Reflections for the homily of the Fifth Sunday In Ordinary Time (05/02/2023) by Fr. Benher Patil.
सामान्य
काळातील पाचवा रविवार
दिनांक: ५/२/२०२३
पहिले वाचन: यशया ५८: ७-१०
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र २: १-५
शुभवर्तमान: मत्तय ५: १३-१६
विषय: तुम्ही जगाचे मीठ आणि प्रकाश आहेत.
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाकाळातील
पाचवा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्यला ख्रिस्ती जबाबदारी आणि कर्तव्ये
ह्यांची ओळख करून देते आणि ती पार पाडण्यास निमंत्रित करते. ह्या जगात ख्रिस्ताचे
शिष्य म्हणून वास्तव्य करत असताना आपण आपलं जीवन मिठाप्रमाणे आणि
प्रकाश्याप्रमाणे, लोकांच्या हितासाठी, परोपकारासाठी खर्ची घालणे ह्यातच आपला
परमार्थ आहे ह्याची जाणीव करून देते. यदाकदाचित आपल्या कृत्याने किवा शब्दांनी,
आपण सद्गुणी जीवन जगण्यास उणे पडलो असू, अथवा पापांच्या अंधकारात चाचपत पडले
असल्यास, त्याबद्दल पश्चाताप करून देवाची क्षमा मागुया.
मनन
चिंतन:
एकदा एका लहान मुलाला
त्याच्या आईने प्रसिद्ध देऊळ/चर्च पाहण्यासाठी नेले. खिडक्यांवर विविध नावाजलेल्या
ख्रिस्ती-पंडित व साधू-संतांची चित्रे रेखाटलेली होती. काचेच्या खिडक्यांमधून
चमकणारे सूर्यकिरण पाहत असताना त्याने आईला विचारले, “खिडक्यावरील ती लोकं
कोण आहेत?” ती म्हणाली, "ते संत
आहेत." लहान मुलाने खिडकीकडे बघितले आणि आईला म्हणाला, “ठीक आहे, आता मला समजले की,
संत काय किवा कोण असतात. ते असे लोक आहेत कि ज्यांनी प्रकाश चमकू दिला आहे.”
आज आपण ज्या
जगात राहतो ते दुर्दैवाने वेगवेगळ्या समस्यांनी, चिंतांनी आणि संकटांनी ग्रासलेले
जग आहे. ह्या जगातील लोक भ्रष्टाचार, अहंकार, लोभ, अन्याय, अत्याचार आणि पापरुपी
अंधकारात खितपत पडले आहेत. त्याचं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन नैराश्यान भरून,
एकप्रकारे बेसूर, बेचव, आणि अर्थहीन झालं आहे. अश्या परिस्थितीत ख्रिस्त आपणास
आपली ख्रिस्ती भूमिकाची जाणीव करून देतो. आजच्या शुभवर्तमानात तो दोन रूपकांचा
वापर करून, आपणास पृथ्वीचे मिठ आणि जगाचा प्रकाश बनण्यास आमंत्रण करतो. आपण कश्या प्रकारे
आपली ख्रिस्ती भूमिका/जबाबदारी पार पडू शकतो?
आपण मीठाचे गुणधर्म आपल्या संपूर्ण जीवनात
जोपासले पाहिजे. पहिल्याप्रथम, मीठ हे शुद्धतेचे प्रतीक आहे. ते प्राचीनकाळी यज्ञांमध्ये वापरले जात असे. त्यावरून ख्रिस्ती माणसाने आपल्या बोलण्यात, आचरणात आणि
विचारातही शुद्धतेचे उदाहरण असले पाहिजे असे सूचित होते. दुसरं म्हणजे, मीठ हे जंतुनाशक असून आरोग्यदायी
घटकांनी भरलेले आहे, त्याचप्रमाणे ख्रिस्ती माणसाचा इतरांच्या
जीवनावर आणि समाजावर विशिष्ट प्रभाव असणे आवश्यक आहे: भ्रष्टाचाराचा पराभव करणे, अन्यायाविरुद्ध
लढणे आणि इतरांना पाप करण्यापासून परावृत्त करणे म्हणजेच पृथ्वीचे मीठ बनणे होय.
आणखीन एक मिठाचा गुणधर्म म्हणजे मीठ खाद्यपदार्थांचे रक्षण करते, त्याप्रमाणे आपण
येशूने आपल्याला दिलेली धार्मिक श्रद्धा, ख्रिस्ती
सांस्कृतिक मूल्ये आणि नैतिक तत्त्वे जतन करणे आवश्यक आहे. दैनदिन भोजनात मीठ हे अन्न रुचकर आणि स्वादिष्ट
बनवण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे ह्या जगात जे लोक निराशित आणि हताश आहेत
त्यांचे मनोबल वाढवून, त्यांना मदत करून त्यांच्या जीवनात आशेचा किरण बनण्यास आपण
झटले पाहिजे.
प्रकाश हा परोपकारी आहे, त्याच्यामुळे आपण
पाहू शकतो. तो आपल्याला अंधकारात मार्गदर्शन करतो आणि थंडीच्या दिवसात उब देतो.
त्याचप्रमाणे आपणसुद्धा लोकसेवा आणि जनहित, परोपकारी आणि निस्वार्थी भावनेने
करण्यास आपल्याला प्रेरणा देतो. आजच्या पहिल्या वाचनात, प्रभु देव त्याचा
संदेष्टा यशया द्वारे आपल्याला शिकवतो की आपण देवाचा प्रकाश आपणाद्वारे कसा चमकू
देऊ शकतो? “तुमची भाकर भुकेल्यांना वाटून घ्या, अत्याचारित आणि
बेघरांना आश्रय द्या; जेव्हा तुम्ही त्यांना नग्न पाहता तेव्हा
त्यांना कपडे घाला आणि स्वतःहून त्यांच्याकडे पाठ फिरवू नका. मग अंधारात
तुमच्यासाठी प्रकाश उगवेल आणि अंधार तुमच्यासाठी दुपारप्रमाणे होईल” (यशया ५८:७, १०). जगाला प्रकाश
देण्यासाठी आपणास पहिल्या प्रथम ख्रिस्ताचा प्रकाश प्राप्त करणे गरजेचे आहे.
ख्रिस्त जगाचा खरा प्रकाश आहे, त्याच्या पावलावर पावूल ठेऊन आपण समाजात प्रेम,
दयाळूपणा, चांगुलपणा, क्षमा, नम्र सेवा आणि
आदरयुक्त जीवनाने इतरांना प्रेरित केले पाहिजे. त्याचप्रमाणे द्वेष्य, पूर्वग्रह, आणि मत्सर
यांच्यामुळे निर्माण झालेला अंधार दूर करणे आपले कर्त्यव आहे.
जेव्हा आपण मिठाप्रमाणे आणि प्रकाशाप्रमाणे दुसऱ्याच्या गरजेस धावून येतो आणि सत्कर्माने, सदाचाराने जीवन जगतो, तेव्हा आपण स्वता:चे आणि इतरांचे जीवन रुचकर आणि प्रकाशमान करत असतो आणि अश्याप्रकारे आपण देवाचा गौरव प्रगट करतो.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:
१. सर्व ख्रिस्ती
लोकांनी, प्रत्येक परोपकारी कृतीत, प्रेरणादायी शब्द आणि प्रेमळ हावभावात आपला
ज्याच्यावर अढळ विश्वास आणि जिवंत आशा आहे, अश्या प्रभु येशूला, म्हणजेच जगाच्या
प्रकाशाला अधिक स्पष्टपणे चमकू द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. अखिल ख्रिस्तसभेच्या
पुढाऱ्यांनी, जगात ऐक्यासाठी मध्यस्थी करावी आणि जगात शांतता, न्याय, समता आणि समेट घडवून आणण्यास आपले
जीवन चिकाटीने आणि प्रेमाने समर्प्रीत करावे म्हणून प्रार्थना करूया.
३. जे कोणी
जीवनात निराश आहेत, आजारी, अस्वस्थ व अंधकारात आहेत त्यांनाही तारणदायी येशूच्या
प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व त्यांचे जीवन
आनंदाने आणि आशीर्वादाने भरावे, तसेच त्यांच्या जीवनात बदल घडून यावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. आमची कुटुंबे, स्वागतार्ह आणि आदरातिथ्य करणारी, विश्वासात शिक्षण देण्यास आणि आशेने स्वतःचे पोषण करण्यास सक्षम असावीत आणि खऱ्या ख्रिस्ती जीवनास साजेशी अशी इतरांना चांगली प्रेरणा आणि प्रोस्ताहन देणारी असावीत म्हणून प्रार्थना करूया.