Reflections for the homily of First Sunday of Advent
(27-11-2022) by: Br Reon Andrades
आगमन
काळातील पहिला रविवार
“तुम्हीदेखील तैयारीत रहा, कारण तुम्हाला कल्पना
नाही अश्या वेळी मानवपुत्र येईल!” (मतय २४:४४)
दिनांक: २७/११/२०२२
पहिले वाचन: यशया २:१-५
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र
१३: ११-१४
शुभवर्तमान: मतय २४: ३७-४४
प्रस्तावना:
आज आपण आगमन काळात
प्रवेश करीत आहोत. आगमन काळ हा तैयारीचा काळ व जागृत राहण्याचा काळ आहे. आजच्या पहिल्या
वाचनात यशया संदेष्टा म्हणतो कि, ख्रिस्त हा जगाचा प्रकश आहे व आपण त्यच्या
प्रकाश्यामध्ये वाटचाल करायला हवी. जगाच प्रकाश ख्रिस्त आपणामध्ये येण्यास आतुर आहे.
आपल्याला अंधारात राहण्याची इतकी सवाई झाली आहे कि, आपल्याला प्रकाश्याकडे वाटचाल करायला
संकोच होत असतो. म्हणून संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला अंधारातली कार्ये सोडण्यास
व ख्रिस्ताच्या प्रकाश्याला परिधान करण्यास सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू
ख्रिस्त आपणास जागृत व तैयारीत राहण्याचे आव्हान करीत आहे. आगमन काळ आपल्याला ख्रिस्ताचा
योग्य रीतीने स्वीकार करावयास व पूर्ण तैयारीत राहण्यास आपल्याला आठवण करून देत आहे.
मनन चिंतन:
डिसेंबरचा
महिना आला कि आपण सर्व जण व्यस्त होतो.
नाताळाची तैयारी
आपण मोठ्या उत्साहाने करत असतो. सगळीकडे आपल्याला सजावटीच्या गोष्टींची दुकाने
आपल्या नजरेस पडतात.
इतकेच नाही तर अनेक ऑफर व सेल ह्यांची याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. हे सर्व करताना आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो ह्याची जाणीव फार कमी लोकांना होत असते. आपण
आपल्या आध्यात्मिक जीवनाला गाढ झोप देत असतो, अशा स्थितीत आपण
असल्याकारणाने आपण रात्रीस योग्य अशी कार्ये यांचे आपण तंतोतंतपणे आचरण
करत असतो. ह्या स्थितीत
आपणास रात्र फार आवडते व अंधारात
आपण स्वतःला सुरक्षित असे समजत असतो.
आजच्या दुसऱ्या
वाचनात संत पौल
म्हणतो कि,
रात्र सरली आहे,
झोपेतून उठण्याची वेळ आली आहे (रोम १३:११). रात्रीस अनुकूल अशी
कामे ज्यांची तुम्ही स्वतःला सवय करून घेतली आहे त्याचा त्याग
करा. ज्या वाईट सवयी तुम्ही अंगीकारल्या आहेत त्या सोडून द्या किंबहुना
त्यांचा त्याग करा /
त्यांचे विसर्जन करा. दिवसा साजेल असे जीवन जगा (रोम १३:१३).
आपण रात्रीची मुले नव्हे तर प्रकाशाची मुले बनण्याचा प्रयत्न करूया, कारण यशया संदेष्टा अध्याय दोन वचन
पाच मध्ये म्हणतो कि, परमेश्वराच्या प्रकाशात चला. परमेश्वर आपला प्रकाश आहे. आज देऊळमाता आपल्याला आठवण
करून देत आहे की जगाचा प्रकाश आपल्यामध्ये आला आहे व त्याच्या प्रकाशाला आपणामध्ये
आत्मसात करणे अत्यंत गरजेचे
आहे.
आजच्या शुभवर्तामानात आपणास दक्ष राहण्याचे आव्हान केले जात आहे (मत्यय २४:४२).
आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टींची दक्षता घेत असतो. आपण दक्ष राहातो आपल्या
आरोग्याबाबत,
आपल्या गुंतवणुकीविषयी,
आपल्या मौल्यवान वस्तूविषयी, आपल्या मालमत्तेविषयी
व अनेक अशा गोष्टीविषयी आपण दक्षता बाळगत असतो.
