Monday 4 May 2015


 The Reflections for the Homily on the 6th Sunday (10/05/2015) of Easter, by Botham Patil.











  पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार


दिनांक: १०/०५/२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ४:७-१०
शुभवर्तमान: योहान: १५:९-१७


“तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे”




प्रस्तावना:

प्रेम देवापासून आहे. आजची उपासना आपल्याला प्रेमावर मनन-चिंतन करून ते प्रत्यक्ष कृतीने एकमेकांवर करण्यासाठी बोलावत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात देव पक्षपाती नसून तो सर्वांना समान लेखतो व त्याच्या प्रेमभरित दानांचा वर्षाव करतो हे सांगण्यात आले आहे. योहानलिखित पत्रातून घेतलेल्या दुस-या वाचनात ‘देव प्रेम आहे’ व त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून त्याने त्याचा पुत्र आपणाखातर दिला, ह्याची घोषणा करण्यात आली आहे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त प्रेम करण्यासाठी शिष्यांना आज्ञा देत आहे. जे प्रेम पिता आणि येशूमध्ये आहे तेच प्रेम येशू शिष्यांना देउन इतरांवर करण्यासाठी आवाहन करतो.
जो कोणी प्रेम करतो तो देवापासून आहे आणि तो देवाला ओळखतो; जो देवाला ओळखतो तो प्रेमाखातर स्वतःचा प्राण देण्याकरीता पुढे सरसावतो कारण ह्यापेक्षा मोठे प्रेम नाही. समाजामध्ये पैश्यापेक्षा आज प्रेमाची गरज जास्त आहे. परमेश्वराच्या प्रेमाचा आपणाला सखोल अनुभव यावा व तोच अनुभव इतरांना देण्यास आज ह्या मिस्साबालीदानामध्ये विशेष कृपा मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८

यहुदी लोक पराराष्ट्रीयांबरोबर कोणत्याही प्रकारचा सबंध ठेवत नसत. परमेश्वराचे प्रेम व दया त्यांना सुद्धा लाभू शकते हे त्यांच्या विचारा पलीकडचेच होते. परराष्ट्रीयच काय, तर स्वतः यहुदी ज्यांनी शास्त्राचं किंवा दिलेल्या नियमांचे पालन केले नाही त्यांना पाहुणे म्हणून घरात स्वीकारणे किंवा त्यांच्या घरी पाहुणे म्हणून जाणे ही गोष्ट शक्यच नव्हती. यहुदी लोक पराराष्ट्रीयांना सर्वांगीण दृष्ट्या अस्वच्छ किंवा गलिच्छ मानत, इतकच नाही तर त्यांना काहीजण ‘कुत्र्यासमान’ लेखत किंवा उपमा देत. परंतु पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पेत्र यहुदी असूनदेखील सर्व प्रकारच्या बंधनांना झिडकारून पराराष्ट्रीयांच्या (कर्नेलियसच्या) घरी गेला. हे कार्य पेत्राचे नसून देवाच्या प्रेरणेचे व त्याच्या प्रेमाचे प्रतिक होते. 
हा उतारा देव पक्षपाती नसून, तो सर्वांबरोबर समान व सर्वांवर सारखीच कृपा करणारा व प्रेम दाखवणारा आहे हे दर्शवतो व हे सर्वकाही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने स्पष्ट होते (ओवी ४४). पवित्र आत्मा हा कोणासाठी राखीव नसून सर्वांसाठी आहे व तो सर्वांमार्फत कार्यरत आहे हे येथे सिद्ध होते. पेत्राने काढलेले उद्गार, “कोणाच्याने मनाई करवेल” (ओवी ४७) दर्शवते की, ‘जर देव स्वतः कार्यरत आहे तर त्याने घडवलेले आपण मानव त्याच्या कार्याला प्रतिकार करणारे कोण? त्याच्या प्रेमाला आणि दयेला प्रश्न विचारणारे कोण?’ 

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ४:७-१०

देव प्रेम आहे आणि म्हणूनच ‘प्रेमाची सुरवात देवामध्ये होते’ (ओवी ७). प्रेम देवाची व्याख्या देत नाही तर देव प्रेमाची व्याख्या देतो. प्रेमाचा उगम देवापासून आहे आणि जो प्रेम करत नाही तो देवाला ओळखूच शकत नाही. ह्या प्रेमाखातरच परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपणासाठी दिला (योहान ३:१६). हा उतारा योहानलिखित पत्रामध्ये ह्या ठिकाणी तिस-यांदा बंधू-प्रेमाविषयी आपणास जाणीव करून देतो. ह्या अगोदर १योहान अध्याय २:७-११ आणि ३:११-१८ येथे ह्याच विषयी बोलला होता. ह्या उता-यातून योहान देव प्रेम आहे असे सांगून एकमेकांवर प्रेम करण्यासाठी बोलावत आहे. योहान ह्या उता-याची सांगता सुरेख शब्दांनी करतो, “आपण देवावर प्रेम केले असे नाही तर देवाने आपणावर प्रेम केले आणि आपल्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून त्याने स्वपुत्राला पाठवले” (ओवी १०). C.S. Lewis म्हणतात, God loves us not because we are lovable, but because he is love; not because he needs to receive but because he delights to give”. 

शुभवर्तमान: योहान: १५:९-१७

आपणा प्रत्येकाला भरपूर लोकांचा परिचय/ओळख आहे परंतु त्यांच्यापैकी फार थोडेशेच आपले मित्र आहेत, असं असलं तरी काही मित्र कोणत्या ना कोणत्या तरी घटकेला वैरत्वाने/प्रतिकूलपणे वागतात. यहूदा इस्कर्योत बद्दल काय? “जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे” (स्तोत्रसंहिता ४१:९). इतकच नाही तर जो एकनिष्ठ आहे, तो देखील गरजेच्या वेळी कमी पडू शकतो किंवा दुर्बल ठरू शकतो. पेत्र, याकोब आणि योहान जेव्हा जागे राहून येशूला साथ द्यावी व प्रार्थना करावी तेव्हा झोपी गेले (लूक २२:४५; मार्क १४:३७; मत्तय २६:४०); पेत्र खडक असून येशूला तीन वेळेस नाकारले (योहान १८:१५-२७; लूक २२:५४-६५; मार्क १४:६६-७२; मत्तय २६:६९-७५). आपली एकमेकांमधली किंवा देवाबरोबरची मैत्री अपूर्ण, सदोष ठरू शकते परंतु परमेश्वराची आपल्या बरोबरची मैत्री पूर्णपणे निर्दोष आणि उत्कृष्ट ठरते.
ह्याच प्रकारच्या मैत्रीच वर्णन येशू ख्रिस्त आजच्या उता-यामध्ये करत आहे, प्रेमाने बांधल्या जाणा-या नात्याविषयी तो बोलत आहे. एकमेकांवर प्रेम करण्यासाठी येशू ख्रिस्त आज्ञा करत आहे. पण खर पाहता हुकूम देण्यावरून प्रेम करणं शक्य आहे का? ख्रिस्ती-प्रेम ही मुलभूतपणे फक्त ‘भावना वा संवेदना’ नसून ‘स्व:खुशीने करावयाची कृती’ आहे. ह्या प्रेमाचा पुरावा भावनेत नसून तो खुद्द क्रियेत आहे. ख्रिस्तासाठी आणि इतरांसाठी आपला स्वतःचा प्राण समर्पित करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे (१ योहान ३:१६; योहान १५:१३). येशू खिस्ताने हे फक्त शब्दांनी व्यक्त केलं नाही तर प्रत्यक्ष कृतीने क्रुसावर प्राण अर्पण करून सिद्ध केले (रोमी ५:१०). ज्याप्रमाणे पित्याने त्याच्या पुत्रावर (येशूवर) प्रेम केले (योहान ३:३५;१७:२३) त्याचप्रमाणे येशूने त्याच्या शिष्यांवर केले (योहान १३:३४;१४:१५,२३) व तेच प्रेम आपण त्याच्या प्रेमात राहून इतरांवर करण्यासाठी येशू सांगत आहे (योहान १३:३४;१५:१२,१७), जेणेकरून त्याचा आनंद परिपूर्ण होईल. परमेश्वराने आपली निवड केली आहे, जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये राहत नाहीत आणि त्याने दिलेल्या आज्ञा पाळत नाहीत तोपर्यंत आपण एकमेकांवर प्रेम करू शकत नाहीत कारण जश्या फांद्या द्राक्षवेलीशिवाय काहीच फळ देऊ शकत नाही त्याचप्रकारे प्रभूमध्ये राहिल्यावाचून अन् त्याच्या आज्ञा पाळल्यावाचून आपण शून्य आहोत.
ह्याच अध्यायात १५:१५ मध्ये येशू शिष्यांना दास न म्हणता मित्र संबोधत आहे. पुरातन काळात मनुष्यांनी परमेश्वराचे दास म्हणून जीवन जगणे ही सार्वजनिक कल्पना होती परंतु दररोजच्या जीवनात परमेश्वराचे दास किंवा नोकर म्हणून राहणे हे काही इब्री विद्वानांच्या मताने नाकारलेली किंवा नापसंत केलेली शिकवण होती म्हणूनच त्यांनी “सत्य तुम्हाला बंधमुक्त करील’ (योहान ८:३२), ही येशूची शिकवण धुडकारून लावली होती, कारण त्यांच्या (यहुद्यांच्या) मते इस्रायली लोक किंवा देवाची प्रजा ही कधीहि कोणाच्या दास्यात नव्हती (योहान ८:३३) अशी होती. परंतु येशूने शिष्यांना मित्र म्हणण्यामागे त्याची संकल्पना वेगळीच होती. त्याकाळी समाजामध्ये सहजीकता मालकाने दिलेली आज्ञा नोकरांनी कोणतेही स्पष्टीकरण न मागता पाळावी अशी समज होती परंतु येशू शिष्यांना मित्र म्हणून प्रभूच्या प्रकटीकरणाची समज असल्याचे सांगतो कारण येशूने ‘पित्याकडून ऐकलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या’ (ओवी ११), दासांना कधीही देवाचे प्रकटीकरण होईल अशी अपेक्षा नव्हती परंतु येशूच्या मते ते शक्य होतं एका वेगळ्याच नात्यात- ‘मित्रत्वाच्या आणि प्रेमाच्या नात्यात’. म्हणूनच येशू ह्या अध्यायाची सांगता एका महत्वाच्या आज्ञेने करतो, “एकमेकांवर प्रेम करा”. ही आज्ञा येशूने अकरा शिष्यांना अध्याय १३:३४-३५ मध्ये दिली होती त्याचीच पुनरावृत्ती १५:१२ व १७ मध्ये करतो, जेणेकरून आपण फळ द्यावे असे फळ जे सार्वकालिक असेल आणि त्याद्वारे पित्याचा गौरव होईल.  
     
बोधकथा:

१. एकदा एक तरुण आपल्या प्रेयसीबरोबर दुचाकीवर भरधाव वेगाने जात होता. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्या तरुणाच्या काहीतरी निदर्शनास आले, म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला त्याच्या डोक्यावरील हेल्मेट काढून स्वत:च्या डोक्यात घालायला सांगितले. ती तरुणी हे पाहून आश्चर्यचकीत झाली परंतु त्याच्या आग्रहामुळे तिने ते हेल्मेट डोक्यावर चढवले. नंतर तो तरुण आपल्या प्रेयसीला म्हणाला, “हे प्रिये, मला घट्ट आलिंगन दे, तुझ्या प्रेमाचा स्पर्श मला जाणवू दे”. तेव्हा त्या तरुणीने त्याला मागून घट्ट मिठी मारून त्याच्यावर असलेले आपले प्रेम व्यक्त केले.
दुस-या दिवशी वृत्तपत्रात पहिल्याच पानावर एक ठळक बातमी झळकली, “काल एका दुचाकीवर प्रवास करणा-या तरुण-तरुणीचा अपघात. तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे हेल्मेटमुळे प्राण बचावले परंतु गंभीररीत्या जखमी”.
(गाडी चालविताना त्या तरुणाला कळून चुकल होतं की गाडीचा ब्रेक असफल झाला आहे परंतु त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांच्या प्रेमाखातर स्वतःचा जीव देऊन त्याच्या प्रेयसीचा जीव वाचवला).
२. दोन मित्र होते. परिस्थितीने गरीबच पण एकमेकांवर अपार प्रेम करणारे, एकमेकांच्या जीवाला जपणारे आणि एक दुस-यासाठी काहीपण करणारे. एका मित्राने दिवस रात्र कष्ट करून एक छोटासा मोबाईल विकत घेतला व तो दाखविण्यासाठी आपल्या मित्राकडे आला. त्यावर त्याचा मित्र म्हणाला की, “तु नवीन मोबाईल विकत घेतला आहेस, त्याची मला पार्टी हवी. तु जर मला पार्टी दिली तर मी तुला काहीतरी भेटवस्तू देईन”. “हो मी देईन” असे म्हणून मोबाईल घेतलेल्या मित्राने दुस-या दिवशीची वेळ ठरवली. परंतु पार्टी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने जाऊन तो मोबाईल विकला.
दुस-या दिवशी ठरलेल्या वेळी दोघेजण भेटले व छोटीशी पार्टी केली. वचन दिल्याप्रमाणे दुस-या मित्राने त्याला भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू पाहताच पार्टी दिलेल्या मित्राचे डोळे अश्रूंनी भरून आले कारण मोबाईलच्या स्वरूपातच त्याला भेटवस्तू भेटली होती. तेव्हा दुस-या मित्राने त्याला जोरदार आलिंगन देऊन म्हटले, “मला माहित होते की पार्टी देण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत आणि आपल्या एकमेकांवरच्या प्रेमाखातर जाऊन तु मोबाईल विकणार म्हणून मी तुला भेटवस्तू द्यायचे कारण सांगून त्याच दुकानदाराकडून तु विकलेला मोबाईल विकत घेतला व पुन्हा एकदा भेटवस्तूच्या रुपात तुला तो देत आहे”.    

मनन-चिंतन: 

‘देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या तारणासाठी दिला’ (योहान ३:१६) आणि एवढेच नाही तर येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपला प्राण समर्पण करून आणि तिस-या दिवशी मरणावर विजय मिळवून आपणावरील प्रेम सिद्ध केले, म्हणूनच येशू ख्रिस्त आपणाला सांगत आहे, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर केले आहे, तेच प्रेम तुम्ही एकमेकांवर करा” (योहान १५:९). जो इतरांवर प्रेम करतो तोच देवाला ओळखतो (१ योहान ४:७) कारण देव प्रेम आहे. ह्या प्रेमाखातर ती व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे इतरांसाठी आपला प्राण द्यायला देखील तयार होते (योकान १५:१३).
नाझी काँन्सनट्रेशन कॅम्प (जर्मनीतील हिटलरच्या काळातील छळ-छावणी) मध्ये घडलेला प्रसंग. “माझ्या बायकोचं आणि माझ्या मुलाचं काय होईल, कृपाकरून कोणीतरी मला वाचवा!”, हे शब्द एक मनुष्य जोर-जोराने ओरडत होता, कारण नाझी सैनिक त्याला मरणदंडाची शिक्षा देण्यासाठी घेऊन जात होते. ज्या गटातून ह्या माणसाला चालवले होते त्याच गटामध्ये एक फ्रान्सिसकन धर्मगुरू देखील कैद होते. जेव्हा त्यांनी ह्या माणसाची आरोळी ऐकली तेव्हा त्यांनी पुढे येऊन “ह्या माणसाच्या बदल्यात मला घेऊन चला, मी त्याच्या जागी मरायला तयार आहे, परंतु ह्याला त्याच्या कुटुंबाखातर सोडून द्या” अशी विनवणी केली. हे धर्मगुरूचे उद्गार ऐकताच त्या सैनिकांनी त्या माणसाला सोडून धर्मगुरूला नेले व जीवे मारले. हा धर्मगुरू म्हणजे ख्रिस्तसभेने घोषीत केलेला एक संत- संत मँक्सीमिलीयन कोलबे.
संत मँक्सीमिलीयन कोलबे ह्यांनी येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन तंतोतंत केले. त्यांनी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता फक्त प्रेमाखातर आपला जीव दिला (योहान १५:१३). अशा नाना प्रकारच्या धाडसी/शूर उदाहरणांनी इतिहास भरला आहे. परमेश्वराच्या प्रेरणेने कोणी-ना-कोणी हे कृत्य समाजाला आपल्या गाढ झोपेतून उठवण्यासाठी किंवा आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी करत असते. परंतु आता हे आधुनिक जग बदलत चालले आहे. आता फक्त स्वतःसाठी कमवा व ते सर्वकाही मौजमजा करण्यात गमवा हेच दृश्य सगळीकडे दिसून येत आहे. ह्यासाठी येशूची प्रेमाविषयीची शिकवण ह्या काळासाठी अधिकाधिक गरजेची आहे. कारण समाज स्वार्थी आणि लोभी/अतृप्त होत चालला आहे. रक्ताची नाती किंवा मित्रत्वाची नाती, आता नाती नसून फक्त एक सामाजिक बंधन/कर्तव्य बनत चाललं आहे. पैसा आणि प्रतिष्ठा ह्याच्यावर सबंध जोडले जात आहेत आणि ज्या आई-वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, तेच मुलं त्यांना प्रेम देण्याएवजी वृद्धाश्रमात भारती करत आहेत, आणि जे घरी आहेत त्यांना असहाय वागणूक दिली जात आहे.
(मी स्वतः अनुभवलेलं कटू सत्य: एका धर्मग्रामात घडत असलेली सत्य परिस्थिती)
एका स्त्रीने आपल्या पतीच्या निधनानंतर मुलांना काबाडकष्ट कष्ट करून वाढवलं. स्वतःची कोणतीही काळजी न करता दिवस-रात्र घरकाम करून त्यांना शिकवलं व चांगल्या नोकरीला लावून दिले. एका मुलाच लग्न झालं आणि घरात पाळणा हालला. वर्षे लोटली आणि पुन्हा एकदा दुस-यांदा घरात नवीन बाळ जन्माला आले. ह्याच काळात त्या स्त्रीच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली परंतु कोणतीही तक्रार न करता ती आपलं जीवन आनंदाने जगत होती. पण घरात आलेली सून दोन-चार पुस्तके जरा जास्तच शिकलेली. सासूला नीट उभं राहता येत नसतानादेखील स्वतः बसून, सासूकडून सर्व कामे करवून घेते. तरीही कोणतीच तक्रार न करता निमूटपणे फक्त मुलाच्या आणि नातवंडांच्या प्रेमाखातर खुर्चीचा आधार घेऊन ती सर्व कामे करत आहे. ह्याला म्हणावं का प्रेम? हिच का आपली चंद्रावर पोहोचलेली आणि मंगळावर पाय ठेवण्यासाठी धडपड करणारी, समुद्राच्या पायथ्याशी जाऊन असलेल्या खजिन्याचा शोध लावणारी, आर्थिक परिस्थितीने आणि ज्ञानाने आकाशात भरारी घेणारी परंतु संस्काररहित असलेली आपली सुशिक्षित पिढी?
असिसिकर संत फ्रान्सिस नेहमी म्हणत असत, “जो प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम केले नाही” (Love is not loved). जोपर्यंत आपण येशूने दिलेली प्रेमाची आज्ञा पाळणार नाही, तोपर्यंत आपण शेजा-यावर प्रेम करायला सुरवात करूच शकत नाही. पवित्र त्रैक्य हे आपणासमोर प्रेमाने ओसंडून वाहणारे प्रतिक आहे आणि तेच आपला आदर्श आहे, कारण, ‘देवच प्रेमाचा उगम आहे’. कार्ल मिनींगेर म्हणतात, “प्रेम एका वेळी दोघांना रोगमुक्त करते, एक जो देतो आणि दुसरा जो स्वीकारतो”. आई-वडिलांनी मुलांना चांगले शिकवले पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत, त्यांचे लाड न पुरवता त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे कारण प्रीतीने माणूस शिकतो व सावरतो पण लाडाने बिघडला जातो.
धन्यवादीत मदर तेरेसा म्हणतात, “तुम्ही किती करता हे महत्वाचं नाही, पण ते करण्यात किती प्रेम दाखवता ह्याला महत्व आहे”. ह्या विज्ञानाच्या काळात आपणाला भरपूर गोष्टींचा विसर पडला आहे- गाडी आल्यापासून आपण चालायचं विसरलो आहोत, घरात टीव्ही आल्यापासून आपला शेजारी कोण आहे ते आपणाला ठाऊक नाही, मोठ-मोठी घर बांधली आहेत पण छोट्यातल्या छोट्या कुटुंबात माणसांना एकत्र नांदता येत नाही, परमाणुचं (Atom) विभाजन करून तो कशाने बनला आहे ह्याचा शोध लावत आहोत परंतु दुस-यांना आणि त्यांच्या संस्कृतीला स्वीकारणे आपल्याला कठीण जात आहे. हिच का आपली प्रगती? माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो परंतु समाजात दृश्य वेगळचं आहे, पैश्यावर प्रेम आणि माणसाचा वापर केला जात आहे. प्राण्यांना हातात पकडून व छातीला लावून रस्त्याने लोक फिरवत आहेत तर आपल्या पोटच्या मुलांना गाडीमध्ये बसवून दोरीने रस्त्यावर खेचत आहेत.
संत पौल म्हणतात, “मी जरी देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो; पण माझ्याठायी प्रीति नसली तर मी आवाज करणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे” (१ करिंथ १३:१-२). प्रेमाशिवाय मनुष्यजीवन हे नरका समान आहे. खरं प्रेम करणं म्हणजे यातनांना सामोरे जाणे, स्वतःचा त्याग करणे, स्वतः पडून दुस-यांना उठवणे, ह्यालाच म्हणतात प्रेम. प्रत्येकाला प्रेम हवं असतं पण द्यायला मात्र थोडेच तयार असतात. खरं प्रेम धनदौलतीने विकत घेता येत नाही- ते इतरांना देण्यात व परत मिळविण्याची आशा न ठेवता जीवन जगणे ह्यातच खरा आनंद असतो. क्रूसभक्त संत योहान म्हणतात, “प्रेमाच्या आधारावरच ह्या विश्वाचा न्याय-निवाडा केला जाईल. सर्व मानवजातीच तारण हे प्रेमावरच आधारित आहे, ‘प्रेम’ हा शब्द मानवजातीच्या इतिहासातील सर्वात शेवटचा शब्द असेल”. संत पौल प्रमाणे आपण ह्या प्रेमाने झपाटले गेले आहोत का? 
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:  

प्रतिसाद: हे परमेश्वरा, परस्परावर प्रेम करण्यास आम्हाला सहाय्य कर.
१. ज्याप्रमाणे पित्याने पुत्रावर प्रेम केले व पुत्राने आपणावर, तेच प्रेम सर्व भाविकांना व ख्रिस्तसभेच्या सर्व पुढाका-यांना एकमेकांवर करण्यास कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. पवित्र आत्म्याचा वर्षाव आपणा प्रत्येकावर व्हावा व मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा उपयोग स्वत: पुरताच न करता इतरांच्या व समाजाच्या कल्याणासाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. दु:ख सहन करणारे आपले शेजारी, विशेषकरून जे आजारी व गरीब आहेत. अश्यांकडे बेपर्वाई व उदासीनतेने न पाहता, सर्वांनी त्यांची काळजी घ्यावी, ह्या परमगुरुस्वामींच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया.
४. यंदाच्या वर्षी पावसाळी मोसमात चांगला पाऊस व्हावा, शेती-बागायतीसाठी योग्य ते हवामान मिळावे व शेतक-यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच त्यांच्या शेतातील भरगोस पिकाने इतरांचेदेखील पोषण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.   
५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी आपण प्रार्थना करूया. 
    

   
 


No comments:

Post a Comment