Reflections for Homily By:- Allwyn Gonsalves.
पुनरूत्थानकाळातील
चौथा
रविवार
“येशू हा उत्तम मेंढपाळ आहे”
दिनांक ११/०५/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४१.
दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
शुभर्वतमान: योहान १०:१-१०.
प्रस्तावना:
आज
आपण पुनरुत्थानकाळातील चौथा
रविवार साजरा करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे. मेंढपाळ आणि
त्याची मेंढरे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते आजच्या वाचनांतून व्यक्त होते. मेंढरे
त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना
बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे
त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात (योहान १०:२-४). मोहाला बळी
पडल्यामुळे, पापात पडल्यामुळे आपली काय अवस्था होते हे संत पेत्र आजच्या दुस-या
वाचनातून आपल्या लक्षात आणून देत आहे. तो म्हणतो आहे, “तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवांचा
मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात” (१ पेत्र २:२५).
आपण प्रत्येकजण परमेश्वराची मेंढरे आहोत. आपल्या दररोजच्या
जीवनमार्गावर चालत असताना आपणदेखील कधी-कधी योग्य त्या मार्गावरून भटकून चुकीच्या
मार्गावर वाटचाल करतो. परंतु येशू भटकलेल्या एका मेंढराखातर नव्व्याण्णव मेंढरे
कळपात सोडून त्या एका भटकलेल्या मेंढराच्या शोधात जातो. ह्या अश्या प्रेमळ व
दयामयी मेंढपाळाची साथ आपणास नेहमी लाभावी व त्याचा आवाज सतत आपल्या कानी पडावा,
हे कृपादान आपणास लाभावे म्हणून ह्या पवित्र ख्रिस्तयागात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:-
पहिले
वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४१.
निरनिराळ्या
भाषांत देवाची मह्कृत्ये सांगणा-या प्रेषितांची काही लोक थट्टा करत होते अश्यावेळी
पेत्र त्या जमावासमोर मोठ्या धैर्याने उभा राहतो व सुवार्ता सांगतो. पेत्राने
ख्रिस्ताविषयी जे सांगितले ते ऐकून जमलेल्या यहूदी लोकांना त्यांचे अपराध समजले.
आपली चूक कबूल करीत, ‘आम्ही आता काय करू?’ असा
प्रश्नही त्यांनी विचारला(ओवी ३७).
ख्रिस्ताला धिक्कारणा-या यहुदियांना पश्चाताप करून, आपली वृत्ती
बदलून येशूचा मसीहा व पापांपासून तारणारा असा स्वीकार करण्याची गरज होती. येशू
ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे त्याचा धावा करा व त्याला प्रभू माना
असे पेत्र म्हणतो. असे केल्याने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळणार होती.
पापक्षमा होताच त्यांना पवित्र आत्मा मिळणार होता(ओवी ३८). पुढे ओवी ४१ सांगते की तीन
हजार लोकांनी पश्चाताप करून ख्रिस्ताचा स्वीकार केला.
दुसरे
वाचन: १ पेत्र २:२०-२५.
त्या काळात बरेच
नोकर व गुलाम ख्रिस्तसभेचे सभासद होते. त्यांना फारच कमी प्रतीचे मानत व
त्यांच्यावर मोठा अन्याय होत असे. पेत्र त्यांना धीर देत सांगतो की ‘तुम्हीं
विश्वासणारे आहात म्हणून, जे क्रूर व निर्दयी आहेत त्यांच्याही आज्ञा पाळा व
त्यांना मान द्या.’
शुभर्वतमान: योहान १०:१-१०.
त्या
काळाच्या पद्धतीप्रमाणे एका मेंढवाड्यात पाच-सहा मेंढपाळांची मेंढरे रात्रीच्या
वेळी ठेवत. मेंढवाडा म्हणजे सभोवती उंच भिंत असलेले व एकच दार असलेले एक अंगण.
सकाळी प्रत्येक मेंढपाळ या दारातून आत जाऊन विशिष्ट आवाज काढी. तो आवाज ऐकून
त्याचीच सर्व मेंढरे त्याच्याकडे येत व तो त्यांना बाहेर नेई. नंतर दुसरा मेंढपाळ
देखील असे करी व त्याची मेंढरे त्याच्या मागे जात.
प्रभू येशूने हा जो दृष्टांत सांगितला त्याचा अर्थ तेथे जमलेल्या
लोकांना समजला नाही. यामुळे येशूने अधिक स्पष्टपणे बोलण्यास आरंभ केला. येशू
पहिल्याने स्वतःला दाराची उपमा देतो. मी मेंढरांचे दार आहे (ओवी ७). सुरक्षित ठिकाणी
जाण्यासाठी मेंढरांना दारातून मेंढवाड्यात जावे लागे. तसेच तारण मिळविण्यासाठी येशू
ख्रिस्त हा एकच उपाय आहे. जो त्याच्याद्वारे देवाजवळ येईल त्यालाच तारण मिळेल(ओवी
९). येशू ख्रिस्त आपल्या मेंढरांचे पालनपोषण व रक्षण करतो(ओवी ९).
जे
ख्रिस्ताद्वारे देवाजवळ येतात त्यांना ख्रिस्त आपली मेंढरे म्हणतो. तो त्यांना
जीवन देतो व ते विपुलपणे देतो (ओवी १०). त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांना
सार्वकालिक जीवन विपुलपणे देण्यासाठीच येशू ख्रिस्त आला होता(ओवी १०).
बोधकथा:
१. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणा-या एका
निवेदकाने सभागुहात बसलेल्या त्याच्या मित्रांना व पाहूण्यांना आंनदी करण्यासाठी
त्यांना विंनती केली की, ते कुठलीही कविता, विनोद किंवा काही पण बोलून घ्यायचे असेल तर ते विचारू
शकतात. एक माणूस ऊभा राहिला व म्हणाला, ‘तुम्ही माझ्यासाठी २३ वी स्तोत्रसंहिता म्हणाल
का?’ तेव्हा तो निवेदक आश्चर्यचकित झाला आणि थोडावेळ विचार करून म्हणाला, ‘मी
तुमच्यासाठी २३ वी स्तोत्रसंहिता बोलतो परंतू माझी एक अट आहे.’ त्या माणसाने होकार
दिल्यावर तो निवेदक म्हणाला, ‘माझे बोलून झाल्यावर तीच स्तोत्रसंहिता तुम्हाला
म्हणावी लागेल.’ त्या माणसाने अट मान्य केली. निवेदकाने २३वी स्तोत्रसंहिता एका
विशिष्ट पध्दतीन, सुरेख आवाजात व उत्कृष्ठ
लयेमध्ये लोकांसमोर मांडली. त्याने बोलण्याचे संपवल्यावर लोकांनी मोठ्या टाळ्याच्या आवाजात त्यांचे अभिनदंन
केले. निवेदकानंतर त्या दुस-या माणसाने २३ वी स्तोत्रसंहिता बोलण्यास सुरूवात
केली. स्तोत्रसंहिता संपेपर्यंत लोकांच्या डोळ्यांत अश्रू होते कारण त्या माणसाने स्तोत्रसंहितेमधले
भाव लोकांपर्यंत पोहचवले होते. भारावून
गेलेल्या निवेदकाने यावर म्हटले, “माझ्या प्रिय
बंधू-भगिनीनो, मी जे बोललो ते फक्त तुमच्या डोळ्यांपर्यंत व कानांपर्यंत पोहचले
आहे; परंतु ह्या माणसाने २३ वी स्तोत्रसंहिता तुमच्या हृदयापर्यंत
पोहचविली. आमच्या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच की मला २३ वी स्तोत्रसंहिता पूर्ण माहित होती तर ह्या माणसाला मेंढपाळ कोण आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे.”
२. एकदा दोन मेंढपाळांना आपल्या मेंढरांसोबत एका गुहेत रात्र घालावी लागली. त्या मेंढपाळांनी आपल्या मेंढरांना एकत्र त्या गुहेत ठेवले. सकाळी दोन्ही मेंढरांची
कळपे एकत्र झाली होती, त्यामुळे कोणती मेंढरे कोणत्या मेंढपाळाची कळत नव्हते.
त्यावेळी एक मेंढपाळ उठला, काही अंतरावर जाऊन त्याने आपल्या मेंढरांना आवाज देऊन
त्यांना बोलावले, लगेचच त्याची सर्व मेंढरे त्याच्याजवळ गेली. अशा प्रकारे त्या
दोन मेंढपाळानी आपल्या मेंढरांना वेगवेगळे केले. कारण सर्व मेंढरे आपल्या
मेंढपाळाचा आवाज ओळखत होती.
मनन चिंतन:
देव माझा मेंढपाळ, माझा
करितो साभांळ........
होय, आपण आजच्या शुभवर्तमानात वाचले की येशू ख्रिस्त हा एक
उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्यावर प्रेम व आपला साभांळच करत नाही तर आपल्यासाठी तो
त्याच्या प्राणाची आहुती क्रुसावर देतो. आपण सर्व येशू ख्रिस्ताची मेंढरे आहोत व
तो आपला मेंढपाळ आहे, आणि सर्वस्वी आपण त्याचेच आहोत. आजचे पवित्र शुभवर्तमान येशू
आपला मेंढपाळ व आपण ख्रिस्ताची मेंढरू
आहोत असे चार वेगवेगळ्या दृष्ट्या समजावून सांगण्यात आले आहे.
१. मेंढरांना मेंढपाळाची
ओळख असते:
येशू ख्रिस्त हा एक उत्तम
मेंढपाळ आहे, तो आपल्या मेंढरांना ओळखतो कारण आपण त्याची मेंढरे आहोत. येशू ख्रिस्तामध्ये व आपल्यामध्ये
एक अतूट नाते आहे, हे नाते साधे-सूधे नाही तर पवित्र आत्माने जोडलेले आहे.
मेंढपाळाला त्याचे मेंढरे कोणती हे माहित असते. येशू ख्रिस्त, आपला मेंढपाळ,
आपल्याला नावानीशी ओळखतो. आपण त्याचे मेंढरे आहोत आणि म्हणून आपला प्रतिसाद मेंढरासारखा असायला पाहिजे. आपण मेंढपाळाच्या
जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात राहाण्याचा
व जवळ जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बायबल
वाचन होय. संत जेरोम, ज्याने बायबलचे लॅटिन भाषेत भाषातंर केले, म्हणतो, “ज्या माणसाला बायबलचे ज्ञान नाही, त्या माणसाला येशू
ख्रिस्ताविषयी काहीच माहित नाही.” जर आपल्याला येशू
ख्रिस्तीविषयी ज्ञान असेल, तर आपण ठामपणे सागू शकतो की, येशू ख्रिस्त हा गुरू
व सर्व जगाचा तारणकर्ता आहे.
२. मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखतो:
त्या काळात मेंढवाड्यात पाच-सहा मेंढपाळांची मेंढरे
रात्रीच्या वेळी ठेवत. सकाळी प्रत्येक मेंढपाळ आत जाऊन विशिष्ट आवाज काढी. तो आवाज
ऐकून त्याचीच सर्व मेंढरे त्याच्याकडे येत व तो त्यांना बाहेर नेई. त्याचप्रमाणे आपण येशू
ख्रिस्ताच्या कळपातील मेंढरे आहोत. आपण आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखला पाहिजे. कारण
मत्तय २४:५ आपणास सांगते की “पुष्कळजण माझ्या नावाने
येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील.” देवाच्या नावाने खोटा प्रचार करून पैसे कमावणारे लबाड
लांडगे खूप आहेत. अश्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. येशू ख्रिस्ताने स्थापन्न
केलेल्या ख्रीस्तसभेचा तो एकमेव मेंढपाळ आहे. आजच्या आधुनिक जगात
ख्रिस्तसभेव्यतिरिक्त येणा-या खोट्या प्रचारकापासून सावध राहणे व ख्रिस्ताचा आवाज
ओळखणे हे योग्य आहे.
३. मेंढरांचा आपल्या
मेंढपाळावर विश्वास व प्रेम आहे:
उत्तम मेंढपाळ हा कोणी
भाडोत्री नोकर नाही. त्याला कोणीही त्याच्या कामाचा मोबदला देत नाही. तो आपल्या
मेंढरांवर खूप प्रेम करतो व त्यांच्यासाठी प्राणदेखील देण्यास तयार असतो. त्याचे
विशेष कार्य म्हणजे सर्व मेंढरांचा साभांळ करणे व त्यांचे सर्व सकंटापासून रक्षण
करणे. ज्याप्रमाणे प्रवक्ता यशयाच्या पुस्तकात देव म्हणतो की, ‘मी तुमच्यावर
चीरस्थायी प्रेम करतो.’ त्याचप्रमाणे आपला मेंढपाळ, प्रभू येशू आपल्यावर नितांत व
असीम प्रेम करतो. आपले जीवन त्याच्या स्वाधीन करून आपण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद
देत असतो. राजा दाविदच्या शब्दात आपणदेखील आत्मविश्वासाने म्हटले पाहिजे की, ‘देव
माझा मेंढपाळ, माझा करितो साभांळ.’
४. मेंढरे आपल्या
मेंढपाळामागे चालतात:
उत्तम मेंढपाळ जेव्हा
बोलावतो तेव्हा मेंढरे त्याच्या मागे जातात. खरा मेंढपाळ हा कळपाच्या मागे न जाता,
त्यांच्या पुढे चालतो व त्यांचा साभांळ करतो. स्तोत्र २३:२ म्हणते की, “‘तो मला
थंडगार पाण्यांच्या झ-याकडे घेऊन जातो”.’ येशू ख्रिस्ताच्या समीपतेमध्ये आपण
सुखरूप असतो, आपला मार्ग चुकत नाही, कारण हा मार्ग आपल्याला स्वर्गातील पवित्र देव
पित्याकडे नेतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः “हे ख्रिस्ता तुझ्या मेंढरांचे पालनपोषण व रक्षण कर”.
१.
ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व
सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित
प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद
असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.
हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कुपा दृष्टी आमच्या
देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिका-यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना
सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३.
हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही सर्व शेतक-यांसाठी विशेष
प्रार्थना करतो, अचानक पावसामुळे व गारपिटामुळे ज्या शेतक-यांचे
पिकांचे नुकसान झाले आहे व ज्या कुटुंबावर उपवासमारीची वेळ आली आहे ह्या सर्वांवर
देवाचा आर्शिवाद असावा व त्यांचे जीवन सूखी व समाधानी व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४.
हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे
जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित
प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे सर्व आजारातून
त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५.
आता
आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी
प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment