Reflection for 29th Sunday in Ordinary Time (World Mission Sunday) (20/10/2024) By Br. Trimbak Pardhi
सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार
(जागतिक मिशन रविवार)
दिनांक २०-१०-२०२४
पहिले वाचन :- यशया ५३:१०-११
दुसरे वाचन :- इब्री लोकांस ४:१४-१६
शुभवर्तमान :- मार्क १०:३५ -४५
आज
देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार आणि मिशन रविवार साजरा करीत आहे. आजची
उपासना आपल्याला मिशन कार्य करण्यास आवाहन करीत आहे. सर्वसाधारणपणे मिशन हा
शब्द “मिस्सीओ” या लॅटिन शब्दातून आला
आहे. ज्याचा अर्थ “पाठविणे.” असा होतो.
आजच्या
पहिल्या वाचनात, "दुःख सहन करणारा सेवक" यावर आहे, ज्याच्या दुःखामुळे सर्वांचे तारण
होते. हे ख्रिस्ताचे आगमन दर्शवते, ज्याने आपले जीवन आपल्या
लोकांसाठी दिले. परमेश्वराच्या इच्छेने त्याच्या दुःख सहनाद्वारे, संपूर्ण
मानवजातीचे तारण केले जाईल.
आजच्या
दुसऱ्या वाचनात, येशू हा आपला महान याजक म्हणून संबोधिले आहे. त्याने मानवी रूप
घेतले आणि सर्व प्रकारच्या मोहाच्या
अनुभवातून तो गेला, म्हणून, आपण आत्मविश्वासाने
देवाच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो आणि त्याच्या कृपेची आणि दयेची याचना करू शकतो.
आजच्या
शुभवार्तमानात सांगितले आहे कि, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर तो
सेवा करावयास आला आहे. प्रभू येशूने जशी
लोकांची सेवा केली तशीच आपल्याला तो आज मिशन रविवार साजरा करत असताना, आपणाला मिशन
सेवाकार्य करण्यास आमंत्रण देत आहे. आपले मिशन म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेमाचे
साक्षीदार होणे. निराश असलेल्या लोकांना आशा देणे आणि ज्या लोकांना देवाची ओळख
नाही अशा लोकांना देवाचा संदेश सांगणे. मिशन कार्य केवळ दुसऱ्या देशामध्येच नाही
तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कार्यस्थळी, आपल्या समाजात सुरू करूया.
मनन चिंतन
प्रिय
बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण मिशन रविवार साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला चर्चची
मूलभूत ओळख म्हणजेच एक मिशनरी होण्याची आठवण करून देतो. येशूने आपल्या अनुयायांना
दिलेली ती जबाबदारी आहे. “जगभर जा आणि सृष्टीतील प्रत्येकाला सुवर्ता सांगा”
(मार्क १६:१५) हा आदेश केवळ काहींनाच नव्हे, तर प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला
दिलेला आहे.
पोप
फ्रान्सिस यांनी आपल्या कार्यकाळात मिशनरी देऊळमातेची सुधारणा करण्यावर भर दिला
आहे. सिनडच्या माध्यमातून देऊळ मातेमध्ये मिशनरी परिवर्तन करून सुधारणा करण्याची
पोप फ्रान्सिस यांची तळमळ आपण पाहत आहोत. यासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक आहे.
मिशनरी असणे नेहमी सोपे नसते, त्यासाठी त्याग, धैर्य आणि चिकाटी लागते. शतकानूशतके
अनेकांनी सुवार्तेसाठी आपले जीवन अर्पण केले आहे. आज आपण त्या मिशनऱ्यांचा सन्मान
करतो आणि त्याचं स्मरण करतो. त्यांनी आपल्या घरी असलेल्या सुख सोयीचा त्याग केला, अनेक संकटे सहन केली आणि येशूचा संदेश जगभर पसरवला
पोहोचवला.
प्रिय
भाविकांनो मिशनमध्ये माझी भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मिशन म्हणजे काय हे
माहीत असले पाहिजे. बहुतेक भाविकांना मिशनचा अर्थ म्हणजे मुक्तीचे धर्मशास्त्र असा वाटतो. परंतु याचा अर्थ असा की
भुकेल्यांना अन्न देणे, बेघरांना निवास देणे, पर्यावरणाची काळजी घेणे असा होतो. ख्रिस्ताचा महान
आदेश आपण मत्तयलिखित शुभवर्तमानात वाचतो, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला
आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने
बाप्तिस्मा दया आणि जे काही मी तुम्हाला शिकवले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा
आणि पहा काळाच्या शेवटपर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहील.” (मत्तय २८:१९)
दुर्दैवाने
ख्रिस्ताच्या महान आदेशाला आधुनिक तत्त्वांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले, थट्टा केली आणि तो आदेश फटाळला. आजही काही धर्म पंडित
म्हणतात की, बाप्तिस्मा करण्याची गरज नाही, ते निष्कर्ष काढतात की एक छान, ,दयाळू, सामाजिक
न्यायी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला ख्रिश्चन असण्याची किंवा देवावर
विश्वास ठेवण्याची गरज नाही आणि त्यामुळे आज देऊळे रिकामी होत आहेत.
पोप
फ्रान्सीस त्यांच्या २०२४ च्या जागतिक मिशन रविवारच्या संदेशात म्हणतात की, चर्चचे ध्येय सर्व लोकांसाठी निर्देशित केले आहे; आणि प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग
आवश्यक आहे. मिशन म्हणजे सर्व पुरुष आणि स्त्रियांसाठी नेहमी अथक बाहेर जाणे, त्यांना देवाला भेटण्यासाठी आमंत्रित करणे.
ज्याप्रमाणे येशू चांगला मेंढपाळ आणि पित्याचा संदेशवाहक हरवलेल्या मेंढरांच्या
शोधाला गेला त्याप्रमाणे बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताची
सुवार्ता पसरविण्यासाठी बाहेर पडले पाहिजे.
प्रिय
बंधूंनो व भगिनींनो, मिशन रविवार साजरा करताना लक्षात ठेवा की, चर्चचे मिशन केवळ काहीसाठी नाही तर प्रत्येकासाठी
आहे. आपण हे आव्हान उत्साहाने स्वीकारूया आणि हे जाणून घेऊया की, देव आपल्या छोट्या प्रयत्नाद्वारे मोठी कामे करतो.
चला, आपल्या दैनंदिन जीवनात मिशन जिवंत
करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांनी देवाचा संदेश अद्याप ऐकलेला नाही, त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करू व प्रार्थना करू की, आपल्याला खऱ्या मिशनऱ्यासारखे बनवण्यासाठी पवित्र
आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल आणि मिशनरी उत्साहाने भरले जाईल, जगभर येशू ख्रिस्ताची सुवर्ता पसरण्यासाठी.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना
प्रतिसाद – हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती
लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला
मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा
वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास
धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात
सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ
राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी
प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना
करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment