Thursday, 14 March 2019


Reflection for the Homily of 2nd SUNDAY OF LENT (17-03-19) By Fr. Ashely D’Monte 








उपवास काळातील दुसरा रविवार

दिनांक: १७/०३/२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६






हा माझा निवडलेला पुत्र आहेयाचे तुम्ही ऐका.

प्रस्तावना:
     आज आपण प्रायश्चित काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना परमेश्वराने मानवाशी केलेल्या कराराविषयी सांगत आहे.
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ह्या कराराची सुरुवात नमूद करण्यात आली आहे. आब्राहामाने केलेले यज्ञ स्विकारून, देव आब्राहामाशी करार प्रस्थापित करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिप्पीकरांस पाठवलेल्या पत्रात म्हणतो, ‘आपण स्वर्गीय राज्याचे प्रजाजन आहोत. आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त येऊन, आपले नीच शरीर बदलून त्याच्यासारखे वैभवशाली करील’. तर लुकलिखित शुभवर्तमानात आपण येशूच्या रूपांतराविषयी ऐकतो.
परमेश्वर, आपला पुत्र येशू ह्याच्याद्वारे मानवाशी करार करतो. येशूचे रुपांतर हे त्याच्या वैभवशाली पुनरूत्थानाचे व त्या स्वर्गीय नंदनवनाची एक पूर्वसुचना होती. ह्या नंदनवनात आपण सर्व सामील होण्यास केलेला हा करार होय. येशुप्रमाणे आपल्याही जीवनाचे रुपांतर व्हावे व आपणास त्या स्वर्गीय नंदनवनात प्रवेश मिळावा म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८
देव आब्राहामाला उरदेशातून बोलावून त्याच्याशी करार करतो. परमेश्वर त्याला आकाशात पहायला सांगतो, ते ह्यासाठी की, ‘हे सर्व काही स्वप्न नसून हकीकत होती’. परमेश्वर आपल्या वचनांशी एकनिष्ठ राहतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे आब्राहामाची संतती होण्याचे वचन परमेश्वर त्याला देतो. आब्राहाम त्याच्या देवावरील विश्वासामुळेच विश्वासाचा पिता' ठरतो व नितीमान गणण्यात येतो. आब्राहामाला व साराला पुत्राचे वचन दिल्यानंतर, परमेश्वर त्यांस आता वतन देण्याचे आश्वासन देतो. त्याच्या पुत्राचा बळीअर्पण करण्यास सांगणे, ही परमेश्वराने आब्राहामाच्या विश्वासाची केलेली परीक्षा होती. परंतु आब्राहाम त्यात उत्तीर्ण होतो. परमेश्वर मेघवाणीतून आब्राहामाला वतन मिळवून देतो. मात्र ह्या वतनावर इस्रायली जनतेचे वर्चस्व फार उशिराने होते. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक खाच-खळग्यांतून जावे लागते. इस्रायली जनता देवापासून दूर जाते, परंतु परमेश्वर मात्र त्याने केलेला करार मी तुमचा देव व तुम्ही माझी प्रजा आहातहे विसरत नाही.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
पौल ख्रिस्ती बांधवाना आपल्याप्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आवाहन करीत आहे. आपण घेतलेल्या निर्णयावर पौल ख्रिस्ती जनांस विचार-विनिमय करण्यास सांगत आहे. पौल, ‘ख्रिस्ताच्या क्रुसाचे शत्रूअसे संबोधताना, केवळ अधर्मी व जे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार करत नाही अशांचा उल्लेख करीत नाही; तर अनेक ख्रिस्ती जनही त्यामध्ये सामील आहेत असे त्यांस सांगावयाचे आहे असे दिसून येते. कारण त्यांचा विश्वास व त्यांचे जीवनमान एकसमान नसून, ते विरोधाभास आहे असे वाटते. आपल्या जीवनात येणाऱ्या दु:खांपासून दूर पळून ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू बनले आहेत. ते ख्रिस्ताची स्तुतीसुमने गातात व आपण परिपूर्ण कसे व्हावे ह्यासाठी झटतात. पौल म्हणतो, ‘त्यांची वाटचाल ही विनाशाकडे आहे. ते ऐहिक जगात रमले आहेत. त्याविरोधात संत पौल ख्रिस्ती जनास म्हणतो की, ‘हे ऐहिक जग आपले मुळ स्थान नसून स्वर्गीय नंदनवन आपले ध्येय आहे. ह्या भूतलावर आपण फक्त एक क्षणभंगुर जीवन जगतो, परंतु स्वर्गात आपणास चिरकाल जीवन प्राप्त होईल. त्यामुळे आपली दृष्टी ही स्वर्गाकडे असावी; हे स्वर्गातील स्थान आपल्याला, आपला उद्धारक प्रभू येशू मिळवून देईल. जो अखिल पृथ्वीचा अधिपती आहे. येशू, आपले शरीर त्याच्या शरीराप्रमाणे वैभवशाली करून आपणास नवजीवन प्राप्त करून देईल. हे सर्व शक्य होण्यास, ‘प्रभूच्या येण्याची प्रतिक्षा, आपण विश्वासाने करावी व ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आपले आचरण ठेवावे असे संत पौल म्हणतो.

शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६
     येशूच्या रुपांतराची कथा आपणास मार्क, लुक व मत्तय ह्या तीनही शुभवर्तमानात आढळून येते. मत्तय शुभवर्तमानकार येशूला नवीन मोशे म्हणून गणतो. तर लुक शुभवर्तमानकार येशू प्रार्थनेत मग्न होऊन, त्यांस हा अविष्कार होता असे म्हणतो. लुकलिखीत आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू परमेश्वराचा परमप्रिय पुत्र असल्याचे जाहीर होते. येशूचे रुपांतर हे त्याच्या मरणोत्तर पुनरूत्थानाचे व त्यानंतरच्या सार्वकालिक जीवनाची जणू एक पूर्वसुचना करुन देते. येशू प्रार्थना करावयास डोंगरावर जातो. डोंगर हे त्याकाळच्या परंपरेनुसार परमेश्वराच्या प्रकाटीकरणाचे स्थळ होते. येशू प्रार्थना करीत असावा, परमेश्वराचे वैभव एका लखलखीत प्रकाश झोताप्रमाणे त्याच्या शरीराला भेदून गेले व येशूचे वस्र पांढरे शुभ्र झाले व तो दैदीप्यमान दिसू लागला. लखलखीत प्रकाश हे दैवी नगरीचेप्रतिक होय. येशू हा ख्रिस्तम्हणजेच परमेश्वराचा अभिषिक्त’, हे त्यावेळी प्रकट झाले. मग मोशे आणि एलिया हे दोघेजण त्याच्याशी बोलताना त्याच्या शिष्यांना दिसले.
मोशे आणि एलिया ह्या दोघांना परमेश्वराचे दर्शन डोंगरावर झाले होते. मोशेने परमेश्वराकडून दहा आज्ञा सिनायपर्वतावर स्वीकारल्या व एलिया संदेष्याला परमेश्वराचे दर्शन होरेबपर्वतावर झाले आणि येशुसुद्धा ताबोरपर्वतावर प्रार्थना करीत होता. मोशे व एलिया ह्यांनी परमेश्वराने दिलेली जबाबदारी पार पाडली होती. मोशेने इस्रायली जनतेस फारोच्या गुलामगिरीतून सुटका करून सोडवले व वचन दिलेल्या देशात त्यांची वाटचाल केली. तर एलीया संदेष्ट्याने तारणारा आपले तारण कसे करील ह्याचे भाकीत केले होते. हे दोन्ही महापुरुष केवळ येशू करीत असलेल्या समर्पनासाठी, त्याला पाठींबा देण्यासाठी आलेले नसून, ‘येशूहाच मसीहा’, ‘तारणाराआहे ह्याची ग्वाही देण्यास आले होते. स्वर्गातून आलेली वाणी हि येशूच्या बाप्तीस्म्याच्या वेळीसुद्धा होती. ही वाणी सांगते कि, येशू हा देवपुत्र होता व देवाने ख्रिस्ताद्वारे आपणास त्याची मुले म्हणून स्वीकारले आहे. येथे येशूचे रुपांतर हे त्याचे दुख:सहन, मरण व पुनरुत्थान ह्यांची सुरुवात आहे असे संत लुक मांडतो.

मनन चिंतन:
लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशू प्रार्थना करीत असता त्याचे रुपांतर झाले. प्रार्थनेत नम्र झालेला येशू उंचावला गेला. येशूने प्रार्थनेला महत्वाचे स्थान दिले. आपल्या बाप्तिस्म्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, शिष्य निवडण्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, चमत्कारापुर्वी प्रार्थना केली व शेवटी दु:ख सहन करण्यापुर्वी त्याने प्रार्थना केली. येशूने दिवसातील पुष्कळ वेळ केवळ प्रार्थनेसाठी दिला होता. आपली प्रार्थना ही केवळ पोपटपंची नसावी तर परमेश्वराठायी मन एकरूप करणारी असावी. खऱ्या अंत:करणाने केलेल्या प्रार्थनेत परमेश्वराशी समेट होतो, आपण त्याच्याठायी एकरूप होतो. ख्रिस्त जेव्हा परमेश्वराशी एकरूप झाला तेव्हा तो पूर्णत: प्रकाशमान झाला. परमेश्वराठायी साचलेली एकरूपता आपणालाही प्रकाशमान करते. आपले अंत:करण बदलून टाकते.
येशूचे रुपांतर हे त्याच्या जीवनात कायापालट करणारी घटना होती. ख्रिस्त हा लोकांना चमत्कार करून व आपल्या प्रवचनाद्वारे दयेकडे आकर्षित करीत होता. पण आता मात्र त्याला डोंगर उतरून येरुशलेम नगरीत प्रवेश करावयाचा होता; गेथसमनी बागेची वाट चालत शेवटी कालवरी टेकडी चढायची होती. रूपांतरामुळे येशूला पित्याच्या प्रेमाची जाणीव झाली. ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्यावेळी पित्याने आपल्या प्रेमाची ओळख करून दिली, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्या बाबतीत मी संतुष्ट आहे,’ व रूपांतराच्या वेळी परमेश्वर म्हणतो, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका’.
येशूचे झालेले रुपांतर हे केवळ त्याच्या स्वत:साठी नसून ते शिष्यांसाठी होते. ते त्यांस धीर देण्यासाठी होते. कारण येशू त्याच्या रुपांतरानंतर येरुशलेम नगरीत जाणार होता. तेथे त्याचा छळ होणार होता. त्यास दु:ख सहन करायचे होते व शेवटी एखाद्या लुटारुप्रमाणे क्रुसावर मरण पत्करायचे होते. या सर्व गोष्टी पाहण्यास त्याच्या शिष्यांस धीर देण्याची गरज होती हे येशू जाणून होता. येशू त्यांस भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची जणू एक पुर्वसुचना देतो व त्याच्या पुनरुत्थानाविषयीची कल्पना देतो.
शिष्यांना हा प्रसंग अतिशय आल्हाददायक वाटत होता म्हणून पेत्र म्हणाला, ‘प्रभो आपण येथे असणे फार छान आहे’. परंतु येशू त्यांना तिथे राहावयास मनाई करतो. कारण येशूला त्यांची गरज होती. गेथसमनी बागेत त्याला त्यांच्या प्रार्थनेची गरज होती परंतु ते झोपी गेले; येशूला जेव्हा धरून नेले तेव्हा सर्व शिष्य पळाले. आपणही शिष्या प्रमाणे वागतो का? आनंद, उत्सव सर्वांनाच आवडतात. आनंदाच्या वेळी, यशाच्या वेळी आपण जणू म्हणतो, ‘प्रभो हे सर्व चांगले आहे; परंतु थोडे दु:ख वाट्याला आले तर शिष्यांप्रमाणे आपण पळून जातो. आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो, ‘परमेश्वर हे दु:ख माझ्याच वाटयाला का’? ‘आयुष्यात जर दु:ख नसेल तर सुख काय आहे हे आपणाला कधीच कळणार नाही’. ‘प्रकाशाची जाणीव जशी अंधारात होते त्याच प्रमाणे सुखाची, आनंदाची जाणीव ही दु:खामध्ये होते’. अपयशाच्या चिखलात पाय रोवल्याशिवाय यशाची कमळे हाती लागत नाही. ख्रिस्ताचे खरेखुरे अनुयायी बनायचे असेल तर आपण आपल्या दु:खाचे क्रूस वाहिले पाहिजेत तरच आपणास पास्काचा आनंद मिळेल.
ख्रिस्तासमवेत आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण सुखकारक असतो. परंतु ज्यावेळी आपण त्यावेळात साधलेला संवाद प्रत्यक्ष जीवनात आचरण करतो, त्यावेळी आपणास खरा आनंद प्राप्त होतो. आजचे जग हे क्षणभंगुर, सुखाच्या मागे धावत आहे व आपणही ह्या शर्यतीत सरपटले जात आहोत. परंतू ख्रिस्त आपणास म्हणतो, ‘खरा आनंद, सुख मी तुम्हाला देत आहे’. जग दु:ख, संकटे ह्यांना टाळण्याचे अनेक उपाय सांगत आहे परंतु ख्रिस्ताने दु:खाला सामोरे कसे जावे व त्यावर मात कशी करावी हे दाखवून दिले आहे.ज्याप्रमाणे येशूचे रुपांतर झाले, त्याचप्रमाणे आपलेही पुनरुत्थानावेळी रुपांतर होईल व येशुप्रमाणे आपणही तेजमान होईल. त्यासाठी आपण आपली दृष्टी स्वर्गीय राज्याकडे लावायला हवी व परमेश्वराची योजना आपल्या जीवनाद्वारे पूर्णत्वास नेली पाहिजे. येशूने सुद्धा तेच केले. आपल्या पापांसाठी त्याने क्रुसावर मरण पत्करले व स्वर्गीय नंदनवनात आपणास सामील करुन घेतले. येशूचे रुपांतर शहरापासून दूर, डोंगरावर झाले, म्हणजेच आपण जर ह्या एैहिक जगात गुरफटले असलो तर परमेश्वराच्या सानिध्यात कधीच येऊ शकणार नाही. आपण थोडा वेळ बाजूला सारून त्याच्या सानिध्यात घालवला पाहिजे. हे एैहिक जग सर्वस्व नसून त्यानंतरही जीवन आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. येशूला आपणा सर्वांस ह्यात सहभागी करून घ्यायचं आहे म्हणूनच तो आपल्या शिष्यांना आपले प्रतिनिधी म्हणून त्याच्या ह्या दैदीप्यमान-पणाचा अनुभव देतो. आपण सर्व त्या चिरंतर जीवनाचे वाटेकरी होऊया, पण त्याअगोदर आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवूया परमेश्वराच्या सानिध्यात राहून आपले रुपांतर करूया. आपण सर्व जगात राहून ख्रिस्ताकडे वळूया, त्याच्या शिकवणुकी-प्रमाणे वागूया व शेवटी त्या स्वर्गीय नंदनवनात सहभाग घेऊया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांस तुझ्या कृपेने नवजीवन दे.

१. आपले परमगुरु, धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी यांनी ख्रिस्ताप्रमाणे स्वर्गीय नंदनवनाचे पुढारक व्हावे व त्यांना अडचणींवर मात करण्यास प्रभूने कृपा-शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाची धुरा वाहणारे आपले राजकीय नेते व पुधाकारी ह्यांच्या हातून आपल्या देशातील  लोकांची सेवा व्हावी व  देशाला प्रगती पथावर न्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपण सर्वांनी ह्या जगातील एैहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशूप्रमाणे आपलेही रुपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे निराश आहेत, हताश आहेत अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासूपणे जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 7 March 2019


Reflection for the Homily of 1st SUNDAY OF LENT
(10-03-19) By Br. Amit D’Britto    





उपवास काळातील पहिला रविवार


दिनांक: १०/०३/२०१९
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३
शुभवर्तमान: लूक ४:१-१३





"मोहापासून आम्हाला दूर ठेव"

प्रस्तावना:
     आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूने कशाप्रकारे मोहावर विजय मिळवला हे दाखवून आपणां सर्वांना सुद्धा मोहांवर विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.
     अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधामधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल जो अंत:करणात येशूवर विश्वास ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईलअसे सांगत आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.
येशूने मोहावर मिळवून आपल्यासाठी तो एक आदर्श बनला आहे. म्हणून त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१० 
पुरातन इस्रायलमध्ये परमेश्वराची केली जाणारी पूजा-अर्चना ही देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आणि मिसऱ्यांपासून त्यांच्या सुटकेबद्दल दिलेली उपकार स्तुती व धन्यवादाचा भाग होता. ह्या ऋणानिर्देशात त्यांना जमिनीच्या देणगीहूनही अधिक प्रिय होते ते म्हणजे देवाची आठवण व उपकारस्तुती. (ओवी ५-१०) हा अनुवाद २४ ह्या अध्यायातील महत्वाचा गाभा आहे. ह्या उताऱ्यात इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या पुढ्यात मांडलेली अर्पणे ही त्यांच्या प्रायश्चिताचे प्रतिक आहे. कारण पूर्वजांच्या जमिनीशिवाय त्यांचे अस्तित्व शून्य आहे असे ते मानात. देवाने त्यांच्यावर त्यांच्या पूर्वजांकरवी केलेल्या ह्या महत्कृत्यामुळे त्यांनी देवाला उत्पन्नाचा दशांस भाग अर्पण केला. एक परिवार म्हणून केलेले सहभोजन हासुद्धा त्यांच्या आनंदोत्सवाचा व ऋणानिर्देशाचाच भाग होता.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३
          संत पौलाचा प्रस्तुत उताऱ्यात यहुद्यांविषयीचा कठोरपणा दिसून येतो, परंतु ह्यामागचा हेतू हाच होता की, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा व त्यांच्याद्वारे यहुद्यांचे तारण व्हावे. परंतु हे सत्य जरी पौलाने मायेने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी त्यात कटुता आणि ताठरपणा अनुभवला. यहुद्यांना देवाबद्दल आस्था व लगाव आहे, ह्याची जरी पौलाला जाणीव होती, तरी त्यांची ही आस्था चुकीचे मार्गक्रमण करत होती हे त्याला ठाऊक होते. यहुदी पंत हा नियम व रूढी पाळण्यात अतिशय चाणक्ष होता. त्यांची अशी खात्री होती की, हे सर्व नियम कटाक्षाने पाळल्याने त्यांना देवाची कृपावरदाने लाभेल व ते देवाच्या अगदी जवळ जातील.
यहुद्यांनी नियमानुसार, लोकांनी केलेल्या चांगल्या वाईट वर्तणुकीवरून त्यांची वर्गवारी केली होती. ह्या सर्वांना अंत म्हणून संत पौल सांगतो, की, येशू ह्या नियमांचा शेवट किंवा अंत असा आहे. तो म्हणतो, ‘ख्रिस्तानुमते देवाला समाधानी करण्यासाठी अशा नियमांचे पालन करणे रास्त नाही तर देवाचे प्रेम, दया आणि कृपा ह्यांचे अंत:करणात जतन करून कृतीत उतरविणे योग्य आहे’. संत पौल येथे देवावरील विश्वासाने आपले तारण होईल असे म्हणतो.

शुभवर्तमान:  लूक ४:१-१३ 
शुभवार्तिक संत लूकने येशूची जनसमुदयासमोर कामगिरी करण्यापूर्वीची तयारी लिखित केली आहे. यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतल्यानंतर नभातून झालेल्या पित्याच्या वाणीने त्यास त्याचा परमप्रिय पुत्र व मसीहा म्हणून घोषित केले. तद्नंतर पवित्र आत्म्याने त्यास यार्देन जवळील अरण्यात परीक्षा घेण्यास नेले. तेथे येशूने चाळीस दिवस रात्र उपवास केला आणि नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. पहिल्या ख्रिस्ती समूहाने ह्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता हा प्रसंग तीनही शुभवर्तमानात मुख्य स्वरुपात मांडलेला आहे. ही घटना विशेष आणि महत्वाची आहे कारण ह्यात येशूचा मानवी स्वभाव दिसून येतो.
सैतानाने त्याची परीक्षा घेतली : सैतानाने केलेल्या परीक्षेत येशू खालील तीन विशेष मोहांवर विजय मिळवितो.
१) ऐहिक (एैश्वर्य) गोष्टींचा मोह. २) अधिकाराचा मोह ३) प्रतिष्ठेचा मोह
परंतु येशू उचित बायबल मधील ओव्यांनी किंवा देवाच्या वचनांद्वारे ह्या सर्वांवर मात करतो व त्यावर विजय मिळवतो. उदा: अनुवाद ८:३; ६:१३; ६:१६. सैतान येशूला मोहात पाडण्यात अपयशी ठरला परंतु तो पुन्हा काहीतरी अशाच गोष्टींची संधी शोधत होता.

बोधकथा :
एकदा सॅॅमसन आपल्या आजोबा सोबत बागेत फिरत होता. फिरत असताना आजोबा सॅॅमसनला समाजात होत असलेल्या अत्याचार व हिंसा ह्याविषयी सांगत होते. तेव्हा सॅॅमसन आजोबांना प्रश्न विचारतो कि, “तुम्हाला ह्या हिंसा व अत्याचाराबद्दल काय वाटते?” तेव्हा आजोबा उत्तरतो, “मला असे वाटते कि, माझ्या हृदयात दोन वाघ भांडण करत आहेत. त्यामधील एक वाघ हा रागीट, खुन्नसी आणि हिंसक आहे; तर दुसरा वाघ हा प्रेमळ, क्षमाक्षील आणि दयाळू आहे.” सॅॅमसन परत विचारतो, “त्यामधील कोणता वाघ यशस्वी ठरेल.आजोबा म्हणतो, “ज्या वाघाला मी अधिक प्रोस्ताहित करून उत्तेजन देतो तोच यशस्वी होईल.
ह्या उपवास काळात आपल्याला होणाऱ्या मोहाला वाव किंवा उत्तेजन न देता आपण त्यावर प्रभू येशुप्रमाणे विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. जर आपण आपल्या मोहास पाठबळ दिले तर आपण देवापासून दूर जाऊ; आणि जर आपण मोहावर विजय मिळवला तर आपण प्रभूच्या समीप येऊ शकतो.

मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभू येशूला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; आणि तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. आपले प्रथम पालक आदाम व हव्वा ह्यांना मोह झाला व ते त्या मोहास बळी पडले. इस्राएली प्रजेची वाळवंटात परीक्षा पाहिली आनी ते सुध्दा अपयशी ठरले. परंतु येशूला झालेल्या मोहावर तो विजय मिळवतो. येशूची अरण्यातील ही परीक्षा उपवासकाळाच्या सुरुवातीला पाहिली जाते. कारण ती उपवास काळातील चाळीस दिवासांशी समांतर आहे.
          ‘मोह होणे’ हे काही पाप नाही; परंतु पाप करण्यास एक प्रकारचे आमंत्रण ठरते. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला विविध प्रकारचे मोह होत असतात.  तसेच मोह होण्यापासून या जगातील कोणतीही महान व्यक्ती सुटली जात नाही. अब्राहम, मोशे, ईयोब, मरिया अनेक संत ह्या सर्वांना मोह होते होते. इतकेच नव्हे, तर खुद्द देवपुत्र प्रभू येशुलाही मोह झाला. पण जर आपण त्या मोहाला बळी पडलो तरच परिस्थिती गंभीर होते. मोह हा सैतानापासून येत असतो आणि त्याचा हेतू हा आपला घात करून आपल्याला देवापासून दूर नेण्याचा असतो. सत्य असे आहे की, आपल्याला मरेपर्यंत मोह होत राहतील.
          सैतान आपल्याला देवापासून दूर नेण्यासाठी पुढील तीन प्रकारच्या मोहाचा वापर करतो: ऐहिक गोष्टी, अधिकार, प्रतिष्ठा. आजसुद्धा सैतान ह्या तिन्ही गोष्टींच्या सहाय्याने आपल्याला मोह करीत आहे.
१) पहिला मोह हा धोंड्याचे रुपांतर भाकरीत करण्याचा होता. कारण प्रभू येशूने चाळीस दिवस प्रार्थना व उपवास केल्याने तो खूप उपाशी व भुकेला होता. सैतान असा मोह करतो की, मानवी जेवण हे मिशनरी कार्यासाठी पुरेसे आहे व प्रार्थना, दान उपवास ह्याची गरज नाही. परंतु येशू म्हणतो, “मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही." म्हणजेच आपली शाररीक भूक नव्हे तर, आत्मिक आणि आध्यात्मिक भूक भागवणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. हा होता भौतिक गोष्टींचा किंवा संपत्तीचा मोह.
२) दुसऱ्या मोहात सैतान येशूला जगातील सर्व राज्ये दाखवतो आणि त्याला म्हणतो की, “ह्यावर सर्व अधिकार तुला देईन, परंतु मला नमन कर.” येशू जाणून होता की संपूर्ण विश्वावर देवाचा अधिकार आहे. म्हणून सैतान हा खोट बोलत आहे. हा मोह अधिकार मिळण्याबाबत होता. म्हणून येशू म्हणतो, “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर.” इतकेच नव्हे, तर प्रभू येशू आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे क्रुसावर प्राण अर्पण करून नतमस्तक होतो.
३) तिसऱ्या मोहात सैतानाने येशूला उंच मंदिरावरून खाली उडी मारण्यास सांगितले. “कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, तो तुझे रक्षण करावयास दूतांना आज्ञा देईल.” येशूने उत्तर दिले, “परमेश्वर जो तुझा देव आहे त्याची परीक्षा पाहू नको.” हा प्रतिष्ठा मिळविण्याबाबतचा मोह होता.
संपत्ती, अधिकार, आणि प्रतिष्ठा ह्यांचा मोह अतिशय घातक आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात अशा मोहाच्या आहारी जाणे योग्य वाटते. परंतु आपण ह्या मोहापासून दूर राहिले पाहिजे. कारण ते आपली आत्मिक भूक भागवू शकत नाही. आपल्याकडे संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा कितीही प्रमाणात असली तरीही आपण तृप्त होऊ शकत नाही. हजार, लाख, करोड, अब्ज अशी ही वाटचाल आहे, ज्याला शेवट नाही.
          तसेच संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा ह्यांच्या मोहामुळे आपण अतिशय गर्विष्ठ बनतो व आपल्या सभोवतालच्या व्यक्तींना, जगाला विसरून जातो. येशूला झालेला मोह हा जरी बायबल मध्ये एकाच ठिकाणी नमूद केला असला तरीही आपल्या लक्षात येते की, येशूला पृथ्वीवर जीवन जगत असताना अनेक वेळा अशाच प्रकारे मोह झाला कारण तो आपल्याप्रमाणे मानवा होता. परंतु प्रत्येक क्षणी त्याने मोहावर विजय मिळवला व आपणही तसेच केले पाहिजे.
          ह्या उपवासकाळात तयार होण्यासाठी फादर वि. मा. दासन ह्यांच्या पुस्तकातील पुढील मुद्द्यावर मनन चिंतन करून आपण ते आत्मसात करूया.
१) उपवासकाळ हा तयारीचा काळ आहे:- प्रभू येशूने आपले सामाजिक कार्य सुरु करण्यापूर्वी चाळीस दिवस उपवास व प्रार्थना करून तयारी केली. आपणही ह्या उपवास काळात प्रभूच्या दुःखसहनावर मनन चिंतन करून आपली योग्य अशी तयारी करूया.
२) उपवासकाळ म्हणजे शुद्धीकरण:- जर आपल्याला देवाचे मित्र व्हायचे असेल, तर आपल्यामधील वाईट गुणांचा त्याग करून आपले आंतरिक शुद्धीकरण केले पाहिजे.
३) उपवास काळातील सहभाग:- प्रभूच्या दुःखसहनात सहभागी होत असताना आपण उपवास करून, आपली पापे शुद्ध करून व गरिबांना दानधर्म करून आपला सहभाग दर्शविला पाहिजे.
४) उपवासकाळातील आपला जाहीरनामा:- ह्या उपवासकाळात आपला प्रभूवरील विश्वास म्हणजेच, “येशू प्रभू आहे, जो मरण पावला आणि मेलेल्यांतून उठला.” (रोमकरांस पत्र १९:९) हे जाहीर करावे.
अशाप्रकारे देवाचे सवंगडी बनण्यासाठी व ह्या उपवासकाळात मोहावर विजय मिळविण्यासाठी अधिक प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.
) आपले पोपबिशप्सधर्मगुरूव धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य दयावे तसेच ह्या उपवास काळामध्ये त्यांनी उपवासाचेप्रार्थनेचे व दानधर्माचे महत्व आपल्या दररोजच्या जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

३) या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपण सर्वांनी ह्या प्रायश्चित काळात पापांपासून दूर राहून चांगले पवित्र जीवन जगावे व दुसऱ्यांना योग्य अशी मदत, प्रेम व क्षमा करावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी मांडूया. 

Friday, 1 March 2019



Reflections for the homily of 8th Sunday of ordinary Time (03-03-2019) by: Br. Jameson Munis





सामान्य काळातील आठवा रविवार



दिनांक – ०३-०३-१९
पहिले वाचन – बेनसिरा २७:४-७
दुसरे वाचन – पौलाचे करिंथकरास पहिले पत्र १५:५४-५८
शुभवर्तमान – लुक ६:३९-४५





“अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार”



प्रस्तावना
          आज आपण सामान्य काळातील आठवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला चांगुलपणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे. आजची वाचने सुद्धा चांगल्या झाडांची उपमा समोर ठेवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला सद्गुणांची फळे यावीत म्हणून सांगत आहे.
          जशी कुंभाराच्या मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा त्याच्या संभाषणात होते. कारण माणसाच्या बोलण्यावरून त्यांची मनोवृत्ती कळून येते. म्हणून आजचे पहिले वाचन आपल्याला कोणत्याही माणसाचे मत ऐकल्याशिवाय त्याची स्तुती कर नये असे उद्देशून सांगत आहे.
          देवाने आपल्या प्रभू येशू खिस्ताद्वारे आपणाला जय दिला आहे. तसेच प्रभू देव आपल्या लोकांना मरणाच्या मुखातून सोडून घेईल असे अभिवचन आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात करत आहे. आजच्या लूकलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त लहानश्या दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन आपल्या शिष्यांचा स्वभाव चांगल्या झाडासारखा व प्रेमळ अंतःकरणाचा असावा असे सांगत आहे. आपली जीवनशैली व वागणूक चांगली व प्रेमळ बनावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात भाग घेऊन लागणारी शक्ती व कृपा आपण परमेश्वराकडे मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिरा २७:४-७
          बेनसिरा आपल्या पुस्तकात चांगल्या संभाषणाचे कौशल्य दाखवतो. जसे सूप हलवल्याने त्यातील कचरा दिसतो, तसेच माणसाचा दृष्टपणा त्याच्या भाषेतून दिसून येतो. तसेच ज्याप्रमाणे कुंभाराच्या मडक्याची परीक्षा जशी भट्टीत होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा संभाषणात होते. जेव्हा माणूस चांगले बोलतो, तेव्हा त्याच्या हृदयात चांगुलपणा आहे हे दिसून येते. परंतु जर एखादी व्यक्ती वाईट बोलत असेल, तर त्यांच्या मनात कडूपणा असतो. म्हणून माणसाच्या बोलण्याच्या प्रकारावरून त्यांची मनोवृत्ती कळून येते. भाषा ही देवाने दिलेली देणगी आहे. म्हणून आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना व आपणाला सुध्दा लाभ झाला पाहिजे. आपण चांगले, सत्य व खरे बोलायला हवे. असा संदेश पहिल्या वाचनात आपल्याला ऐकावयास मिळत आहे.   

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:५४-५८
          आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौल होशेय १३:१४ ह्या भविष्यवादाचा उल्लेख करत आहे. तो म्हणजे, “देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला जय दिला आहे. तसेच, प्रभू देव आपल्या लोकांना मरणाच्या मुखातून सोडवून घेईल असे अभिवचन भाकीत केले आहे. पाप हे मरणाचे कारण आहे. ख्रिस्ताने मरणाच्या अधिसत्तेवर आक्रमण करून त्याची नांगी मोडून टाकली. हा सर्वात महान विजय आहे. यासाठी देवाची स्तुती करून त्याचे उपकारस्मरण केला पाहिजे. अश्या प्रकारचा संदेश दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो.

शुभवर्तमान: लूक ६:३१-४५
          लूकलिखित शुभवर्तमानत येशू ख्रिस्त लहानशा दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन आपल्या शिष्यांचा स्वभाव चांगल्या झाडासारखा असावा असे दाखवत आहे. मनुष्याच्या अंतःकरणात जे भरले आहे, तेच त्याच्या मुखातून निघते, हे सुध्दा येशू ख्रिस्त ह्या शुभवर्तमानात सांगत आहे. ह्या सुवचनांच्या पहिल्या समुहात आध्यात्मिक दृष्टी ठेवण्याचा मुद्दा दिला आहे. म्हणजे आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही, नाहीतर दोघेही खाली पडतील. असा प्रयत्न मूर्खपणा ठरतो. दुसऱ्या समूहात, शिष्यांनी शिक्षक होऊन दुसऱ्यांना शिक्षण देण्याअगोदर स्वतः शिकले पाहिजे. तिसऱ्या समुहात दुसऱ्यांचे दोष दाखविण्यापूर्वी शिष्यांनी स्वतःकडे स्पष्टपणे पहावे, आपले परीक्षण करावे. त्यानंतर दुसऱ्यांच्या डोळ्यातले मुसळ काढावे. चौथ्या समूहात चांगले झाड व वाईट झाड म्हणजे शुद्ध अंतःकरणातूनच सदाचरण होणार असे ऐकतो. दृष्टांकडून चांगल्या कृतींची अपेक्षा करणे हे वाईट झाडापासून चांगले फळ मिळविण्यासारखे खुळेपणाचे लक्षण आहे. ज्यांच्या अंतःकरणात उत्तोमोत्तम गोष्टींचा साठा आहे, त्यालाच चांगले शिक्षण देता येईल. असे येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे.

बोधकथा:    
          विनीत शेमकी पदवी पास करून आला. त्याने आजूबाजूला पाहिले. कुणीच शेती करीत नव्हते. त्याने आपल्या शेतात नव्या जातीची आंबे, पेरू, चिकू, फणस ह्या फळांची कलमे आणून लावली. थोड्या वर्षानंतर त्याना भरपूर व मोठ्या प्रतीची रसाळ, चवदार, फळं येऊ लागली. फळं पाहून गावातील अनेक माणसांनी विनीतचे कौतुक केले. शेतात आपण सोनं पिकवू शकतो, असे गावातील माणसांना वाटू लागले. त्यांनी विनीतची मुलाखत घेतली. जॉन्सन विनीतच्या नर्सरीमध्ये गेला. त्याने चांगली चिकू, पेरू, हापूस आंब्याची, नारळाची, पपयांची इत्यादि फळांची कलम आणली व जमिनीत लावली. काही काळानंतर जॉन्सनची प्रगती झाली. त्याला आनंद झाला. अशाप्रकारे अनेकांनी अनुकरण केले व त्या गावाची प्रगती झाली. विनीताला सुद्धा बरे वाटले.
तात्पर्य: माणसाचा न्याय त्याच्या कृत्यांवरून केला जातो. माणसाच कर्म त्याचं जीवन दर्शविते. आपण सर्वच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे तसे करीत असतो.   

मनन चिंतन :
          आज आपण चांगुलपणा यावर मनन चिंतन करणार आहोत. आजची उपासना आपल्याला सांगत आहे की, जे आपल्या अंतःकरणात भरले आहे, तेच मुखावाटे निघते. ज्या परमेश्वराने संपूर्ण विश्वाची व मानवजातीची निर्मिती केली आहे तोच परमेश्वर सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की, आपल्या जीवनात चांगली फळे यावीत. आपण ख्रिस्ती असून सुध्दा आपली वागणूक ही ख्रिस्ताच्या शिकवणुकीला साजेशी नसते. आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे आपण आपले व आपल्या धर्माचे चित्र इतरांसमोर उभ करतो.
          सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या कृत्याने व वागणुकीद्वारे आपली परीक्षा केली जाते. मराठी भाषेत एक सुंदर अशी म्हण आहे, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसेच हृदी असे ते वचनी दिसे.म्हणजेच आपल्या शब्दाद्वारे व कृत्यांद्वारे आपण आपले मन लोकांसमोर मांडत असतो. आपल्या मनातले आपल्या कृतीद्वारे आपण इतरांना दाखवत असतो. ज्यांच्या हृदयात प्रेम, दया, क्षमा आहे तो मनुष्य इतरांना क्षमा करतो. तो दीनांना दया दाखवतो. कोणत्याही जातीधर्माच्या माणसांना तो प्रेम दाखवतो. त्याच्याठायी निंदानालस्ती नसते. तो सूड घेत नाही, तिरस्कार करत नाही. जो कष्टाळू आहे तो आळशीपणाचे दर्शन घडवत नाही. तो शिस्तप्रिय व जबाबदार वाटतो व जो निस्वार्थी असतो तो स्वार्थी वृत्ती दाखवत नाही.
          आजच्या तिन्ही वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला एक चांगली अशी सूचना करीत आहे. ती म्हणजे आपला जीवनवृक्ष चांगला असू द्या म्हणजे त्याला चांगली फळे येतील. आपले ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताच्या शिकवणुकीवर व ख्रिस्ती मूल्यांवर आधारित असले पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात ऐकले की, जसा कुंभाराच्या मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा त्याच्या संभाषणातून होते. म्हणून आपले बोलणे, वागणे व चालणे चांगले पाहिजे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, जेव्हा आपण चांगले जीवन जगतो म्हणजेच पापाच्या मोहाला बळी पडत नाही तेव्हा देव आपल्याबरोबर असतो, तोच आपला सांभाळ करतो. तसेच शुभवर्तमानात येशू ख्रिस्त लहानशा दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन आपले जीवन, स्वभाव, बोलणे व चालणे चांगली असावीत असे सांगतो.

          ख्रिस्त हाच मार्ग, सत्य व जीवन आहे. ख्रिस्ताच्या हाती आपले जीवन सोपवले तर आपण ख्रिस्ताप्रमाणे बनू शकतो. ख्रिस्ताप्रमाणे आपण नम्र व प्रेमळ असले तर आपल्या जीवनात चांगली फळे येतील. प्रत्येक पालकाला असे वाटते कि, आपली मुले चांगली असावीत. प्रत्येक धर्मगुरूला असे वाटते कि आपल्या धर्माग्रामातील लोक ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे वागवीत. प्रत्येक व्यक्तीला वाटते कि मी चांगला आहे असे लोकांच्या मुखातून ऐकावे. म्हणूनच आपल्या जीवनात चांगली फळे यावीत म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा आमच्या जीवनाला चांगली फळे येऊ दे.

१) आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस आध्यात्मिक मेंढपाळ, ह्यांना त्यांच्या कार्यात प्रभूचा सतत वरदहस्त लाभावा, त्यांना प्रभुणे चांगले आरोग्य बहाल करावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्त सभेची प्रगती होत रहावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 

२)आपल्या देशातील राज्यकर्ते व अधिकारी ह्यानी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. 

३) ज्या कुटुंबात स्त्री-पुरुषात व मुला-मुलीत जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे त्यांचे जीवन चांगल्या झाडासारखे बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४)आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतःकरणे उघडून येशू ख्रिस्ताचा संदेश समजून तो आपल्या जीवनात जगण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मागुया तसेच त्यांच्या इच्छा व हेतु सफळ व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५)जे कोणी आजारी आहेत, अश्या सर्व व्यक्तीना देवाच्या सुखद हाताचा स्पर्श व्हावा व त्यांना चांगले आरोग्य मिळावे, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.  

६) आपण आता आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.