Wednesday, 28 October 2015

Reflection for the Homily of 31st Sunday in Ordinary Times   (01/11/2015) By: Xavier Patil.








सामान्यकाळातील एकतिसावा रविवार



दिनांक: ०१-११-१५
पहिले वाचन – प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
दुसरे वाचन – योहानाचे पहिले पत्र ३:१-३
शुभवर्तमान – मत्तय ५:१-१२ 


‘स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे’



प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज देऊळमाता सर्व संतांचा सण साजरा करीत आहे. आजच्या उपासनेतील वाचने आपणाला संतांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहीत करतात.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने निवडलेल्या लोकांवर शिक्का मारला आहे, कारण त्यांनी त्यांचे झगे कोकराच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत योहान आपणाला देवपित्याने दिलेले प्रतिपादन म्हणजेच ‘आपण सर्वजण देवाची मुले आहोत आणि पुढे काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही’ असे सांगत आहे. तसेच शुभवर्तमानात येशु ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनातून लोकांना केलेला बोध ऐकावयास मिळतो.
प्रत्येक व्यक्ती हा संत बनण्यासाठी देवाने निर्मिलेला आहे. संत बनण्यासाठी महान कृत्ये करण्याची आवश्यकता नाही तर लहान गोष्टी संपूर्ण निष्ठेने व देवावर असणाऱ्या श्रद्धेने करण्याची गरज असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपणदेखील संताप्रमाणे ख्रिस्ताने दाखवून दिलेल्या वाटेवर चालून देवाची मुले म्हणून सदैव जगावे अशी प्रार्थना ह्या पवित्र मिस्सा-बलीदानामध्ये भाग घेत असता करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन – प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
ह्या वाचनात संत योहानाने अखेरच्या दिवसातील देवाच्या लोकांचे दोन दृष्टांत सांगितले आहेत. पहिल्या दृष्टांतामध्ये देवाने स्वतःचा शिक्का मोर्तब करून निवडलेली नवीन इस्रायल प्रजा आहे. तर दुसऱ्या दृष्टांतात उद्धार पावलेले असंख्य लोक आणि त्यांच्या मागून येणारी गौरविलेली जनता होय. ‘ख्रिस्ती लोकांनी अखेरच्या न्यायादंडाची भीती बाळगू नये कारण देव त्यांचे सांत्वन करील’ हि खात्री देण्याच्या उद्धेशानेच योहानाने हे लिहिलेले आहे.
जिवंत देवाचा ठसा:
ज्यांच्यावर शिक्का मारला आहे ते देवाचे दास आहेत हे शब्द प्रकाटीकरणाच्या पुस्तकात वारंवार येतात आणि या शब्दांनी उद्धार पावलेले सर्व लोकसमुदाय हा अर्थ व्यक्त होतो. या चिन्हामुळे विध्वंस करणाऱ्या लोकांकडून त्यांचा नाश होणार नाही तर ते वाचतील. ह्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.
दुसऱ्या दृष्टांतात योहानाने कोणाला मोजता आला नाही असा मोठा लोकसमुदाय राज्यवैभवामध्ये देव आणि कोंकरु ह्यांच्यासमोर उभा राहिल्याचे त्याने पहिले. ह्या सर्व लोकसमुदायाने संकटांना सामोरे जाऊन त्यांचे झगे येशूच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.

दुसरे वाचन – योहानाचे पहिले पत्र ३:१-३
ह्या वाचनात योहान म्हणतो, “पाहा पित्याने आपणावर किती प्रीती केली आहे! आपणाला देवाची मुले म्हटले आहे. आपल्याला फक्त नावच नव्हे तर आपण खरोखरच देवाची मुले आहोत. दिव्य पाचारण, हे प्रभावी पाचारण आहे, या संबंधात तो आमच्या मनात कसलाच किंतू राहू देत नाही. देव आम्हाला ‘मुले’ म्हणतो, म्हणूनच जग आपल्याला ओळखीत नाही. जग आणि ख्रिस्ती विश्वास एकत्र नांदने शक्य नाही. हा विचार योहानाच्या लेखांमधून पुन्हा पुन्हा पुढे येतो.
जग ख्रिस्ताच्या अनुयायांना ओळखीत नाही, हे जगाचे उणेपण आहे. पण त्यात नवल करण्यासारखे काहीही नाही. कारण जगाने येशूला देखील ओळखले नाही. योहानाच्या म्हणण्याप्रमाणे आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून कोणालाच माहित नाही पण आपण ख्रिस्तासारखे होऊ असे तो भाकीत करतो.

शुभवर्तमान – मत्तय ५:१-१२
     मत्तयने नमूद केलेल्या महान “प्रवचनांपैकी” हे पहिले प्रवचन आहे. सामान्यत: हे “डोंगरावरील प्रवचन” ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
३-१० चांगले जीवन:
प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उद्दगारांतून (धन्यवाद) खऱ्या शिष्यांचे अष्टपैलूपूर्ण चित्रण केले आहे. ‘धन्य’ किंवा ‘सुखी’ या मूळ शब्दाचे यथार्थ भाषांतर होत नाही. मूळ शब्दात ‘अभिनंदन, वाहवा तारीफ आणि प्रशंसा’ हे अर्थभाव आहेत. या गुणांची कास धरावी, ते अंगी बाळगावे; हे गुण मिळून चांगले जीवन होते. या प्रत्येक उद्दगाराच्या बरोबरीने एक एक कारण दिले आहे. जीवनाच्या या मार्गाने चालल्याने कोणाचीही हानी होणार नाही.  त्याद्वारे मिळणारी प्रतिफळे हि भौतिक लाभापेक्षा, आध्यात्मिक अनुभव देणारी आणि देवाशी नाते जोडणाऱ्या स्वरुपाची आहेत.
‘स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे’ या महत्त्वपूर्ण शब्दांनी या वचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला आपला राजा म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द उच्चारले आहेत.

आठ सुखानंद (Beatitudes) :

1.     जे आत्माचे .................... राज्य त्याचे आहे.
जे स्वतःच्या कारणास्तव नव्हे तर दुसऱ्यांच्या कारणास्तव गरीब आहेत. इथे मत्तय आर्थिक गरिबी विषयी न सांगता जे गुलामगिरी सहन करत आहेत त्यांच्याविषयी सांगत आहे. अशा सर्वांना ‘स्वर्गाचे राज्य’ प्राप्त होईल असे ख्रिस्त सांगतो.

2.     जे शोक .................... सांत्वन करण्यात येईल.
ज्यांचे जीवन कठीण झाले आहे अशा सर्वांचे येशु ख्रिस्त सांत्वन करील. त्यांचे दुःख काढून सुख देण्यात येईल. येशु ख्रिस्त यशया संदेष्टा ह्यांचे शब्द स्वतः’ला उल्लेखून सांगतो की, जे तुरुंगामध्ये अडकले आहेत, जे विनयशील व शोक करत आहेत, अशा सर्वांचे येशु ख्रिस्त त्याच्या पुन: आगमनाने सांत्वन करील.

3.     जे सौम्य .................... पृथ्वीचे वतन भोगतील.   
4.     जे नितीमत्वाचे .................... ते तृप्त होतील.
शास्री व परुशी ह्यांनी जुन्या नियमशास्राचे काटेकोरपणे पालन केले, पण येशु ख्रिस्त त्याच्या शिष्यांस शास्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा चांगले जीवन जगण्यास सांगत आहे. शिष्यांचे नितीमत्व शास्री आणि परुशांपेक्षा अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात त्यांना प्रवेश मिळणार नाही (५:२०)

5.     जे दयाळू .................... दया होईल.
शेजाऱ्यांवर दया करणे व त्यांना संकटामध्ये मदत करणे हा प्रेमाचा महामंत्र येशु ख्रिस्त त्यांना देतो. ज्याप्रकारे आपण इतरांवर दया आणि प्रेम तो अगदी त्याचप्रकारचे प्रेम आणि दया देव आपणावर करील. येशु म्हणतो, ‘ ज्या मापाने तुम्ही देता त्याच मापाने तुम्हांला पुन्हा देण्यात येईल’.

6.     जे अंतकरणाचे .................... देवाला पाहतील.
येथे येशु ख्रिस्त यशया संदेष्ट्याच्या शब्दांत शास्री आणि परुश्यांना ढोंगी असे संबोधतो. कारण ते शब्दांनी देवाचा सन्मान करतात, पण त्यांची अंतकरणे मात्र देवापासून दूर आहेत हे प्रभू येशूने जाणले होत,. म्हणून जो कोणी स्वतःच्या अंतकरणाने ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे पाल,ण करील त्यांना स्वर्ग प्राप्त होईल व ते देवाला पाहू शकतील.

7.     जे शांती .................... मुले म्हणतील
येशु ख्रिस्ताच्या पुनरुस्थानानंतर येशूने शिष्यांना दर्शन देऊन त्यांस शांती प्रदान केली, म्हणून शांतीने वागणे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे. जी शांती देवाने आपणाला दिली आहे तिचे पालन करावे व इतरांना देखील आपण आपल्या जीवनाद्वारे शांती प्रदान करावी. असे केल्याने आपण देवाची मुले म्हणून ओळखले जाऊ असे येशु ख्रिस्त म्हणतो.

8.     नितीमत्वाकरीता जे झटतात.................... राज्य त्यांचे आहे.
देवाच्या प्रेमाखातर आणि येशूच्या शिकवणुकीचे पालन केल्याने ज्यांचा छळ केला जाईल, अशा सर्वांना स्वर्गाचे राज्य बहाल करण्यात येईल व स्वर्गात त्यांचे प्रतिफळ मोठे असेल असे असे येशु ख्रिस्त म्हणतो.

मनन चिंतन:
आज आपण सर्व संतांचा सण साजरा करीत आहोत आणि आजच्या मिस्साबलीदानाचा प्रारंभ आपण “प्रभूमध्ये सदैव आनंद करा” ह्या वाक्याने झाला आहे. कारण आजची उपासना आपणाला स्वर्गातील संतांच्या आनंदाचा आस्वाद घेण्यास आमंत्रित करत आहे.
आज आपण ख्रिस्तसभेने घोषित किंवा मान्य केलेल्या प्रसिद्ध संतांचाच नव्हे तर ज्या लोकांनी वेगवेगळ्या काळामध्ये देवाच्या वचनांचे प्रामाणिकपणे पालन करून ते आता स्वर्गीय सुख उपभोगत आहेत अशा सर्व संतांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत.
सणाचा थोडक्यात इतिहास :
रोम शहरामध्ये “Panteon” (पान्तेऑन) ह्या नावाचं एक प्रसिद्ध मंदिर होते. हे मंदिर “सर्व देवांचे मंदिर” ह्या नावाने ओळखले जात असे कारण त्या मंदिरामध्ये रोमच्या राजाने अनेक देशांतील देव आणि देवी ह्यांच्या मूर्ती गोळा करून तेथे त्यांची आराधना करत असत. इ.स. ६०९ मध्ये पोप महाशय बॉनिफस चौथे ह्यांनी सर्व मुर्त्या बाहेर काढून Panteon मंदिरात कुमारी मरिया माता, सर्व रक्तसाक्षी आणि सर्व संतांचा सण १३ मे ह्या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. नंतर पोप महाशय ग्रेगरी तिसरे ह्यांनी इ.स. ७३१ साली वॅटिकन च्या भव्य मंदिरात (Vatican Besilica) एक छोटसं देवालय सर्व संतांच्या सन्मानार्थ बांधले व १ नोव्हेंबर रोजी सर्व संतांचा सण साजरा करण्याची घोषणा केली. आणि अशाप्रकारे ह्या सणास तेथपासून प्रारंभ झाला.
“संत” – संत म्हणजे कोण? ह्या शब्दाचा अर्थ काय? हा प्रश्न आपणाला नक्कीच पडला असणार. ‘संत’ ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. जी माणसं देवाशी जोडली गेली आहेत, अशा सर्वांना आपण संत म्हणतो. कारण त्यांनी देवाच्या वचनांचे तंतोतंत पालन केले. त्यांनी काही मोठे चमत्कार किंवा मोठया गोष्टी केल्या नाहीत तर त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांनी देवाची आज्ञा पाळली. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांच्या जीवनाचा सारांश आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणाला ऐकावयास मिळतो.
कदाचित जगाच्या दृष्टीकोनातून ते असमर्थ, अडाणी, अनाकर्षक, अर्धवट किंवा मंद बुद्धीचे असले तरी देवाच्या दृष्टीकोनातून ते सर्वजण महान असे होते. परमेश्वराच्या शक्ती आणि सामर्थ्याने त्यांनी संकटावर, आजारांवर, गुलामगिरीवर व गरीबीवर मात केली म्हणूनच आपण सर्वजण त्यांचा आदर आपल्या डोळ्यासमोर ठेवतो व त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
 नोविशिएट (Novitiate) मध्ये असताना मी एक रेखाटलेले चित्र भिंतीवर लावलेले पाहिले होते. त्या चित्रात एक लहान मुलगा कुठलातरी विचार करीत होता, आणि त्या चित्राखाली एक वाक्य लिहिले होते, “मी कोण आहे?” मित्रांनो हा प्रश्न आपण कित्येकवेळा स्वतःलाच विचारला असणार, त्याच उत्तर “मी मुलगा/ मुलगी आहे, मी डॉक्टर, इंजिनियर, चित्रकार, कलाकार अश्या कितीतरी विशेषनांनी दिले असणार.
आजचे दुसरे वाचन जर आपण लक्षपूर्वक ऐकले असेल तर “मी कोण आहे?” ह्या प्रश्नाचे साध-सोप्प आणि सुंदर उत्तर आपणाला नक्कीच सापडेल. आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत” हीच आपली पहिली ओळख आहे. देवाने आपणाला त्याची मुले-मुली म्हणून संबोधिले आहे म्हणून देवाच्या वचनांच पालण करून, संतांसारखे धार्मिक मार्गावर चालणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
पुढे आपण काय होणार आहे हे कुणालाच ठाऊक नाही पण आपण ख्रिस्तासारखे होणार असे संत योहान आपणाला सांगत आहे. कारण ‘कोणाला मोजता येणार नाही असा मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकरासमोर उभा राहिलेला योहानाच्या दृष्टीस पडला. हा मोठा लोकसमुदाय म्हणजेच सर्व ‘संतगण’ हिच ती देवाची लेकरे, ज्यांनी त्यांचे कपडे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केली आहेत. ह्याचा अर्थ असा कि, त्यांनी जीवनातील सर्व संकटावर मात करून विजय मिळविला आहे. ह्याच संतांचा स्मृतिदिन आज आपण साजरा करीत आहोत.
संत बनणे जरी कठीण असले तरी ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे मुलभूत पाचारण आहे. मग आपण प्रापंचिक असो किंवा धार्मिक व्यक्ती असो. पण कश्याप्रकारे आपण संत बनु शकतो? – संत बनण्यासाठी बुद्धीची, लावण्य किंवा सुंदरपणा, उच्च व्यक्तिमत्त्व, पैसा, संपत्ती किंवा यशाची गरज लागत नाही. तर आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे जे गरीब अंतकरणाचे आहेत, जे शोक करतात, जे लीन, सौम्य, दयाळू आहेत, जे शांतीने जगतात अशाच व्यक्ती संत बनु शकतात. म्हणून आपल्या रोजच्या जीवनात ख्रिस्ताने दिलेल्या मूल्यांचे पालण करावे व संतांसारखे जीवन जगावं म्हणून आपण प्रयत्न करूया व त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराकडे मागुया.   
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो सर्व संताद्वारे आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स ह्यांना देवाचे प्रेम, दया व शांती इतरांपर्यंत पोहचवण्यास कृपा व शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जे लोक वाईट व्यसनांच्या अधीन गेलेले आहेत व जे युवक-युवती मोहाला बळी पडून देवापासून दूर गेलेले आहेत, अश्या सर्वांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांचे मनपरिवर्तन व्हावे व वाईट व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी प्रभूचे ध्यैर्य व सामर्थ्य लाभावे आणि त्यांनी चांगले धार्मिक जीवन जगावे, म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. आज आपण सर्व संताचा सण साजरा करत असताना इथे हजर असलेल्या आपणा सर्वांना संतासारखे जीवन जगण्यास प्रभूचे सामर्थ्य व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करु या.









No comments:

Post a Comment