Reflection for the First Sunday of Advent (30/11/2025) By Fr. Rakesh Ghavtya
आगमन काळातील पहिला रविवार
दिनांक: ३०/११/२०२५
पहिले वाचन: यशया २:१-५
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३: ११-१४
शुभवर्तमान: मतय २४: ३७-४४
प्रस्तावना:
आज आपण नवीन उपासना वर्षाची सुरुवात 'आगमन काळाने' करतो. आगमन काळ हा एकंदरीत चार
सप्ताहांचा काळ, आपल्याला येशूच्या आगमनाविषयी जाणीव करून
देतो; तसेच हा आगमन काळ आपल्याला येशूच्या
पुनरागमनाची आठवण करून देतो.
आज आगमन काळातील पहिला रविवार साजरा करत
असताना, ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूच्या आगमनासाठी
व पुनरागमनासाठी आध्यात्मिक तयारी कशी करावी,
याविषयी
आवाहन करते.
आजचे पहिले वाचन यशया संदेष्ट्याच्या
पुस्तकातून घेतले असून, यशया संदेष्टा असे आश्वासन देतो की, बाबीलोनच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या
यहुदी लोकांचे परमेश्वर तारण करणार व एक समृद्ध जीवन बहाल करणार.
दुसऱ्या वाचनात संत पॉल सांगतो की, आपली अंधकारमय कृत्ये म्हणजेच वाईट
कृत्ये सोडून, आपल्याला ख्रिस्ताकडून प्राप्त होणार
असलेल्या तारणासाठी तयार राहावे.
तर आजच्या शुभवर्तमानात येशू निश्चित व
आकस्मिक येईल, त्यासाठी आपण सतत सज्ज राहावे व दक्ष
राहून त्याच्या आगमनाची तयारी दाखवावी,
याविषयी बोध
देण्यात आला आहे.
याच प्रभूच्या आगमनासाठी आपण आध्यात्मिकरीत्या आपल्या अंत:करणाची तयारी करूया, की जेणेकरून त्याच्या स्वागतासाठी आपण तयार असावे व त्याच्याच कृपाशीर्वादाने आपल्याला त्याच्या उपस्थितीचा अनुभव व्हावा. म्हणून या मिसाबलिदानात सहभाग घेताना विशेष प्रार्थना करूया.
मनन चिंतन
“प्रभूच्या
स्वागतासाठी तयार राहा”
संपूर्ण मानवजातीचे तारण व्हावे, हाच परमेश्वर पित्याचा एकमेव हेतू होता.
त्यासाठी परमेश्वराने तारणप्राप्तीचा मार्ग तयार केला व अनादिनकाळाची योजना होती, ती आपल्या पुत्राद्वारे पूर्ण केली. अशा
प्रकारे परमेश्वराने संपूर्ण मानवजातीवर दया दाखवून,
सिद्ध
केलेले तारण प्रदान केले.
प्रभू येशू, जो जगाचा तारणारा आहे, त्यानेच आपल्याला तारण प्राप्त करून
दिले. तो अगोदर आला होता, तो आता आला आहे व तो पुन्हा येणार आहे.
त्यासाठी त्याच्या आगमनासाठी व पुनरागमनासाठी आम्ही योग्य प्रकारे तयारी करायला
हवी. त्याच्या स्वागतासाठी आम्ही सतत तयार राहावे.
प्रभू येईल तेव्हा आम्ही आमच्या
स्वतःच्या जगात व्यस्त राहू नये, गुंतून जाऊ
नये; नाहीतर आमची सुद्धा दशा, नोहाच्या काळात झालेल्या लोकांप्रमाणे
होईल, म्हणजेच नाश होईल. कारण त्यांनी जलप्रलय
येण्याअगोदर पूर्वतयारी केली नव्हती. परंतु आम्ही नोहाप्रमाणे अगोदरच सतर्क
राहायला हवे, तयार असावे. कारण ज्या प्रभूचे आगमन होईल, तोच आमचे खरे तारण करील; हाच तारणारा आमच्यासाठी येणार आहे.
प्रभूचे आगमन आपल्याला हाच संदेश देत आहे
की:
१. प्रभूचे
आगमन निश्चित होणार आहे
जो प्रभू येणार आहे, तो आमच्याबरोबर राहणार आहे. त्यासाठी
आम्ही सर्वांनी आपल्या मनाची व अंत:करणाची पुरेपूर तयारी करायला हवी. हाच प्रभू
आम्हा प्रत्येकाला जागृत राहण्यासाठी सांगत आहे. त्यासाठी आपण झोपी न जाता
त्याच्या आगमनासाठी सज्ज राहूया. आजचे दुसरे वाचन याबाबत सांगते की, 'आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला, तेव्हापेक्षा आता तारण आपल्याजवळ आले आहे' (रोमकरांस पत्र अध्याय १३ : ओवी ११). तसेच
आजचे शुभवर्तमान असे नमूद करते की,
'मानवपुत्राचे
आगमन होणार आहे, त्यासाठी दक्ष राहण्यास हवे' (मत्तय अध्याय २४ : ओवी ३७). त्याचे आगमन
कोणत्या परिस्थितीत व कोणत्या घटकेस होणार हे आम्हाला ठाऊक नाही, पण त्याचे येणे निश्चित आहे.
२. प्रभूचे
आगमन आकस्मिक होणार आहे
प्रभूचे आगमन होईल तेव्हा आपल्याला
कल्पना नसेल किंवा त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही; कारण तो कधी, केव्हा व कसा येईल हे आम्हाला कळून येणार
नाही. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की,
आम्ही सतत
तयार राहावे; कारण आम्हाला कल्पना नसताना अशा वेळी
मानवपुत्र येईल (मत्तय अध्याय २४ : ओवी ४४). त्याचे आगमन अचानकपणे होईल, त्यासाठी आम्ही तयारीत असावे, की जेणेकरून आपल्याला त्याचे स्वागत
योग्य प्रकारे करता येईल.
तसेच आजची उपासना आपल्याला प्रभूच्या
आगमनासाठी पुढील प्रकारे तयारी करायला सांगत आहे:
१. वयक्तिक
तयारी करणे
प्रभूचे आगमन हे प्रत्येकासाठी तारणाची
आशा घेऊन येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे अंत:करण शुद्ध, नितळ व निर्मळ ठेवणे गरजेचे आहे.
स्वतःच्या स्वभावात बदल घडवून आणणे,
चांगली
शिस्त व वर्तणूक अंगी बाळगणे, तसेच नम्र
अंत:करणाने सर्वांशी चांगले वागणे. तसेच वाईट गोष्टी सोडणे व स्वतःचा विचार न करता
प्रभूच्या आगमनासाठी वैयक्तिकरीत्या तयारी करणे.
या आधुनिक जगात प्रभूचे आगमन
कुठल्याही मनुष्यरूपात होऊ शकते. एकदा असिसिकर संत फ्रान्सिस रस्त्याने जात होता.
अचानक त्याच बाजूने एक कुष्ठरोगी येत होता. त्याला पाहून व त्याच्या जखमांमधून
येणाऱ्या वासामुळे संत फ्रान्सिसला त्याचा किळस आला व त्याच रस्त्याने न जाता
मागे फिरला व पुढे जाऊ लागला. थोडे पुढे गेल्यावर त्याला जाणीव झाली की, मी हे योग्य केले नाही. मग तो कुष्ठरोग्याकडे गेला, त्याचे चुंबन घेतले व त्याला आलिंगन दिले.
त्याच वेळी संत फ्रान्सिसने त्या कुष्ठरोग्याला माणूस म्हणून स्वीकारले; कारण त्याच्यामध्ये संत फ्रान्सिसने
ख्रिस्ताचे रूप पाहिले. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या स्वभावात बदल घडवून आणला.
२.
सामुदायिक तयारी करणे
प्रभूच्या स्वागतासाठी, त्याच्या आगमनासाठी सर्वांनीच तयारीला
लागणे. प्रत्येकाच्या कुटुंबात, शेजोळात, धर्मग्रामात आणि समाजात प्रेम, दया,
शांतीचे
वातावरण पसरावे. एकमेकांना समजून घेऊन,
आदर व
सन्मान देऊन आपुलकीने जीवन जगणे. तसेच एकमेकांच्या सुखदु:खात सहभाग घेऊन, आपली तुटलेली नाती जोडून एकीने राहणे.
आपला वेळ खाण्यात व पिण्यात न घालवता एकमेकांच्या सेवाकार्यासाठी व मदतीसाठी
द्यावा, म्हणजे आपण प्रभूच्या आगमनासाठी उत्तम
तयारी करू शकतो.
गेल्या वर्षी मी एका ख्रिस्ती
कुटुंबाला भेट दिली. तो दिवस होता आगमन काळातील चौथा रविवार. या दिवशी मी त्या
कुटुंबाकडून बरेच काही शिकलो. खरंतर मला खूप छान अनुभव आला; कारण मी एक गोष्ट त्या कुटुंबात अनुभवली, ती ही की,
या
कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरवले होते की,
आगमन
काळातील चारही सप्ताहांमध्ये कोणीही घरात मोबाईल वापरणार नाही. जास्तीत जास्त वेळ
एकमेकांना देणे, एकत्र जेवण करणे, एकमेकांच्या सहवासात बसणे, एकत्र प्रार्थना करणे. या निश्चयामुळे
त्यांच्या घरात जणू काही कृपेचे वातावरण पसरलेले अनुभवायला मिळाले. खरोखर मला
वाटले की, त्यांनी येशूच्या आगमनासाठी
सामुदायिकरीत्या अचूक तयारी केली होती. तसेच या गोष्टी एकत्रपणे करत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसून आला.
खरोखर ही होती त्यांची ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयारी.
३.
आध्यात्मिक तयारी करणे
अ.
पश्चात्ताप करून प्रायश्चित्त संस्कार स्वीकारणे:
आपण मानव आहोत, मर्यादित आहोत; आपल्याकडून अपराध घडतात. त्यासाठी
देवासमोर नतमस्तक होऊन, आपण पापी आहोत हे नम्रपणे स्वीकारून
देवाकडे क्षमा मागणे. त्यासाठी आपले पाप कबूल करून पश्चात्ताप करावा व चांगल्या
प्रकारे प्रायश्चित्त संस्कार स्वीकारावा. तसे केल्याने देव आपल्याला त्याच्या
विपुल कृपेने भरेल.
ब. पवित्र
मिसाबलिदानात सक्रियतेने सहभाग घेणे:
प्रभू येशूच्या पवित्र रहस्यात सहभाग
घेऊन त्याच्या आगमनासाठी आतुरता दाखवूया. कारण जेव्हा आपण भक्तिभावाने पवित्र
मिसाबलिदानात सहभाग घेऊ, तेव्हा आपण आपल्या अंत:करणाची योग्य
तयारी करू, की ज्यामध्ये त्याने वस्ती करावी व
आपल्याबरोबर सतत राहावे.
क. जपमाळेची
प्रार्थना कुटुंबात नेहमी करणे:
कुटुंबात जपमाळेची प्रार्थना करून
त्यातील प्रत्येक रहस्यावर मनन-चिंतन करणे. जेव्हा संपूर्ण कुटुंब प्रार्थनेसाठी
एकत्र येते, तेव्हा देव त्या कुटुंबावर आशीर्वाद
पाठवतो. कारण प्रार्थनेद्वारेच आम्ही देवाशी आपले नाते जोडतो. देव आपला पिता व आपण
त्याची लेकरे; म्हणून जेव्हा प्रभूचे आगमन होईल, तेव्हा आपण प्रार्थनेत असायला हवे, म्हणजे आपल्याला त्याच्या उपस्थितीची
जाणीव होईल.
ड. वैयक्तिक
प्रार्थना करणे:
वैयक्तिक प्रार्थनेद्वारे देवाशी संवाद
साधणे, त्याचे नामस्मरण करून त्याच्या श्रद्धेत
व विश्वासात वाढणे. जेव्हा प्रभू येईल,
तेव्हा
प्रत्येक जण प्रार्थनेत मग्न असावा,
म्हणजे
प्रत्येक व्यक्तीला प्रभूचा साक्षात्कार होईल.
इ. प्रभू
वचनावर मनन-चिंतन करणे:
प्रभूचे वचन हे आम्हाला जीवनात पुढे
जाण्यासाठी दिशा दाखवते. या प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जीवन जगलो, तर खरोखर आपल्याला खुद्द प्रभू येशूचा
अनुभव प्रत्यक्षात होईल. तसेच जेव्हा आपण प्रभूच्या वचनावर मनन-चिंतन करू, तेव्हा आपले मन इतर ठिकाणी भटकण्याऐवजी
स्थिर राहून आपल्यात एकाग्रता दिसून येईल. म्हणून प्रभू शब्द आपल्या दैनंदिन
जीवनात पाळूया, म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्या
स्वागताची संधी आम्हाला मिळावी.
आजच्या उपासनेत सहभाग घेताना आपली
ख्रिस्तसभा आपल्याला आध्यात्मिक तयारी योग्य प्रकारे करण्यास सांगत आहे. कारण जो
प्रभू येणार आहे, त्याची घटका, काळ व परिस्थिती कोणालाच ठाऊक नाही; पण हे निश्चित आहे की त्याचे आगमन होणार
आहे व तो आकस्मिक येईल, हे ठाम आहे. आजच्या या पवित्र
मिसाबलिदानात सहभाग घेत असताना याच प्रभुकडे हीच प्रार्थना करूया की, "हे प्रभू,
तुझ्या
आगमनासाठी आम्हाला तुझे स्वागत करण्यास पात्र बनव;
की जेणेकरून
आम्ही तुझा अनुभव घेण्यास सतत सज्ज राहू व जागृत असू."
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
धर्मगुरू: प्रिय भाविकांनो, आपला प्रभू येशू हा
जगाचा तारणारा म्हणून त्याचे आगमन होणार आहे. त्याच्या आगमनाने आम्हाला तारण
लाभणार आहे. याच प्रभू येशूच्या चरणांजवळ आपल्या काही विनंत्या आणि गरजा श्रद्धेने
व विश्वासाने मांडूया.
प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्या स्वागतासाठी आम्हाला पात्र बनव.
१. आपले पोप महाशय लियो, सर्व कार्डिनल्स,
बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू,
धर्मभगिनी व प्रापंचिक या सर्वांना आपल्या सेवाकार्यात समाधान
लाभावे व देवाची विशेष कृपा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनुभवायला मिळावी, म्हणून प्रार्थना करूया.
२. प्रभूच्या आगमनासाठी आम्ही सर्वांनी आध्यात्मिक
तयारी करून, प्रभूसाठी योग्य वेळ द्यावा, म्हणून प्रार्थना
करूया.
३. जे लोक देऊळ-मातेपासून (ख्रिस्तसभेपासून) दूर गेले
असून पापी जीवन जगत आहेत, अशा लोकांना प्रभूचा स्पर्श व्हावा; की
जेणेकरून त्यांच्यात परिवर्तन घडून यावे व त्यांची प्रभूवरील निष्ठा वाढावी,
म्हणून प्रार्थना करूया.
४. या आगमन काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबात प्रभू
येशूला प्राधान्य देऊन, प्रभू येशूच्या आगमनासाठी सामुदायिकरीत्या श्रद्धापूर्वक
अंत:करणाने तयारी करावी, म्हणून प्रार्थना करूया.
५. येथे उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्व भाविकांवर प्रभू
येशूची नजर असावी, की त्याद्वारे हा आगमन काळ सुरू करताना आम्ही प्रभूच्या
आगमनासाठी उत्सुकता दाखवावी व सर्व धार्मिक कार्यात सक्रियतेने सहभाग घ्यावा,
म्हणून प्रार्थना करूया.
धर्मगुरू: हे प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्यासमोर
आमच्या काही गरजा सादर केल्या आहेत, त्या तू ऐकून घे व
तुझ्या इच्छेप्रमाणे सफल कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. आमेन.

