Reflection for the Homily of the Feast of Christ the King (22/11/2015) By: Ashley D'monty.
ख्रिस्त राजाचा सण
पहिले वाचन: दानियल ७:१३-१४
दुसरे वाचन : प्रकटीकरण १:५-८
शुभवर्तमान : योहान १८:३३-३७.
‘मी राजा आहे पण माझे राज्य ह्या जगाचे नाही’
प्रस्तावना:
आज देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. त्याचप्रमाणे
सामान्यकाळातील उपासनेचा हा शेवटचा रविवार आहे.
आजची तिन्ही वाचने आपणाला ख्रिस्त हा एक आदर्श राजा आहे हे पटवून
देत आहेत. पहिल्या वाचनात दानिएल संदेष्ट्याने सहा हजार वर्षापूर्वीच ख्रिस्ताच्या विजयत्सोवाणीची घोषणा केल्याचे आपण ऐकतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेल्या
दुसऱ्या वाचनात ख्रिस्ताला ‘राजांचा राजा व प्रभूचा प्रभू’ म्हणून गणण्यात आले
आहे. तर योहानलिखित शुभवर्तमानात, येशू जो युगान-युग राज्य करणारा राजा आहे, तो
आपल्या दु:ख सहनाच्यावेळी
सुद्धा एक खरा-खुरा राजा होता असे प्रकट करण्यात आले आहे. पिलात व येशुमधील
संभाषणात पिलात येशूला राजा म्हणून संबोधतो.
ख्रिस्त हा अखिल विश्वाचा व प्रत्येक व्यक्तीचा राजा आहे.
ही भावना आपणामध्ये आजच्या उपसानेद्वारे जागृत केली जात आहे. ख्रिस्त माझा तारणारा
आहे हा विश्वास आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी एक प्रेरणेचे स्थान आहे. ख्रिस्ताला
आपल्या जीवनाचा राजा घोषित करण्यासाठी व आपण त्याची प्रजा म्हणून पात्र ठरण्यासाठी
ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: दानियल ७:१३-१४
दानियल संदेष्टा येशूच्या राज्यत्वाची घोषणा येशूच्या जन्मापूर्वीच
करतो. येशू हा राजा मानवपुत्राप्रमाणे मेघांवर आरूढ होऊन मोठया गौरवाने येताना तो
पाहतो. दानियल रात्रीच्या दृष्टांतात येशूच्या या भूलोकावरील जीवनानंतरचे वैभवशाली
जीवन पाहतो. ख्रिस्त हा राजा मानवाप्रमाणे आहे. तो आपल्याप्रमाणेच हाडामांसाचा
मनुष्य आहे. ख्रिस्त हा सर्व बाबतीत मानवाप्रमाणेच होता पण त्याने कधी पाप केले नाही.
ख्रिस्त हा अनंतकाळचा राजा आहे; म्हणून दानियल पुढे म्हणतो, ‘सर्व लोक, सर्व
राष्ट्रे,व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व
वैभव व राज्य दिले आहे. ख्रिस्त सर्वांचा राजा आहे, त्याच्या राज्याला सीमा नाही,
संपूर्ण सृष्टीचा तो अधिपती आहे. म्हणून सर्वांनी त्याची सेवा करणे अगत्याचे आहे,
पृथ्वीवरील अनेक राजे, राज्य करून गेले परंतू ख्रिस्ताचे राज्य मात्र अढळ आहे ते
अविनाशी आहे. दानियलने पाहिलेल्या ह्या दृष्टांताची पूर्तता आपणाला आज येताना दिसत
आहे.
दुसरे वाचन: प्रकटीकरण १:५-८
योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूला राजांचा राजा व प्रभूंचा
प्रभू (१९:१६), पृथ्वीवरील राजांचा अधिपती (१:५) असे वेगवेगळी शीर्षके देऊन येशु हाच राजा
आहे असे दर्शवतो. योहान येशूला ही शीर्षके बहाल करताना त्याकाळचे
रोमन राजे, जे वेगवेगळ्या देशावर राज्य करत होते, त्यांना
ध्यानात धरून बोलत होता. या राजांच्या कायद्याचे पालन संपूर्ण राज्यात केले जात
असत. त्याचे उल्लंघन केल्यास अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ सुद्धा केला जाई. फक्त
राजालाच प्रभू म्हणून संबोधण्यात येत असे.
ख्रिस्ती लोकांनी मात्र हे शीर्षक येशूला बहाल केले व त्यास आपला
राजा म्हणून घोषित केले. राजा कितीही बलवान असला तरी त्याची तुलना ख्रिस्ताशी करता
येणार नाही, कारण ख्रिस्ताने आपल्या प्रजेसाठी रक्त सांडले व
त्यास पापमुक्त केले (१:५) त्याने त्यांना आपल्या राज्यात प्रवेश दिला.(१:६)
योहान शेवटी म्हणतो, ख्रिस्त हा ‘अल्फा’ व ‘ओमेगा’ आहे. ‘अल्फा’ हे ग्रीक भाषेतील
पहिले अक्षर तर ‘ओमेगा’ हे शेवटचे
अक्षर आहे. ह्यात हेतू हा की, ख्रिस्त हा सुरुवात व शेवट
आहे. सर्व मानवजातीची सुरवात हि ख्रिस्ताद्वारे होते व शेवटही ख्रिस्तात होतो.
शुभवर्तमान: योहान १८:३३-३७.
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
सदर प्रश्न आपणास प्रत्येक शुभवर्तमानात आढळतो. पिलाताला आपण खुद्द
रोमन अधिकारी असल्याने इतर कुणी स्वत:ला राजा समजतो हे नक्कीच खटकणारे होते.
पिलाताला येशूच्या प्रतीउत्तराची मुळीच कल्पना नव्हती. ख्रिस्त आपल्या पुढील
प्रश्नात पिलाताला विचारतो, “आपण स्वत:हून हे म्हणता कि,
दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले (१८:३४) येशु जणू विचारतो,
‘कोणत्या प्रकारचा राजा आपण आपल्या मनात बाळगता?’ रोमन कि, यहुदी?’ राजकीय राजा
कि, धार्मिक राजा? ख्रिस्त पिलाताच्या
मनातील गोंधळ दूर करीत होता. जर पिलाताने येशूला रोमन राजा संबोधले असते; तर येशु
एक देशद्रोही ठरला असता. पिलात येशूला चार वेळेस ‘राजा’
म्हणून संबोधतो. शेवटी क्रूसावरील पाटीवरही तो राजा’ असे लिहितो. (१८:३९;१९:५,१४-१५,१९.)
पुढे येशु म्हणतो, ‘मी राजा आहे पण माझे राज्य
ह्या जगाचे नाही’ ख्रिस्ताच्या राज्याला मानवी अधिकार नाही.
यहुदी रोमन अधिकाराखाली होते व पिलात सम्राटाच्या अधिकाराखाली होता. परंतु
ख्रिस्ताचा अधिकार मात्र त्याच्या परमपित्याकडून होता. त्याचे राज्य हे अध्यात्मिक
स्वरूपाचे होते. ते त्याच्या अनुयायांच्या अंतकरणात होते. जर ख्रिस्ताचे राज्य
भौतिक असते तर त्याच्या अनुयायायांनी येशूची सुटका केली असती.
येशु ३७ व्या ओवीत आपली ओळख व आपले राज्य कसे आहे, हे सांगतो. येशु
आपले कार्य सुद्धा नमूद करतो. सत्याला साक्ष देण्यास त्याचे अध्यात्मिक राज्य
सत्याचे होते. त्याने लोकांची मने विश्वासाने व आपल्या छापील प्रभावाने जिंकली.
रोमन अधिकाऱ्यांचे शस्र तलावार होते, परंतू ख्रिस्ताचे शस्र
मात्र देवाविषयीचे सत्य होते. जीवनाला त्याची सांगड घालणे हे येशूचे ध्येय होते.
त्यामुळेच येशु म्हणतो, जो कोणी सत्याचा आहे, तो माझी वाणी
ऐकतो’.
बोध कथा:
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस जर्मनी देशाने डेन्मार्क या छोट्याश्या
देशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ‘ख्रिशनन दहावा’ हा त्या देशाचा राजा होता. हा राजा खूप प्रेमळ व दयाळू होता.
त्याचे आपल्या प्रजेवर फार प्रेम होते. हा राजा कित्येक वेळेस आपल्या घोड्यावर
स्वार होऊन पहाटेची भ्रमंती करीत असे. वैशिष्ट्य म्हणजे राजा एकटा भ्रमंती करत असे,
त्याचा एकही अंगरक्षक त्याच्या सोबत नसे. एक दिवशी एका नाझीच्या अधिकाऱ्याने
राजाला विचारले, “राजे, तुमचे अंगरक्षक
कुठे आहेत, तुम्ही एकटेच कसे काय फिरता?” राजाने उत्तर दिले,
‘ते इथेच आहेत, माझ्या सभोवताली, सर्व माझे हे
माझे अंगरक्षक आहेत.” लोकांचे आपल्या प्रजेवर नितांत प्रेम
होते, त्यामुळेच राजा एक मित्राप्रमाणे त्यामध्ये वावरत असे.
ख्रिस्ताचे सुद्धा प्रजेवर फार प्रेम होते. त्यामुळे ख्रिस्तसुद्धा
लोकांत मिळून मिसळून राहिला.
मनन चिंतन:
आज अखिल ख्रिस्तसभा ख्रिस्तराजाचा सण साजरा करत आहे. ख्रिस्त सर्व
मानवजातीचा व अखिल विश्वाचा राजा आहे. परंतु ख्रिस्ताचे राज्यत्व हे इतर राजांप्रमाणे
नव्हते. इस्रायली जनतेने देवाकडे राजाची मागणी केली; तेव्हा देवाने त्यास शौल राजा
दिला परंतु ह्या राजाने त्यांचा छळ केला; मग देवाने दावीद
राजा नेमला व ह्या राजाने एका उत्तम राजाची भूमिका बजावली. त्यानंतर शलमोन राजा
आला. ह्या राजाने सुद्धा शहाणपणाने व बुद्धिमत्तेने लोकांची मने जिंकली; परंतु
तद्नंतर मात्र त्याचा ऱ्हास होऊ लागला. शेवटी देवाने आपला एकुलता एक पुत्र,
दाविदाच्या वंशांतून पाठविण्याचे घोषित केले. त्यादिवसापासून इस्रायली जनतेत एक आशा
निर्माण झाली कि, आमचा राजा येईल व आम्हांस मुक्त करील. इस्रायली
जनता हि अनेक अश्या अधिपतींच्या दबावाखाली दडली होती. त्यामुळे ते तारणाऱ्याची वाट
पाहत होते. त्यांचा विश्वास होता की, त्यांचा राजा मोठ्या
सामर्थ्याने व गौरवाने येईल व त्यांची सोडवणूक करील. परंतु देवाचे मार्ग व ईश्वरी
मार्ग वेगवेगळे आहेत. जगाचा तारणारा एका गाईच्या गोठ्यात जन्मला व क्रुसावर एका
अपराध्यासारखा मरण पावला. त्यामुळे जेव्हा त्या लोकांचा मसीहा, राजा ह्या भूतलावर आला, तेव्हा त्यांनी त्यास नाकारले. फार थोडक्यांनीच
ज्यांनी त्याचा जवळून अनुभव घेतला त्यांनी त्यांस आपला राजा घोषित केले.
ख्रिस्तराजाला ह्या भूतलावर कोणताही तटबंद राजवाडा नव्हता, होता ते मानवी हृद्य. ख्रिस्तराजा हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात व हृदयात
राज्य करतो व ह्याच व्यक्ती म्हणजेच ख्रिस्ताचे साम्राज्य ह्यांची संपत्ती इ.
त्याच्या साम्राज्याला सीमा नाही; कारण तो पृथ्वीचा व साऱ्या
ब्रम्हांडाचा विधाता आहे. तोच अल्फा व ओमेगा आहे. ख्रिस्त हा एक उत्तम जाणता राजा
आहे; म्हणून ह्या भूतलावर असताना त्याला आपल्या लोकांचा कळवळा आला. त्याने त्यांस
अन्न, आंधळ्यांस डोळे, मुक्यांस वाचा,
रोग्यांस आरोग्य दिले व मेलेल्यांस जिवंत केले. प्रत्येक वेळी,
प्रत्येक क्षणी तो आपल्या प्रजेसाठी झटला. ख्रिस्ताने आपले राज्य कोणतीच लढाई
जिंकून नाही, तर दु:ख यातना सहन करत आपल्या क्रूसावरील समर्पणाने प्रस्थापित केले.
एकमेव असा राजा ज्याने आपल्या प्रजेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून आज
त्यास आपण राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू म्हणून गौरवीत आहोत. असा राजा जगाच्या
इतिहासात ना कधी होऊन गेला व न कधी होणार. ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याला
आपला राजा म्हणूया व त्याच्या राज्यात एक विश्वासू जनता म्हणून प्रवेश करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझे राज्य येवो.
१.
आपले परमगुरु, महागुरू,धर्मगुरू व व्रतस्थ हयांनी ख्रिस्त
राजाप्रमाणे अखिल विश्वासू लोकांसाठी आपले सर्वसंग त्यागून त्यांची सेवा करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
आपला ख्रिस्ती समुदाय ख्रिस्ताचे राज्य प्रस्थापित करण्यास
प्रयत्नशील असावा म्हणून प्रार्थना करूया.
३.
येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने
ख्रिस्तावरील आपला विश्वास ढळू न देता त्यास आपल्या जीवनाचा राजा घोषित करावे
म्हणून प्रार्थना करूया.
४.
आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून
ख्रिस्तराजाप्रमाणे राज्याच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असावे तसेच देशाचा व
मानवजातीचा विकास घडवून आणावा म्हणून प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment