपूर फळ देईल. तेव्हा तेथे हजर असलेल्या लोकांपैकी सर्वांनी लोकांचे काहीतरी घेतले होते छोटी मोठी चोरी केली होती. राजाला त्या चोराची युक्ती आवडली राजाने त्या चोराची मरण दंडाची शिक्षा रद्द केली याचा अर्थ जीवनात जो हुशार चतुर असतो तो स्वतःला वाचू शकतो.

 

मनन चिंतन:

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची वाचणे निष्ठा आणि देवाच्या दयेचा सेवेचा आणि प्रेमाचा संदेश आपणास देत आहे.

) मानवाचा अविश्वासूपणा परमेश्वराच्या नजरेतून सुटत नाही.

आजच्या पहिल्या वाचनात आमोस संदेष्ट्याने गरीबावर होणाऱ्या अत्याचाराचे वर्णन केलेले आहे. परंतु देवाच्या नजरेतून कोणीच सुटू शकणार नाही. देवासमोर सर्वजण एकच आहोत. हे आम्हास लोकांना पटवून देतो.

) प्रार्थनेद्वारे मनुष्य परमेश्वराशी असलेली आपली निष्ठा दृढ करू शकतो.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल लोकांना प्रार्थना करण्याचे आव्हान करीत आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो प्रार्थना हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. प्रार्थने शिवाय आपण काहीच करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा कुठलेही कार्य करण्या अगोदर प्रार्थना केली त्यानंतर त्याचा कार्याला सुरुवात केली.

) परमेश्वरावरील निष्ठा हे आपले अंतिम ध्येय असावे.

आजच्या शुभवर्तमानात अन्यायी कारभाराचे शहाणपण सुचित करणारा दाखला देण्यात आलेला आहे. आजच्या अत्याधुनिक युगात, राजकीय नेते मतदानाच्या वेळी लोकांना मोठ-मोठी आश्वासने देत असतात. परंतु त्याप्रमाणे करत नाही. ह्या युगाचे लोक आपल्यासारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे आहेत. म्हणून येशू ख्रिस्त आपणास सांगतो, कोणत्याही चाकराला दोन धण्याची सेवा करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील दुसऱ्यांवर प्रीती करील. अथवा एकाला धरून राहील दुसऱ्याला तुच्छ मानेल (लूक १६-१३) देवाने या जगाची निर्मिती केली आणि आपण फक्त या जगाचे पाहुणे आहोत. स्तोत्र करता म्हणतो, "पृथ्वी तिच्या वरील सर्व काही परमेश्वराचे आहे".(स्तोत्र २४:) आपण या जगात काहीही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. म्हणून आपल्या या जीवनातील प्रवासामध्ये आपण देवाची धनाची सेवा करू शकत नाही. म्हणून आज प्रभू ख्रिस्त आपणास त्याची सेवा  करण्यास बोलावीत आहे.

आजच्या या शुभवर्तमानातून आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात.

) आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला वापर करणे. विधवा स्त्री तिच्या उदारपणातून तिच्याकडे जे काही आहे ते सर्व ती देवाला अर्पण करते. तसेच प्रभू येशू त्याच्या वचनाद्वारे सांगत आहे. तुम्ही जे काही तुमच्या शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.

) आपल्याकडे जे काही आहे, त्यामध्ये आपण समाधानी असले पाहिजे. आपण सर्वजण देवाची लेकरे आहोत. कारण आपण त्याच्या ठाई जगतो, आणि सर्व काही देवाचे आहे. (प्रेषित १७-१८)

) आपल्याकडे जे काही आहे. ते फक्त थोड्या दिवसासाठी आहे. या जगातील संपत्ती नाशवंत आणि तात्पुरती आहे. आपण या जगात कितीही संपत्ती साठवून ठेवली तरी मेल्यावर आपण काहीच घेऊन जाणार नाही. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? (मार्क -३६)

) अप्रामाणिकपणे किंवा स्वार्थीने जीवन जगण्यापेक्षा चांगले जीवन जगून आपण आपल्या जीवनात देवाची इच्छा मानली पाहिजे. संपत्ती पैसा आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जात नाही. तर खरी संपत्ती ही देवाची सेवा करण्यात आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त आज आपणास सांगत आहे आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘हे प्रभू मारिया मातेसह आम्ही विनवितो’

(१)  आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी तसेच ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे सर्व मिशनरी कार्यकार्त्यावर प्रभूचा आशिर्वाद नेहमी राहावा, तसेच त्यांना त्याच्या कामामध्ये नेहमी प्रभूचे सामर्थ व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

(२) आपल्या धर्म ग्रामातील युवक-युवती जे देऊळ माते पासून दूर गेलेले आहेत, ते देवाच्या जवळ यावे, देवाच्या दैवी कृपेचा अनुभव त्यांना यावा व त्यांनी त्यांचे जीवन देऊळमातेच्या नियमाप्रमाणे जगावे आणि इतरांना आदर्श दयावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

(३) आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींना प्रभूच्या आत्म्या द्वारे चांगले आरोग्य लाभावे व त्यांचा आजार बरा व्हावा, तसेच त्यांच्या आजारामध्ये त्यांनी नेहमी परमेश्वाचा धावा करून परमेश्वराच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

(४) आज विशेषता प्रार्थना करूया आशा लोकांसाठी ज्यांना पावसाच्या पाण्यामुळे अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पुरामध्ये अनेक लोकांची विविध प्रकारची हानी झाली आहे. या सर्व लोकांना योग्य ते सहकार्य लाभावे व इतर सर्व प्रकारच्या आपत्ती पासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

(५) आज ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहेत त्या त्या लोकांना परमेश्वराचा विशेष असा आशिर्वाद मिळावा व अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यावा म्हणून प्रार्थना करूया.

(६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.