Wednesday 14 May 2014

Reflections for the Homily By: Manuel Fernandes.








पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार

‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.’

दिनांक: १८/०५/२०१४.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७.
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९. 
शुभवर्तमान: योहान १४:१-१२

प्रस्तावना:
आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाजवळ जाणा-या मार्गाची ओळख करून देत आहे. प्रेषितांची कृत्ये ह्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की जेव्हा विधवांची सेवा कोणी करावी ह्याविषयी वाद चालू झाला तेव्हा बारा प्रेषितांनी सा-या शिष्यगणाला एकत्र जमविले व सात कारभा-यांची निवड केली. आजचे दुसरे वाचन पेत्राच्या पहिल्या पत्रातून घेतलेले आहे. पेत्र मौल्यवान कोनशील्याविषयी बोलत असताना म्हणतो, ‘तो मौल्यवान कोनशीला दुसरा कोण नसून येशू ख्रिस्त स्वतः आहे.’
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्याला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. येशू म्हणतो, ‘मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे.’” एक मनुष्य म्हणून आपण पित्याच्या ह्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास अपयशी ठरलो असाल किंवा आपण रस्ता चुकलो असाल तर आपल्या पापांची क्षमा मागून भक्तिभावाने आजच्या ह्या मिस्साबलीत सहभागी होऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
येशू ख्रिस्ताच्यावेळी हेल्लेणी यहूदी (ग्रीक) आणि इब्री यहूदी (हिब्रू) हे दोन सांस्कृतिक गट होते. अन्नाच्या साधन सामग्री वाटणीवरून या दोन ख्रिस्ती यहूदी गटामध्ये वाद सुरु झाला होता. या अगोदर हेच हेल्लेणी आणि इब्री यहूदी ख्रिस्ती लोक आपापसात सर्व काही वाटून घेत व परस्परांच्या गरजा भागवीत असे संत लूक आपणांस सांगतो. ही सेवा एकंदरीत नियमितपणे किती व्यापक प्रमाणात चाले ते प्रत्यक्षात नमूद केलेले आढळते.
एकीकडे प्रार्थना व वचनाची सेवा आणि दुसरीकडे पंक्तीसेवा याची तुलना दाखवली आहे. ह्यातून एक सेवा दुसरीहून श्रेष्ठ आहे अगर कनिष्ठ आहे असा अर्थ काढू नये. आजकाल अनेक देशात भिन्न-भिन्न संस्कृतीत व समाजात ‘पंक्तीसेवा करणे’ म्हणजे मेजवानी समारंभात जेवण वाढवण्यासाठी ‘कराराने नेमलेले सेवक’ असा अर्थबोध होतो. पण हा अर्थ अनेक दृष्टीने चुकीचा आहे. एक म्हणजे भोजन वाटून देणे हे घराच्या प्रमुखाचे काम असे. याशिवाय येथे ‘पंक्ती’ (पंगत) या अर्थी मुळात योजिलेल्या शब्दाचे दोन विशेष अर्थ आहेत:
१. जेवणाचे मेज
२.  सावकाराचे मेज
येथे वाद कसल्या कारणाने होत आहे व तो कसा सोडवावा म्हणून प्रेषितांनी सात जणांच्या अंगी आवश्यक असणारे गुण पाहता वरील अर्थविवरण योग्यच ठरते. या सेवेसाठी हे लोक पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असणे जरुरीचे होते. व्यवस्था, देखरेख करण्यासाठी त्यांचे ज्ञान व तम्य हे आवश्यक होते. अर्थात यानंतर बारा जणांनी व्यवस्थापन कारभार, अगर भौतिक गरजा वैगेरे जबाबदा-या टाळल्या. तर या सात जणांनी प्रार्थना व वचनांची सेवा हे कार्य सोडून दिले असे मुळीच नाही. खरे तर स्तेफन आणि फिल्लीप यांच्या विषयी लूक पुढे सांगतो की त्यांचा संबंध अन्नपाणी, पैसा अडका  ह्याच्याशी नाही तर त्यांनी केलेल्या वचनाच्या सेवेकडे आहे.   
 
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९

ख्रिस्ती लोकांची वाढ सामुहिक आणि वैयक्तिक अशी दोन्ही प्रकारे झाली पाहिजे. पेत्राने येथे हाच विषय मांडला आहे. हे विवेचन सहज समजण्याजोगे आहे. मौल्यवान व जिवंत खडक असलेल्या येशू ख्रिस्ताबरोबर सतत संवाद साधल्याने ख्रिस्ती लोकही त्याच्यासारखे जिवंत खडक होतील. एकेकटा खडक काही कामाचा नसतो. अनेक खडक एकत्र केल्याने सुंदर इमारत बांधून तयार होते आणि प्रत्येक खडक त्या इमारतीचा एक अंश होतो. संपूर्ण वास्तूचा एक भाग होणे हाच ‘जिवंत खडकाचा’ उद्देश असतो. पुढे पेत्राचे विचार इमारतीकडून (बहुदा मंदिर) त्या इमारतीमध्ये कार्य कारण-यांच्या दिशेला वळलेले आहे. देवाच्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य म्हणून ख्रिस्ती लोकांची दुहेरी जबाबदारी आहे. उपासनाद्वारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करणे व आपल्या कार्याद्वारे साक्ष देणे, हे याद्वारे योजलेले आहे.
या मुद्द्याला पुष्टी देण्यासाठी पेत्राने जुन्या करारामधून जिवंत धोंड्याविषयीचे संदर्भ देऊन त्याची परिपूर्ती ख्रिस्तामध्ये झाल्याचे दाखवले आहे. पहिले संदर्भवचन(ओवी ६) विश्वासाकडून पूर्ण झाले आहे तर उरलेल्या दोन संदर्भवचनाची (ओवी ७, ८) परिपूर्ती विश्वास न ठेवणा-याकडून झाली आहे. लोक मनी विश्वास धरून जिवंत धोंड्याकडे आले किंवा दुस-या काहींनी त्याला नाकारले तरी देवाचे हेतू सर्वोच्च असतात, त्यात बदल होत नाही. ख्रिस्त मुख्य इमारतीच्या कोनशिलाचा धोंडा झाला आहे. जे संदेशाचा, सुवार्तेचा अव्हेर करतात ते ढेचकाळून अडखळतात आणि धडपडून पडतात. अश्यावेळी कोनशिलाचा खडक असणा-या येशूकडे नतमस्तक होणे समंजस आहे.

शुभवर्तमान: योहान १४:१-१२

येशू म्हणाला, ‘तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.’ येशूचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान आपणांस स्वर्गामध्ये विश्वासू लोकांसाठी राखीव ठेवलेल्या जागेविषयी हमी देतात. शिष्यांनी विचारलेले प्रश्न पाहता त्यांना विशेष आध्यात्मिक उमज होती असे दिसत नाही. तथापि पित्याकडे जाण्याचा मार्ग त्यांना माहित असायला हवा होता हेच येशूच्या शब्दावरून दिसते. थोमाने तर त्याच्या बोलण्याचे अगदी शब्दश: अर्थ घेऊन बाळबोध प्रश्न विचारला. येशूच मार्ग आहे आणि जीवनही आहे आणि हेच सत्य आहे. येशूमध्ये व्यक्तीरूप दिलेला मार्ग हा मानखंडनेद्वारे दु:ख सोसून आणि विजयी होऊन मिळवलेला आहे. ‘मी कोण आहे हे तुम्हीं ओळखले असते’ या शब्दांवरून शिष्यांना येशूची ओळख विसरलेली होती हे सूचित होते. या शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे घेणे योग्य ठरेल; तुम्हीं मला ओळखता तर तुम्हीं माझ्या पित्याला ओळखाल.
‘येशू ख्रिस्त’ हे परिपूर्ण, गाढ, आणि गोड सत्य आहे. येशूचे ज्ञान झाले की पित्याचे ज्ञान होते. फिल्लीपला हे आकलन झाले नाही, ते कल्पनेने समजण्याजोगे आहे. देवाचे थेट प्रकटीकरण झाल्यानेच त्याचे समाधान होऊन उमज पडणार होती. पण यावर येशूने त्याला दोन शब्द सुनावले. देवाने येशुमध्ये आपण स्वतःला प्रकट केले. आपली ओळख दिली आहे हे परिपूर्ण सत्य एकही शिष्याला भावले नाही. येशूने फिल्लीपच्या दोन मुद्द्यांवर आवाहन केले त्याच्या आधारे येशूने केलेल्या चमत्कारातूनच ती फक्त देवाचीच कार्य आहेत असे दाखवले आहे.
येशू जे काही विश्वासाने करीत होता तेच पुढे करीत राहील हे त्याने स्पष्ट केले होते. पण ह्याहून मोठी कार्ये हे फक्त पुनरुत्थानानंतरच्या कालखंडाच्या आधारेच समजून घेता येतील. याच काळात सुवार्तेची घोषणा व्हायची होती. येशू पित्याकडे जाणार आहे म्हणूनच ही अधिक मोठी कार्ये करता येणार हे स्पष्टच आहे. हे भाकीत पूर्ण झाल्याचे प्रमाण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून मिळते.

मनन चिंतन:

येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, ‘तुम्ही देवावर विश्वास ठेवा व माझ्यावरही विश्वास ठेवा’; कारण, ‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.’ आदिकाळापासून लोक अनंतकाळचा मार्ग शोधत आहेत, पण त्यांना मार्ग काही सापडलेला नाही; आदिकाळापासून लोक सार्वकालिक सत्य शोधत आहेत, परंतु त्यांनी काहीही शोधून काढलेले नाही; आदिकाळापासून लोक सार्वकालिक जीवन शोधत आहेत, परंतु त्यांना अजून मिळालेले नाही; येशूच्या व्यक्तीमत्वात हा अनंतकाळचा मार्ग, सार्वकालिक जीवन व सार्वकालिक सत्य ह्यांचा उगम आणि शेवट झालेला आहे.
कधी-कधी मनुष्य येशू ख्रिस्त सत्य आहे ह्यावर विश्वास न ठेवता दुस-या गोष्टीवर विश्वास ठेवतो. जेव्हा इब्री भाषा बोलणारे व ग्रीक बोलणारे यांच्यात वाद सुरु झाला तेव्हा ह्या प्रश्नाकडे प्रेषितांनी ताबडतोब लक्ष दिले. नवख्रिस्तीत यहूदी लोकांमध्ये असलेला विश्वासाचा अभाव प्रेषितांनी ओळखला व तो प्रश्न त्यांनी पवित्र आत्म्याच्या दानाद्वारे सोडविला. जे देवावर विश्वास ठेवतात व त्याच्याकडे प्रार्थना करतात देव त्यांना मदत करत असतो. तसेच जे लोक पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात त्यांच्यात ख्रिस्ताचे गुण दिसतात. आपण देवावर, ख्रिस्तावर व पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवावा हाच संदेश आपल्याला आजच्या उपासनेमध्ये भेटत आहे.
     विश्वास ठेवणे म्हणजे सर्व परिस्थितीत देवाचा आधार घेणे, त्याच्यावर भिस्त ठेवणे व त्याच्यावर अवलंबून राहणे. तसेच देवाची अभिवचने खरी मानून त्यांचा आधार घेणे. येशू ख्रिस्त हा खरा धोंडा आहे, देवाने त्याला निवडलेले आहे. ख्रिस्त कोनशिला आहे ह्या विश्वासाने जे त्याच्यावर अवलंबून राहतात त्यांची कधीच फजिती होणार नाही. यामुळे विश्वासू लोकांना ख्रिस्त फार मौल्यवान वाटतो. आज आपण देवाच्या दृष्टीत विश्वासू झाला आहात काय हे लक्षात घेवूया.    

बोधकथा:

एकदा एक ख्रिस्ती माणूस शहरातील एका हॉलमध्ये जाण्यास निघाला. पत्ता ना सापडल्यामुळे त्याने तेथे खेळत असलेल्या मुलांना विचारले, ‘तुम्हीं मला अमुख अश्या हॉलमध्ये घेऊन जाणार का, कारण मला तेथे जाण्याचा रस्ता माहित नाही.’ ‘होय’ म्हणून सर्व मुले त्याच्याबरोबर हॉलकडे जाण्यास निघाली.
     वाटेवर एका मुलाने त्यास विचारले, ‘सर, तुम्ही हॉलमध्ये कश्यासाठी जात आहात?’ तेव्हा त्या माणसाने सांगितले, ‘लोकांना स्वर्गाचा रस्ता माहित नाही म्हणून मी लोकांना स्वर्गाच्या मार्गाकडे कसे जावे ह्या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी जात आहे.’ तेव्हा मुलांनी आप-आपसात म्हटले, ‘ह्या माणसाला हॉलमध्ये जाण्याचा रस्ता माहित नाही आणि हा म्हणत आहे मी लोकांना स्वर्गाचा रस्ता दाखवायला जात आहे व स्वर्गाचा रस्ता मिळवण्यासाठी काय करावे ह्याविषयी सांगणार आहे.’

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे प्रभो, आमची प्रार्थना स्वीकारून घे.’
१.  ख्रिस्तसभेचे कार्य करणारे पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, सिस्टर्स व प्रापंचिक ह्या सर्वांना देवाचे कार्य करण्यास चांगले आरोग्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. जसे येशू ख्रिस्ताने आपल्याला पित्याची ओळख करून दिली, तीच ओळख आपण आपल्या वागण्याने, वर्तनाने दुस-यांना करून दयावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे ह्या वचनावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा व जे लोक रस्ता हरवलेले आहेत व देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना देवाने स्पर्श करावा व ते परत यावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.  आपल्या धर्मग्रामात जे आजारी व दु:खी आहेत त्यांना देवाने चांगले आरोग्य द्यावे व त्यांना जीवनात आनंद मिळावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.           

       

    

  

1 comment:

  1. Congratulations from Dr.Subhash D'souza .Wonderful reflection.I had written daily reflection books based on three cycles of the church .People liked it very much.You have a gift of writing such reflection.It is need of the hour.Please write such wonderful reflection regularly .God bless you.

    ReplyDelete