Reflection for THE SOLEMNITY OF THE EPIPHANY OF THE LORD (09/01/2023) By Bro. Pravin Bandya
प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण
दिनांक: - ०८/०१/२०२३
पहिले वाचन: - यशया ६०:१-६
दुसरे वाचन: - इफिस ३:२-६
शुभवर्तमान: - मत्तय २:१-१२
“मग मागी लोकांनी, आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, उद, व गंधरस यांचे नजराणे दिले”.
प्रस्तावना
आज अखिल ख्रिस्तसभा
प्रकटीकरणाचा सण साजरा करीत आहे. काही दिवसापूर्वी आपण प्रभू येशूच्या जन्माचा उत्सव
साजरा केला. येशूच्या प्रकटीकरणाचा सोहळा आपणास संदेश देतो कि, येशू ख्रिस्त हाच एकमेव
कधीही अस्ताला न जाणारा असा आपला तारणाचा सूर्य आहे. त्या सूर्याच्या प्रकाशात आपणाला
परमेश्वराच्या आपणावरील प्रीतीचे तेज दिसून येते. आपल्या जीवनाच्या पाप अंधारात येशुरूपी
सूर्य सतत उदयास यावा आणि आपली जीवने प्रकाशमय बनवावीत म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील
असूया. ज्याप्रमाणे येशूच्या चरणाशी नमन करून ते तीन राजे वेगळ्या मार्गाने गेले
तसे आपणही येशूला स्वीकारून पापी मार्ग सोडून देऊया आणि नवजीवनाच्या वाटेला चालूया.
येशूच्या
येण्याने आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडावा. आपल्या जीवनाचा समस्त कायापालट व्हावा,
आपल्या जीवनाचा काळोखात आंतरिक परिवर्तनाचे लक्ष दीप उजळावेत म्हणून ह्या पवित्र मिसाबलिदानात
सहभागी होत असता प्रार्थना करू या.
मनन चिंतन
आज आपण एक महत्वाचा आणि महान सण
साजरा करीत आहोत; तो म्हणजे प्रभू येशूचे प्रकटीकरण. सुरवातीपासूनच हा सोहळा एक महत्वाचा
सोहळा म्हणून साजरा करीत असत. हा सोहळा आपणास तीन ज्ञानी राज्यांचे बेथलेमात प्रभू
येशूला भेटण्यास येण्याची आठवन करून देत आहे व तसेच प्रभू येशु हाच खरा देव,
ख्रिस्त आणि जगाचा तारणारा आहे, हे ही आठवण करून देतो.
तसेच हा सोहळा आपणास येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश
आहे हे दाखवून देतो. त्याच्या जन्माद्वारे, आपण जगामध्ये प्रकाशाचे आगमन
पाहतो. तिन्ही ज्ञानी माणसांनी आकाशातील तेजस्वी तारा पाहिला, त्याचा अर्थ समजून घेतला आणि
त्याचे अनुसरण केले. ज्ञानी लोकांद्वारे, आपण आशेचा, आनंदाचा आणि शांतीचा प्रकाश पाहतो.
एकंदरीत, आजचा हा सण आपणास सांगतो की, देवासाठी कोणीही परके
नाहीत. त्याच्या दृष्टिकोनातून, सर्व त्याची लाडकी मुले आहेत. याचा अर्थ आपल्यापैकी
प्रत्येकजण एकमेकांचे भाऊ आणि बहीण आहोत. दाखला आपणास सांगतो की, परमेश्वर भेदभाव करत
नाही आणि आपण सर्व त्याचे निवडलेले लोक आहोत. देवाची आपल्याशी असलेली जवळीक अधिक
खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जे आपल्यासाठी एकमेकांच्या जवळ येण्याचे एक कारण आहे.
ज्ञानी लोक ताऱ्याच्या मागे गेले आणि त्यांना देव भेटला. हे आपल्याला सांगते की
आपल्याला देखील आपल्या देवाचा शोध घ्यावा लागेल आणि जोपर्यंत आपण त्याला शोधू शकत
नाही तोपर्यंत स्तब्द न राहता त्याचा शोध करणे.
मत्तयचे
शुभवर्तमान आपणास ज्ञानी लोक हे कसे ताऱ्याच्या साह्याने प्रभू येशूचा येरुसलेमेत शोध
घेत आले व नवीन राजा जन्माचे चिन्ह काय आहे, हे स्पष्ट करून देते. हे ज्ञानी राजे अनोळखी
होते तरीही ते प्रभू येशूला राजा म्हणून भेट देण्यास व दाने अर्पण करण्यास आले.
आजच्या पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा लोकांना धैर्य देऊन सांगतो
कि, उभे रहा व नवीन दिवसाचे स्वागत करा. संपूर्ण अंधकार हा प्रकाशाने ग्रासला जाईल
व इस्त्राएल पुन्हा प्रकाशमान होईल. यशया संदेष्टा लोकांमध्ये नवीन आशा निर्माण करतो
कि, इस्त्राएलात प्रभूचा गौरव दिसणार आहे, आणि फक्त यहुदी लोकांवरच नाही तर परराष्ट्रीयांवर
सुद्धा.
ह्या ज्ञानी लोकांना इंग्रजीत मजाई म्हणून शब्द वापरला आहे.
हे मजाई किंवा ज्ञानी लोकांचा एक गट किंवा जात होती जे स्वप्नांच्या व्याख्या, ज्योतिष आणि जादू यांच्याशी
संबंधित होते. शुभवर्तमानात त्यांची नावे काय आहेत हे आपणाला सांगितले नाही; तसेच ते
कुठून आले ह्याविषयी सुद्धा सांगितले नाही. परंतु परंपरेनुसार आपण मानतो कि, ते तीन
लोक होते आणि त्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारची दाने प्रभू येशूला अर्पण केली.
परंतु सातव्या शतकात त्यांना ख्रिस्तसभेने नावे दिली ती म्हणजे गॅस्पर, बाल्थाझार आणि
मल्खिउर. ह्यानावांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे: गॅस्पर म्हणजे धन-संपत्ती;
बाल्थाझार म्हणजे वैभव आणि मल्खिउर म्हणजे देव राजाचे रक्षण करतो. जेव्हा हे ज्ञानी
लोक प्रभू येशूला भेटतात तेव्हा ते त्याला सोने, उद, व गंधरस ही दाने अर्पण करतात.
त्याकाळी ही दाने राजांना भेट म्हणून देण्यात येत होती. सोने हे पृथ्वीवरील राजाचे
प्रतिक आहे; उद हे पुरोहिताचे प्रतीक आहे तर गंधरस हे मृत्यूचे प्रतीक म्हणून
सुगंधित तेल वापरत असत.
आज ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असता आपण ही त्या ज्ञानी लोकांप्रमाणे प्रभूचा शोध घ्यावा म्हणून प्रार्थना करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद:
हे प्रभू, आम्हांला तुझा शोध करण्यास मदत कर
१) आपल्या ख्रिस्त सभेची धुरा
वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व धार्मिक अधिकारी ह्यांना देव-राज्याची सुवार्ता
जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन
सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात
आहेत, त्यांना
योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या काम धंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद
असावा, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४) स्नान-संस्काराद्वारे आपल्यावर
असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नान-संस्काराच्या वचनांशी
आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील ज्या
व्यक्ती आजारी, निराशित
आणि दुःखी-कष्टी आहेत, अशा सर्वांना दैवी-दयेचा स्पर्श होऊन त्यांचे जीवन
प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment