Reflections for the homily for Fifth
Sunday in the Ordinary Time (08-02-2026) by Fr. Pravin Bandya
“त्यापमाणे तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडूद्या
कि त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे”.
आज आपण सामान्य काळातील पाचवा रविवार
साजरा करीत आहोत; आणि आजची उपासना आपणास अंधःकारमय जगात पावित्रतेचा प्रकाश
बनण्यासाठी बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनात
परमेश्वर आपल्याला शिकवतो की खरी भक्ती ही केवळ शब्दांत नसून, गरिबांप्रती
करुणा, भुकेल्यांशी
भाकर वाटणे आणि दुःखींची काळजी घेणे यातून प्रकट होते; तेव्हाच
आपला प्रकाश अंधारात उजळतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की सुवार्तेची शक्ती
मानवी शहाणपणात नसून, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आहे, जे
साधेपणातून आणि विश्वासातून प्रकट होते. तर आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला “पृथ्वीचे
मीठ” आणि “जगाचा
प्रकाश” होण्याचे
आवाहन करतो, जेणेकरून
आपल्या चांगल्या कृतींमधून लोक देवाची महिमा करतील. म्हणून आजची वाचणे आपल्याला
आठवण करून देतात की आपला विश्वास हा शब्दांपुरता न राहता, प्रेमाच्या
कृतींमधून जगासमोर उजळावा.
मनन चिंतन
कथा: - जवळ-जवळ ८५०
वर्षा अगोदर रोम शहरातील वातावरण निरस आणि अंधकारमय होत. लोकं बाहेरून धार्मिक
दिसत होते परंतु त्यांच्या अंतःकरणात देवासाठी जागा नव्हती. तरुण पिढी चुकीच्या
मार्गावर जात होती; पाप वाढत होत. लोकं जणूकाही पापी-अंधारमय जीवन जगत होते. ह्याच
शहरा पलीकडील असिसी ह्या शहरात ११८२ रोजी बर्नाडोने या कुटुंबात एका मुलाचा जन्म
होतो. हे कुटुंब श्रीमंत होते. वडिलांचा कपड्यांचा मोठ्ठा व्यवसाय होता. जसजसा हा
मुलगा मोठा होत गेला तसतसा हा देखील इतर वाईट तरुणांच्या संगतीला लागला. एशोआराम,
धनसंपत्ती, आणि मौजमजेच जीवन तो जगायला लागला. त्याच्या वडिलांची इच्छा होती कि
आपल्या मुलाने एक सरदार बनावं व इतरांवर अधिकार चालवावा; म्हणून त्याने आपल्या
मुलासाठी उत्तम युद्ध सामग्री आणली होती.
एक
दिवस हा तरुण युद्धावर जात असता वाटेत आजारी पडतो, म्हणून त्याचे इतर साथीदार
त्याला पुन्हा घरी जाण्याचा सल्ला देतात. तो घरी परत असता वाटेत त्याला संत
दामियानो नवाच एक तुटक-फुटक चर्च दिसत. म्हणून विश्रांती घेण्यासाठी तो त्या
चर्चमध्ये जातो. विश्रांती घेत असता त्याला त्या चर्च मध्यल्या क्रूसावरील
ख्रिस्ताची वाणी ऐकू येते, “तुला कुणाची सेवा करायची आहे, मालकाची कि चाकराची?”
या वाणीला उत्तर म्हणून तो म्हणतो, “मला मालकाची (देवाची) सेवा करायची आहे”.
तेव्हा पुन्हा त्या क्रुसातून वाणी येते, “मग तू इथे काय करतोस? जा आणि माझं
मंदिर जे तुटलेलं आहे ते पुन्हा बांध”.
तेव्हा
पासून ह्या तरुणाच्या हृदयात परिवर्तन व्हायला सुरवात होते. तो आपलं पापी जीवन सोडून
देतो. जे स्वप्न त्याने पाहिलं होत ते बाजूला ठेवतो. एशोआरामच जीवन सोडून देऊन;
आपलं होत नव्हत ते सर्वकाही सोडून देऊन परमेश्वर पित्याला आपला बाप म्हणून स्वीकारतो.
त्याच हे परिवर्तीत जीवन, त्याच हे पवित्रतेच जीवन पाहून इतर तरुण, इतर लोकं देखील
त्याला अनुसरतात. आपलं पापी-अंधारमय जीवन सोडून देऊन पवित्र जीवन जगण्यास सुरवात करतात.
अशा प्रकारे जे शहर अंधारमय जीवन जगत होत, पापी जीवन जगत होत ते एका तरुणाच्या
पवित्र जीवनामुळे प्रकाशमान झालं. आणि ह्याच तरुणाला आज आपण असिसिकार संत
फ्रान्सिस म्हणून ओळखतो.
ज्या
प्रमाणे असिसिकर संत फ्रान्सिस हे अंधारमय जगात प्रकाशाची ज्योत बनले, त्याप्रमाणे
आपण देखील जे पापमय-अंधारात जीवन जगत आहेत त्यांच्या जीवनातून, हृदयातून पापमय-अंधार
दूर करण्यास आजची उपासना आपणास बोलावत आहे. आज आपण अशा जगात जगत आहोत जेथे अंधार
केवळ रात्रीचाच नाही तर तो माणसांच्या हृदयात नैराश्य, पाप, अन्याय, राग, मत्सर,
लोभ, भीती या सर्वांच्या रुपात दिसून येतो.
अंधारमय
जीवन म्हणजे पापी जीवन. संत पौल रोमकरांस पत्र ३:१० मध्ये म्हणतो,
“शास्त्राप्रमाणे, नीतिमान कोणीही नाही; एक देखील नाही”. याचा अर्थ आपण सर्वजण पापी आहोत; आपण अंधारमय
जीवन जगात आहेत. आणि जेव्हा आपण अंधारात चालतो तेव्हा आपल्या पायास ठेच लागते
किंवा आपण खाली खड्डयात पडण्याची शक्यता असते; म्हणजे जेव्हा आपण पापात जीवन जगतो
तेव्हा आपला नाश होणे निश्चित आहे. म्हणूनच संत पौल इफिसिकारंस पत्र ५:८ मध्ये
म्हणतो, “तुम्ही अंधारात जीवन जगत आहात परंतु आता ते अंधारमय जीवन सोडून देऊन
प्रभू मध्ये प्रकाशमय जीवन जगा”. कारण जोपर्यंत आपण स्वतःच जीवन बदलत नाही तो
पर्यंत आपण इतरांना बदलू शकत नाही. पुढे संत पौल म्हणतो, “कारण देवाने आपणास
अशुद्धपणासाठी नव्हे तर पावित्रतेसाठी पाचारण केले पाहिजे. म्हणजे आपण सर्वजण
ख्रिस्तामध्ये पवित्र जीवन जगलो पाहिजे.
पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारात आपण
योना या पुस्तकात निनवे शहराविषयी ऐकतो. हे शहर पापी जीवन जगत होतं, अंधकारमय जीवन
जगत होतं. तेव्हा परमेश्वराने योनाची निवड केली; त्याला आपल्या प्रकाशाने भरलं आणि
निनवे शहर जे अंधकारमय जीवन जगात होतं त्यांना त्या अंधारातून बाहेर काढण्यास तेथे
पाठवलं. योना निनवे शहरात जाऊन त्याने परमेश्वराच्या वाणीची घोषणा केली कि, “फक्त
चाळीस दिवस आणि चाळीस रात्र तुमच्या जवळ आहेत, जर तुमचं जीवन बदलून तुम्ही
पश्चाताप केला नाही तर परमेश्वर तुमचा नाश करणार”. त्याचे हे शब्द ऐकून
निनवेकरांनी पश्चाताप केला. म्हणून परमेश्वाने योनाद्वारे निनवेकरांच तारण केलं;
त्यांचा नाश केला नाही.
योहान
अध्याय ८ मध्ये आपण एका व्यभिचारी स्त्री विषयी ऐकतो. ही स्त्री पापी जीवन
जगत होती; अंधकारमय जीवन जगत होती; व्यभिचाराच जीवन जगत होती. परंतु ख्रिस्त
तिच्या जीवनात प्रकाशासारखा आला आणि तीच ते अंधकारमय जीवन प्रकाशीत केलं.
लुक
अध्याय १९ मध्ये आपण जक्कय विषयी ऐकतो. तो एक जकातदार होता; लोकांना
लुबाडत होता, त्यांच्याकडून जास्त कर वसूल करत होता. जणूकाही तो पापी-अंधारमय जीवन
जगत होता. परंतु ख्रिस्त त्याच्या जीवनात देखील प्रकाशासारखा आला आणि त्याला त्या
अंधारमय जीवनातून बाहेर काढलं व त्याचं तारण केलं.
प्रेषितांची
कृत्ये या पुस्तकात आपण शौलाविषयी ऐकतो. हा एक कठोर माणूस होता; तो ख्रिस्ती
लोकांचा छळ करीत असे, त्यांना बंदिवासात टाकत असे; पापी-अंधारमय जीवन जगत असे.
परंतु ख्रिस्ताने त्याला दिमस्काच्या वाटेवर प्रकाशाच्या रुपात दर्शन दिलं आणि
त्याला त्या अंधारमय जीवनातून बाहेर काढलं. आणि आज आपण त्यांना एक महान संत किंवा
ख्रिस्ताचा शिष्य म्हणून ओळखतो.
हे
सर्वजण पापी जीवन जगत होते; अंधारमय जीवन जगत होते परंतु ख्रिस्त त्यांच्या जीवनात
प्रकाश म्हणून आला आणि त्याचं जीवन प्रकाशमान केलं. आज ख्रिस्त आपणास देखील त्याच्यासारखं
इतरांच्या जीवनात मीठ आणि प्रकाश बनण्यास बोलावत आहे. आपणा प्रत्येकाला
परमेश्वराने विशेष हेतूसाठी या जगात पाठवलेलं आहे. हा हेतू पूर्ण करण्यासाठी आपण मिठासारख
चविष्ठ झालो पाहिजे आणि प्रकाशासारख चमकून इतरांच जीवन प्रकाशमान केलं पाहिजे.
ज्याप्रमाणे
असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी आपल्या पवित्र जीवनाद्वारे संपूर्ण शहर प्रकाशमय
केलं, त्याच प्रमाणे आपण देखील ख्रिस्ताच्या प्रकाशात प्रकाशमान होऊन इतरांची
हृदये प्रकाशमान करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
धर्मगुरू: जो प्रभू येशूचा आदर्श घेऊन, त्याने दाखवलेल्या मार्गावर जीवनक्रमण करतो तो खऱ्या आणि परिपूर्ण आनंदाचा
अनुभव घेऊ शकतो. त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे आपण आपल्या गरज देवपित्याच्या चरणाशी
मांडूया.
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला पृथ्वीचे मीठ आणि प्रकाश बनव.
१. सर्व ख्रिस्ती लोकांनी, प्रत्येक परोपकारी
कृतीत, प्रेरणादायी शब्द आणि प्रेमळ हावभावात आपला
ज्याच्यावर अढळ विश्वास आणि जिवंत आशा आहे, अश्या प्रभु
येशूला, म्हणजेच जगाच्या प्रकाशाला अधिक स्पष्टपणे चमकू
द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. अखिल ख्रिस्तसभेच्या पुढाऱ्यांनी, जगात ऐक्यासाठी
मध्यस्थी करावी आणि जगात शांतता, न्याय, समता आणि समेट घडवून आणण्यास आपले
जीवन चिकाटीने आणि प्रेमाने समर्प्रीत करावे म्हणून प्रार्थना करूया.
३. जे कोणी जीवनात निराश आहेत, आजारी, अस्वस्थ व अंधकारात आहेत त्यांनाही तारणदायी येशूच्या प्रेमाचा व शांतीचा
अनुभव यावा व त्यांचे जीवन आनंदाने आणि आशीर्वादाने
भरावे, तसेच त्यांच्या जीवनात
बदल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी
आपला स्वार्थ बाजूला ठेऊन सतत देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करू या.