Thursday, 26 November 2015

Reflection for the Homily of 1st Sunday in Advent Time (29/11/2015) By: Baritan Nigrel.











आगमन काळातील पहिला रविवार





पहिले वाचन: यिर्मया ३३:१४-१६.
दुसरे वाचन: थेस्स ३:१२–४:२.
शुभवर्तमान: लूक २१:२५-२८,३४-३६.

“ख्रिस्त मोठ्या वैभवाने येईल”



प्रस्तावना:

आजपासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरुवात करीत आहे. ह्या आगमन काळामध्ये देऊळ माता आम्हां प्रत्येकाला, आपल्या मनाची व अंतकरणाची तयारी करून प्रभू येशु ख्रिस्ताला पुन्हा एकदा नव्याने स्वीकारण्यासाठी आमंत्रित करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएल लोकांना, दाविदाचा पुत्र ‘मसिहा’ ह्याचा जन्म इस्रायली लोकांच्या तारणासाठी होईल असे अभिवचन देतो. दुसऱ्या वाचनात प्रभू न्यायनिवाडा करण्यासाठी येईल, म्हणून त्याला भेटण्यासाठी आपण निर्दोष व पवित्र असावे असे संत पौल आपल्याला सांगत आहे. आणि शुभवर्तमानात येशु आपल्याला सर्वप्रसंगी प्रार्थना करून जागृत राहण्यासाठी संबोधित आहे.
प्रभू येशूने आम्हा प्रत्येकाच्या हृदयात जन्म घेऊन, आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनातून आणि पापातून मुक्त करावे तसेच त्याला स्विकारण्यासाठी आपण सदैव जागृत असावे, म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करुया.   

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया ३३: १४-१६
परमेश्वराने इस्रायल लोकांना दाविदाच्या नव्या राज्याचे अभिवचन दिले होते (यिर्मया २३:५,६). त्याचाच उल्लेख आजच्या पहिल्या वाचनात केल्याचे आपणास दिसून येते. दाविदाचे ऐतिहासिक राजघराणे संपुष्टात आले असले, तरी दावीद घराण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दावीद राजापेक्षा महान असेल. ‘देव आमची धार्मिकता’ हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये ‘सिद्द्कीया’ नावाशी जुळणारे आहे. हे नाव राजाला खरोखर सर्वांगी साजेसे असेल, पण हा राजा, हे नाव खरोखर सत्याने धारण करील. यिर्मया संदेष्टा, येथे दाविदाच्या पुत्राची (‘मसिहा’) दृष्टी रोखून वाट पाहत आहे, कारण त्याचा जन्म इस्राएलच्या तारणासाठी होणार आहे असे त्यास सांगण्यात आले होते (मत्तय १:१; लूक २:२९-३५).

दुसरे वाचन : १ थेस्स ३:१२ – ४:२
थेस्सलनिकर प्रीतीने भरलेले होते. हे पौलाने ऐकले होते. ती प्रीती प्रचंड प्रमाणात वाढावी व सर्वांपर्यंत पोहचावी अशी प्रार्थना पौल करतो. उफाळून वर येणाऱ्या झऱ्याप्रमाणे ही प्रीती असावी अशी पौलाची प्रार्थना होती (१२), अगदी त्याप्रमाणेच ही प्रीती त्यांच्यामधून नदीप्रमाणे ओसंडून वाहत होती.
प्रभू न्यायनिवाडा करण्यासाठी येईल (१३) तेव्हा आपल्या वाचकांनी त्याला भेटण्यासाठी निर्दोष व पवित्र असावे हीच त्याची इच्छा आहे. प्रभू लवकरच येईल, असे त्याला वाटते म्हणूनच देवाने त्यांच्या अंतःकरणात हे गुण स्थिर करावे आणि प्रभू येईपर्यंत ते टिकून राहावेत हीच त्याची प्रार्थना आहे.

शुभवर्तमान : लूक २१:२५-२८, ३४-३६
जुन्या करारात केलेल्या भाकितानुसार, विश्वात होणारी उलथापालथ हा अंतसमय येण्यासंबधातील दुसरा टप्पा आहे (११). येथे परराष्ट्रीयांच्या सत्ता उलथून टाकल्याचे रूपकात्मक वर्णन केले गेले आहे असे काही अभ्यासक म्हणतात. त्यानंतर मनुष्याचा पुत्र येईल, आणि दानिएल ७:१३-१४ मधील भाकीत परिपूर्ण होईल. तेथे त्याचे आगमन, न्यायाचा दिवस आणि देवाची सत्ता दृश्यरूपात प्रत्यक्षपणे प्रस्थापित होणे यांतील परस्पर संबंध येथे दर्शविण्याचा प्रयत्न  केला गेला आहे. पुढे येणारी संकटे, अनर्थ वगैरे मुक्ततेच्या या दिव्य कृत्याची प्रस्तावनाच आहे म्हणून शिष्यांनी भीती सोडावी आणि आशा धरून रहावे.
(२५-२८) या वचनात प्रभू येशूने या जगावर देवाचा क्रोध पडेल, त्यासमयी काय काय घडेल ह्याविषयी सांगितले आहे. या घटनांचे सविस्तर वर्णन प्रगटीकरण ६-१८ या अध्यायात आढळते. त्या काळी जगावर अरिष्टे कोसळतील व मग ख्रिस्त आपल्या वैभवाने उतरेल. तो येरुशलेमेत आपले राज्य स्थापील व सर्व जगावर राज्य करील (२७). तेव्हा इस्राएल लोक येशू हाच मसिहा आहे हे ओळखतील (२८).
प्रभू येशु पुढे आपल्याला सांगत आहे की, सर्वप्रसंगी प्रार्थना करीत सदैव जागृत राहा (३६), कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे.

बोधकथा:
एके दिवशी आईने तिच्या मुलाला विचारले – ‘प्रत्येक दिवशी कामावरून आल्यावर तू एकटा त्या घराच्या झाडाखाली का बसतोस? मुलाने आईला म्हटले, ‘तिथे मी एकटा नसतो, तर मी शांततेत देवाच्या सानिध्यात असतो. माझा थोडासा वेळ बाजूला काढून, तो वेळ मी देवाला देत असतो.’
हे शब्द ऐकल्यावर आईला बरे वाटले, मात्र तिने त्याला विचारले, देव तर सर्व ठिकाणी आहे, मग तू दरदिवस फक्त त्याच जागी का जातोस? मुलाने आईचा हाथ पकडला आणि म्हणाला, ‘आई, खरच देव आपल्याबरोबर व सर्व ठिकाणी आहे, पण मी देवाबरोबर नसतो.’
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, देव आपल्याबरोबर सदैव असतो, मात्र आपण देवाबरोबर नसतो. ह्या आगमन काळामध्ये आपण दिवसातून थोडा वेळ बाजूला काढून देवाबरोबर राहण्याचा प्रयत्न करुया. कारण देवाच्या सानिध्यात राहील्याने आपण निर्दोष व पवित्र बनतो. आपण सदैव प्रार्थना करून जागृत रहावे म्हणून आपण त्याच्याबरोबर राहूया आणि प्रत्येक दिवशी आपण त्याचा स्वीकार करुया.

मनन चिंतन:

ख्रिस्त जन्माची कथा अभ्यासताना मानवी स्वभावाचा एक मोठा गुण आपल्या निदर्शनास येतो तो म्हणजे “आशा”. माणसाच्या जीवनात आशा नसेल तर तो आत्महत्या करतो!
माणसाला आशेने भविष्याकडे पहायला लावून त्यांचे नैराश्य, दुःख दूर करण्याचे महान सामर्थ्य प्रत्येक धर्मात आहे; मग तो कोणताही धर्म असो. काबाडकष्ट करून तीन मुलांना वाढवणारी विधवा – ‘माझा देव माझ्या मुलांना चांगल्या उच्च पदवीवर कामाला लावेल!’ याच आशेने प्रार्थना करते, ती अधिक जोमाने काबाडकष्ट करते व मुलांसाठी लागणारी अभ्यासाची महागडी पुस्तके विकत आणते. तरुण विधवा, कुंकू लावून फिरते व आशेने म्हणते, ‘माझा पती वादळात वाचलाय, तो मेला नाही तर जिवंत आहे, एखादया बेटावर मदतीसाठी हाक मारत असेल आणि एकेदिवशी तो नक्कीच परत येईल!’
आज आगमन काळातील पहिला रविवार. आगमन काळ म्हणजे ‘प्रभू येण्याचा काळ आहे’ अशी आशा मनात बाळगून त्याच्या येण्याची पूर्व तयारी करणे होय. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की, आपल्या पहिल्या माता-पित्यांनी देवाविरुद्ध पाप केले. परंतु त्यामुळे देवाने आपल्याला एकटे सोडले नाही. तो आपल्यापासून दूर गेला नाही, उलट देवाने त्याच मानवाला मी ‘माझा पुत्र तुमच्या तारणासाठी पाठवीन!’ अशी आशा दाखविली. ह्यास्तव देवाने अनेक संदेष्टे पाठवले व त्यांच्याद्वारे देवाने इस्रायली जनतेमध्ये ‘ख्रिस्त’ येईल आणि तो त्यांची सारी दुःखे नष्ट करील, त्यांचे अश्रू पुसून टाकील, असे भविष्य कथन करून त्यांच्या जीवनात आशादिप पेटत ठेवला होता.
दोन हजार वर्षापूर्वी देवाने त्याचा पुत्र या पृथ्वीतलावर पाठविला. येशु ख्रिस्त देवाचा पुत्र या जगात पाप्यांचे तारण करावयास आला. स्वर्ग सोडून तो या जगात मानवी देहात अवतरला. ह्याला प्रभू येशूचे पहिले येणे म्हणतात. तो या जगात लहानाचा मोठा झाला, वधस्तंभावर मरण पावला, पुन्हा उठला व स्वर्गात चढला. जाण्यापूर्वी त्याने आपणास सांगितले की, “मी पुन्हा येईन व तुम्हांस जवळ घेईन”. जसा तो स्वर्गात घेतला गेला तसाच तो पुन्हा येणार आहे (प्रेषितांची कृत्ये १:११). ही दिव्य आशा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या मनात असते.
प्रभू येशु दुसऱ्यांदा परत येईल, ह्याच आशेने देऊळमाता प्रत्येक वर्षी आपल्याला जागृत होण्यास व आपली अंतःकरणे, हृदये साफ ठेऊन ख्रिस्ताला स्वीकारण्यास या आगमन काळामध्ये बोलावत असते. आजच्या पहील्या वाचनात आपण ऐकले की, परमेश्वर पिता इस्रायल लोकांना, दाविदाच्या घराण्यातील जो पुत्र जन्माला येईल, तो इस्रायल लोकांचा तारणारा ‘मसिहा’ असेल असे अभिवचन देतो.
यशया संदेष्टा परमेश्वराला हाक मारून म्हणतो, ‘हे प्रभो, ये आणि अनादि काळापासून वाट पहात असलेल्या या मानवतेला तुझे दर्शन दे! आम्ही सारे अशुद्ध बनलो आहोत, कारण आम्ही दुष्कृत्यांची गलिच्छ वस्त्रे घातली आहेत. अधर्माच्या वादळाने आमची दाणादाण उडविली आहे, जळून आमचे भस्म झाले आहे. तूच आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. ये आणि तूच आम्हाला घडव’ (यशया ६४:४-८).
येशू ख्रिस्त आपल्याला शुद्ध बनवण्यासाठी, आपल्याला सत्कर्माची शुभ्र वस्त्रे घालण्यासाठी, आपल्याला पापातून मुक्ती देण्यासाठी, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी व अशांतीतून शांतीमध्ये व प्रितीमध्ये आपले जीवन जगण्यासाठी येशू ख्रिस्त पुन्हा येईल; कारण तोच आपला तारणारा आहे.
त्याने ‘देवाचे राज्य’ या भूतलावर प्रस्थापित केले. सर्वत्र दया, क्षमा, शांती आणि प्रीतीचे राज्य प्रस्थापित केले. येशू ख्रिस्ताने पूर्वजांच्या आशा पूर्ण केल्या आणि नव्या आशा मनाला लावून दिल्या. ख्रिस्ताने आंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवणशक्ती आणि पांगळ्यांना नवशक्ती दिली. शुभवर्तमानात आपण ऐकले की, प्रभू मेघांवरून, मोठया गौरवाने येईल. तो पवित्र दूतांसह येईल. त्याच्या येण्याची वेळ आपल्याला ठाऊक नाही परंतु सर्व चिन्हांवरून त्याच्या येण्याचा समय जवळ आला आहे, हे आपल्याला समजेल. त्यामुळे आपण सदोदित प्रार्थना करीत, वाट पाहत ख्रिस्तामध्ये जागृत राहिले पाहिजे. कारण तो चोरासारखा अचानक येईल. तो आपल्या लोकांसाठी, राज्य करावयास व जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येईल (२ तिमथ्य ४:१). प्रभूच्या येण्याची तयारीसाठी लागणारी कृपा ह्या आगमन काळात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभो, आम्हाला तुझे दर्शन घडू दे.
1.     ह्या आगमनकाळात आपण सर्वांनी आपल्या मनाची व अंतःकरणाची तयारी करून प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा नव्याने आपला तारणारा म्हणून स्वीकारावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
2.     ह्या आगमन काळात आपण प्रत्येकांनी सर्व प्रसंगी प्रार्थना करून देवाबरोबर रहावे तसेच त्याच्यासारखं निर्दोष व पवित्र बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.    
3.     प्रत्येक कुटुंबातील रागाचे व अशांतीचे वातावरण नाहीसे होऊन, देवाचे प्रेम व देवाची शांती आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात वास करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.  
4.     आपल्या चर्चमधील ज्या व्यक्ती देवापासून दूर गेलेल्या आहेत, ज्या व्यक्ती चर्चमध्ये मिस्साला येत नाहीत, अश्या सर्वांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा ख्रिस्तमय जीवन जगावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया. 
5.     थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करुया. 





Tuesday, 17 November 2015

Reflection for the Homily of the Feast of Christ the King (22/11/2015) By: Ashley D'monty.










ख्रिस्त राजाचा सण






पहिले वाचन: दानियल ७:१३-१४
दुसरे वाचन : प्रकटीकरण १:५-८
शुभवर्तमान : योहान १८:३३-३७.



मी राजा आहे पण माझे राज्य ह्या जगाचे नाही’ 





प्रस्तावना:

आज देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. त्याचप्रमाणे सामान्यकाळातील उपासनेचा हा शेवटचा रविवार आहे.
आजची तिन्ही वाचने आपणाला ख्रिस्त हा एक आदर्श राजा आहे हे पटवून देत आहेत. पहिल्या वाचनात दानिएल संदेष्ट्याने सहा हजार वर्षापूर्वीच ख्रिस्ताच्या विजयत्सोवाणीची घोषणा केल्याचे आपण ऐकतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात ख्रिस्ताला ‘राजांचा राजा व प्रभूचा प्रभू’ म्हणून गणण्यात आले आहे. तर योहानलिखित शुभवर्तमानात, येशू जो युगान-युग राज्य करणारा राजा आहे, तो आपल्या दु:ख सहनाच्यावेळी सुद्धा एक खरा-खुरा राजा होता असे प्रकट करण्यात आले आहे. पिलात व येशुमधील संभाषणात पिलात येशूला राजा म्हणून संबोधतो.
ख्रिस्त हा अखिल विश्वाचा व प्रत्येक व्यक्तीचा राजा आहे. ही भावना आपणामध्ये आजच्या उपसानेद्वारे जागृत केली जात आहे. ख्रिस्त माझा तारणारा आहे हा विश्वास आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी एक प्रेरणेचे स्थान आहे. ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा राजा घोषित करण्यासाठी व आपण त्याची प्रजा म्हणून पात्र ठरण्यासाठी ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण:
पहिले वाचन: दानियल ७:१३-१४
दानियल संदेष्टा येशूच्या राज्यत्वाची घोषणा येशूच्या जन्मापूर्वीच करतो. येशू हा राजा मानवपुत्राप्रमाणे मेघांवर आरूढ होऊन मोठया गौरवाने येताना तो पाहतो. दानियल रात्रीच्या दृष्टांतात येशूच्या या भूलोकावरील जीवनानंतरचे वैभवशाली जीवन पाहतो. ख्रिस्त हा राजा मानवाप्रमाणे आहे. तो आपल्याप्रमाणेच हाडामांसाचा मनुष्य आहे. ख्रिस्त हा सर्व बाबतीत मानवाप्रमाणेच होता पण त्याने कधी पाप केले नाही. ख्रिस्त हा अनंतकाळचा राजा आहे; म्हणून दानियल पुढे म्हणतो, ‘सर्व लोक, सर्व राष्ट्रे,व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व वैभव व राज्य दिले आहे. ख्रिस्त सर्वांचा राजा आहे, त्याच्या राज्याला सीमा नाही, संपूर्ण सृष्टीचा तो अधिपती आहे. म्हणून सर्वांनी त्याची सेवा करणे अगत्याचे आहे, पृथ्वीवरील अनेक राजे, राज्य करून गेले परंतू ख्रिस्ताचे राज्य मात्र अढळ आहे ते अविनाशी आहे. दानियलने पाहिलेल्या ह्या दृष्टांताची पूर्तता आपणाला आज येताना दिसत आहे.

दुसरे वाचन: प्रकटीकरण १:५-८
योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूला राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू (१९:१६), पृथ्वीवरील राजांचा अधिपती (१:५) असे वेगवेगळी शीर्षके देऊन येशु हाच राजा आहे असे दर्शवतो. योहान येशूला ही शीर्षके बहाल करताना त्याकाळचे रोमन राजे, जे वेगवेगळ्या देशावर राज्य करत होते, त्यांना ध्यानात धरून बोलत होता. या राजांच्या कायद्याचे पालन संपूर्ण राज्यात केले जात असत. त्याचे उल्लंघन केल्यास अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ सुद्धा केला जाई. फक्त राजालाच प्रभू म्हणून संबोधण्यात येत असे.
     ख्रिस्ती लोकांनी मात्र हे शीर्षक येशूला बहाल केले व त्यास आपला राजा म्हणून घोषित केले. राजा कितीही बलवान असला तरी त्याची तुलना ख्रिस्ताशी करता येणार नाही, कारण ख्रिस्ताने आपल्या प्रजेसाठी रक्त सांडले व त्यास पापमुक्त केले (१:५) त्याने त्यांना आपल्या राज्यात प्रवेश दिला.(१:६)
     योहान शेवटी म्हणतो, ख्रिस्त हा अल्फाओमेगाआहे. अल्फाहे ग्रीक भाषेतील पहिले अक्षर तर ओमेगाहे शेवटचे अक्षर आहे. ह्यात हेतू हा की, ख्रिस्त हा सुरुवात व शेवट आहे. सर्व मानवजातीची सुरवात हि ख्रिस्ताद्वारे होते व शेवटही ख्रिस्तात होतो.

शुभवर्तमान: योहान १८:३३-३७.

तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
     सदर प्रश्न आपणास प्रत्येक शुभवर्तमानात आढळतो. पिलाताला आपण खुद्द रोमन अधिकारी असल्याने इतर कुणी स्वत:ला राजा समजतो हे नक्कीच खटकणारे होते. पिलाताला येशूच्या प्रतीउत्तराची मुळीच कल्पना नव्हती. ख्रिस्त आपल्या पुढील प्रश्नात पिलाताला विचारतो, “आपण स्वत:हून हे म्हणता कि, दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले (१८:३४) येशु जणू विचारतो, ‘कोणत्या प्रकारचा राजा आपण आपल्या मनात बाळगता?’ रोमन कि, यहुदी?’ राजकीय राजा कि, धार्मिक राजा? ख्रिस्त पिलाताच्या मनातील गोंधळ दूर करीत होता. जर पिलाताने येशूला रोमन राजा संबोधले असते; तर येशु एक देशद्रोही ठरला असता. पिलात येशूला चार वेळेस राजाम्हणून संबोधतो. शेवटी क्रूसावरील पाटीवरही तो राजाअसे लिहितो. (१८:३९;१९:५,१४-१५,१९.)
     पुढे येशु म्हणतो, ‘मी राजा आहे पण माझे राज्य ह्या जगाचे नाहीख्रिस्ताच्या राज्याला मानवी अधिकार नाही. यहुदी रोमन अधिकाराखाली होते व पिलात सम्राटाच्या अधिकाराखाली होता. परंतु ख्रिस्ताचा अधिकार मात्र त्याच्या परमपित्याकडून होता. त्याचे राज्य हे अध्यात्मिक स्वरूपाचे होते. ते त्याच्या अनुयायांच्या अंतकरणात होते. जर ख्रिस्ताचे राज्य भौतिक असते तर त्याच्या अनुयायायांनी येशूची सुटका केली असती.
     येशु ३७ व्या ओवीत आपली ओळख व आपले राज्य कसे आहे, हे सांगतो. येशु आपले कार्य सुद्धा नमूद करतो. सत्याला साक्ष देण्यास त्याचे अध्यात्मिक राज्य सत्याचे होते. त्याने लोकांची मने विश्वासाने व आपल्या छापील प्रभावाने जिंकली. रोमन अधिकाऱ्यांचे शस्र तलावार होते, परंतू ख्रिस्ताचे शस्र मात्र देवाविषयीचे सत्य होते. जीवनाला त्याची सांगड घालणे हे येशूचे ध्येय होते. त्यामुळेच येशु म्हणतो, जो कोणी सत्याचा आहे, तो माझी वाणी ऐकतो’.

बोध कथा:
     दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस जर्मनी देशाने डेन्मार्क या छोट्याश्या देशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ख्रिशनन दहावा’ हा त्या देशाचा राजा होता. हा राजा खूप प्रेमळ व दयाळू होता. त्याचे आपल्या प्रजेवर फार प्रेम होते. हा राजा कित्येक वेळेस आपल्या घोड्यावर स्वार होऊन पहाटेची भ्रमंती करीत असे. वैशिष्ट्य म्हणजे राजा एकटा भ्रमंती करत असे, त्याचा एकही अंगरक्षक त्याच्या सोबत नसे. एक दिवशी एका नाझीच्या अधिकाऱ्याने राजाला विचारले, “राजे, तुमचे अंगरक्षक कुठे आहेत, तुम्ही एकटेच कसे काय फिरता?” राजाने उत्तर दिले, ‘ते इथेच आहेत, माझ्या सभोवताली, सर्व माझे हे माझे अंगरक्षक आहेत.लोकांचे आपल्या प्रजेवर नितांत प्रेम होते, त्यामुळेच राजा एक मित्राप्रमाणे त्यामध्ये वावरत असे.
     ख्रिस्ताचे सुद्धा प्रजेवर फार प्रेम होते. त्यामुळे ख्रिस्तसुद्धा लोकांत मिळून मिसळून राहिला.

मनन चिंतन:

     आज अखिल ख्रिस्तसभा ख्रिस्तराजाचा सण साजरा करत आहे. ख्रिस्त सर्व मानवजातीचा व अखिल विश्वाचा राजा आहे. परंतु ख्रिस्ताचे राज्यत्व हे इतर राजांप्रमाणे नव्हते. इस्रायली जनतेने देवाकडे राजाची मागणी केली; तेव्हा देवाने त्यास शौल राजा दिला परंतु ह्या राजाने त्यांचा छळ केला; मग देवाने दावीद राजा नेमला व ह्या राजाने एका उत्तम राजाची भूमिका बजावली. त्यानंतर शलमोन राजा आला. ह्या राजाने सुद्धा शहाणपणाने व बुद्धिमत्तेने लोकांची मने जिंकली; परंतु तद्नंतर मात्र त्याचा ऱ्हास होऊ लागला. शेवटी देवाने आपला एकुलता एक पुत्र, दाविदाच्या वंशांतून पाठविण्याचे घोषित केले. त्यादिवसापासून इस्रायली जनतेत एक आशा निर्माण झाली कि, आमचा राजा येईल व आम्हांस मुक्त करील. इस्रायली जनता हि अनेक अश्या अधिपतींच्या दबावाखाली दडली होती. त्यामुळे ते तारणाऱ्याची वाट पाहत होते. त्यांचा विश्वास होता की, त्यांचा राजा मोठ्या सामर्थ्याने व गौरवाने येईल व त्यांची सोडवणूक करील. परंतु देवाचे मार्ग व ईश्वरी मार्ग वेगवेगळे आहेत. जगाचा तारणारा एका गाईच्या गोठ्यात जन्मला व क्रुसावर एका अपराध्यासारखा मरण पावला. त्यामुळे जेव्हा त्या लोकांचा मसीहा, राजा ह्या भूतलावर आला, तेव्हा त्यांनी त्यास नाकारले. फार थोडक्यांनीच ज्यांनी त्याचा जवळून अनुभव घेतला त्यांनी त्यांस आपला राजा घोषित केले.
     ख्रिस्तराजाला ह्या भूतलावर कोणताही तटबंद राजवाडा नव्हता, होता ते मानवी हृद्य. ख्रिस्तराजा हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात व हृदयात राज्य करतो व ह्याच व्यक्ती म्हणजेच ख्रिस्ताचे साम्राज्य ह्यांची संपत्ती इ. त्याच्या साम्राज्याला सीमा नाही; कारण तो पृथ्वीचा व साऱ्या ब्रम्हांडाचा विधाता आहे. तोच अल्फा व ओमेगा आहे. ख्रिस्त हा एक उत्तम जाणता राजा आहे; म्हणून ह्या भूतलावर असताना त्याला आपल्या लोकांचा कळवळा आला. त्याने त्यांस अन्न, आंधळ्यांस डोळे, मुक्यांस वाचा, रोग्यांस आरोग्य दिले व मेलेल्यांस जिवंत केले. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तो आपल्या प्रजेसाठी झटला. ख्रिस्ताने आपले राज्य कोणतीच लढाई जिंकून नाही, तर दु:ख यातना सहन करत आपल्या क्रूसावरील समर्पणाने प्रस्थापित केले. एकमेव असा राजा ज्याने आपल्या प्रजेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून आज त्यास आपण राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू म्हणून गौरवीत आहोत. असा राजा जगाच्या इतिहासात ना कधी होऊन गेला व न कधी होणार. ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याला आपला राजा म्हणूया व त्याच्या राज्यात एक विश्वासू जनता म्हणून प्रवेश करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझे राज्य येवो.
१.      आपले परमगुरु, महागुरू,धर्मगुरू व व्रतस्थ हयांनी ख्रिस्त राजाप्रमाणे अखिल विश्वासू लोकांसाठी आपले सर्वसंग त्यागून त्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.      आपला ख्रिस्ती समुदाय ख्रिस्ताचे राज्य प्रस्थापित करण्यास प्रयत्नशील असावा म्हणून प्रार्थना करूया.
३.      येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्तावरील आपला विश्वास ढळू न देता त्यास आपल्या जीवनाचा राजा घोषित करावे म्हणून प्रार्थना करूया.
४.      आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून ख्रिस्तराजाप्रमाणे राज्याच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असावे तसेच देशाचा व मानवजातीचा विकास घडवून आणावा म्हणून प्रार्थना करूया.
५.      थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतुंसाठी प्रार्थना करुया.




Tuesday, 10 November 2015


Reflection for the Homily of 33rd Sunday in Ordinary Times  (15/11/2015) By: Dominic Brahmane.
                                  









                                   सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार




पहिले वाचन: दानिएल १२:१-१३.
दुसरे वाचन : इब्री लोकांस पत्र १०:११-१४;१८.
शुभवर्तमान : मार्क १३:२४-३२.


"अखेरपर्यंत जो वाट पाहिलं, तो खूप सुखी होईल"




प्रस्तावना:

     आज आपण सामान्याकाळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगण्यास पाचारण करत आहे.
     दानिएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींविषयी केलेले भाकीत आपण ऐकतो. त्या काळात ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली आहेत ते सर्व बचावतील; मृत उठवले जातील, काहींना चिरंजीवीत्व तर काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल असे परमेश्वर म्हणतो. इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रात संत पौल म्हणतात, ‘जेथे पापांची क्षमा झाली तेथे अधिक अर्पणाची गरज भासणार नाही’. तर मार्कलिखित शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरागमनाची परिपूर्ती कशी होईल ह्याबाबतचे चिन्हे सांगत आहे.
     प्रभू येशूच्या पुनरागमनाने आंम्हा सर्वांचे तारण होणार आहे; परंतु त्यासाठी आपण धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगायला हवे. ह्यासाठी आजच्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :
पहिले वाचन: दानिएल १२:१-१३
हा उतारा दानिएल पुस्तकास दिलेली एक कवितामय सांगता होय. ह्यात शेवटच्या घटकेत होणारा विध्वंस व हा देवाच्या न्यायनिवाड्याचा दिवस असेल असे सांगण्यात आले आहे. ह्यामध्ये देवाने निवडलेले अथवा देवावर विसंबून राहणाऱ्यांचे तारण होईल. मिखाएल देवदूत जो इस्त्रायलचा आश्रयदाता मानला जातो, तोच इस्त्रायल लोकांच्या बऱ्या-वाईटपणाचे वृत्त परमेश्वराला कळवील. जे कबरेत निजले होते, त्यांना नवजीवन प्राप्त होईल. हे वैयक्तिक दिलेले पुनरुत्थानाचे वचन नव्या कराराशी अतुलनात्मक आहे (यशया २६.१९).
ज्या देवभिरू, विश्वासू लोकांनी संकटात देवावर विश्वास ठेवला, त्यांना हे अनंतकाळचे जीवन लाभणार आहे असे येथे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. जुन्या करारात ‘शियोल’ नावाच्या ठिकाणी सर्व मृतात्मे पुरले जात. ह्या जागेत असणाऱ्या व्यक्ती देवापासून दूर गेलेल्या आहेत आणि त्याचा देवापासूनचा संबंध तुटला असे समजले जात असे (यशया ३८:१८; स्तोत्र ८८:१०-१२).
ह्या पुस्तकाचा लेखक (v-४) मध्ये अंतिम दिनाचे गुढ कायम ठेवत आहे, कारण हे सर्व कधी घडेल याचा उल्लेख स्पष्टपणे येथे करण्यात आलेला नाही. (v.५)मध्ये नमूद केल्याप्रमाणे, दोन देवदूत नदीच्या दुतर्फा उभे असतील आणि शुभ्र वस्र परिधान केलेला व्यक्ती त्यांचा न्याय करील असे (v.७) मध्ये सांगतो. (v.८) मध्ये दानिएल जेव्हा ह्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छा प्रगट करतो, तेव्हा त्यास नकारात्मक प्रतिसाद मिळतो.

दुसरे वाचन: इब्री १०:११-१४,१८.
     ह्या प्रास्ताविक उताऱ्यात इब्री पत्राचा लेखक येशूने केलेल्या स्व-अर्पणात आणि पूर्वीच्या काळी धर्मगुरुंनी केलेल्या प्राणार्पनात असलेली तफावत आपल्या दृष्टोत्पत्तीस आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या पत्राचा लेखक येशूने अर्पण केलेल्या अर्पणावर विशेष भर देत आहे. कारण येशूने अर्पिलेले अर्पण हे अनंत काळासाठी होते व त्यास पुन्हा हे अर्पण करण्याची गरज नव्हती. त्याउलट पूर्वीच्या धर्मगुरुंनी केलेली होमार्पण, प्राणार्पणे, जलार्पणे ही प्रत्येक वर्षी त्यांना करावे लागत असे, त्यात अनंतकाळचा घटक नव्हता. ह्यास विसंगती होती ती येशूने केलेल्या अर्पणाची.
हे ह्या विशेष दोन घटक आढळतात.
अ)   ह्याची पुनरावृत्ती करण्याची गरज भासणार नाही. कारण ते त्याने स्व-अर्पणाने एकदाच सर्वकाळासाठी परिपूर्ण असे केले होते.
आ)   ह्या अर्पणाची पुनरावृत्ती कोणीच करू शकत नाही.
येशू ख्रिस्ताद्वारे आपण सर्वांनी देवाचे प्रेम अनुभवले. येशुद्वारेच आपणाला “अब्बा पिता” कळला. येशूचे मरण व पुनरुत्थान हे आज्ञाधारकतेचे अत्यंत मार्मिक उदाहरण आहे आणि हे सर्व येशुत असल्याने पित्याकडून आलेला तो परीपूर्ण असा पुत्र होता आणि त्याने केलेले अर्पण हे परिपूर्ण असे होते. म्हणून अश्या परिपूर्ण अर्पणाची पुनरावृत्ती कोणीच करू शकत नाही.
     (v.१८) ह्या अध्यायाअंती लेखकाने त्याच्या लेखनशैलीनुसार यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाक्यावर विशेष जोर दिला आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही” (यिर्मया ३१:३४). येथे यिर्मया संदेष्टा नवीन कराराबद्दल बोलत आहे. हा करार त्यांच्या ह्र्दयपटलावर कोरला गेला होता. नव्या करारातही येशूने त्याच्या स्व-अर्पणाने मनुष्याचा देवाबरोबर पापामुळे असलेला दुरावा दूर करून त्यांच्यातील पापाचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट केला आणि त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळवली.

शूभवर्तमान: मार्क १३:२४-३२.
     ह्या परिच्छेदात येशू न चुकता त्याच्या पुनरागमनाबद्दल भाष्य करतो. ह्या त्याच्या पुनरागमनाने कोणकोणते बदल घडून येतील हे तीन भागात विभागता येतील.
१)        येशूच्या पुनरागमनात युद्ध होतील. ४ एज्रा मध्ये ह्याची विशेष नोंद मिळते. ‘तेव्हा धरणीकंप होईल, लोकांचा गलाटा उठेल, शहरांमध्ये तह होतील, अधिकाऱ्यांची धांदल उडेल, असे लिहिलेले आढळून येते’ (९:६). बारुखच्या दुसऱ्या पुस्तकातही ह्याबद्दल वाचावयास मिळते (२७:५-१३). (४८:३२) मध्ये, ‘पृथ्वीवर राहणारे सर्व एकमेकांविरुद्ध होतील; त्यांची भांडणे होतील; ह्याच कल्पनेचा किंवा यहुद्यांच्या भविष्याविषयी केलेल्या भाकीताचा (स्वप्नाचा) येशूने येथे वापर केला असावा.
२)                 येशूचा पुनरागमनाने सर्वत्र अंधार पसरेल. जुन्या करारात ह्याविषयी आपल्याला बरेच संदर्भ दिलेले आढळतात. उदा. आमोस ८:९, योएल २:१०, ३:१५, यशया १३:१०,३४:४, बारुख ३२:१.
‘त्याकाळात महान व्यक्तींच्या आगमनाने सर्व पृथ्वी थरारली जाईल’. ह्यावरून येशून सर्वश्रुत अशा जुन्या करारातील भाषेचा वापर करतो असे समजते.
३)     ज्यू पंथीयांच्या हा एक कल्पनेचा भाग होता की, सर्व ज्यू पंथीय एक दिवशी चारही बाजूंनी येऊन पालेस्तीन शहरात एकवटतील, ह्याविषयी दिलेला संदर्भ आपणास जुन्या करारात यशया २७:१३, ३५:८-१०; मिखा ७:१२  आणि जखऱ्या १०:६-११ ह्या पुस्तकांत सापडतो. ह्या येशूने वापरलेल्या चित्रयुक्त भाषेत आपल्याला प्रभूच्या पुनरागमनाची शास्रशुद्ध अशी तारीख व दिवस सांगितलेला नाही, परंतु येशूने ज्यू-पंथीयांनी पुरातन काळात वापरलेली भाषा परत एकदा वापरली. ह्या उताऱ्यात येशूने जरी विध्वंसाचे चित्रमय वर्णन केलेले असले तरी येशूच्या पुनरागमनाचे सत्य त्यातून वगळता येणार नाही.

बोधकथा:
    1. एक विदेशी व्यक्ती खेडेगावातून फेरफटका मारत होता. गरीब आणि संसाराच्या तारेवरची कसरत करणाऱ्या जनतेला बघून तो कळवळला. त्याने एका सर्वात गरीब सुताराला काम देण्याचे ठरवले. त्या विदेशी माणसाने सुताराला बक्कळ पैसा दिला आणि सांगितले ह्या पैश्यांतून मला सुंदर असे लाकडाचे घर व फर्निचर बनवून दे. असे सांगून तो परदेशी निघून गेला. सुताराने ह्या गोष्टीचा फायदा घेतला आणि सगळ्यात कमी किंमतीचे लाकूड, फळ्या वापरून घर अगदी कमकुवत, तकलादी बनवले. त्यातून झालेल्या पुष्कळ फायद्यात स्वतःची मौजमजा व छानछौकीचे जीवन जगण्यात घालून पैश्यांची उधळपट्टी केली.
     काही दिवसांनी तो विदेशी माणूस घर बघण्यासाठी आला व घर बांधलेले बघून तो आनंदी झाला. त्याने त्या सुताराला बोलावले व त्याची प्रशंसा करत त्याला आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणजे त्या परदेशी माणसाने त्या सुताराने बनवलेल्या घराच्या चाव्या त्यालाच परत सोपवल्या आणि हे घर आता तुझेच आहे असे म्हणत त्या घरात त्याला राहण्यास सांगितले आणि तो मायदेशी परतला. सुताराला पश्चाताप झाला आणि स्वत:शी म्हणू लागला, ‘जर मला अगोदर माहित असते की, मीच ह्या घराचा मालक असणार आहे, तर मी सर्वात उच्च प्रतीचे लाकूड, फळ्या, फर्निचर वापरले असते. त्याने बांधलेल्या कमकुवत घराचा कटू अनुभव त्याला पावसाळ्याच्या दिवसात आला. सर्वत्र पाणी गळू लागले आणि घरात पाणी साचले. सुतार पुन्हा डोक्याला हात लावून अश्रू गाळत बसला.
तात्पर्य: येशूच्या पुनरागमनाची निश्चित वेळ आपणास ठाऊक नाही. परंतु त्या शेवटच्या घटकेस जर आपण विश्वासू आणि नीतिमान असलो तर केलेल्या पापांचे दुष्परिणाम आपणास भोगावे लागणार नाहीत. तर आपल्या विश्वासाचे व नितीमत्वाचे प्रतिफळ नक्कीच प्राप्त होईल.


2.   डॉमनिकन संस्थेचे थोर तत्वज्ञानी आणि विचारवंत थॉमस अक्वायनस, सह्भोजनानंतर आपल्या साथीदारांसोबत विरंगुळा करत गप्पा-गोष्टी मारत होते. एकमेकांच्या सहवासात त्यांना सुखदायक अनुभव येत होता. इतक्यात त्यांच्यातील एकाने संत थॉमस यांना प्रश्न विचारला, ‘येणाऱ्या पंधरा मिनिटांत जगबुडी होणार आहे, असे जर तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?’ त्यावर स्मितहास्य करत ते उत्तरले, ‘जे मी आता सध्या करत आहे तेच चालू ठेवील’.

तात्पर्य: जर आपण देवाने दिलेल्या आज्ञेनुसार आपले जीवन जगत आलो असेल तर शेवटी पश्चाताप करण्याची काहिच गरज पडणार नाही. प्रभूच्या पुनरागमनासाठी आपण आहोत तसे तयार असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक क्षण आपण नितीमानाने व विश्वासाने परमेश्वरचरणी समर्पित करायला हवा.

मनन चिंतन:
‘आपले ह्या पृथ्वितलावरचे वास्तव्य हे क्षणिक आहे, कारण आपले येथे  अस्तित्व हे एका वाटसरू किंवा यात्रेकरूप्रमाणे आहे, त्यास कायमचा ठावठिकाणा कदापि नाही’ असे संत अगुस्तीन म्हणतात. आजच्या पहिल्या व शुभवर्तमानातील वाचनातून आपल्याला ह्याची प्रचीती नक्कीच येते. दानिएल संदेष्ट्याच्या पुस्तकात ह्या युगाच्या समाप्तीविषयी भाकीत केल्याचे आपण ऐकले आणि शुभवर्तमानातही येशूच्या पुनरागमनापुर्वी होणारा विध्वंस ऐकला. येशूने शुभवर्तमानात सांगितलेला विध्वंस हा इ.स. नंतर सत्तर वर्षांनी येरुशलेम मंदिराच्या झालेल्या नाशाबाबत काही प्रमाणात खरा ठरला. त्याकाळी रोमन लोकांनी ते मंदिर युद्धामध्ये जमीनदोस्त केले होते. परंतु आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या पुनरागमानापुर्वी होणाऱ्या अकालाची चाहूल करून देत आहे.
येशू जेंव्हा पुन्हा येईल तो न्यायनिवाड्याचा दिवस असेल. तेव्हा येशू नव्याने त्याचे राज्य नीतिमान व विश्वासू असलेल्या लोकांबरोबर प्रस्थापित करेल. ह्यास समरूप दानिएलच्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन आपणास सांगण्यात येते की परमेश्वर जे मरण पावले आहेत त्यांस उठवील; काहीना चिरंजीवित्व तर काहींना कायमस्वरुपाची अप्रतिष्ठा लाभेल.
पुष्कळदा आपण ह्या अश्या वाचनांनी घाबरून जातो. त्यात भर ती म्हणजे नाविन्यप्रघातक भाकिते करणारी प्रसार माध्यमे. २०१२ मध्ये ह्या पृथ्वीचा अंत होणार व तो थोडक्यात कसा होणार हे दाखवणारा ‘२०१२ The end of the world’ अश्या नावाचा कल्पनात्मक चित्रपट प्रदर्शित केला गेला होता. त्यामध्ये युगाच्या समाप्तीअंती होणारा विध्वंस खूप भयावह स्वरुपात दाखवण्यात आला होता. असेच काहीतरी सांगणाऱ्या विशिष्ट लोकांनी ह्या अकालाविषयी बिनबुडाचे भाकितेही केली. परंतु ह्यात भयावह असे काही नाही, त्यासमयी येशू आपल्या बरोबर असणार आहे, कारण तो न्यायनिवाड्याचा दिवस असेल व आपण सर्वजण त्याच्या सानिध्यात पुनरुत्थित केले जाणार आहोत. फक्त आवश्यकता आहे ती आपल्या येशूवर असलेल्या विश्वासाची आणि प्रत्येक क्षण नितीमत्वाने व विश्वासाने जगण्याची. कारण मदर तेरेसा म्हणतात, ‘आपल्याला यशस्वी होण्यासाठी नव्हे तर देवाबरोबर आजन्म विश्वासू राहण्यासाठी पाचारीत केले गेले आहे’.
आपल्या जीवनात भरपूर अशी संकटे येतात, प्राणघातक हल्ले होतात तसेच ह्या छानछौकीच्या युगात येशुविरहित जीवन जगण्यासाठी मोह होतात परंतु आपली देवावरील असलेली नजर ढळता कामा नये. दुसऱ्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर कोणी विचारले की, ‘आता ह्या क्षणी जर अकाल येण्याची चाहूल तुम्हाला लागली तर तुम्ही काय कराल?’ तर आपले सर्वांचे उत्तर काय असेल? संत अक्वायनससारखे उत्तर असायला आम्ही आमच्या जीवनात ख्रिस्तानुरूप जीवन भरून जगायला हवे. भविष्यात काय होईल ह्याची कल्पना करून जीवन फुकट घालवण्यापेक्षा आपला वर्तमान देव-इच्छेनुरूप जगून शेवटच्या, न्यायाच्या दिवसासाठी तयार असणे केव्हाही चांगले होय. प्रभूच्या पुनरागमनात आम्ही त्याच्यासमोर नीतिमान व विश्वासू असून आपल्याला सार्वकालिक चिरंजीवित्व लाभावे म्हणून प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमचे तारण कर.
१)विश्वव्यापी ख्रिस्तसभा तिचे सर्व पुढारी व सदस्य ह्यांना प्रभूसुवार्ता घोषवण्यासाठी लागणारी कृपाशक्ती व सामर्थ्य परमेश्वराने बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)     आजच्या समृद्ध युगात ‘पाप’ हि संकल्पनाच प्रत्येकाच्या मनातून नाहीशी होत चालली आहे. प्रत्येकाला तो सर्वकाही बरोबरच करतो असे भासते. हि अबुद्धी बदलावी व परमेश्वरचरणी त्यांनी नम्र होऊन, पापांची क्षमा मागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     बहुतेक धार्मिकस्थळे हे राजकारणाचे व्यासपीठ बनत चालले आहे, त्यातून धार्मिक मतभेद निर्माण केले जात आहेत, अश्या समाज-विघातक विकृतींना आळा बसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     प्रभू येशु जेंव्हा नव्याने आमचे तारण करावयास आगमन करील तेंव्हा त्याच्यासमोर आम्ही सर्वजण एक नीतिमान व धार्मिक व्यक्ती असे उभे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     आपल्या धर्मप्रांतावर, धर्मग्रामावर, व प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा कृपापूर्ण आशिर्वाद असावा म्हणून आपण थोडावेळ शांतपणे प्रार्थना करूया.