Monday, 26 May 2014

Reflections By: Wickie Bavighar.









स्वर्गारोहणाचा सोहळा


पाहा, युगांतापर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.

दिनांक ०१/०/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये :-११.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १: १७-२३.
शुभर्वतमान: मत्तय २८:१-२०.

प्रस्तावना:
आज आपण येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. पुनरूत्थान हा आपल्या विश्वासाचा आणि आशेचा कण आहे. आजच्या पहिले वाचन येशूचे स्वर्गरोहण आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही माझे साक्षी व्हाल यावर प्रकाश टाकत आहे. तसेच दुस-या वाचनात संत पौल आपणास येशूच्या स्वर्गरोहणाविषयी सांगतो की सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले आहे.  
आजचे शुभवर्तमान आपणास सागंते की, ‘जा सर्व रा़ष्ट्रांना सुवार्ता सांगा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्माच्या नावाने बाप्तिस्मा द्या मी जे तुम्हाला आज्ञापिले, ते सर्व पाळावयास शिकवा.’ आजच्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया की आपणास देवाची सुवार्ता कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी व देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चांगले ख्रिस्ती जीवन जगता यावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:-

पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये १:१-११.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात येशू ख्रिस्त स्वर्गाला गेल्यावर ख्रिस्ती मंडळीची सुरुवात कशी झाली, मंडळीचा छळ, वाढ आणि निरनिराळ्या देशांत मंडळ्यांची स्थापना कशी झाली याची माहिती आहे. सुमारे ३० वर्षातील काही प्रमुख घटना लूकने लिहिल्या आहेत.
या वाचनात आपण पाहतो की, पवित्र आत्माची देणगी, स्वर्गरोहण आणि पृथ्वीवर करावयाचे कार्य लूकने नमूद केलेल्या प्रसंगातून दिसून येते. आजही काही ख्रिस्ती लोक अशी घटना घडण्याची अपेक्षा धरून आहेत. पण काळ/समय आपणाला माहित होणार नाही तरी अशी अपेक्षा ठेवणे त्यांच्या दृष्टीकोनातून योग्य आहे हे सूचित होत आहे.

     दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र  १: १७ - २३
ओवी १७ मध्ये ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा दयावा आशी विनंती आहे. ही बोलण्याची खास यहुदी रीत आहे याचा र्थ असा: अगोदरच मिळालेल्या आत्म्याकडून या गोष्टी मिळण्याचा अनुभव त्यांना यावा हीच पौलाची विनवणी असे. काही विशेष ज्ञान मिळावे म्हणून नव्हे तर खुद्द ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या देवाचे ज्ञान व समज अधिक सखोलपणे व्हावी हाच ह्या प्रार्थनेचा उद्देश असल्याचे लक्षात येते. म्हणजेच येशूकडे सोपवलेली सर्व शक्ती अधिकार मंडळीमध्ये पुर्वत्वाने कार्य करीत आहे हाच याचा अर्थ आहे.

शुभर्वतमान: मत्तय २८: १६ - २०
          येशू जिवंत आहे; तो सर्वभौम आहे.   गालीलात परत येणे म्हणजे समाधानाचा, सुटकेचा अनुभव घेणे. येशूच सेवासुवार्ता कार्याचा यथार्थ आरंभ बिंदू आहे. सर्वांचा राजा म्हणून राजासनारूढ केलेल्या पुनरुत्थीत ख्रिस्ताच्या भेटीतून सेवाकार्याचा आरंभ झाला.
अठराव्या वचनामध्ये पुन्हा दानियेल :१४ चे पडसाद उमटले आहेत. तथापि पूर्वीच्या उल्लेखात मनुष्याच्या पुत्राच्या सर्वांगिक, वैश्विक अधिकाराची परिपूर्ती भावी काळात व्हायची असे दानियेलच्या भविष्य संदेशातून दाखवले होते पण ती परिपूर्ती आता येशूच्या स्वर्गरोहाणाद्वारे साध्य झाली आहे.   त्याच अधिकाराला अनुसरून येशूने आता आपल्या शिष्यांना बाहेर पाठवले. त्यांनी आणखी अधिक शिष्य करून सर्व राष्ट्रांवर येशूच्या सत्तेचा प्रसार करायचा आहे. या शिष्यत्वाचे स्वरूप त्यांना बाप्तिस्मा देणे शिकविणे यातून स्पष्ट केले आहे. जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दया(मत्तय २८:१९). ह्या शब्दात आपल्या स्वर्गरोहणापूर्वी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आज्ञापिले व त्या दिवसापासून आजपर्यंत हा सुवार्ताप्रचार अखंडितपणे व अविरतपणे सुरु आहे.     
      
बोधकथा:
१.
     मार्टिन ऑफ टूअर्स हा ख्रिस्ती रोमन शिपाई होता. एका कडक हिवाळ्याच्या दिवशी तो एका शहरात जात असताना त्याला एका भिकाऱ्याने थांबविले व मदतीसाठी हात पुढे केला. थंडीमुळे तो भिकारी कुडकुडत होता. मार्टिनला जाणीव होती की मिलटरी नियमप्रमाणे सैनिकाचा कोट दुसऱ्यांना देता येत नाही म्हणून त्याने कोटाचे दोन तुकडे केले व अर्धा कोट त्या भिकाऱ्याच्या अंगावर टाकला. त्या रात्री मार्टिनला स्वप्न पडले की, स्वर्गात ख्रिस्त अर्धा कोट घालून फिरताना दिसला. देवदूतांनी विचारले. तुम्ही अर्धा कोट का घालता? तुम्हाला अर्धा कोट कोणी दिला? येशूने उत्तर दिले माझा सेवक मार्टिन ऑफ टूअर्सने दिले.
     तात्पर्य; ज्याने खिर्स्तासाठी व सुवार्तेसाठी स्वताच्या जीवनाचा त्याग केला आहे त्याला शंभर पटीने प्रतिफळ मिळेल.

मनन चिंतन:
प्रभू येशू ख्रिस्त मृतांतून परत उठला तो पुन्हा आपल्या पित्याकडे जाण्यासाठी, त्याचे मानवी जीवन हे जणू परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या एक दैवी जीवनातला अडसर होता. प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा परमेश्वर पित्याबरोबरच्या आपल्या सहजीवनास आरंभ करतो याची आम्हाला आठवण करून देतो.  
प्रभू येशूने शिष्यांना दिलेली शेवटची आज्ञा ही होती की, “जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दया”(मत्तय २८:१९); आणि त्याच्या शिष्यांनी ती आज्ञा खऱ्या अर्थाने पाळली. येशूचा शिष्य थोमा भारतात आला आणि त्याने आद्य भारतीय ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली. आजसुद्धा ख्रिस्ताचे अनेक थोर सेवक खरोखरच जगभर फिरून सुवार्ता सांगत आहेत पण प्रत्येक ख्रिस्ती माणूस प्रचारसभा आयोजित करू शकत नाही. तो स्वतःची पुस्तके प्रकाशित करू शकत नाही. सामान्य ख्रिस्ती माणसाला सुवार्ता सांगण्याची संधी मिळतेच असे नाही, तर त्याला अशी संधी आपले दैनंदिन जीवन जगत असताना शोधावी लागते. आपल्यापुढे येशूचे स्वतःचे उदाहरण आहे. त्याला कधी कोणी प्रमुख पाहुणा म्हणून भाषण करायला आमंत्रित करत नसत. अनेक लोक तर त्याला शत्रू समजायचे आणि त्याला मारायला टपलेले असायचे. पण येशूला जगाला पुष्कळ काही सांगायचे होते आणि म्हणून लोकांशी बोलायची कोणतीही संधी त्याने कधी गमावली नाही. आपण नव्या करारात वाचतो की, प्रभू येशू स्वर्गाच्या राज्याची घोषणा करत गावोगावी फिरला (लूक ८:१).
ज्या सुवार्तेवर आपला विश्वास आहे ती जर आपण कोणाला सांगितलीच नाही, तर लोक ती कशी ऐकतील? आणि लोकांनी ती कधी ऐकलीच नाही तर ते विश्वास कसा ठेवतील? म्हणून पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, ‘जे दूरवर जाऊन सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत’ (रोम १०:१४-१५); परंतु आजच्या ह्या जगात देवासाठी वेळ काढणे किती कठिण होत चालले आहे. आपल्या स्वतःसाठीच दिवसाचे चोवीस तास पुरे पडत नाहीत, मग देवासाठी कुठे वेळ मिळणार! पण प्रयत्न करून बघा, चोवीस तासांतले निदान दोन-चार क्षण तरी त्याच्यासाठी काढता येतील का? कदाचित ते एवढे अशक्य नाही.
परमसुखाचा आस्वाद घेत असताना दोन क्षण काढता आले तर …
परमेश्वराला धन्यवाद द्या!
आनंदोत्सव साजरा करत असताना काही क्षण वेगळे करता आले तर 
त्याची स्तुती करा!
परीक्षेच्या वेळी एक क्षण मिळाला तर …
देवावर भरवसा करा  !
प्रतीक्षा करताना काही क्षण विचार करता आला तर …
त्याच्यावर विश्वास ठेवा !
कठिण परिस्थितीचा सामना करत असताना काही क्षण काढता आले  तर … 
देवाच्या जवळ जा!
दुःखाच्या क्षणी … त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्या !
काहीच घडत नसताना थोडे शांत क्षण लाभले तर … त्याचा आवाज ऐका !
     प्रभूच्या इच्शेनुसार होत आसलेला हा सुवार्ताप्रचार केवळ प्रवचनाने, लिखाणाने किंवा चमत्काराने होत असतो असे नाही; तर सुवार्ताप्रचार हा आपल्या जीवनाद्वारे आणि कृतीद्वारे होत आसतो हे आपल्याला आजच्या शुभवार्तमानात दिसून आले आहे. सुवार्तेची घोषणा करा, स्वर्गराज्याची  घोषणा करा, असे करणाऱ्यांना सार्वकालिक जीवन वतन मिळेल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.  
. आपण सर्व ख्रिस्तसभा आहोत, या विशाल ख्रिस्तसभेत आपण आपले ऐक्य कायम टिकवावे व एकत्रीत आनंदात राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
. जे दु:खात आहेत त्यांचाबरोबर आपण आनंद वाटून घ्यावा व त्यांची दु:खे दूर करावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आपणाला आपल्या पित्याची हाक ऐकू यावी, पवित्र आत्म्याची उत्सुकता कळावी व त्याद्वारे आपणाला ख्रिस्तसभेचे काम करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आपल्या कुटुंबातील ज्या-ज्या व्यक्ती मृत पावल्या आहेत त्या सर्वांना प्रभू परमेश्वराने स्वर्गराज्यात चिरंतन शांती द्यावी  म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
.आता आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.

Thursday, 22 May 2014

 Reflections By: Valerian Patil.









पुनरूत्थानकाळातील सहावा रविवार


पिता तुम्हांला दुसरा कैवारी देईल


दिनांक २५/०५/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये :५-८,१४-१७.
दुसरे वाचन: १ पेत्र :१५-१८.
शुभर्वतमान: योहान १४:१-२१.

प्रस्तावना:
आज आपण पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपणांस प्रीती व पवित्र आत्मा ह्या दोन आंतरिक दानांविषयी सांगतात. प्रेषितांची कृत्ये ह्या आजच्या पहिल्या वाचनातून आपणांस कळते की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने फिलिप्पने देवाचा संदेश संपूर्ण समारियात पसरविला. योहानाने व पेत्राने समारियातील लोकांना पवित्र आत्म्याचे वरदान लाभण्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली. आजच्या दुस-या वाचनात संत पेत्र आपल्या पत्रात म्हणतो, ‘ख्रिस्तासाठी आपल्या  मनात पूज्य भाव ठेवून ख्रिस्ताला आपला प्रभू माना’. कारण शारिरिकदुष्ट्या ख्रिस्ताचा वध करण्यात आला, परंतू आत्मिकदुष्ट्या ख्रिस्ताला जिंवत आहे.
आजचे पवित्र शुभवर्तमान आपणांस पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. येशू म्हणतो, ‘तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझा आज्ञा पाळाल. मी पित्याला विनवणी करीन व तो तुम्हांला दुसरा साह्यकर्ता म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण आपल्या पापाची क्षमा मागूया व पवित्र आत्म्याचा आर्शिवाद आपल्यावर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.   

सम्यक विवरण:-

पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये :५-८,१४-१७.
     स्तेफनाच्या वधानंतरही येरुशलेमेत असलेल्या ख्रिस्ती मंडळीचा फार छळ होत होता (ओवी.१). तो इतका त्रासदायक होता की ख्रिस्ती विश्वासू लोकांना येरुशलेम सोडून पळून जाण्यास भाग पडले. शौल हा छळ करणा-यांचा तरुण पुढारी होता. तो घरोघरी जाऊन ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता त्यांना पकडून तुरुंगात टाकी. ह्या छळातून विश्वासू स्त्रियाही सुटल्या नाहीत (ओवी.३).
     परंतु देवाची महती अगम्य असते. या छळापासून वाचण्यासाठी ख्रिस्ती विश्वासू यहुदिया व शोमरोन या प्रांतात पसरले. तेथे ख्रिस्ताच्या कार्याला नवीन दिशा मिळाली. छळामुळे गप्प ना राहता या प्रदेशात ते देवाची सुवार्ता पसरू लागले. येशू हाच खरा तारणारा आहे व प्रत्येकाने त्याच्यावर विश्वास ठेवणे अगत्याचे आहे (ओवी.४) अशी ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी खेड्यापाड्यांत पसरविली.
     येशूचा शिष्य फिलीप्प हा शीमरोन शहराला जाऊन तो लोकांना ख्रिस्ताविषयी सांगतो (ओवी. ५). शमरोनी शहरात यहूदी खूप तुरळक प्रमाणात होते. त्यांचा शमोरी लोकांकडून तिरस्कार होत होता कारण त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेले होते. त्यामुळेच पेत्र व योहान ह्यांच्या प्रार्थनेने ह्या यहूदी विश्वासू लोकांना पवित्र आत्मा मिळाला व ते मंडळीचे अवयव झाले(ओवी. १४-१७).

दुसरे वाचन: १ पेत्र :१५-१८.
     दु:खसहन हे पेत्राच्या पत्रातील गाभा होय. पेत्र आपल्या वाचकांना ख्रिस्ताच्या दु:खसहनाची आठवण करून भावी काळात दु:ख सोसण्यासाठी तयार करीत आहे. पेत्राच्या मते दु:ख सोसणे अगत्याचे आहे. कारण ह्यात येशूचे अनुकरण होते. यात विश्वासणारा ख्रिस्ताच्या मनोवृतीशी एकरूप होतो व दु:ख भोगून देवाची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती त्यांस प्राप्ती होते.

शुभर्वतमान: योहान १४:१-२१.
माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्हीं माझ्या आज्ञा पाळाल:          
प्रीती व आज्ञाधारकपणा यांच्यातील संबंधावर ह्या भागात विशेष भर दिला आहे. आज्ञाधारकपणा म्हणजे दासपणाची प्रवृत्ती नसून स्वेच्छेने स्वीकारलेली प्रीतीमय भावना व कार्य होय. ख्रिस्तावर आपली प्रीती असेल, तर आपण त्याच्या सर्व आज्ञा पाळण्यास उत्सुक असू. आपल्या आज्ञापालनाचे जीवन ख्रिस्तावरील प्रीतीत दर्शविलेले आहे (ओवी. १५, २१). प्रभूच्या आज्ञा पाळून आपण त्याच्या व देवापित्याच्या प्रीतीत राहतो व आपल्याला ख्रिस्ताची अधिक ओळख होते(ओवी. २१). ख्रिस्ताविषयी जे चांगले घडते त्यामुळे त्याच्यावर प्रीती करणा-यांना आनंदच होईल (ओवी. २८).
     मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा राहावे:
मोशेच्या नियमशास्त्राविषयी यहुदियांची प्रवृत्ती ही सहाय्य मागण्याची होती. आपल्या शिष्यांना देवाने सोपविलेले कार्य पूर्ण करण्यासाठी साहाय्य लागणारच हे येशूला माहित होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना धीर देत दुसरा कैवारी पाठवण्याचे अभिवचन देत आहे. या अभिवचनाद्वारे शिष्यांमागे भक्कमपणे धीर, धैर्य व उत्तेजन देण्याचा सुंदर विचार आहे.  

बोधकथा:
१. एकदा जर्मनीमध्ये दोन मित्र राहत होते. त्यांच्यातील एकाचे नाव अल्ब्रेच दुरेर आणि दुस-याचे नाव फ्रांझ कोनिंगस्टेन होते. त्या दोघांना चित्रकार बनण्याची खूप इच्छा होती. चित्रकार बनण्यासाठी खूप आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे त्या दोघांनी असे ठरवले की एक जण विद्यापीठात जाऊन चांगला चित्रकार बनण्याचे शिक्षण घ्यावे व दुस-याने काम करून शिक्षणासाठी लागणारा जो खर्च त्यानी दयावा. त्यानंतर पहिल्याने रंगवलेली सर्व चित्रे विकून दुस-याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तो पैसा वापरावा. पहिला विद्यापीठात कोण जावा यासाठी त्या दोघांनी त्यांच्या नावच्या चिठ्या टाकल्या. त्यायोगे अल्ब्रेच दुरेर हा शिक्षणासाठी विद्यापीठात जाणार होता व फ्रांझ कोनिंगस्टेन हा काम करण्यासाठी जाणार होता. विद्यापीठामध्ये चित्रकलेचे शिक्षण मिळाल्यावर दुरेर हा उत्कृष्ठ चित्रकार बनला. त्यानी त्याची रंगवलेली चित्रे विकून खूप पैसा गोळा केला. झालेल्या कराराप्रमाणे दुरेर घरी परतला कारण त्याला फ्रांझचे शिक्षण पूर्ण करायचे होते. परंतु खूप वर्ष कष्ट केल्यामुळे फ्रांझ याची हाताची बोटे नाजूक व संवेदनशील झाली होती. चित्रकार बनण्याचे स्वप्न देखील तो विसरून गेला होता. परंतु तो खूप आनंदी होता कारण त्याचा मित्र हा खूप मोठा चित्रकार बनला होता. एके दिवशी दुरेरनी आपला मित्र फ्रांझ ह्याला गुडघे टेकून हात जोडून प्रार्थना करताना पहिले त्यावेळी दुरेरने लगेच आपल्या मित्राच्या हाताची रूपरेषा एका कागदावर कोरली. आध्यात्मिक प्रर्थानामय दर्शित फ्रांझचे हाताचे हे चित्र आज जगातल्या उत्कृष्ट चित्रामध्ये प्रसिद्ध आहे.    

मनन चिंतन:
    आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्ताची गरज आहे तर आंतरिक जीवनासाठी आपणास पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रत्येक मानवाच्या दोन आध्यात्मिक गरजा आहेत; एक म्हणजे क्षमाशीलता आणि दुसरी म्हणजे चांगुलपणा. आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेने ह्या दोन गरजांसाठी इच्छित असतो.
अ) पापक्षमेसाठी मनुष्याचा आक्रोश:
     आपण क्षमाशीलतेसाठी आतुरलेलो असतो. आपणांस ठाऊक आहे की आपण पापी आहोत व पाप करून आपण देवाच्या गौरावापासून भरकटलेले आहोत. देवाच्या समोर आपण सर्वजण पापी असतो. निष्कलंक होण्यासाठी आपणास देवाच्या क्षमाशीलतेची गरज भासते. आपल्याला क्षमा मिळावी म्हणून देवाने त्याचा पुत्र दिला. मानवांच्या पापांसाठी प्राण्यांची बळी न घेता त्याने आपल्या पुत्रास अर्पण केले. देवानें जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे (योहान; ३:१६).
ब) आपण चांगुलपणासाठी धडपडतो:
     जीवनामध्ये सदैव चांगले, आनंदी राहावे असे प्रत्येक मनुष्याची इच्छा असते. वाईट कृत्ये आपल्याला या सुप्त व सुंदर अश्या इच्छेपासून परे करीत असतात. संत बर्नड म्हणतात, ‘तीन प्रकारच्या कृत्यांमुळे आपल्या जीवनात आपण दु:खी-कष्टी होतो. एक म्हणजे चुकीच्या मार्गावर आकर्षिले जाणे, दुसरे म्हणजे कार्यांमध्ये असमर्थ राहणे आणि तिसरे म्हणजे प्रतिकार क्षमतेत उणे पडणे. चांगले करण्याची इच्छा असून सुद्धा वाईटात पडून आपली फसवणूक होते. चांगले राहण्याचा प्रयत्न करून सुद्धा आपल्यातील कार्यक्षमता अपुरी पडते. तर कधी प्रतिकार करूनही वाईट मार्गच आपल्यावर विजय मिळवितो’.  ह्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पवित्र आत्म्याचे वरदान दिले आहे जेणेकरून आपण ह्या सर्व गोष्टीवर विजय मिळवू शकू. ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करितो की, आपल्या देवाने तुम्हांस झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी, व तुम्हांला त्याच्या ठायी, गौरव मिळावे(२ थेस्सलनी १:११-१२).
पवित्र आत्मा आपला मार्गदर्शक बनतो व आपल्याला सर्व संकटातून व त्रासापासून आपले संरक्षण करतो आणि पापातून मृक्त करतो. पवित्र आत्मा आपल्याला जगात चांगले बनण्यासाठी शक्ती देतो. असे सांगितले जाते की, ‘सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताची गरज आहे, परंतु आंतरिक जीवनासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे’. येशू ख्रिस्ताने आपल्याला अभिवचन दिले आहे की तो आपल्यासाठी त्याचा पवित्र आत्मा पाठवणार आहे. शिष्यांवर पेन्ताकोस्तच्या दिवशी आपला पवित्र आत्मा पाठवून त्याने आपल्या वचनाची पूर्तता केली आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शिष्यांमध्ये आत्मविश्वास, धैर्य व आत्मशक्ती निर्माण झाली व त्यांचा जीवनाचा कायापलट झाला. तोच पवित्र आत्मा आपल्यावर देखील येण्यास तत्पर आहे. आपण त्याचा स्विकार करण्यास तयार राहिले पाहिजे. संत पेत्र आपल्या पहिल्या प्रवचनात सांगतो की, ‘पश्चाताप करावा व आपल्या पापांची क्षमा मागून, सर्वांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा स्विकारावा, जेणेकरून आपण पवित्र आत्म्याची दाने स्वीकारू शकतो’(प्रेषितांची कृत्ये २:३८). त्या करिता आपण एकत्र येऊन प्रभू चरणी पवित्र आत्म्याच्या दानांसाठी विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः हे दयाळू बापा तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐकून घे.
१.      आपण आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य मिळावे व त्यांनी देवाचे शब्द जगाच्या काना-कोप-यात, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.     हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कुपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिका-यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर, त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३.  पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचा कायापलट व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४.    हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे, सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५.    आता आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.