Friday, 27 October 2023

 Reflections for the 30th Sunday In Ordinary Time (29/10/2023) by Br. Justin Dhavade.


सामान्य काळातील तिसावा रविवार



दिनांक: २९/१०/२०२३

पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६

दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०

शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०  

प्रस्तावना:

“तू आपला परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण मनाने प्रीती कर”.

       ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देऊळमाता सामान्यकाळातील तिसावा रविवार साजरा करीत आहे. आणि आजची उपासना आपणास परमेश्वरावर व आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्यास पाचारण करीत आहे. प्रेम हा मानवी मनाचा अत्युच्च नी सर्वांना हवाहवासा वाटणारा एकमेव अविष्कार आहे, व प्रेमालाच आपल्या रहस्यमय जीवनातील एकमेव महत्वाची बाब समजली जाते. कारण प्रेमामुळेच आपण त्यागी वृत्ती आत्मसात करतो व निस्वार्थी अंगी बाळगतो, ह्याची जाणीव ख्रिस्ताला होती.

       ख्रिस्ताला ठाऊक होते कि, प्रेमाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे व प्रेम असे एक माध्यम आहे कि, जे अशांततेत शांतता, तर दुभांगातेत एकता निर्माण करू शकते. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो कि, परमेश्वरावरील व शेजार प्रीती हि सर्वात महत्वाची आहे. ख्रिस्ताच्या ह्या आज्ञांचे तंतोतंत पालन करून ह्या भूतलावर प्रीती प्रस्थापित करण्यास व सर्वत्र प्रेमाचे वातावरण निर्माण करण्यास ख्रिस्त आज आपणा प्रत्येकास बोलावित आहे.

मनन चिंतन:

       प्रीती, ह्या शब्दात फार महत्व आहे. जेथे प्रीती असते तेथे विश्वास असतो. कारण देव प्रीती आहे. म्हणून प्रभू येशूने देवप्रिती आणि परस्पर प्रीतीची आज्ञा आपल्याला दिलेली आहे. परमेश्वर अखिल मानवजातीवर प्रीती करतो. आपण मानव आहोत, या एकाच कारणामुळे तो आपणावर प्रीती करतो. देवाची प्रीती प्राप्त करून घेण्यास हे एवढेच एक कारण पुरे आहे. मानवी प्रीतीची पराकाष्ठा होऊन ती संपुष्टात आली तरी देवाची प्रीती आपणाला अंतर देणार नाही. देवाची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, ह्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो. देवाचे नियम, आज्ञा पाळणे म्हणजे देवावर प्रीती करणे. ह्याचीच येशू ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. येशू ख्रिस्त सर्व लोकांवर प्रीती करतो असे नवीन करारात पुन:पुन्हा आढळते. जे त्रासलेल  व गांजलेले आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त जगात होता. तो हरवलेल्याना शोधावयास व तारावयास आला होता.

       गरजवंत व ज्यांचे कुणीच नाहीत अशांसाठी आपण आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडायला हवेत. प्रभू येशू सर्वदा आपल्यावर प्रेमपूर्वक कृपादानाचा वर्षाव करीत असतो. आपल्या प्रिय भक्तगणांसाठी आणि त्याला शरण येणा-या प्रत्येक श्रद्धावंतांसाठी प्रभू येशू अदभूत चमत्कार करण्यास तयार आहे. आपण त्याच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची प्रीती-आज्ञा आचरणात आणून, श्रद्धेने जीवन जगण्यास सदा तत्पर असलो पाहिजे.

आजच्या समाजात प्रेम या शब्दाचा दुरुपयोग होऊन या शब्दाचं महत्व आणि मूल्य कमी होत आहे. जर आपल्या प्रेमाचं रूपांतर ख्रिस्ताच्या प्रेमाच्या प्रतिमेत केले गेले, तर प्रेमाला पुन्हा त्याचं महत्व आणि मूल्य प्राप्त होऊ शकतं. जर आपलं प्रेम दोन्ही दिशाकडे वळाल, तरचं ते खरं, ख्रिस्ती आणि ख्रिस्ताच्या प्रेमासारखं होऊ शकतं आणि त्या दोन दिशा म्हणजे: देवाकडे दर्शविणारी दिशा आणि मानवाकडे दर्शविणारी दिशा होत.

आजच्या मिस्सात सहभागी होत असताना आपण स्वत:हालाच प्रश्न विचारू या की माझं देवावरील व एकमेकावरील प्रेम कोणत्या स्वरूपाच आहे? माझ्या प्रेमात मी, माझं  अशा स्वार्थीवृत्तीचा कलह लागलेला आहे का? येशू सारखी देवावर व इतरांवर प्रीती करण्यासाठी शक्ती व ताकद, प्रेमाचा उगम व सागर ह्याच्या कडून मागूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला प्रेमळ बनव.

१) आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि ख्रिस्तसभेच्या कार्याची धुरा स्वीकारलेल्या सर्वानी प्रभूची देवप्रीती आणि शेजारप्रीतिची आज्ञा समजून आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे या प्रेमाच्या आज्ञेची शिकवणूक इतरांना द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.

 ) आपल्या पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, दुःखात आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत अशा सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना लवकरात लवकर या सर्व त्रासातून मुक्तता मिळावी व नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

)  आपल्या देशातील धार्मिक, राजकीय व सामाजिक प्रश्नावर सखोल चिंतन व्हावे विधायक मार्ग शोधण्यासाठी सर्वस्तरावर चांगला सुसंवाद घडावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

 4) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा आपण प्रभुचरणी मांडूया.


No comments:

Post a Comment