Friday, 3 May 2024

  Reflection for the Sixth Sunday of Easter (05/05/2024) By Fr. Benjamin Alphonso.



 

पुनरुत्थान काळातील सहावा रविवार


दिनांक: /०५/२०२

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८

दुसरे वाचन: १ योहान ४:७-१०

शुभवर्तमान: योहान १५:९-१७


प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील सहावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रामुख्याने देवाच्या प्रीती विषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देव पक्षपाती नसून तो सर्वांना समान लेखतो व त्याच्या प्रेमभरीत दानांचा वर्षाव करतो हे सांगण्यात आले आहे. योहान लिखित पहिल्या पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात 'देव प्रेम आहे' व त्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्याने त्याचा पुत्र आपणासाठी दिला. ह्याची घोषणा करण्यात आली आहे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त प्रेम करण्यासाठी शिष्यांना आज्ञा देत आहे. जे प्रेम पिता आणि येशूमध्ये आहे तेच प्रेम येशू शिष्यांना देऊन इतरांवर प्रेम करण्यासाठी आव्हान करतो. आपण ख्रिस्ताप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतो का? प्रभू ख्रिस्ताची आज्ञा पाळून आपण एकमेकांवर योग्य ते प्रेम करावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

एक सुंदर अशी कथा आहे. एकदा एक नवविवाहित दापत्य फिरण्यासाठी जात होते. पती हा एक शूर सैनिक होता. ते एक नदी ओलांडत होते. त्यांची बोट छोटी होती. त्यांची छोटीशी बोट जेव्हा नदीच्या मध्यभागी पोचली तेव्हा सोसाट्याचा वारा सुरू झाला त्यांची बोट नदीत बुडू लागली तेव्हा पत्नी फार घाबरली परंतु पती शांत होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. तेव्हा पत्नीने आपल्या पतीला विचारले की मी इतकी घाबरलेली आहे, परंतु तुमच्या चेहऱ्यावर काहीच भीती नाही. तेव्हा पतीने आपल्या कमरेतून धारदार तलवार काढली आणि तिची टोक पत्नीच्या गळ्यावर ठेवली आणि तिला विचारले मला सांग, मी तलवार तुझ्या मानेवर पकडली आहे तुला भीती वाटते का? ती म्हणाली की मला काहीच भीती वाटत नाही, त्यावर पतीने विचारले का? तेव्हा पत्नीने उत्तर दिले की मला माहित आहे, की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही मला मारणार नाहीत. तेव्हा पती म्हणाला तुझ्या प्रश्नाचे उत्तर तेच आहे की देवाचे माझ्यावर फार प्रेम आहे, आणि देव मला ह्या नदीत बुडून मरू देणार नाही.

आपल्या दररोजच्या जीवनात प्रेम आणि विश्वास फार महत्त्वाचा आहे. देवाचे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. देवाचे प्रेम निस्वार्थी आहे. देवाच्या प्रेमात अटी काहीच नाही. देवाचे खरं प्रेम काय आहे हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर रित्या पटवून दिले आहे. आपण योहानाच्या शुभवर्तमानात ऐकतो, की देवाने जगावर इतकी प्रीती केली की देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला (योहान ३:१६). ह्या उलट माणसाचे प्रेम स्वार्थी आहे. माणसाच्या प्रेमात आपल्याला भरपूर अटी आढळतात. आजचे शुभवर्तमान अगदी उत्तम प्रकारे आपल्याला देवाच्या प्रेमाविषयी सांगत आहे. प्रभू येशू म्हणतो, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच प्रीती मी तुमच्यावर करत आहे. प्रभू म्हणतो माझ्या प्रेमात राहा. जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही सुद्धा सगळ्यांवर प्रीती करा. कारण तो इतरांवर प्रेम करतो तो देवाला ओळखतो (१ योहान ४:७). कारण देव प्रेम आहे. ह्या प्रेमा खातीर ती व्यक्ती स्वतःच्या जीवाची परवा न करता निस्वार्थीपणे इतरांसाठी आपला प्राण द्यायला देखील तयार होते. (योहान १५:१३).

सीसीकर संत फ्रान्सिस नेहमी म्हणत असत, "जो प्रेम आहे त्याच्यावर प्रेम केले नाही". जोपर्यंत आपण येशूने दिलेली प्रेमाची आज्ञा पाळणार नाही तोपर्यंत आपण  शेजाऱ्यांवर प्रेम करायला सुरुवात करूच शकत नाही. पवित्र त्रैक्य हे आपणासमोर प्रेमाने ओसंडून वाहणारे प्रतीक आहे आणि तेच आपला आदर्श आहे, कारण देवच प्रेमाचा उगम आहे.

संत मदर तेरेजा म्हणतात, तुम्ही किती कार्य करता हे महत्त्वाचं नाही पण ते करण्यात किती प्रेम दाखवता ह्याला  महत्त्व आहे. ह्या विज्ञानाच्या काळात आपणाला भरपूर गोष्टीचा विसर पडला आहे. संत पौल म्हणतात, मी जर देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असतो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी आवाज करणारी थाळी आणि झणझणणारी झांज आहे. (१ करीथ १३:१-२) प्रेमाशिवाय मनुष्याचे  जीवन नरक समान आहे. खरं प्रेम म्हणजे यातनांना  सामोरे जाणे. स्वतःचा त्याग करणे, स्वतः पडून दुसऱ्यांना उठवणे ह्यालाच प्रेम म्हणतात. प्रत्येकाला प्रेम हवं आहे पण प्रेम द्यायला मात्र थोडेच असतात.

प्रभू येशूख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आपण देवावर, सर्वांवर प्रीती करूया ख्रिस्ताच्या प्रेमाची दयेची शिकवण पुढे नेऊया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू एकमेकांवर प्रीती करण्यास आम्हास सहाय्य कर.

१) सर्व समर्थ दयाळू पित्या आज आम्ही आमचे पोप फ्रान्सिस सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्म-बंधु व धर्म-भगिनी हयाच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांनी आपल्या कार्याद्वारे देवाच्या प्रेमाची शिकवण सगळ्यांना द्यावी म्हणून प्रार्थना करूया.

२) सर्व समर्थ प्रेमळ परमेश्वरा आम्ही अश्यासाठी प्रार्थना करतो, ज्यांना प्रेम मिळत नाही आणि जे दयेचे व प्रेमाचे भुकेलेले आहेत त्यांना तुझे व इतरांचे प्रेम लाभू दे. म्हणून प्रार्थना करूया.

३) हे प्रेमळ परमेश्वरा सर्व युवकांसाठी प्रार्थना करतो, त्यांना खरं प्रेम काय असतं ते समजावे व त्यांनी योग्य ते प्रेम करावे म्हणून त्यांना आशीर्वादित कर. म्हणून प्रार्थना करूया.

४ हे दयाळू परमेश्वरा आम्ही जे आजारी आहेत, अडचणीत आहेत, दुःखात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या आजारातून दुःखातून मुक्त कर त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव येऊ दे. म्हणून प्रार्थना करूया.

५) वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना. 


No comments:

Post a Comment