Reflection for 28th Sunday in Ordinary Time (13/10/2024) By Dn. Rackson Dinis
सामान्य काळातील अठ्ठावीसावा
रविवार
दिनांक १३-१०-२०२४
पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११
दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :-
४:१२-१३
शुभवर्तमान :- मार्क १०:१७ -३०
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी
जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील अठ्ठावीसावा
रविवार साजरा करीत आहोत, आजची उपासना आपल्याला दैवी ज्ञान याचे
महत्त्व सांगत आहे. दैवी ज्ञान हे देवाने दिलेले दान आहे. हे दैवी ज्ञान विश्वाची
निर्मिती होण्याअगोदर ते अस्तित्वात आले होते. ह्या विश्वाची निर्मिती देवाच्या
दैवी ज्ञानाने झालेली आहे.
ज्ञान
हे अमूल्य रत्न आहे, जगातील सर्व संपत्ती ही तात्पुरती आहे, परंतु दैवी ज्ञान हे अनंत काळाचे आहे. दैवी ज्ञान ही
खरी संपत्ती आहे. दैवी ज्ञान आपल्याला मिळाले तर आपोआप जगाची सर्व काही संपत्ती
आपल्या हाती येते. म्हणूनच आपण जीवनात प्राधान्य दैवी ज्ञानाला दिले पाहिजे, आणि त्याचा खऱ्या मनाने शोध घेतला पाहिजे. कारण ह्या
सर्व गोष्टींचा उगम दैवी ज्ञानाकडून होत असतो . मानवासाठी दैवी ज्ञान हा एक अक्षय
खजिना आहे. ह्या खजिन्याचा लाभ होणाऱ्यांना देवाचे मित्रत्व लाभते.
आजच्या
ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण खऱ्या मनाने व अंतकरणाने ह्या दैवी ज्ञानाचा शोध
घेण्यासाठी आणि त्या मार्गावर चालण्यासाठी आशीर्वाद मागूया.
मनन चिंतन
ख्रिस्ताठायी
जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला "दैवी
ज्ञानाबद्दल" उपदेश करीत आहे. (दैवी ज्ञान) हा शब्द बायबल मध्ये एकूण २३०
पेक्षा अधिक जास्त वेळा वापरला गेला आहे. दैवी ज्ञानाला हिब्री भाषेमध्ये
"होकमा" असे म्हणतात, याचा अर्थ म्हणजे कौशल्य ज्याला इंग्लिश मध्ये skills म्हणतात.
देवाने
ही पृथ्वी, जलाशय, आकाश, अंतराळ, समुद्र, डोंगर, नद्या, झाडे, निर्माण करण्या अगोदर, सर्वप्रथम दैवी ज्ञानाची स्थापना केली(नीतीसूत्रे ८
:२३). ह्या वचनावरून आपल्याला समजून येते की "दैवी ज्ञान" किती
महत्त्वाचे आहे. हे दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मानवाला देवाच्या
संगतीत राहण्यास लागते. कारण परमेश्वराचे भय म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. हे भय
म्हणजेच देवाचा आदर करणे, त्याच्या आज्ञा पाळणे, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे, त्याच्याबरोबर बोलने, त्याच्या सहवासात राहणे, असे केल्यानेच आपल्याला देवाचे दान म्हणजे दैवी ज्ञान
प्राप्त होते.
दैवी
ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची गरज लागते असं नाही, तर ते ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात व कामात सुद्धा
मिळते. ह्यासाठी फक्त एक गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे परमेश्वराचा धावा आणि
प्रार्थना.
आजचे
पहिले वाचन हे भरपूर सुंदररित्या ज्ञानाचे महत्त्व आणि देवाच्या शहाणपणाबद्दल
सांगत आहे. जगातील सर्व संपत्ती, सोने, चांदी, शक्ती, पैसा, सौंदर्य ह्या सर्व गोष्टीमध्ये, अमूल्य रत्न म्हणजेच दैवी ज्ञान होय. कारण जगातील
सर्व संपत्ती, सर्व शक्ती, ह्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. ज्ञान हे सर्वात
श्रेष्ठ आहे, सोने ज्ञानापुढे वाळू सारखे आहे, तर चांदी केवळ चीखलासारखी आहे. परंतु, देवाचे शहाणपण अनंत आहे. जीवनाच्या खऱ्या
उद्दिष्टाकडे नेणारे शहाणपण हेच खरी संपत्ती आहे. जर का आपल्याला दैवी ज्ञान
मिळाले, तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला आपोआप
मिळतील, कारण ह्या सर्व गोष्टींचा उगम दैवी
ज्ञानाकडून होतो. परंतु आजच्या युगात आपण न्याहाळून पाहिले की आपल्याला दिसून येते
आजची पिढी ही धनसंपत्तीच्या मागे व "डिजिटल जग" ह्यामध्ये बुडून गेलेली
दिसून येते.
आजच्या
दुसऱ्या वाचनात आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे दुधारी तलवारीपेक्षा
तीष्ण आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द हे जीवन देणारे शब्द आहेत. हे शब्द दैवी
ज्ञानासारखे आहेत. हे ज्ञान आपल्याला सर्वकालीन जीवनाची वाट दाखवत असते.
तर
आजच्या शुभवर्तमानमध्ये आपण पाहतो एक श्रीमंत तरुण व्यक्ती प्रभू समोर येते आणि
म्हणते, हे प्रभू येशू ख्रिस्ता मी देवाच्या सर्व
आज्ञा पाळून आलेलो आहे तर आता मी सार्वकालिक जीवनप्राप्तीसाठी काय करू. प्रभू येशू
म्हणतो जे काही तुझ्याकडे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला
स्वर्गात संपत्ती मिळेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द ऐकून तो श्रीमंत
माणूस कष्टी होऊन निघून गेला.
माझ्या
प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर का आपल्याला दैवी ज्ञान प्राप्त
करायचे असेल तर देवाच्या शब्दाचे पालन करावे लागेल. आज जर देव छोट्या मुलावर प्रसन्न
झाला आणि म्हणाला, बाळा तुला काय पाहिजे आणि मुलाचे उत्तर
असेल, मला मोबाईल दे. जर देव तरुणांवरती
प्रसन्न झाला तर तरुण म्हणेल, देवा मला इंजिनीयरचा नाहीतर कुठलातरी एक चांगला जॉब दे. जर का देव लग्न
झालेल्या व्यक्तीवर ती प्रसन्न झाला तर ते म्हणतील देवा आम्हाला आमच्या कामात
धनसंपत्ती व पैसा दे. आणि जर का देव वयस्कर लोकांवरती प्रसन्न झाला तर ते म्हणतील
देवा मला चांगले आरोग्य आणि शांती दे. ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की दैवी
ज्ञान मागणारे ह्या जगात भरपूर कमी आहेत.
माझ्या
प्रिय मित्रांनो, जीवनामध्ये धनसंपत्ती पैसा हे महत्त्वाचे
असते परंतु आपण त्या धनसंपत्ती पासून जास्त आकर्षिले न जावे, कारण आज कमावलेला पैसा दुसऱ्या दिवशी तो आपल्या
हातातून निघून जाणार आहे, परंतु दैवी ज्ञान हे आपण जर प्राप्त केले
त्याच्या सहवासात राहिलो, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुन्हा लाभणार, आणि त्याचबरोबर आपण देवाच्या सहवासात राहणार. कारण
ह्या धरतीची आकाशाची पृथ्वीची निर्मिती करण्याअगोदर दैवी ज्ञान देवाबरोबर उपस्थित
होते. धनसंपत्ती पैसा सोने हे सर्व काही दैवी ज्ञानानंतर आलेले आहेत, म्हणूनच जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे संपत्ती म्हणजे
दैवी ज्ञान. हे दैवी ज्ञान शिक्षित लोकांनाच मिळते, असे नाही,तर ते अशिक्षित लोकांना सुद्धा मिळू शकते, मात्र जीवनामध्ये त्या दैवी ज्ञानाचा खऱ्या मनाने व
अंत:करणाने शोध केला पाहिजे. आपण कसे जगावे, काय करावे, या सगळ्यात देवाचे शहाणपण आपल्याला मार्गदर्शन करते.
एका
गरीब गावात एक माणूस राहत असे. त्याच्याकडे काहीच नव्हते. परंतु त्याला शहाणपणाची
आवड होती. तो नेहमी शिकत असे, आणि देवाच्या मार्गांचा अभ्यास करत असे. त्याच्यावर लोक हसत असत. एकदा
त्याच्या गावात एक श्रीमंत व्यापारी आला. तो व्यापारी मोठ्या गर्वाने सांगत होता
की त्याच्याकडे किती संपत्ती आहे. तेव्हा या गरीब माणसाने त्याला विचारले, "तुझ्या संपत्तीत देवाचे शहाणपण आहे का?" व्यापाऱ्याला उत्तर देता आले नाही. तेव्हा त्या
माणसाने सांगितले, "तू कितीही श्रीमंत असलास, परंतु देवाचे शहाणपण नसेल तर तू खरा गरीब आहेस."
या
कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रीमंतीपेक्षा शहाणपण अधिक महत्त्वाचे आहे.
देवाच्या शहाणपणाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट शाश्वत नसते.
आजच्या
उपासनेत सहभाग घेत असताना देवाकडे हीच विनंती करूया कि हे देवा तुझ्या दैवी
भांडारातून आम्हाला दैवी ज्ञानाच्या कृपेचा वर्षाव कर म्हणजे आम्हला सार्वकालिक
जीवनाचा अनुभव घेता येईल.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना
प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या
लोकांची प्रार्थना ऐक.
१. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी
ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ
राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा
व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना
करूया.
3. जी कुटुंबे दैनिक वादविवादाला
बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला
उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
४. जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व
बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment