Reflections for the homily for First
Sunday in The Season of Lent (22/02/2026) by Br. Oliver Munis
प्रायश्चित काळातील पहिला रविवार
दिनांक: २२/०२/२०२६
पहिले वाचन: उत्पती
२:७-९; ३:१-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९
शुभवर्तमान: मत्तय
४:१-११
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय
भाविकानो, आज आपण प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करत आहोत. राखेच्या बुधवारी
आपण कपाळावर राख लावली आणि ठरवले की,
“मला बदलायचे
आहे.” पण बदलणे हे सोपं नसते. आजची सगळी
वाचणे आपल्याला एका शब्दावर विचार करायला लावतात आणि तो शब्द म्हणजे ‘निवड’
(Choice). एकीकडे आपण
बघतो, आदम आणि एवा आहेत, ज्यांनी चुकीची निवड केली आणि सर्वकाही गमावले
तर दुसरीकडे येशू आहे, जो चाळीस दिवस उपाशी असूनही वाळवंटात ठाम
राहिला आणि त्याने सैतानाच्या मोहांना ‘नाही’ म्हटले.
आपल्या आयुष्यातही रोज असे प्रसंग येत असतात.
एक रस्ता सोपा असतो (Shortcut) आणि दुसरा रस्ता कष्टाचा पण खरा असतो. तर
जेव्हा-जेव्हा आपल्यासमोर ‘मोह’
येतील, तेव्हा आपल्याला ठामपणे त्या मोहांना ‘नाही’ म्हणता आले पाहिजे, ह्यासाठी आजच्या ह्या
पवित्र मिस्साबलीदानात आपण येशूकडे कृपा व शक्ती मागूया.
मनन चिंतन
माझ्या प्रिय बंधू-भगिनिंनो, एकदा एक
गरुड आकाशात आनंदाने उडत होता. त्याला खाली एक शिकारी दिसला. त्याच्या टोपलीत
भरपूर मासे होते. गरुडाला मासे खूप आवडायचे. तो खाली आला आणि म्हणाला, “हे मित्रा, मला एक मासा देशील का?”
शिकारी हसला
आणि म्हणाला, “हो देईन की! पण फुकट नाही. एका माशाच्या
बदल्यात मला तुझे एक पीस (Feather) द्यावे लागेल.” गरुडाने विचार केला, “माझ्या पंखावर हजारो पिसं आहेत. एक दिले
तर काय फरक पडणार आहे? आणि त्याबदल्यात मला आयतं जेवण मिळत आहे, शिकार करायचे कष्टतरी वाचतील.” त्याने एक
पीस उपटले आणि दिले व तो मासा खाल्ला.
हे रोजचे झाले. “कष्ट नको, फक्त मजा,” असा विचार करून गरुड रोज एक-एक पीस देऊन
मासा खाऊ लागला. काही दिवसांनी त्याला परत उंच आकाशात उडावेसे वाटले. त्याने पंख
पसरले, पण बघतो तर हे काय? पंखात उडायला पिसेच उरली नव्हती! तो आता
गरुड असूनही कोंबडीसारखा जमिनीवरच अडकून पडला होता. त्याचा निर्णय: आळस आणि 'शॉर्टकट'
त्याला खूप
महाग पडला.
आज प्रायश्चितकाळाचा पहिला रविवार, आपल्याला हेच सांगत आहे: योग्य निर्णय
घेणे हे खूप महत्वाचे आहे कारण चुकीचा निर्णय आपल्याला देवापासून तोडतो.
पहिल्या वाचनात आपण पाहिले कि, आदम आणि एवाला देवाने सगळे दिले होते. पण
त्यांना एका गोष्टीचा मोह झाला. सैतान त्यांना म्हणाला, अहो,
देवाचं ऐकू
नका, हे फळ खा, तुम्ही देवासारखे
व्हाल. त्यांनी ते ऐकले आणि स्वर्गाचे सुख गमावले. आजही सैतान आपल्याकडे तसाच येतो. तो
शिंगे आणि शेपूट घेऊन येत नाही, तो 'सोप्या संधी' (Easy Option) च्या रुपात येतो.
तसेच आजच्या शुभवर्तमानात, आपण ऐकतो, येशू चाळीस
दिवस उपाशी होता. अशक्त होता. सैतान त्याला तीन गोष्टी करायला सांगतो, ज्या आजही आपल्यासमोर येतात:
१) भौतिक
सुख: सैतान येशूला म्हणाला, ‘तू देवाचा पुत्र
आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.’
आज आपण, आपल्या शक्ती व सामर्थ्याचा (Power) किंवा कौशल्यांचा (Talents)
वापर फक्त
स्वतःचा फायदा करण्यासाठी करतो. ऑफिसमध्ये थोडं 'सेटिंग'
लावून पैसे
कमावणे किंवा परीक्षेत नक्कल (Copy) करून पास
होणे. हे म्हणजे दगडाची भाकरी करण्यासारखेच आहे. येशू म्हणतो, नाही! “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर
परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने (म्हणजेच तत्वावर) जगेल.
२) दिखावेपना
(शो-बाजी): सैतान म्हणाला, ‘ तू देवाचा पुत्र आहेस
तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे कि, तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी
आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये, म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.
प्रसिद्ध (Famous) व्हायला काहीही करणे. सोशल मीडियावर
लाईक्ससाठी धोकादायक रिल्स बनवणे किंवा लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खोटे वागणे.
येशूने हा 'स्टंट'
करायला नकार
दिला. येशूने हा दिखाऊपणा नाकारला. देवाची परीक्षा घ्यायची नसते.
३) सत्तेची
हाव: सैतान म्हणाला, ‘तू पाया पडून मला नमन
करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.’
यशासाठी आपल्या मूल्यांशी तडजोड (Compromise) करणे. “थोडे खोटे बोलून जर फायदा होत
असेल तर काय बिघडते?" हा विचार इथे येतो. पण येशूने स्पष्ट
सांगितले: ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन
कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’
आपण सर्वजण एका ‘गर्दीच्या वाळवंटात’ राहतो. जेव्हा एखादा तरुण म्हणतो, सगळेच जुगार खेळतात, मी खेळलो तर काय बिघडले? (गरुडाचं एक पीस), जेव्हा एखादा व्यापारी म्हणतो, सगळेच कामचोरपणा करतात. मी केला तर काय
झालं? तेव्हा लक्षात ठेवा, आपण त्या गरुडासारखी आपली ‘आध्यात्मिक
पिसं’ (Spiritual Feathers) गमावत असतो.
सुरुवातीला मासा मिळतो (सुख मिळतं),
पण शेवटी
आपण उडायची ताकद गमावून बसतो.
प्रायश्चितकाळ म्हणजे फक्त मटण-मच्छी
सोडणे नव्हे. तर आपल्यातल्या त्या सवयी शोधणे, ज्या आपल्याला आळशी आणि स्वार्थी बनवत
आहेत. या चाळीस दिवसांत एकच ठरवा कि, जे योग्य आहे, तेच मी करेन, मग ते कितीही कठीण असो.
जेव्हा-जेव्हा मनात येईल की “अरे, हे सोपे आहे, हे करून मोकळा होतो,”
तेव्हा
येशूची आठवण करा. येशूने क्रूसाचा कठीण रस्ता निवडला, पण तोच रस्ता विजयाकडे गेला.
देवाला
प्रार्थना करूया कि,
हे प्रभू, मला मोह टाळण्याची आणि योग्य तेच
निवडण्याची शक्ती दे, जेणेकरून मी त्या गरुडासारखा जमिनीवर न
राहता, तुझ्या कृपेत उंच भरारी घेऊ शकेन.
आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
धर्मगुरू: माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताने वाळवंटात सैतानाच्या मोहांवर मात करून आपल्याला विजयाचा
मार्ग दाखवला आहे. आपल्या आयुष्यातील संघर्षात आपल्यालाही तीच शक्ती मिळावी,
म्हणून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे विश्वासाने प्रार्थना करूया.
प्रतिसाद: हे पित्या, आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु पोप लिओ, बिशप्स आणि सर्व
धर्मगुरु यांच्यासाठी प्रार्थना करूया कि, या प्रायश्चित काळात त्यांनी आम्हाला सत्याचा
मार्ग दाखवावा आणि जेव्हा-जेव्हा जग आम्हाला सोप्या पण चुकीच्या मार्गाचे आकर्षण
दाखवेल, तेव्हा त्यांनी आम्हाला ठाम राहण्याची प्रेरणा
द्यावी. म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. मुलांसाठी आणि तरुणांसाठी प्रार्थना करूया कि,
सध्याच्या स्पर्धेच्या जगात त्यांना यश मिळवण्यासाठी अनेकदा नक्कल करणे किंवा
चुकीचे मार्ग वापरणे याचा मोह होतो. त्यांना येशूचे धैर्य मिळावे, जेणेकरून त्यांनी
यशापेक्षा प्रामाणिकपणाला महत्त्व द्यावे आणि स्वतःचे भविष्य उज्वल करावे. म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाच्या आणि समाजाच्या नेत्यांसाठी
प्रार्थना करूया कि, सत्तेचा आणि पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी न
करता, सामान्य लोकांच्या
सेवेसाठी करावा. भ्रष्टाचाराच्या मोहापासून त्यांनी दूर राहावे आणि न्यायाने
वागावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक व्यसनाच्या, आळसाच्या किंवा नैराश्याच्या आहारी
गेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया कि जेणेकरून,
त्यांनी तात्पुरत्या सुखाच्या मागे न लागता, त्यांना ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाची
शक्ती आणि आपल्या समाजाचा आधार मिळावा. म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज येथे जमलेल्या आपल्या सर्वांसाठी प्रार्थना
करूया. ह्या प्रायश्चितकाळात आपण फक्त अन्नाचा उपवास न करता, आपल्या रागाचा,
अहंकाराचा आणि खोटं बोलण्याच्या सवयीचा उपवास करावा. येशूने जसे
सैतानाला ‘नाही’ म्हटले, तसेच आम्हालाही पापाला ठामपणे ‘नाही’
म्हणण्याचे बळ मिळावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक
हेतूंसाठी प्रार्थना करू या.
धर्मगुरू: हे दयाळू पित्या, तू आमचा आधार आहेस. वाळवंटातील
प्रवासात तू येशूला सांभाळलेस, तसेच तू आम्हावरही तुझी कृपादृष्टी ठेव. मोहांच्या
वेळी आम्हाला तुझ्या शब्दाचे बळ दे आणि आम्हाला पापापासून दूर ठेव. ही प्रार्थना
आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
No comments:
Post a Comment