Sunday, 1 October 2023

 Reflection for the Feast of St Francis of Assisi (04/10/2023) By Br. Suhas Pereira.

   

संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांचा सण

दिनांक: ०४ /१० /२०२३

पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७

दुसरे वाचन: गलतीकारास पत्र -६:१४-१८

शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०



प्रस्तावना

          आज आपण फ्रान्सिस्कन संस्थेचे संस्थापक अस्सिसीकर संत फ्रान्सिस ह्यांचा सण साजरा करतो. अडॉल्फ होल या युरोपमधील एका लेखकाने संत फ्रान्सिसला "शेवटचा ख्रिस्ती" अशी उपमा दिलेली आहे. संत फ्रान्सिसने गोर-गरिबांवर, आजाऱ्यांवर आणि उपेक्षितांवर प्रेम केले, त्यांची काळजी घेतली आणि त्यांना या समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या दयाळू आणि प्रेमळ फ्रान्सिसमध्ये आपल्याला आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूचे दर्शन होते. प्रभू येशूला आपल्या जीवनाद्वारेसुद्धा त्याची दया आणि त्याचे प्रेम जगाला अर्पावयाच आहे. ते जास्तीत जास्त शक्य आणि साध्य होण्यासाठी आपल्याला प्रभू येशूच्या समर्पणरूपी ऊर्जास्रोतातून वाहणाऱ्या दैवी कृपेची आणि शक्तीची गरज आहे. म्हणूनच आज आपण या प्रभूच्या पवित्र मंदिरं एकत्र आलेलो आहोत, कि जेणेकरून संत फ्रान्सिस हा शेवटचा ख्रिस्ती न होता, आपणसुद्धा त्याच्याप्रमाणे आपल्या जगासाठी, इतरांसाठी खरे ख्रिस्ती बनावेत. त्यासाठी आपल्याला प्रभू येशूच्या प्रेमाद्वारे नूतनीकरण अनुभवण्याची आणि संत फ्रान्सिसकडून प्रेरणा आणि आदर्श घेऊन संपूर्ण जगाला, सर्व प्राणिमात्रांना, सर्व चराचराला प्रेम देण्याची आवश्यकता आहे. यासाठीच आजच्या मिस्साबलीमध्ये आपण खास प्रार्थना करू या. 

मनन -चिंतन

संत फ्रान्सिस आपल्यला आज कोणता संदेश देईल?

          पोप फ्रान्सिस ह्यांनी २०१३ मध्ये अस्सिसीकर संत फ्रान्सिसच्या सणाच्या दिवशी अस्सिसी येथे दिलेल्या प्रवचनातील विचार संक्षिप्त रूपाने आज तुमच्या समोर मांडू इच्छितो.

प्रिय बंधू आणि भगिनींनो संत फ्रान्सिस जर आज आपल्या जगात असला असता तर त्याने आपल्याला काय संदेश दिला असता? त्याने आपल्याला काय सांगितलं असतं? संत फ्रान्सिस आपल्याला आज त्याच्या सणाच्या दिवशी काय सांगत आहे?

१)  ख्रिस्ती असणे म्हणजे ख्रिस्ताशी एक अतूट आणि जिवंत नातं जपणे, ख्रिस्तमय होणे आणि ख्रिस्तासारखे बनणे: संत फ्रांसीसचा ख्रिस्तमय होण्याचा मार्ग संत दामिआनो नावाच्या छोट्याशा ख्रिस्तमंदिरातील आल्तारावरील क्रुसाच्या पायथ्याशी झाला. संत फ्रान्सिसने क्रुसावरील ख्रिस्ताला पहिले आणि क्रुसावरील ख्रिस्ताने त्याला. फ्रान्सिसच्या आणि संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी आपले जीवन क्रुसावर समर्पित करणाऱ्या ख्रिस्ताने फ्रान्सिसला आपणाकडे आकर्षित करून घेतलं. संत दामिआनो ख्रिस्तमंदिरात पवित्र क्रुसासमोर प्रार्थना करताना फ्रान्सिसने हा अनुभव घेतला. क्रुसावरील ख्रिस्त हा मृत नव्हता तर मृत्युंजय ख्रिस्त होता. तो फ्रान्सीसबरोबर पराभव, असफलता आणि अपयशाबद्दल बोलला नाही. जीवन असणाऱ्या आणि जीवनदायी मरणाबद्दल प्रभुरू येशू त्याच्याशी बोलला. कारण प्रभू येशू फ्रांसिसशी देवाच्या प्रेमाबद्दल बोलला आणि प्रभू येशू हा मानव बनलेलं देवाचं प्रेम आहे. या प्रेमाला मरण नाही. जो कोणी स्वतःला ख्रिस्ताद्वारे आकर्षित करून घेतो, त्याचं नूतनीकरण होत असते, त्याचा नवजन्म होत असतो.

हे अस्सिसीकर संत फ्रान्सिस, क्रुसि खिळलेल्या ख्रिस्तसमोर वेळ घालवण्यास, त्याच्या नजरेमध्ये कैद होण्यास, त्याच्या प्रेमाद्वारे नवजन्म घेऊन जीवन जगण्यास आम्हाला शिकव.

२) संत फ्रान्सिस आपल्याला सांगत आहे, कि जो कोणी ख्रिस्ताचे अनुकरण करतो  त्याला खऱ्या शांतीचा अनुभव येतो. कारण हि शांती दैवी शांती आहे, जग देते ती शांती नव्हे. अनेक लोकं जेव्हा शांतीबद्द्ल बोलतात तेव्हा संत फ्रान्सिसचा विचार करतात आणि ते योग्य आहे. परंतु फारच थोडी लोकं सखोल विचार करतात. संत फ्रान्सिसने आपल्या जीवनात अनुभवून या जगाला देण्याचा प्रयत्न केलेली शांती कोणती होती? संत फ्रान्सिसने अनुभवलेली शांती हि पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती होती. जो कोणी ख्रिस्ताचे जू (ओझे) ओल्या खांद्यावर घेतो, त्यालाच ह्या शांतीचा अनुभव येतो. ख्रिस्ताचे जू आहे त्याने आपल्याला दिलेली आज्ञा: "जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा". ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छिणार ओझं आपण गर्व, घमेंडीपणा आणि उद्धटपणाने नव्हे तर नम्रता आणि चांगुलपणानेच वाहू शकतो.

हे अस्सिसीकर संत फ्रान्सिस, जी शांती प्रभू येशू आम्हाला देऊ इच्छितो आणि ज्या शांतीचा उगम परमेश्वरमध्ये आहे, अशा शांतीचे साधन बनण्यास आम्हाला शिकव. 

३) संत फ्रान्सिसने लिहिलेल्या निसर्गाच्या स्तोत्रगीतामध्ये संत फ्रान्सिस लिहितो: "हे उच्च, सर्वशक्तिमान आणि चांगल्या देवा, तुझ्या संपूर्ण सृष्टीसह तुझे नाव सुवंदित असो". संत फ्रान्सिसने देवाच्या संपूर्ण निर्मितीवर प्रेम केले, निसर्गाचं संगोपन केलं. संत फ्रान्सिसच्या मनात इतर लोकांबद्दल  होता. कारण त्याला माहित होतं कि देवाने मानवाला निसर्गाचा मुकुट म्हणून निर्माण केलेलं आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या हातातील बाहुलं म्हणून नाही. संत फ्रान्सिस हा शांती, सुसंवाद आणि ऐक्याचा जनक होता. संत फ्रान्सिसप्रमाणे आपणसुद्धा नाशाची, संहाराची साधनं नं बनता, मनुष्य आणि निसर्गाचं मुल्य आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले कान उघडून शोक करणाऱ्यांच्या, दुःखात  असणाऱ्यांच्या आणि हिंसेला बळी पडणाऱ्यांच्या  आर्त किंकाळ्या आपण ऐकू या. म्हणूनच या देवाच्या धरतीला रक्तरंजित करणारी युद्धे थांबावेत, शस्त्रांनी संहारापासून माघार घ्यावी, सर्वत्र द्वेषाचं रूपांतर प्रेमात व्हावं, अपमानाचं रूपांतर क्षमाशीलतेत आणि दुहीचं रूपांतर ऐक्यात व्हावं म्हणून प्रार्थना करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे प्रभू, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) अस्सिसीकर संत फ्रान्सीसप्रमाणे निसर्गामध्ये सौंदर्य आणि चांगुलपणा शोधून आपल्या स्वर्गीय निर्मात्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी आम्हाला सदबुद्धी दे.

२) आपल्या पवित्र ख्रिस्तसभेने संत फ्रान्सिसच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सर्व ऐश्वर्य आणि सत्तेचा हव्यास सोडून देऊन साधेपणाचं जीवन जागून तुझी सेवा करावी म्हणू तू तिला कृपा दे.

३) आमच्या सर्व राजकीय नेत्यांनी स्वार्थ सोडून देऊन आपल्या समाजात न्याय आणि शांतीचं वातावरण प्रस्थापित करण्यासाठी झटावं म्हणून त्यांना कृपा आणि प्रेरणा दे.

४) फ्रान्सिस्कन संस्थेच्या सर्व बंधू-भगिनींनी तुझ्या प्रेमाची आणि शांतीची सुवार्ता संपूर्ण जगाला द्यावी म्हणून त्यांना तुझी कृपा आणि शक्ती दे.

५) आमच्या कुटुंबातील आणि संपूर्ण फ्रान्सिस्कन संस्थेच्या सर्व मृत बंधू-भगिनींना तू तुझ्या स्वर्गीय राज्यात चिरंतन शांती दे.

हे प्रभू आमच्या प्रार्थना एक आणि तू दाखविलेल्या मार्गावर आणि तुझ्या शिकवणुकीप्रमाणे आमचं जीवन जगण्यास आम्हाला तुझी कृपा दे. तू जिवंत असून सदासर्वदा आमच्या हृदयावर राज्य करतोस. आमेन


No comments:

Post a Comment