सामान्य काळातील बत्तीसावा रविवार
दिनांक: ०८/११/२०१५.
पहिले वाचन – १ राजे १७: १०-१६.
दुसरे वाचन – इब्री लोकांस पत्र ९: २४-२८.
शुभवर्तमान – मार्क १२: ३८-४४.
‘विधवेने केलेले दान’
प्रस्तावना:
आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बत्तीसावा रविवार
साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वरासाठी त्यागाने केलेल्या दानाचे महत्व
पटवून देत आहे.
पहिल्या वाचनात एका विधवेने आपल्याजवळ काहीही नसताना एलिया
संदेष्ट्याला खावयास अन्न दिल्याचे आपण ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इब्री लोकांस
उद्देशून सांगतो की, ‘ख्रिस्त एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून आपली पापे
नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे’. तसेच मार्कलिखित शुभवर्तमानात विधवेने आपल्या
कमाईतून केलेल्या दानाचा विशेष उल्लेख केल्याचे समजते.
‘दिल्यानेच आपणास प्राप्त होत असते’, असे संत फ्रान्सिस
असिसिकर म्हणतात. इतरांची गरज जाणून घेऊन व स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून आपण
इतरांना मदत करावी म्हणून आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना देवाकडे
त्यासाठी लागणारी विशेष कृपा मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन – १राजे १७: १०-१६
एलिया संदेष्टा हा तान्हेला व भुकेला होता. म्हणून तो
परमेश्वराच्या वचनाला मान देऊन सिदोन शहरातील सारफथ नावाच्या नगरात जातो. तिथे एक
विधवा त्याला जळणासाठी लाकडे गोळा करताना आढळते, त्या विधवेजवळ एलियाला देण्यासाठी
काहीही नव्हते परंतु ती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागते.
एलिया त्या विधवेला प्रथम पिण्यासाठी पाणी विचारतो. जरी
एलिया हा त्या विधवेला अनोळखी होता तरीही ती विधवा त्याची मागणी पूर्ण करते. परंतु
जेव्हा एलिया तिला भाकरीची मागणी करतो, तेव्हा मात्र ती विधवा आपली दयनीय
परिस्थिती एलियासमोर मांडते. ती आपल्या शेवटच्या भोजनासाठी काटक्या गोळा करीत होती,
तरीही एलियाने तिच्याजवळ हट्ट केला आणि त्या विधवेने देवाच्या आज्ञेनुसार व
एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. त्या विधवेने एलियावर विश्वास दाखवला आणि एलियाचे
तिच्याठायी असलेले भाकीत खरे ठरले ते म्हणजे – ‘तिचे पीठाचे मडके कधीही रिकामी
झाले नाही व तेलाची कुमि कधीही आटली नाही’.
दुसरे वाचन – पौलाचे इब्री लोकांस पत्र ९: २४-२८
संत पौल इब्री लोकांस सांगत आहे की, ख्रिस्त आपले पापे
नाहीसे करण्यासाठी ह्या जगात आला. ज्याप्रमाणे प्रमुख याजक प्रतिवर्षी इतर
प्राण्यांचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असत, अगदी त्याचप्रकारे ख्रिस्ताने स्वतःचे
रक्त सांडून तो करार कायमचा पूर्ण केला. म्हणूनच ख्रिस्ताने केलेल्या त्यागामुळे
पुन्हा पुन्हा प्राणार्पणे करण्याची गरजच पडणार नाही असे संत पौल सांगत आहे. स्व-अर्पणाने
ख्रिस्ताने पुष्कळांची पापे स्वतःवर घेतली.
शुभवर्तमान – मार्क १२: ३८-४४
शुभवर्तमानात ख्रिस्त शास्राच्या ढोंगीपणाबद्दल उद्देशून
सांगत आहे, कारण शास्री हे दुतोंडी होते. ते आपला देखावा करत होते. ते जे बोलत
होते ते आपल्या कृतीमध्ये उतरवत नव्हते. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की, धर्मशास्री
मंडळी पासून सावध रहा कारण त्यांना लांब-लांब झगे घालून मिरवणे आवडते. त्याचे लांब
झगे संपूर्ण जमीन पुसत होते, तसेच झगे लांब असल्या कारणाने त्यांना निट चालता येत
नसे, किंवा काम करता येत नसे. प्रत्येक वेळी ते झगे अश्याप्रकारे घालत की,
त्यामुळे लक्ष त्यांच्याजवळ वेधले जाई.
त्यांना भर बाजारात नमस्कार
घेणे आवडत असे. शास्र्यांना प्रतिष्ठेने दिलेला नमस्कार आवडत असे. ते सभागृहात मानाची
आसने पटकावने आवडत असे. ते सभागृहात जेथे देवाचा कोश ठेवला आहे तिथे लोकांकडे
तोंड करून बसत जेणे करून लोकांचे लक्ष
त्यांच्याकडे वेधले जाईल. मेजवानीच्या प्रसंगी मुख्य बैठकांवर आरूढ होणे त्यांना
आवडत असे. ते विधवांची मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेत. धर्मशास्री धर्माकायद्याचे
अभ्यासक होते. विधवांच्या मालमत्तांचे विश्वस्त म्हणून ते काम पाहत आणि तसे करताना
ते त्यांना लुबाडत असत. त्यांना लांब- लांब प्रार्थना करून त्यांचा देखावा
करण्याची आवड होती. परंतु ख्रिस्ताने ह्या सर्व गोष्टीचा निषेध केला म्हणून
शास्त्राचे हे वर्तन बघून आपल्या समोर ख्रिस्त एका विधवेचे उदाहरण ठेवत आहे.
ख्रिस्त व त्याचे शिष्य भांडारासमोर
बसून हे पाहत होते. जेथे एकूण तेरा भांडारे वेगवेगळ्या प्रकारचे दान
स्वीकारण्यासाठी ठेवलेली होती. उदा: कणसे द्रक्षारास तसेच तेल विकत घेण्यासाठी.
त्या दानाचा उपयोग रोजच्या केल्या जाणाऱ्या यज्ञबळीचा लागणाऱ्या वस्तूच्या
येणाऱ्या खर्चासाठी वापरला जात असे. येशू आणि त्याचे शिष्य निरीक्षण करत होते की,
कश्याप्रकारे धनवान लोक गर्वाने मोठमोठया रकमा हळुवारपणे दानपेटीत टाकत होते
जेणेकरून सभोवताली असलेल्या लोकांना त्यांनी केलेल्या मोठ्या दानांची माहिती
व्हावी. त्याचवेळी एक विधवा येऊन आपल्या आजूबाजूला न पाहता अगदी नम्रपणे ती दोन
नाणी भांडारात टाकते. त्या दोन नाण्यांची तुलना आपल्याकडील जुन्या दमडीबरोबर करता
येईल; त्या विधवेला कदाचित आपण केलेल्या कमी दानाची स्वत:ला लाज वाटली असेल. तिच्या ह्या कृतीने येशूचे शिष्य
कदाचित तिच्याकडे पाहुन हसले असतील, म्हणूनच ख्रिस्त त्या विधवेची प्रशंसा व
स्तुती करून म्हणतो, ‘हे जे भांडारात द्राव्य टाकत आहे, त्या सर्वांपेक्षा ह्या
गरीब विधवेने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले’. परंतु
हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे, आपली ‘सर्व उपजीविका’ टाकली.
ख्रिस्ताला येथे असे सांगायचे आहे की, तिने आपले सर्व जीवन परमेश्वराला दान केले.
बोधकथा:
मदर तेरेसा जिथे त्यांचे प्रमुख वसतीस्थान आहे, तिथे आसपास
विस्तीर्ण झोपडपट्टी आहे. तिथल्या विधवांची पोर अन्न-अन्न करून माना टाकत होती हे
तिला ठाऊक होते. एक दिवस अश्याच एक झोपडीत मदरचा पद स्पर्श झाला. विधवेची तीन मुले
तीन दिवस उपाशी होती. मदरने तिच्या बरोबर ४-५ किलो तांदूळ आणले होते. ते विधवेला
दिले आणि सांगितले, ह्यातले थोड-थोडे शिजव आणि मुलांना घाल. त्या विधवेने मदरला
पाच मिनिटे बसायला सांगून मागच्या दाराने ती बाहेर गेली व पाच मिनिटांनी ती परत
आली. मदरने विचारले, ‘तू अचानक पाच मिनिटे कुठे गायब झाली होतीस’?त्यावर ती विधवा
पाणावलेल्या डोळ्यांनी, परंतु कृतज्ञतेच्या अंतकरणाने म्हणाली, ‘मदर येथे दोन मिनिटाच्या
अंतरावर दुसरी एक माझ्याच सारखी विधवा आहे, तीचे सुद्धा तीन मुले अन्ना-विना भुकेलेली
आहेत, तर तुम्ही मला दिलेल्या तांदळातून अर्धे मी तिला देऊन आले’.
मनन चिंतन:
वरील घटनेतील विधवेने आपल्याला दिलेले धान्य आपल्या
स्वत:साठी न ठेवता दुसऱ्या विधवेबरोबर वाटून घेतले. तिने आपल्या स्वत:चा विचार न
करता ती दुसऱ्याच्या मदतीस धावून गेली . आजच्या पहिल्या वाचनात व शुभवर्तमानात
विधवेचा उल्लेख केला गेला आहे. आपण बघतो की, त्या एलिया संदेष्ट्याला देण्यासाठी
काहीही नव्हते परंतु ती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागते. तिला कदाचित वाटले असेल
की, एलिया हा आपल्याला परका आहे, म्हणून मी त्याला अन्न का द्यावे ? किंवा मी जर
एलीयाला अन्न दिले तर माझ्या मुलाला मी काय देईन? शुभवर्तमानातील विधवा आपल्याकडील
असले नसले सर्व काही दान करते. त्या विधवेजवळ फक्त दोन नाणी होती व त्यावर तिची
उपजीविका होती. तरीही तिने मागचा-पुढचा विचार न करता दोन्ही नाणी भांडारात टाकली.
ख्रिस्त नेहमी गरीब व नम्र लोकांवर
प्रेम करतो. म्हणूनच ख्रिस्त आपल्या डोंगरावरील प्रवचनात म्हणतो, ‘अहो दीन, तुम्ही
धन्य कारण देवाचे राज्य तुमचे आहे’ (लूक: ६:२०). येथे ख्रिस्त गरीब व दीन लोकांना
धन्य म्हणतो, कारण गरीब व नम्र लोक ख्रिस्ताचा संदेश स्वीकारून त्याचे जतन करतात.
ख्रिस्त स्वत: गरिबीत जीवन जगला म्हणून तो आज विधवांनी केलेल्या दानाची प्रशंसा व
स्तुती करतो.
आजच्या शुभवर्तमानात आपल्याला दोन
प्रकारचे लोक आढळतात. १) शास्री: ज्यांच्याजवळ संपत्ती होती.
२) विधव स्री: जिच्याजवळ संपत्ती नव्हती.
शास्र्याकडे संपत्ती असूनही ते विधवांना लुबाडण्याचा
प्रयत्न करीत होते. आपल्या समाजामध्ये सुद्धा अश्याच प्रकारचे उदाहरण दिसून येते.
जे अतिश्रीमंत आहेत ते गरिबांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची फसवणूक
करून त्यांची जमीन, धन-दौलत आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतात.
शुभवर्तमानात उल्लेख केल्याप्रमाणे धनवान लोक मोठ-मोठया
रकमा भांडारात टाकीत होते, परंतु हे सर्व करीत असताना, त्यांना प्रसिद्धी पाहिजे
होती. ते इतरांना दाखवण्यासाठी आपल्या दानधर्माचा देखावा करीत होते. आपणही त्या
धनवान लोकांप्रमाणे आपल्या दानकार्याची समाजात, नावलौकिक मिळवण्यासाठी देखावा करीत
असतो. आपण समाजकार्यासाठी आर्थिक मदत केली असेल, तर आपल्याला आपल्या नावाची
जाहिरात हवी असते.
सर्वांना पैशाचा लोभ असतो, आणि
धनसंचय करण्याचा मोह असतो. ह्यात काहीही वाईट नाही कारण पैशाने आपल्या गरजा भागविल्या
जातात परंतु पैशाचा अतिलोभ विनाशकारी ठरतो. विधवेने आपल्या जीवनात महत्व न देता
आपले होते नव्हते ते सर्व देवासाठी अर्पण केले. आपणही आपल्या जीवनात पैशाचा किंवा
आपल्या संपत्तीचा गुलाम न बनता आपण त्याचा परमेश्वराच्या कार्यासाठी दीन-दुबळ्यांना
मदत करून त्याचा त्याग करण्यास शिकलं पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे प्रभो गरजवंतांना मदत करण्यास आम्हाला कृपा दे.
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा सांभाळणारे पोप, महागुरु,
धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी आपल्या कार्याद्वारे गरिबांची सेवा करावी व प्रभूचा
संदेश सर्वत्र प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
आपल्या ख्रिस्ती समुदायाने गोर-गरिबांची मदत करून समाजासाठी
एक आदर्श बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यास बाधा आणणारे
सर्व मोह व हाव सोडून ख्रिस्ताला अंगीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
जगातील सर्व विधवा स्रियांना त्यांच्या पतीच्या निधनाने जे
दुःख सहन करावे लागते त्या दुःखाचे ख्रिस्ताद्वारे सांत्वन व्हावे व त्यांच्या मुलांची
ख्रिस्ताच्या प्रेमात वाढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
आज जगात सर्वत्र दहशतवाद वाढत आहे, अश्या सर्व दहशवाद्यांना
देवाचा स्पर्श व्हावा व त्यांनी आपल्या सैतानी वृत्तींचा त्याग करून देवस्वरूप एक
नवीन जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment