Reflections for the homily for the Feast of the Dedication of the Lateran Basilica (09-11-2025) by Br. Saurav Patil
लॅटरन महामंदिराचे समर्पण
दिनांक: ०९/११/२०२५
पहिले वाचन: यहेज्केल: ४७: १-२, ८-९,१२
दुसरे वाचन: १करिंथ ३: ९-११, १६-१७
शुभवर्तमान: योहान: २:१३-२२
प्रस्तावना:
प्रिय बंधूंनो आणि
भगिनींनो, आजच्या पवित्र
वाचनांमधून देव आपल्याला त्याच्या मंदिराचे आणि आपल्या आत्म्याचे महत्त्व समजावतो.
यहेज्केल संदेष्टा आपल्याला देवाच्या मंदिरातून वाहणाऱ्या जीवनदायी पाण्याचे दर्शन
घडवतात. जेथे हे पाणी पोहोचते, तेथे जीवन आणि फळे फुलतात. संत पौल आपल्याला सांगतात की, आपण देवाचे जिवंत
मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा आपल्यात वास करतो. म्हणून आपले जीवन पवित्र, स्वच्छ आणि देवमय
राहिले पाहिजे.
आजच्या
शुभवर्तमानात आपण पाहतो की येशू मंदिर शुद्ध करतो,
कारण लोकांनी देवाच्या घराचे रूपांतर बाजारात केले होते. ही घटना आपल्यालाही
आपल्या अंतःकरणाकडे पाहण्याचे आमंत्रण देते. आपल्या हृदयाचे मंदिर किती शुद्ध आहे? आपल्या अध्यात्मिक
मंदिरात देवाला योग्य स्थान मिळते का,
की तिथे लोभ, स्वार्थ आणि पापाचे
व्यापारी बसले आहेत?
आजचा दिवस आपल्याला
स्मरण करून देतो की देवाचे मंदिर म्हणजे आपल्या आत्म्याचे आणि शरीराचे पवित्र
स्थान आहे. आपण देवाच्या कृपेच्या प्रवाहात वाहू देऊ, जेणेकरून आपल्या
जीवनातून इतरांना जीवन, आशा आणि प्रेमाचा
झरा मिळेल.
मनन चिंतन
देवाचे मंदिर: जीवनदायी उपस्थिती
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या वाचनांद्वारे देऊळमाता
आपणास देवाच्या उपस्थितीबद्दल, त्याच्या जीवनदायी कृपेबद्दल आणि आपल्या आत असलेल्या मंदिराच्या पवित्रतेबद्दल
विचार करायला बोलावत आहे.
पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्टा मंदिरातून
वाहणाऱ्या पाण्याच्या
दर्शनाविषयी सांगतो. ते पाणी सुरुवातीला लहान प्रवाहासारखे दिसते, पण पुढे जाताना मोठ्या
नदीत रुपांतरीत होते. हे पाणी ज्या ठिकाणी जाते,
तिथे जीवन आणि फळ येते. मृत समुद्रासारख्या निर्जीव ठिकाणीही ते पाणी पोहोचते आणि जीवन फुलवते.
प्रिय भाविकांनो, हे पाणी देवाच्या कृपेचे आणि आत्म्याचे प्रतीक आहे. जेव्हा देवाचा आत्मा आपल्या
जीवनात वाहू लागतो, तेव्हा आपले कोरडेपण, उदासीनता आणि पापांनी
भरलेले हृदय नव्या जीवनाने भरून जाते. म्हणूनच आपण देवाच्या कृपेच्या प्रवाहाशी जोडलेले राहिले पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनातही
जीवनाचे आणि आशेचे झरे वाहतील.
दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देतात की आपण सर्व देवाचे सहकारी आहोत, आणि आपण देवाचे मंदिर आहोत. ख्रिस्त हा या मंदिराचा पाया आहे. दुसरा कुणीही त्याच्या ऐवजी त्याचा पाया घालू शकत नाही.
आणि ते पुढे सांगतात “तुम्ही देवाचे मंदिर
आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यात वास करतो.”
प्रिय मित्रांनो, याचा अर्थ असा की प्रत्येक
मनुष्य, प्रत्येक ख्रिस्ती हा
देवाचे जिवंत मंदिर आहे. त्यामुळे आपल्या जीवनात पवित्रता, नम्रता आणि प्रेमाचे
वातावरण असले पाहिजे. पाप, स्वार्थ, द्वेष किंवा असत्य हे
या मंदिराचे अपमान करतात. देव आपल्या आत राहतो हे सतत लक्षात ठेवलं, तर आपल्या प्रत्येक
कृतीत देवाची उपस्थिती दिसून येईल.
शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की येशू येरुसलेमच्या मंदिरात जातो तिचे त्याच्या दृष्टीस येते की, व्यापार सुरू आहे. देवाच्या घराचे बाजारात रूपांतर झाले आहे. तेव्हा तो रागाने
त्या व्यापाऱ्यांना बाहेर काढतो आणि म्हणतो,
“हे माझ्या पित्याचे घर आहे; तुम्ही त्याला चोरांची गुहा बनवली आहे.” प्रिय
भाविकांनो, हे दृश्य केवळ बाह्य
मंदिराबद्दल नाही, तर आपल्या आध्यात्मिक मंदिराबद्दलही आहे. आपल्या हृदयात,
आपल्या मनात, देव राहतो, पण आपण कधी
कधी या मंदिरात लोभ, स्वार्थ, अहंकार आणि पापाचा व्यापार
करू लागतो. येशू आज आपल्याला सांगतो,
“तुमच्या अंतःकरणातील मंदिर शुद्ध करा.” देवाला आपले जीवन पवित्र, प्रेममय आणि सत्यनिष्ठ
हवे आहे. येशू पुढे म्हणतो, “हे मंदिर उद्ध्वस्त
करा, आणि मी ते तीन दिवसांत
पुन्हा उभे करीन.” तेव्हा लोक समजते की तो स्वतःच्या देहाबद्दल बोलत आहे. मृत्यूवर विजय मिळवून तो पुन्हा उठतो, आणि त्याचे पुनरुत्थान
हेच नवे मंदिर बनते , जिथे देव आणि मानव एकत्र येतात.
येशूने
येरुसलेममधील मंदिर शुद्ध केल्यावर,
तो आपल्याला सांगतो की, "तुमच्या
अंतःकरणातील मंदिर शुद्ध करा." हे असे दर्शवते की आपले
जीवन देवासाठी पवित्र असले पाहिजे. येशूचे पुनरुत्थान हेच नवे मंदिर आहे, जिथे देव आणि मानव
एकत्र येतात. त्याच्यावर आपल्या जीवनाचा आधार असणे आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे पवित्रतेचे आणि प्रेमाचे मंदिर असले पाहिजे, ज्यातून देवाचा
प्रकाश आणि शांती इतरांपर्यंत पोहोचेल. आपण जिवंत मंदिर म्हणून जगल्यास, देवाची उपस्थिती
आपल्या जीवनात प्रकट होईल.
म्हणून, प्रिय बंधुभगीनिनो, आपले जीवन हे देवाचे
मंदिर आहे; ते स्वच्छ, प्रकाशमय आणि प्रेमाने
भरलेले असले पाहिजे. देवाच्या कृपेचे पाणी आपल्या आत वाहू द्या, जेणेकरून आपण जिथे जाऊ
तिथे जीवन आणि आनंद पसरू द्या.
ख्रिस्त हा आपला पाया आहे, त्याच्यावर आपले जीवन उभे राहिले पाहिजे. आणि आपण जिवंत मंदिर म्हणून जगलो, तर आपल्यातूनही जगात
देवाचा प्रकाश आणि शांती प्रकट होईल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे प्रभू, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’
१. पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व
व्रतस्थ बंधू-भगिनिंना पवित्र जीवन जगण्याची शक्ती
आणि समर्पण मिळावी, जेणेकरून ते
आपल्या कार्यातून इतरांची श्रद्धा आणि विश्वास बळकट करू शकतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आज
अंधारलेल्या जगात राहत आहोत, निराशेने बरेच
लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशांना ख्रिस्ताच्या आशेचा शुभसंदेश प्राप्त व्हावा व
त्यांना नवचैतन्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. काही लोक हे
पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाहीत व दुसऱ्यांना विश्वासू लोकांचा विश्वास
उध्वस्त करून त्यांस येशुपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना प्रभूचा
स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण
योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण
आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment