Allwyn Gonsalves hails from St. Gonsalo
Gracia Church, Gass, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin
Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at
JDV, Pune.This homily leads faithful to prepare for the coming of our Saviour
Jesus Christ.
आगमन काळातील
पहिला रविवार
०१/१२/२०१३
वर्ष-अ
यशया २:१-५.
रोमकरांस पत्र १३:११-१४.
मत्तय २४:३७-४४.
"जागृत राहा, कारण आपला न्याय-निवाडा करण्यास
येशूख्रिस्त पुन्हा येईल."
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आज ख्रिस्तसभा आगमन काळातील पहिला रविवार साजरा करत आहे.
नाताळच्या अगोदरचे चार रविवार आपण आगमन काळातील रविवार असे म्हणतो. Adventus ह्या लातिन
शब्दाचा अर्थ 'आगमन' म्हणजेच प्रारंभ. आपण
ह्या काळात येशूच्या आगमनाची तयारी करतो. आजची पवित्र वाचने आपल्याला सांगतात की देवाने आपणावर अफाट प्रेम केले आणि आपल्याला तारणकर्त्याचे
आश्वासन दिले. त्याच्या आगमनाची तयारी तो यथायोग्य करत आहे तसेच आपणदेखील आपल्या मनाने
व देहाने येशूच्या आगमनाची तयारी केली पाहिजे.
पहिले वाचन:
ह्या वाचनाद्वारे
यशया संदेष्टा आपणा सर्वांना सांगतो की देवाच्या नवीन राष्ट्रांमध्ये सर्वांचा न्याय
केला जाईल व देवाची शांती सर्व लोकांवर असेल. त्यामुळे आम्हास देवाच्या प्रकाशात चालण्यास
आधार मिळेल.
दुसरे वाचन:
संत पौल रोंमकरांस
लिहिलेल्या पत्रात त्यांना कळकळीची विनंती करतो की आपले तारण जवळ आले आहे; संदेष्टा
येत आहे त्यामुळे आपण झोपेमध्ये न राहता जागृत राहिले पाहिजे व त्याचे स्वागत करण्यास
सदोदीत तत्पर राहिले पाहिजे. त्यासाठी आपण पश्चाताप करायला हवा व देवाच्या सानिध्यात
राहून आपण आपल्या जीवनातला व दुस-यांच्या जीवनातला अंधकार दुर करू शकतो.
शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तमानात
आपल्याला दोन प्रतिमा दिल्या आहेत - दोन व्यक्ती शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यातील
एकाला निवडले जाईल व दोन स्रिया दळण करत बसल्या असताना त्यांच्यातील एकीची निवड केली
जाईल. ह्या प्रतिमा आपल्याला असा उपदेश देतात कि देव कोणत्या दिवशी व कोणत्या घटकेस
येणार हे आपल्याला माहित नाही; परंतू हे मात्र खरे आहे कि देव येईल व त्याच्या इच्छेनुसार
व आपल्या कृत्यानुसार आपला न्याय-निवाडा करील. त्यामुळे आपण सदोदीत जागृत राहून देवाचा स्विकार करण्यास आतूरतेने वाट पहिली पाहिजे.
सम्यक विवरण:
१ मत्तयलिखित शुभवर्तमानास "ख्रिस्तसभेचे
शुभवर्तमान" म्हटले जाते. "जुन्या करारातील संदेष्टयांची भविष्यवाणी पूर्ण
होण्यासाठी हे झाले" असे मत्तयने सुमारे चाळीस वेळा आपल्या शुभवर्तमान म्हटलेले
आढळते(१:२३,२:१५,२:१८ इ.). यहुदी समाज जुन्या नियमशास्त्राशी फार परिचित होता. जुन्या
करारात ह्याच येशूची ओळख करून दिली आहे. प्रत्येक भविष्यवाणीशी ख्रिस्ताचा सबंध आहे
हे दाखवण्याचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.
थोडक्यात, एका यहुदी माणसाने यहुद्यांसाठी यहुदी तारणा-याचे लिहिलेले हे शुभवर्तमान
आहे. आजच्या शुभवर्तमानात मत्तय ह्या शुभवर्तमानकाराने येशू व त्यांचे शिष्य ह्यांमधले
संभाषणाचे वर्णन केले आहे. येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो कि, ''माझे आगमन हे न्याय
करण्यासाठी असेल.'' नोहा व त्यांच्या कुटुंबाने येणा-या पूराची पूर्व तयारी केलेली होती त्यामुळे त्यांचे
पूरापासून संरक्षण झाले. त्यावेळेस दुसरे लोक मात्र मौज-मजा करत होते व ऐहिक जीवनाचा
आनंद घेत होते; त्यांनी जगाच्या अंताचा विचार कधीच केला नाही.
२ आजच्या शुभवर्तमानातील पुढच्या भागात आपण पाहतो
कि घरमालकाला माहित नाही चोर कोणत्या वेळेस व कोणत्या घरावर चोरी करणार आहे; त्यामुळे
घर मालक पूर्व तयारी करतो व सर्वकाळ तत्पर
राहतो. ज्याप्रमाणे चोर घर मालकाला सांगून येत नाही त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मृत्यूची
वेळ व न्यायाचा दिवस सांगितला जाणार नाही. ज्याप्रमाणे ते अकस्मात येणार त्याचप्रमाणे
ख्रिस्त अकस्मात येईल. ख्रिस्त या जगावर राज्य करण्यासाठी केव्हा येणार आहे ती घटका
पित्याला ठाऊक आहे(मत्तय२४:३६). त्या काळात जगातील लोक नेहमीप्रमाणे खात-पित असतील;
जगातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चाललेले असतील. नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा
असेच चालले होते. तसेच ख्रिस्त येईल तेव्हा तो न्याय करील. ज्यांनी सुर्वाता मानली
नाही ते घेतले जातील (म्हणजे मरतील) व ज्यांनी सुर्वाता मानली ते ठेवले जातील (मत्तय२४:४०,४१)
व हे मागे राहिलेले लोक ख्रिस्ताबरोबर राज्य करतील.
बोध कथा:
एके दिवशी
एका माणसाला निरोप मिळतो कि त्याला भेटायला कोणीतरी येणार आहे. परंतु त्या माणसाचे
नाव मात्र त्याला कळले नाही. परंतू ती व्यक्ती कसलाही विचार न करता त्याच्या आगमनाची
तयारी करू लागली. त्या माणसाने त्याच्या पाहुण्यासाठी एक चांगली खोली तयार केली, गोड
पदार्थ बनवले व स्वदिष्ट, चवदार जेवण करण्यास सांगितले. तो माणूस त्या पाहुण्याच्या
आगमनाची आतूरतेने वाट पाहत बसला असताना अचानक दुपारच्या प्रहरी त्याच्या दाराजवळ दोन
लहान मुले जेवण मागण्यास आली. त्या मुलांनी माणसाला विचारले 'आम्हाला खूप भूक व तहान
लागली आहे तुम्ही आम्हाला खावयास अन्न द्याल का?' तेव्हा तो माणूस म्हणाला, 'माझ्या
घरी कोण तरी येणार आहे; त्यामुळे जे खाद्यपदार्थ मी माझ्या पाहुण्यासाठी बनवले आहेत
ते मी तुम्हाला देऊ शकत नाही.' त्या मुलांना फार दु:ख झाले व ते निघून गेले.
दुस-या दिवशी
त्या व्यक्तीने विचारले, 'तुम्ही माझ्या घरी जेवण्यास येणार होते पण तुम्ही आले नाहीत.'
त्यावेळी तो माणूस उत्तरला, 'मी तुझ्या घरी आलो होतो परंतू तू मला घरात घेण्यास नकार
दिला, त्यामुळे मी निघून गेलो.' त्यानंतर त्या माणसाला कळून चुकले की काल जी मुले आली
होती तेच माझे खरे पाहुणे होते.
मनन-चितंन
(जीवनध्येय):
१. आज आपण आगमन काळातील पहिला रविवार साजरा करत आहोत.
देऊळ मातेने चार रविवार आपल्या सर्वांना येशूख्रिस्ताच्या जन्माची तयारी करण्यासाठी
आपल्यापुढे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक रविवारची वाचने हे आपल्याला सांगतात कि, ''तयार
राहा, जागृत राहा, मार्ग बनवा.'' कारण आपला तारणारा व देवाचा पुत्र ह्या जगात येणार
व आपल्या सर्वांचे तारण होईल व आपल्या सर्वांची पापांपासून मृक्ती होईल.
देवाने आपल्या
तारणासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पुथ्वीवर पाठवला. प्रभूच्या येण्याची सूचना देणारे
परुसिया, एपिफनी आणि अपॉकॅलिप्स हे तीन ग्रीक शब्द आहेत.
अ)
Parousia''परुसिया '': परुसिया म्हणजे 'आगमन,
वैयक्तिक समक्षता' (सर्वसाधारणपणे 'येणे') असे भाषांतर केले जाते.
- १ करिंथकरास;
१५:२३- ''ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.''
- १ थेस्सल;
५:२३- ''प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आगमनसमयी...''
-याकोब; ५:७-
''प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा.''
-फिलिप्पै;
२:१९- ''मी (म्हणजे पौल) जवळ असता.''
ब)
Epiphany (एपिफनी): ''एपिफनी'' या शब्दावरून 'प्रकट होणे; तेजस्वी, वैभवशाली' हे अर्थ सूचित होतात.
-१ तीमथ्य;
६:१४- ''आपला प्रभू येशू प्रकट होईपर्यंत.''
-२ तीमथ्य;
४:८- ''त्यांचे प्रकट होणे.''
-२ थेस्सल;
२:८- ''प्रभू आपल्या दर्शनाने (एपिफनी) त्याला नष्ट करील.''
क)
Apocalypse (अपॉकॅलिप्स): अपॉकॅलिप्स हा शब्द 'प्रकटीकरण वा पटल दूर करणे' असा अर्थ
सूचित करतो.
-१ करिंथ;
१:७- ''येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही...''
-२ थेस्सल;
१:७- ''येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल.''
२. आजच्या उपासनेद्वारे देव आपल्या सगंळ्याना सांगतो
कि सूर्य जसा पृथ्वीवर असतो तसेच माझे तुमच्याबरोबर अस्तित्व आहे. तुम्ही जर माझे चागलं
स्वागत केले तर मी तुमच्या अधिक जवळ येईन, तुमच्यात प्रवेश करीन आणि माझ्या अमर्याद
प्रेमाने तुम्हाला प्रकाशित करीन व माझी ऊब तुम्हाला देईन. नव्या करारातील अनेक उता-यांमध्ये
प्रभूच्या आगमनसमयी धार्मिकांना मिळणारे प्रतिफळ आणि अधार्मिकांस मिळणारी शिक्षा यांच्या
बाबत भेद दर्शविलेला आहे. उदा; मत्तय१३:३०, ४१-४३ मध्ये म्हटल्याप्रमाणे 'निंदन अग्नीत
टाकले जाईल व गहू कोठारात साठविले जातील.' मत्तय; २४:२२,२९-३१ मध्ये म्हटल्याप्रमाणे
'महासंकटाच्या त्या दिवसानंतरही निवडलेल्या त्या लोकांना एकवटण्यात येईल.' तर मग ज्यांनी
वेळीच पूर्वतयारी केली नाही त्यांचा धिक्कार असो! प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अपवाद सोडला,
तर जुन्या करारातील भविष्यवादीच त्या अखेरच्या शिक्षेच्या काळाचा तपशील देऊन त्याला
'प्रभूचा दिवस' असे म्हणतात. आपला प्रभू अकस्मात येईल तेव्हा आपल्याकडे सोपवलेले कार्य
आपण विश्वासूपणे पार पाडले असेल तर जेव्हा तो येईल तेव्हा त्याला किती धन्यता वाटेल!
जे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्विकार करतात त्यांच्यात पवित्र आत्मा कार्य करतो व ते
देवाची मुले होतात. हे लोक ख्रिस्ताच्या सभेचे भाग बनतात. जे ख्रिस्ताचा स्विकार करीत
नाहीत ते मूर्ख ठरतील. त्यामुळे आपण ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत जागृत राहावे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:
हे प्रभो, आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपले पोप
महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने
सर्वत्र समेटाचे कार्य करीत आहेत त्यांना यश प्राप्त व्हावे व हे कार्य करण्यास कृपाशक्ती
लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. संपूर्ण
जगात ख्रिस्ताच्या प्रेमाचे व नम्रतेचे महत्व सर्व मानव जातीला समजावे व सर्वत्र शांतीचे
व ऐक्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. हे प्रभू
परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत,
त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझी कृपा त्यांना लाभू दे व त्यांचे मनपरिवर्तन
व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आज समाजामध्ये
गरिबांना न्याय मिळत नाही त्यांना प्रभूच्या कृपेने न्यायाचे वरदान मिळावे जेणेकरून
त्यांच्यावर होणारे अत्याचार, अन्याय थांबून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने समाजामध्ये
जगता यावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या
स्वत:च्या कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी शांत राहून, आपण प्रार्थना करू
या.