परंतु इतकी दक्षता घेऊनसुद्धा आपण संतुष्ट नसतो, आपणामध्ये कुठे ना कुठे तरी ह्या गोष्टी चोरण्याची, हिरावून घेण्याची भीती
असते. आगमन काळाच्या ह्या
पहिल्या रविवारी,
देऊळमाता आपणास
दक्ष राहण्याची आठवण करून देत आहे.
आता आपल्याला प्रश्न पडतो कि कसली दक्षता आपण घेतली पाहिजे? जागतिक गोष्टीविषयी
आपण दक्षता घेतो परंतु आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची दक्षता घेत नाही, कारण हा जीवनाचा भाग सहजपणे
आपल्या नजरेस येत नाही. परंतु हा एक जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. आपल्या उद्धारासाठी,
तारणासाठी व ख्रिस्त सलग जीवन जगण्यासाठी हे गरजेचे
आहे. आपण आपल्या शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी गुंतलेले असतो, कारण ही वेळ लक्ष विचलित करण्याची आहे. ही
उपभोगवादी जीवनशैली अगदी सहजपणे आपले लक्ष त्याच्या कडे वेधून घेत असते. म्हणून
संत
पौल आपणास सांगत आहे
की,
तुमच्या शरीराच्या वासना पुरवण्यास लक्ष देऊ नका (रोम १३:१४) नाहीतर तुम्ही
भरकटले जाणार् तर दक्ष राहा, तैयारीत रहा.
आजच्या शुभवर्तमानात आपणास दक्ष राहण्यास सांगितले़ आहे. आपण दक्षता कसली
घेतली पाहिजे? आपण कसली तैयारी
केली पाहिजे? अनेक वेळेस आपणास सांगण्यात येते की ख्रिस्त येत आहे, तर दक्ष राहा तैयारीत रहा. परंतु जर आपण पाहिलं तर ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला आहे व अजूनही तो
आपणामध्ये आहे.
तो आपणाबरोबर सूरवाती पासून होता, आहे व सदैव असणार आहे. ही जाणीव अपणामध्ये अंकुरीत व्हावी व परमेश्वर माझ्या
बरोबर आहे,
तो माझा
आधार आहे व त्याने माझे तारण
केले आहे याची आठवण आपणास सतत व्हावी म्हणून आपण सदैव दक्ष असावे व
तयारीत असावे.
आपण आपली दुष्कर्मे, नकारात्मक सवयी या सर्वानविषयी दक्षता घ्यायला हवी. शेवटी आपण ख्रिस्ताला आपला
शस्त्रसंभार बनवावे (रोम १३:१४ब)
याचे आव्हान
आज देऊळमाता
आपणास करीत आहे. आगमन काळाच्या ह्या पहिल्या रविवारी आपणास सांगण्यात येते
की तुम्ही तुमची दुष्कर्मे वाईट सवयीं सोडून द्या व परमेश्वराच्या प्रकाशात चला. जागृत राहा व
भरकटले जाऊ नका कारण ख्रिस्त आपला तारणारा आम्हामध्ये आहे व तोच आपले बळ आणि आपली आशा आहे ह्याची जाणीव ठेवा. जागृत रहा तैयारीत रहा व ख्रिस्ताला आपले शस्त्रसंभार बनवा.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: ‘येशू तुझ्या
स्वागतास आम्हाला तत्पर बनव.’
१.ख्रिस्तात जीवन
जगण्यास मार्गदर्शन करणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू
व धर्मभगिनी यांना सतत शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ व्हावा व दैवी कार्य सतत
चालू ठेवण्यास त्यांना कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.आपल्या देशात, समाजात अनेक
लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजा ऐवजी स्वतःच्या स्वार्थास महत्व देत
आहेत. त्यांना या स्वार्थी वृत्ती पासून दूर राहण्यास व समाज कल्याणाचा विचार
करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आज अनेक लोक
व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांना व्यसनमुक्त होण्यास परमेश्वराचे सहाय्य
मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.सत्तेच्या
लोभाने राजकारण्यांनी आपल्या राज्यात कल्लोळ घातला आहे व लोकांच्या अपेक्षांचा भंग
केला आहे. अशा या परिस्थितीत लोकहिताच्या योजनेस प्राधान्य देण्यास त्यांना कृपा
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.जेव्हा आपण
ख्रिस्ती जीवनाऐवजी ऐहिक जीवनात गुरफटून जातो. तेव्हा स्वतःला तारणापासून वंचित
करतो. याची जाणीव आपणास व्हावी व ख्रिस्ती मूल्यांवर आपले जीवन पुनर्स्थापित
करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक,
व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.