Thursday, 31 October 2024

 Reflection for 31st Sunday in Ordinary Time (03/11/2024) By Br. Jostin Pereira

सामान्य काळातील एकतिसावा रविवार

दिनांक: ०३/११/२०२४

पहिले वाचन - अनुवाद ६: २-६

दुसरे वाचन – इब्री ७:२३-२८

शुभवर्तमान- मार्क- १२: २८-३४



प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील एकतीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास देवावर व शेजाऱ्यावर प्रीती करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. मोशे हा एक महान नेता होता. त्याने इस्त्रायली लोकांची गुलामगिरीतून सुटका करून त्यांना वचन दिलेल्या जमिनीत आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मोशेने दिर्घ काळापर्यंत नेतृत्व करून देवापासून दूर गेलेल्या लोकांना प्रभूच्या जवळ आणले. तसेच आजच्या पहिल्या वाचनात मोशे लोकांना आपल्या पूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करण्यास आवाहन करत आहे.

        प्रभू येशू जो आपला मेंढपाळ बनून ह्या जगात आला; तो आपल्याला प्रीतीची - आज्ञा सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करण्यास आमंत्रित करीत आहे. जर आपण हे आचारणात आणले तर आपण देवाच्या राज्यापासून दूर नाही आहोत. प्रभू येशू हा आपला युगानुयुग राहणारा याजक आहे. त्याने प्रकट केलेल्या देवाच्या राज्यावर व प्रीतीच्या आज्ञेवर आपण विश्वास ठेवतो का

        आपण देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करतो का? ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपले ह्रदय हे प्रेमाने  भरावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

प्रेमाचे नाते

    ओढ म्हणजे काय ते जीव लागल्याशिवाय समजत नाही, विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही आणि प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

    आपण प्रेमाविषयी भरपूर वाचतो, भरपूर ऐकतो आणि भरपूर बोलतो; पण प्रेम काय आहे हे समजण्यासाठी आपण स्वतः इतरांवर प्रेम केल पाहिजे. बायबल सांगतं, ‘देव प्रीती आहे’ (१ योहान ४:८). खरोखर देव प्रीती आहे, कारण देवाने पहिलं प्रेम संपूर्ण मानवजातीवर केलं. म्हणून प्रेम काय आहे हे आपण देवाकडून शिकतो. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आणि त्याचे प्रेम प्रकट केले. 

    जी व्यक्ती आपल्याला सांगते, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’ तीच व्यक्ती काही काळानंतर आपल मन दुःखावत असते; परंतु परमेश्वर आपलं मन दुःखावत नाही. आपण कितीही पापे करून त्याच्यापासून दूर गेलो, तरीही तो आपल्यावर प्रेम करतो. आपल्यावर देवाचे भरपूर प्रेम आहे म्हणून आपल्या तारणासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला (योहान ३:१६).

    शुभवर्तमानात आपण वाचतो की, नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूकडे येऊन विचारतो, “सर्व आज्ञांत महत्वाची आणि पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अत:करणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”

    ह्याचा अर्थ असा की, जो म्हणतो, ‘मी देवावर प्रीती करतो’, त्याने इतरांवरही प्रीती केली पाहिजे. जो देवावर प्रीती करतो, त्याच्या मनात कसलीही भेदभावना असू शकत नाही. तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. त्याच्या नजरेत कोणी उच्च नाही किंवा नीच नाही. त्याचं सर्वांवर सारखच प्रेम असतं. जो देवावर प्रीती करतो, तो इतरांवरही प्रीती करतो. ह्याच महत्त्वाच कारण असं की, परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव अश्या व्यक्तीला झाली असते.

    एका मुलाखतीत मदर तेरेसा यांना एकदा विचारण्यात आले होते, "प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे तुम्ही सांगू शकता का?" तिने लगेच उत्तर दिले, “प्रेम देण्यात आहे (Love is Giving). देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला मुलगा दिला. येशूने जगावर खूप प्रेम केले, तुझ्यावर प्रेम केले, माझ्यावर इतके प्रेम केले की त्याने आपले जीवन दिले. आणि त्याने जसे प्रेम केले तसे आपण प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून खरे प्रेम म्हणजे दुखणे होईपर्यंत देणे आणि देणे होय.”

    प्रभू येशूने लोकांना सांगितले होते, “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या.” (मत्तय २२:१५-२२, लूक २०:२०-२६) कोणत्याही देशातील नागरिकांना त्या देशाचे कायदे पाळावे लागतात. त्यांनी कायद्यानुसार अपेक्षित कर भरले नाहीत तर त्यांच्यावर दंड लादला जातो किंवा त्यांना शिक्षा भोगावी लागते. लोकांकडून मिळालेल्या कराचा सरकार त्यांना हिशोब देते, त्या पैशाचा वापर कसा केला गेला ह्याची त्यांना माहिती देते. लोकांच्याच पैशातून देशाचा कारभार चालवला जातो.

    पण देव आपल्यावर कर लादत नाही, किंवा आपली थकबाकी तो वसूल करत नाही.  आपल्या पैशातून तो हे जग चालवत नाही. देवाचे आणि आपले नाते हे प्रेमाचे नाते आहे आणि ते पैशावर आधारलेले नाही. त्यात देवाणघेवाण नाही, हिशोब नाही.

    प्रेमावर आधारलेल्या कोणत्याही नात्यात हिशोब ठेवला जात नाही. पतिपत्नी एकमेकांना आनंद आणि सुख देण्यासाठी जे काही करतात त्याच्यामागे काही स्वार्थ असतो का? मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना जो खर्च करावा लागतो त्यावर मुलांकडून ते व्याज आकारतात का? वृद्ध आईबापांना आधार देणारी मुले त्यांना बिल सादर करतात का?

    देवाचे आणि आपले नातेही अशाच प्रकारचे आहे. खरे तर देव आपल्याकडून काहीच मागत नाही, आपल्याकडून त्याला कसलीही अपेक्षा नाही. देवाने आपल्यावर नेहमीच प्रीती केली आहे आणि आपणही त्याच्यावर तशीच प्रीती करावी एवढीच त्याची इच्छा आहे. आणि ती आपण पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने, आणि पूर्ण बुद्धीने करायची आहे (लूक १०:२५-३७).

    आयुष्य जगण्याद्वारे समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. त्याचप्रमाणे प्रेम हे केल्यावर समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. म्हणून जसं देवावर प्रेम करीतो, तसचं इतरांवरही प्रेम करू या.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व भाविकांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत असताना देवाचे कार्य अविरीतपणे करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपले जीवन जगत असताना देवावर व आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करावे म्हणून प्रार्थना करूया.

३) आजच्या ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले जीवन नष्ट करत आहेत. अश्या तरुणांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या समाजात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत अश्या सर्वांना प्रभूचा आशिर्वाद मिळावा व आजार सहन करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.


Wednesday, 23 October 2024

 Reflection for 30th Sunday in Ordinary Time (27/10/2024) By Br. Reon Andrades

सामान्य काळातील तिसावा रविवार

दिनांक: २७/१०/२०२४

पहिले वाचन: यिर्मया ३१: ७-९

दुसरे वाचन: इब्री ५: १-६

शुभवर्तमान: मार्क १०: ४६-५२


 
प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार  साजरा करत आहोत. आजची वाचने आपणास विश्वासाचे जीवन जगण्यास पाचारण करत आहेत. 

       आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून  येते की, देव आपल्या बरोबर आहे त्याला आपली काळजी आहे. प्रत्येक क्षणी तो आपल्याबरोबर आहे व त्याला आपली काळजी आहे म्हणून तो आपणास आशेचे जीवन जगण्यास बोलावीत आहे.     

         दुसऱ्या वाचनात आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताला आपला मानवी दुर्बलपणा माहित आहे, कारण त्याने स्वतः तो अनुभवलेला आहे. ह्यास्तव तो देवापुढे मानवजातीला रास्तपणे सादर करण्यास सक्षम आहे ह्याची प्रचीती आपणास येते. 

        शुभवर्तमानामध्ये बर्तीमयचा विश्वास, त्याची चिकाटी व येशूवर असलेली खात्री ह्याचे दर्शन आपणास मिळत आहे.

        आपणही ख्रिस्ती विश्वासात वाढावेत व देवाचा अनुभव आपणास पावलो-पावली यावा. तसेच आपण आशेचे जीवन जगावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

        आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची वाचने आपणास देवावर विश्वास ठेवण्यास पाचारण करत आहेत.

        आजच्या पहिल्या वाचानात आपण पाहतो की, देवाला लोकांची काळजी आहे. तो आपल्या लोकांपासून दूर नाही तर प्रत्येक क्षणी, तो त्यांच्या सुख-दु:खात त्याचा सहभाग घोषित करत असतो. हद्द्पारीत व गुलामगिरीच्या अवस्थेत, देव आपल्या लोकांना यिर्मया संदेष्ट्याद्वारे, आशा बाळगण्यास सांगत आहे. देव फक्त चांगल्या लोकांनाच नव्हे, तर लंगडे, लुळे, अपंग, गर्भवती बायकाआंधळे सर्वांना आपल्या मायदेशात परत घेऊन येणार आहे. देव त्यांचे नेतृत्व करणार आहे व त्यांना चांगल्या वाटेने चालवणार आहे. जेणेकरून ते पडणार आणि त्यांना लागणार नाही. देव स्वतःला इस्रायेलचा  पिता घोषित करत आहे, म्हणजेच देव दूर नसून त्यांच्या बरोबर आहे. त्याला सर्व लोकांची काळजी आहे, ज्याप्रमाणे एका पित्याला आपली सर्व मुलं प्रिय असतात मग ति कशीही असो.

        दुसऱ्या वाचनात आपणाला कळून येत कि, येशू हाच एकमेव महायाजक आहे. त्याने आपल्या मरणाने सार्वकालिक एकमेव बळी अर्पण केला आहे. हा महायाजक आपणापासून दूर नसून तो, आपल्यासारखा आहे. त्याला आपल्या कमकुवतपणाचे जाणीव आहे. मानवाचा अशक्तपणा तो जाणतो, कारण त्याने स्वतः तो अनुभवलेला आहे.  तो मानवाला देवापुढे योग्यप्रकारे  सादर करण्याची योग्यता, त्याच्याकडे आहे.

आज शुभवर्तमानात आपण तीन प्रकारची माणसं पाहतो,

शिष्य: येशूच्या बरोबर त्यांना चालण्याची व शिष्य म्हणून घेण्याचे भाग्य त्यांना लाभले, परंतु ते त्या अंध भिकाऱ्याला पाहू शकले नाही. त्यांची वर्तणूक जणू काही बेपर्वाहीची होती. त्यांनी ना सकारात्मक नाही नकारात्मक भूमिका बजावली असती तर मार्क या शुभवर्तमानकरने नमूद तसे नमूद केले असते.

        आपणही अनेक वेळेला बेपर्वाही जीवन जगात असतो. आपल्या शेजार्याला आपली गरज आहे कि नाही ह्याची आपणाला चिंता नसते. आपण आपल्या जीवनात व्यस्थ असतो. आम्ही ख्रिस्ती आहोत हे आम्हाला पुरे, इतरांपर्यंत ख्रिस्त व त्याची शुभवार्ता पोहचविणे आमची जबाबदारी नाही, अशी आपली परिस्थिती असते.

लोकसमुदाय: लोकसमुदाय वाऱ्यासारखा आपली दिशा बदलत आहे. काही क्षणापूर्वी तो अंध भिकाऱ्याला गप्प राहण्यास धमकावले, परंतु येशूने त्याला बोलवताच त्याच्या प्रती त्यांचा व्यवहार बदलतो. ते त्याला धीर धरून उठवतात.

        आपणही लोक्सामुदायासारखे वागत असतो. कोणी आपणास सत्कृत्ये करताना पाहावे व आपल्याविषयी चांगले बोलावे म्हणून आपण कार्य करत असतो. हे कार्य आपल्या हृदयातून होत नसतं. जर आपल्यला पाहायला कोणी नसेल तर आपण ते सत्कार्य करत नाही. ज्या दिशेने आपली वाहवा होईल त्या दिशेने आपण तोंड फिरवत असतो.

बर्तीमय: अंध भिकारी, शारीरिकरित्या अंध होता परंतु अध्यात्मिकरित्या दूरदृष्टी बाळगणारा होता. आज आपणास पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. परंतु बर्तीमय न पाहता, फक्त ऐकून विश्वास ठेवणारा होता. लोकसमुदायने धमकावून देखिल तो गप्प बसला नाही तर उलट मोठ्याने ओरडत होता. ह्यावरून त्याची चिकाटी आपणास दिसून येते. पुढे जेव्हा त्याला येशू बोलावतो तेव्हा, तो आपले भिकाऱ्याची वस्त्रे टाकून येशूकडे येतो. ह्याचा अर्थ हा  त्याला पूर्णपणे खात्री होती की, तो बारा होणार आहे व या पुढे त्याला त्या वस्त्रांची गरज भासणार नाही.

        आपण ह्या बर्तीमय प्रमाणे, विश्वासाचे, चिकाटीचे व खात्रीचे जीवन जगतो का? विश्वास त्या बर्तीमय सारखा आहे का? आपण प्रार्थना करतो पूर्ण होणार ह्याची आपणास खात्री असते का? हा प्रश्न आपण आज स्वतःला विचारूया.

        आज आपण आपली पडताळणी करूया की, मी कोणत्या गटात आहे.? माझे जीवन व वागणे त्या शिष्या-प्रमाणे, लोकसमुदाया-प्रमाणे अथवा बर्तीमय-प्रमाणे जगत आहे. आपणास चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास विश्वासाची देणगी मिळावी म्हणून आज आपण आपल्यासाठी व आपल्या बंधू-भगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व भाविकांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत असताना देवाचे कार्य अविरीतपणे करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपले जीवन जगत असताना देवावर व आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करावे म्हणून प्रार्थना करूया.

३) आजच्या ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले जीवन नष्ट करत आहेत. अश्या तरुणांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या समाजात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत अश्या सर्वांना प्रभूचा आशिर्वाद मिळावा व आजार सहन करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.



Thursday, 17 October 2024

Reflection for 29th Sunday in Ordinary Time (World Mission Sunday) (20/10/2024) By Br. Trimbak Pardhi

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार (जागतिक मिशन रविवार)

दिनांक २०-१०-२०२४

पहिले वाचन :- यशया ५३:१०-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस ४:१४-१६

शुभवर्तमान :- मार्क १०:३५ -४५

 प्रस्तावना

        आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार आणि मिशन रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला मिशन कार्य करण्यास आवाहन करीत आहे. सर्वसाधारणपणे मिशन हा शब्द  “मिस्सीओ” या लॅटिन शब्दातून आला आहे. ज्याचा अर्थ “पाठविणे.” असा होतो.

        आजच्या पहिल्या वाचनात, "दुःख सहन करणारा सेवक" यावर आहे, ज्याच्या दुःखामुळे सर्वांचे तारण होते. हे ख्रिस्ताचे आगमन दर्शवते, ज्याने आपले जीवन आपल्या लोकांसाठी दिले. परमेश्वराच्या इच्छेने त्याच्या दुःख सहनाद्वारे, संपूर्ण मानवजातीचे तारण केले जाईल.

        आजच्या दुसऱ्या वाचनात, येशू हा आपला महान याजक म्हणून संबोधिले आहे. त्याने मानवी रूप घेतले आणि  सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून तो गेला, म्हणून, आपण आत्मविश्वासाने देवाच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो आणि त्याच्या कृपेची आणि दयेची याचना करू शकतो.

        आजच्या शुभवार्तमानात सांगितले आहे कि, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे.  प्रभू येशूने जशी लोकांची सेवा केली तशीच आपल्याला तो आज मिशन रविवार साजरा करत असताना, आपणाला मिशन सेवाकार्य करण्यास आमंत्रण देत आहे. आपले मिशन म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेमाचे साक्षीदार होणे. निराश असलेल्या लोकांना आशा देणे आणि ज्या लोकांना देवाची ओळख नाही अशा लोकांना देवाचा संदेश सांगणे. मिशन कार्य केवळ दुसऱ्या देशामध्येच नाही तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कार्यस्थळी, आपल्या समाजात सुरू करूया.

मनन चिंतन

        प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण मिशन रविवार साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला चर्चची मूलभूत ओळख म्हणजेच एक मिशनरी होण्याची आठवण करून देतो. येशूने आपल्या अनुयायांना दिलेली ती जबाबदारी आहे. “जगभर जा आणि सृष्टीतील प्रत्येकाला सुवर्ता सांगा” (मार्क १६:१५) हा आदेश केवळ काहींनाच नव्हे, तर प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला दिलेला आहे.

        पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कार्यकाळात मिशनरी देऊळमातेची सुधारणा करण्यावर भर दिला आहे. सिनडच्या माध्यमातून देऊळ मातेमध्ये मिशनरी परिवर्तन करून सुधारणा करण्याची पोप फ्रान्सिस यांची तळमळ आपण पाहत आहोत. यासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक आहे. मिशनरी असणे नेहमी सोपे नसते, त्यासाठी त्याग, धैर्य आणि चिकाटी लागते. शतकानूशतके अनेकांनी सुवार्तेसाठी आपले जीवन अर्पण केले आहे. आज आपण त्या मिशनऱ्यांचा सन्मान करतो आणि त्याचं स्मरण करतो. त्यांनी आपल्या घरी असलेल्या सुख सोयीचा त्याग केला, अनेक संकटे सहन केली आणि येशूचा संदेश जगभर पसरवला पोहोचवला.

        प्रिय भाविकांनो मिशनमध्ये माझी भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मिशन म्हणजे काय हे माहीत असले पाहिजे. बहुतेक भाविकांना मिशनचा अर्थ म्हणजे मुक्तीचे  धर्मशास्त्र असा वाटतो. परंतु याचा अर्थ असा की भुकेल्यांना अन्न देणे, बेघरांना निवास देणे, पर्यावरणाची काळजी घेणे असा होतो. ख्रिस्ताचा महान आदेश आपण मत्तयलिखित शुभवर्तमानात वाचतो, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा दया आणि जे काही मी तुम्हाला शिकवले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा आणि पहा काळाच्या शेवटपर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहील.” (मत्तय २८:१९) 

        दुर्दैवाने ख्रिस्ताच्या महान आदेशाला आधुनिक तत्त्वांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले, थट्टा केली आणि तो आदेश फटाळला. आजही काही धर्म पंडित म्हणतात की, बाप्तिस्मा करण्याची गरज नाही, ते निष्कर्ष काढतात की एक छान, ,दयाळू, सामाजिक  न्यायी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला ख्रिश्चन असण्याची किंवा देवावर विश्वास ठेवण्याची गरज नाही आणि त्यामुळे आज देऊळे रिकामी होत आहेत.

        पोप फ्रान्सीस त्यांच्या २०२४ च्या जागतिक मिशन रविवारच्या संदेशात म्हणतात की, चर्चचे ध्येय सर्व लोकांसाठी निर्देशित केले आहे; आणि प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे. मिशन म्हणजे सर्व पुरुष आणि स्त्रियांसाठी नेहमी अथक बाहेर जाणे, त्यांना देवाला भेटण्यासाठी आमंत्रित करणे. ज्याप्रमाणे येशू चांगला मेंढपाळ आणि पित्याचा संदेशवाहक हरवलेल्या मेंढरांच्या शोधाला गेला त्याप्रमाणे बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी बाहेर पडले पाहिजे.

        प्रिय बंधूंनो व भगिनींनो, मिशन रविवार साजरा करताना लक्षात ठेवा की, चर्चचे मिशन केवळ काहीसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. आपण हे आव्हान उत्साहाने स्वीकारूया आणि हे जाणून घेऊया की, देव आपल्या छोट्या प्रयत्नाद्वारे मोठी कामे करतो. चला, आपल्या दैनंदिन जीवनात मिशन जिवंत करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांनी देवाचा संदेश अद्याप ऐकलेला नाहीत्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करू व प्रार्थना करू की, आपल्याला खऱ्या मिशनऱ्यासारखे बनवण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल आणि मिशनरी उत्साहाने भरले जाईल, जगभर येशू ख्रिस्ताची सुवर्ता पसरण्यासाठी.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 10 October 2024

 Reflection for 28th Sunday in Ordinary Time (13/10/2024) By Dn. Rackson Dinis


सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार

दिनांक १३-१०-२०२४

पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३

शुभवर्तमान :- मार्क १०:१७ -३०

प्रस्तावना

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार साजरा करीत आहोत, आजची उपासना आपल्याला दैवी ज्ञान याचे महत्त्व सांगत आहे. दैवी ज्ञान हे देवाने दिलेले दान आहे. हे दैवी ज्ञान विश्वाची निर्मिती होण्याअगोदर ते अस्तित्वात आले होते. ह्या विश्वाची निर्मिती देवाच्या दैवी ज्ञानाने झालेली आहे.

        ज्ञान हे अमूल्य रत्न आहे, जगातील सर्व संपत्ती ही तात्पुरती आहे, परंतु दैवी ज्ञान हे अनंत काळाचे आहे. दैवी ज्ञान ही खरी संपत्ती आहे. दैवी ज्ञान आपल्याला मिळाले तर आपोआप जगाची सर्व काही संपत्ती आपल्या हाती येते. म्हणूनच आपण जीवनात प्राधान्य दैवी ज्ञानाला दिले पाहिजे, आणि त्याचा खऱ्या मनाने शोध घेतला पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टींचा उगम दैवी ज्ञानाकडून होत असतो . मानवासाठी दैवी ज्ञान हा एक अक्षय खजिना आहे. ह्या खजिन्याचा लाभ होणाऱ्यांना देवाचे मित्रत्व लाभते.

    आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण खऱ्या मनाने व अंतकरणाने ह्या दैवी ज्ञानाचा शोध घेण्यासाठी आणि त्या मार्गावर चालण्यासाठी आशीर्वाद मागूया.

मनन चिंतन

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला "दैवी ज्ञानाबद्दल" उपदेश करीत आहे. (दैवी ज्ञान) हा शब्द बायबल मध्ये एकूण २३० पेक्षा अधिक जास्त वेळा वापरला गेला आहे. दैवी ज्ञानाला हिब्री भाषेमध्ये "होकमा" असे म्हणतात, याचा अर्थ म्हणजे कौशल्य ज्याला इंग्लिश मध्ये skills म्हणतात.

    देवाने ही पृथ्वी, जलाशय, आकाश, अंतराळ, समुद्र, डोंगर, नद्या, झाडे, निर्माण करण्या अगोदर, सर्वप्रथम दैवी ज्ञानाची स्थापना केली(नीतीसूत्रे ८ :२३). ह्या वचनावरून आपल्याला समजून येते की "दैवी ज्ञान" किती महत्त्वाचे आहे. हे दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मानवाला देवाच्या संगतीत राहण्यास लागते. कारण परमेश्वराचे भय म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. हे भय म्हणजेच देवाचा आदर करणे, त्याच्या आज्ञा पाळणे, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे, त्याच्याबरोबर बोलने, त्याच्या सहवासात राहणे, असे केल्यानेच आपल्याला देवाचे दान म्हणजे दैवी ज्ञान प्राप्त होते.

     दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची गरज लागते असं नाही, तर ते ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात व कामात सुद्धा मिळते. ह्यासाठी फक्त एक गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे परमेश्वराचा धावा आणि प्रार्थना.

  आजचे पहिले वाचन हे भरपूर सुंदररित्या ज्ञानाचे महत्त्व आणि देवाच्या शहाणपणाबद्दल सांगत आहे. जगातील सर्व संपत्ती, सोने, चांदी, शक्ती, पैसा, सौंदर्य ह्या सर्व गोष्टीमध्ये, अमूल्य रत्न म्हणजेच दैवी ज्ञान होय. कारण जगातील सर्व संपत्ती, सर्व शक्ती, ह्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे, सोने ज्ञानापुढे वाळू सारखे आहे, तर चांदी केवळ चीखलासारखी आहे. परंतु, देवाचे शहाणपण अनंत आहे. जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाकडे नेणारे शहाणपण हेच खरी संपत्ती आहे. जर का आपल्याला दैवी ज्ञान मिळाले, तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील, कारण ह्या सर्व गोष्टींचा उगम दैवी ज्ञानाकडून होतो. परंतु आजच्या युगात आपण न्याहाळून पाहिले की आपल्याला दिसून येते आजची पिढी ही धनसंपत्तीच्या मागे व "डिजिटल जग" ह्यामध्ये बुडून गेलेली दिसून येते.

   आजच्या दुसऱ्या वाचनात आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे दुधारी तलवारीपेक्षा तीष्ण आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे जीवन देणारे शब्द आहेत. हे शब्द दैवी ज्ञानासारखे आहेत. हे ज्ञान आपल्याला सर्वकालीन जीवनाची वाट दाखवत असते.

      तर आजच्या शुभवर्तमानमध्ये आपण पाहतो एक श्रीमंत तरुण व्यक्ती प्रभू समोर येते आणि म्हणते, हे प्रभू येशू ख्रिस्ता मी देवाच्या सर्व आज्ञा पाळून आलेलो आहे तर आता मी सार्वकालिक जीवनप्राप्तीसाठी काय करू. प्रभू येशू म्हणतो जे काही तुझ्याकडे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द ऐकून तो श्रीमंत माणूस कष्टी होऊन निघून गेला.

      माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर का आपल्याला दैवी ज्ञान प्राप्त करायचे असेल तर देवाच्या शब्दाचे पालन करावे लागेल. आज जर देव छोट्या मुलावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, बाळा तुला काय पाहिजे आणि मुलाचे उत्तर असेल, मला मोबाईल दे. जर देव तरुणांवरती प्रसन्न झाला तर तरुण म्हणेल, देवा मला इंजिनीयरचा नाहीतर कुठलातरी एक चांगला जॉब दे. जर का देव लग्न झालेल्या व्यक्तीवर ती प्रसन्न झाला तर ते म्हणतील देवा आम्हाला आमच्या कामात धनसंपत्ती व पैसा दे. आणि जर का देव वयस्कर लोकांवरती प्रसन्न झाला तर ते म्हणतील देवा मला चांगले आरोग्य आणि शांती दे. ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की दैवी ज्ञान मागणारे ह्या जगात भरपूर कमी आहेत.

     माझ्या प्रिय मित्रांनो, जीवनामध्ये धनसंपत्ती पैसा हे महत्त्वाचे असते परंतु आपण त्या धनसंपत्ती पासून जास्त आकर्षिले न जावे, कारण आज कमावलेला पैसा दुसऱ्या दिवशी तो आपल्या हातातून निघून जाणार आहे, परंतु दैवी ज्ञान हे आपण जर प्राप्त केले त्याच्या सहवासात राहिलो, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुन्हा लाभणार, आणि त्याचबरोबर आपण देवाच्या सहवासात राहणार. कारण ह्या धरतीची आकाशाची पृथ्वीची निर्मिती करण्याअगोदर दैवी ज्ञान देवाबरोबर उपस्थित होते. धनसंपत्ती पैसा सोने हे सर्व काही दैवी ज्ञानानंतर आलेले आहेत, म्हणूनच जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे संपत्ती म्हणजे दैवी ज्ञान. हे दैवी ज्ञान शिक्षित लोकांनाच मिळते, असे नाही,तर ते अशिक्षित लोकांना सुद्धा मिळू शकते, मात्र जीवनामध्ये त्या दैवी ज्ञानाचा खऱ्या मनाने व अंत:करणाने शोध केला पाहिजे. आपण कसे जगावे, काय करावे, या सगळ्यात देवाचे शहाणपण आपल्याला मार्गदर्शन करते.

     एका गरीब गावात एक माणूस राहत असे. त्याच्याकडे काहीच नव्हते. परंतु त्याला शहाणपणाची आवड होती. तो नेहमी शिकत असे, आणि देवाच्या मार्गांचा अभ्यास करत असे. त्याच्यावर लोक हसत असत. एकदा त्याच्या गावात एक श्रीमंत व्यापारी आला. तो व्यापारी मोठ्या गर्वाने सांगत होता की त्याच्याकडे किती संपत्ती आहे. तेव्हा या गरीब माणसाने त्याला विचारले, "तुझ्या संपत्तीत देवाचे शहाणपण आहे का?" व्यापाऱ्याला उत्तर देता आले नाही. तेव्हा त्या माणसाने सांगितले, "तू कितीही श्रीमंत असलास, परंतु देवाचे शहाणपण नसेल तर तू खरा गरीब आहेस."

    या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रीमंतीपेक्षा शहाणपण अधिक महत्त्वाचे आहे. देवाच्या शहाणपणाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट शाश्वत नसते.

    आजच्या उपासनेत सहभाग घेत असताना देवाकडे हीच विनंती करूया कि हे देवा तुझ्या दैवी भांडारातून आम्हाला दैवी ज्ञानाच्या कृपेचा वर्षाव कर म्हणजे आम्हला सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेता येईल.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3.  जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

४. जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.