Thursday, 28 January 2016

Reflection for the homily of 4th Sunday in Ordinary Times (31/01/2016) By: Nevil Govind.















सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: ३१/०१/२०१६
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
शुभवर्तमान: लूक ४:२१-३०

‘संदेष्टा स्वदेशांत मान्य होत नाही’



प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणांस प्रीती ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास निमंत्रित करत आहे.
यिर्मया संदेष्टा आपल्याला परमेश्वराकडून झालेल्या पाचारणाविषयी आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल, आशा आणि विश्वास ह्यापेक्षा ‘प्रीती’ हे सर्वोत्कृष्ट दान आहे असे स्पष्टपणे मांडत आहे. तर लूक सुवार्तिक, जुन्या करारात यशया संदेष्ट्याने केलेली भविष्यवाणी आज येशूच्या येण्याने पूर्ण झाल्याचे स्पष्ट करतो. जगाच्या तारण कार्यासाठी परमेश्वराने ख्रिस्ताला, आपल्या आत्म्याने परिपूर्ण करून दीनांस सुवार्ता सांगण्यास तयार केले.
ख्रिस्त आज आपणा प्रत्येकाला त्याची प्रीती आत्मसात करून ती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी निमंत्रण करत आहे. ख्रिस्ताची ही प्रीती आपणांत शेवटपर्यंत राहावी आणि आपल्या जीवनात आपण प्रीतीस प्राधान्य द्यावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
  
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
            यिर्मया तरुण होता तेव्हाच देवाने त्याला यहुदियांच्या पापांचा निषेध करून त्यांच्या राष्ट्राला पूर्वइशारा देण्यासाठी पाचारण केले होते. योशिया राजाच्या कारकिर्दीत २५ वर्षे त्याने देवाचा संदेश दिला होता. यिर्मया हा जुन्याकरारातील फार महत्त्वाचा संदेष्टा होता. तो यहुदीयांच्या बहिष्कारातील कालावधीत देवाचा संदेश इस्त्राएली लोकांस सांगत होता.
१) यिर्मया संदेष्टा हा याजक होता:
     सुमारे ४१ वर्षे देवाचा संदेश यिर्मयाने यहुद्यांना दिला होता. तो हळव्या मनाचा होता, तरी देवाने त्याचा उपयोग राजे, खोटे संदेष्टे व ढोंगी याजक यांना त्यांची पापे दाखवून देण्यास केला. तो मनुष्यासमोर विरोधाच्या वादळात धैर्याने उभा राही व देवासमोर लोकांसाठी मध्यस्थी करीत अश्रू ढाळीत असे. यिर्मया फार कठीण काळात जगला. तो कठीण समयी, आपल्या सेवेत शेवटपर्यंत परमेश्वराशी विश्वासू राहिला. तो आपल्या देवाशी एकनिष्ठ राहिला. तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागला. तो सुमारे ६० वर्षे जगला. तो अधिकाधिक बलवान होत गेला. तो खरी वस्तुस्थिती प्रगट करी. तो देवाच्या रणांगणावर नेहमी आघाडीवर दिसतो. त्याने खोटे, नकली व दुष्ट रूढी व वृत्तींना देवाच्या संदेशाने सतत विरोध केला.
ज्यांना देव सेवेसाठी पाचारण करतो:
१) त्यांनी देवाचे ऐकावे: देवाने यिर्मयाला आपल्या सेवेसाठी घडविले होते. त्याला आपल्या सेवेसाठी वेगळे केले होते व त्या सेवेसाठी नेमले होते (यिर्मया १:५). ही एखाद्या कार्यक्रमाला जाऊन मिळालेली स्फूर्ती नव्हती. यिर्मया तरुण होता. त्याला आपली दुर्बलता समजली म्हणून तो देवासमोर प्रामाणिकपणे ती कबूल करतो व म्हणतो, “मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे” (यिर्मया १:६). ही दुर्बलता त्याच्या सेवेत अडथळा ठरणार नव्हती. त्याला फक्त आज्ञा ऐकायच्या होत्या त्या पाळावयाच्या होत्या (यिर्मया १:७).
२) त्यांनी देवाची आज्ञा पाळावी: आपल्या प्रभूची सेवा करणे म्हणजे सतत त्याची आज्ञा पाळत राहणे (यिर्मया १:१७). यिर्मयाला हेच करायचे होते. देव त्याला बलवान करणार होता (यिर्मया १:१८). देव त्याचा बचाव करणार होता व त्याच्याबरोबर सदैव राहणार होता (यिर्मया १:१९).
स्फूर्ती आली म्हणून देवाची सेवा करण्यास तयार होणे व सुचेल ते करणे, ही प्रभूची सेवा नसते. प्रभू घडवून पाचारण करतो व आपली सेवा स्पष्ट करतो. मग त्या व्यक्तीला फक्त आज्ञापालन करीत राहायचे असते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
     संत पौलाने हे पत्र करिंथ शहरातील ख्रिस्ती मंडळीला इ.स. ५५ मध्ये लिहिले होते. तेव्हा संत पौल इफिस शहरात राहत होता. हे पत्र करिंथ मंडळींकडून आलेल्या एका पत्राला दिलेले उत्तर होते. करिंथ येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने निरनिराळी कृपादाने दिली होती. ही कृपादाने ते इतरांच्या उन्नतीसाठी न वापरता, कित्येक स्वतःच्या स्वार्थासाठी व गटबाजीसाठी किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे त्यांचा वापर करत असत.
मंडळी जेव्हा जमत असे, तेव्हा नुसता गोंधळ माजे. एखाद्याला पवित्र आत्म्याने एखादे कृपादान दिले म्हणून तो अधिक आध्यात्मिक झालेला आहे असे नाही. कृपादानाने कोणी आध्यात्मिक ख्रिस्ती बनत नाही. आध्यात्मिक ख्रिस्ती म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा व ज्याच्यात पवित्र आत्म्याचे फळ आढळते तो. करिंथ येथील मंडळीत याच गोष्टींची उणीव होती व त्यामुळे त्यांची कृपादाने निरुपयोगी ठरत होती. यामुळे संत पौलाने करिंथकरांस यशस्वी सेवेचा मार्ग दाखविला.

शुभवर्तमान: लूक ४: २१-३०
     ही येशूच्या जीवनातील घटना ख्रिस्ताच्याच नाझरेथ गावी घडली होती हे संत लूक आपणास सांगतो. यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला (लूक ४:१४). ज्या नाझरेथ गावी तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानांत जाऊन यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट वाचत होता (लूक ४:१६-१७).  
अ) हा शास्त्रलेख आज तुम्हीं ऐकत असताना पूर्ण झाला आहे.
‘प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’ (लूक ४:१८-१९). ह्या ओवी संत लूकने जुन्याकरारातील यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत (यशया ६१:१-३). इथे संत लूक संदेष्टा यशयाने केलेली भविष्यवाणी येशूच्या येण्याने पूर्ण झाल्याचे दर्शवितो.
ब) हे वैदया, तू स्वतःलाच बरे कर.
     ख्रिस्ताने सांगितले हे सर्व त्याचाच गावातील लोकांना खरे वाटले नाही. ते उलट म्हणू लागले की, “हा योसेफाचा पुत्र ना? (लूक ४:२२ब). कारण ते येशू हा पाठविलेला ख्रिस्त- मसीहा आहे हे खरे मानायला तयार नव्हते. म्हणून येशू त्यांस ही म्हण लागू करतो. 
क) कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
     वरील वाक्य येशूने नाझरेथ येथील लोकांस त्यांचा अविश्वास पाहून म्हटले होते. ते येशू हा मसीहा आहे हे मानायला तयार नव्हते. 
ड) एलीया आणि अलिशा संदेष्टा
     नाझरेथच्या लोकांचा अविश्वास येशूने त्यांना दाखवून दिला. ‘मी इतर गावांत जे केले ते तेथे का करीत नाही या तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘तुमचा अविश्वास’! मी ख्रिस्त आहे हे मान्य करून तुम्ही माझा स्वीकार करीत नाही’. असे सांगून येशूने त्यांस दोन उदाहरणे सांगितली. देवावर विश्वास ठेवण्यास तयार असलेली एक विधवा (लूक ४:२६) आणि अलिशाच्या शब्दावर विश्वास ठेवणारा नामान नावाचा कुष्ठरोगी (लूक ४:२७). त्यांच्या विश्वासामुळे देव कार्य करू शकला होता. हे सत्य ऐकून लोक इतके संतापले की, त्यांनी येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला (लूक ४:२८-२९).

बोधकथा:
           रामपूर गावामध्ये रमेश नावाचा एक मुलगा राहत होता. त्याची एकदा सरपंच पदासाठी निवडणूकीत नाव आलं पण कुणीही त्याला मान्यता देत नव्हते. उलट म्हणत होते की, ह्याचा बाप कोण आम्हांला माहित आहे, तो काय करतो हे आम्हांला ठाऊक आहे. त्याची आई कुठली, ती कुणाची मुलगी, ती काय करते, करत होती हे सर्व आम्हांस ठाऊक आहे. हा भिकारी आमच्या गावाची काय सुधारणा करणार!
हे सर्व ऐकता, त्या तरुणाने आस्था आणि जिद्द सोडली नाही. निवडणूक लढवण्याची वेळ येऊन ठेपली आणि त्याच्या आप्तेष्टांनी त्याच्यावर असलेल्या विश्वासाने त्याला निवडून दिले. त्यानंतर त्या जिद्दी व कर्तव्यप्रेमीने युवकाने गावाचा विकास केला. गावातील सगळे अधर्म कृत्यांची विल्हेवाट लावली, स्रियांना त्यांचा हक्क आणि सुरक्षा मिळवून दिली. अशा प्रकारे त्या गावाला नावारूपाला आणले. त्याची सर्वत्र वाहवा आणि प्रशंसा झाली. मग कुठे लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली, की बाह्यरूपावरून किंवा त्याच्या पालकांच्या गरीबीवरून त्याचे भवितव्य ठरवणे चुकीचे होते.
  
मनन-चिंतन:
     पाचारण म्हणजे काय? पा+चारण म्हणजे ‘परमेश्वराच्या चरणी जाणे’. देवाचे पाचारण हे त्याच्या जवळपास जाण्यास, ‘परमेश्वराबरोबर राहण्यास आणि परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी’ असते. संपूर्ण बायबल आपणांस सांगते की, ‘देव पाचारण केलेल्यांना त्यांच्या आईच्या गर्भाशयांत असतानाच घडवितो. त्यांचा जन्म होण्याअगोदर पवित्र करतो आणि त्यांस राष्ट्रांचा संदेष्टे म्हणून नेमतो. तो त्यांस कधी अंतर देत नाही. तो त्यांचा बचाव करण्यासाठी सतत त्यांच्या बरोबर राहतो’. देव त्यांना विविध कार्ये करण्याची कृपादाने देतो. काहींना ज्ञानाचे वचन तर काहींना विद्देचे, विश्वासाचे, निरोगी करण्याचे, अदभूत कार्ये करण्याचे, संदेश देण्याचे, आत्मे ओळखण्याचे, विविध भाषा बोलण्याचे आणि त्यांचे अर्थ सांगण्याचे वरदान देत असतो.
     येशू ज्या नाझरेथ गावात लहानाचा मोठा झाला होता तेथेच तो जातो आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात, त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट दिला जातो. तो उलगडून येशू त्यात लिहिलेले त्यांच्यासमोर वाचतो: “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे” (यशया ६१:१-२, लूक ४:१८). तो ग्रंथपट वाचून झाल्यावर येशू त्यांस म्हणतो, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे” (लूक ४:२१). परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण त्याने मला दीनांस सुवार्ता सांगण्यास अभिषिक्त केले आहे; ज्याची तुम्ही वाट पाहता तो ख्रिस्त-मसीहा मीच आहे. पण गावाचे लोक हे खरे मानायला तयार नव्हते. उलट ते म्हणू लागले, ‘हा योसेफाचा पुत्र ना? थोडक्यात म्हणायचे म्हणजे येशू तू कोण आहेस, कुणाचा मुलगा, कोठे राहतोस हे सर्व आम्हांला ठाऊक आहे. इग्रंजी भाषेत एक म्हण म्हटली जाते, “familiarity breeds contempt” म्हणूनच येशू त्यांना म्हणतो की, तुम्ही मला ही म्हण लागू करणार, हे वैदया, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमांत ज्या गोष्टी केल्यास, त्या येथेही आपल्या गावी कर. जर का तू ह्या गोष्टी केल्यास तरच आम्हीं तुच तो मसीहा-ख्रिस्त आहेस असे मानू. म्हणूनच ख्रिस्त त्यांस म्हणतो, ‘कोणताही संदेष्टा स्वदेशांत मान्य होत नाही’. समाजात राहणाऱ्या आणि वावरणाऱ्या माणसाला त्याच्याच समाजातील लोक मान्य करत नाही.  
येशूने नासरेथवासियांचा अविश्वास त्यांना दाखवून दिला तो असा की, ‘मी इतर गावांत जे केले ते येथे मी का करीत नाही? या तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘तुमचा अविश्वास! मी ख्रिस्त आहे हे मान्य करून तुम्हीं माझा स्वीकार करीत नाही’. हिंदी भाषेत म्हटलेले आहे की, ‘मुजे तो अपनोने लुटा गैरोमें कहाँ दम था, मेरी कष्टीं वहाँ डुबी जहाँ पानी कम था’|
कठोर काळजाच्या व ताठ मानेच्या लोकांस येशू एलिया आणि अलिशा संदेष्ट्यांची उदाहरणे देत म्हणतो, ‘त्या काळी इस्त्राएलांत पुष्कळ विधवा होत्या; तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठविले नव्हते. तर ‘सीदोन परदेशांतील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठविले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्त्राएलांत पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही; तर सुरीयाचा नामान मात्र शुद्ध झाला. कारण ती एक विधवा देवावर विश्वास ठेवण्यास तयार होती आणि अलिशाच्या शब्दांवर विश्वास ठेवणारा नामान नावाचा कुष्ठरोगी, त्यांच्या विश्वासामुळे बरा झाला होता. येशूने सांगितेले हे सत्य त्यांना पचले नाही. कारण ‘Truth is always Bitter’ म्हणजे सत्य नेहमी कटू असते.  
अध्याय ४ मधील ओवी तिसावी सांगते की, ‘येशू त्यांच्यामधून निघून गेला’. येशू नाझरेथहून का निघून गेला? बायबल आपणांस सांगते की, येशू यानंतर पुन्हा कधीच नाझरेथ गावी आला नाही. येशू आपल्या स्वदेशांत आला परंतु त्याच्याच लोकांनी त्याचा ख्रिस्त म्हणून स्वीकार केला नाही.
एक १६ वर्षाचा मुलगा जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा सर्व म्हणाले हा छोटासा मुलगा काय करणार! ह्या छोट्याशा मुलाने जेव्हा शतक पटकावले तेव्हा लोक म्हणू लागले की हा आमची शान आहे. आज तोच मुलगा सचिन रमेश तेंडुलकर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आहे. 
आपण देखील आपल्या जीवानांत कित्येकवेळेस इतरांना प्राधान्य देत नाही. जो आपल्या गावाचा विकास घडवू इच्छितो त्याला आपण पाठिंबा देत नाही. आपण आपल्या जीवनात तुलनात्मक दृष्टीकोन बाळगतो. आपल्या स्वतःच्या मुलांवर आपण दुर्लक्ष केले, तर त्यांच्या मनात मी माझ्या आई-वडिलांना नकोशी/नकोशा आहे असे वाटत असते. आज सुरीने/ चाकूने वा तलवारीने केलेल्या जखमा सहन होतील, पण ‘न केलेला स्वीकार’ मान्य होणार नाही. तो अधिक खोलवर घाव करू शकतो. प्रेमात न केलेला स्वीकार बळी घेतो, घरात न केलेला स्वीकार घर उध्वस्त करते आणि समाजाने न केलेला स्वीकार माणसाला मातीत मिळवितो. सर्वकाही माझ्याकडून, माझ्या द्वारे आणि माझ्याबरोबर चालू होते. मी जर स्वतःचा स्वीकार केला तर मी इतरांचा स्वीकार करेन आणि जर का मी इतरांचा स्वीकार केला तर मी माझ्या समाजाचा, गावाचा, राज्याचा, देशाचा आणि ह्या जगाचा स्वीकार करेन. जर खुद्द परमेश्वर कुणालाही आपल्यापासून वेगळे करीत नाही, त्यांचा धिक्कार करीत नाही व त्यांना कमी लेखत नाही तर आपण कोण त्यांस न स्वीकारणारे. म्हणूनच म्हणतो, ‘एक जुटीने कंबर बांधू, कर निर्धार मनाचा, देह जीझावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेसी!
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांला ख्रिस्ताच्या प्रीतीने भरून टाक.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी परमगुरुस्वामी ह्यांना मनोबल लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताची प्रीती आपण आपल्या जीवनात आत्मसात करावी आणि तीच प्रीती आपण आपल्या कृत्यातून इतरांपर्यंत पोहचविण्यास आपणांस परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी अनेक सेवाभावी संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद सदैव राहावा व त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत; विशेषकरून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे सदस्य ह्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे आणि त्यांनी देवाची प्रीती त्यांच्या देशभल्यासाठी आत्मसात करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया. 



Wednesday, 20 January 2016

Reflections for the Homily of 3rd Sunday in Ordinary Time (24/01/2016) By: Wickie Bavighar.











सामान्यकाळातील तिसरा रविवार








दिनांक: २४/०१/२०१६
पहिले वाचन: नहेम्या ८:२-४, ५-६, ८-१०.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:१२-३०.
शुभवर्तमान: लूक १:१-४; ४:१४-२१.



“दीनांस शुभवार्ता घोषवण्यास त्याने मला अभिषिक्त केले आहे”





प्रस्तावना :

     आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास परमेश्वराची वचने येशुमध्ये कशी पूर्णत्वास आली आणि ‘दीनांस शुभवार्ता घोषवण्यास देवाने येशूला अभिषिक्त केले’ ह्यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रित करीत आहेत.
     आजच्या पहिल्या वाचनामध्ये, एज्रा याजक युद्धात यातना व दु:ख सहन करून येरुसलेमेत परतलेल्या लोकांना नियमशास्राद्वारे धीर देऊन, नवीन जीवनास सुरुवात करण्यास सांगत आहे. करिंथकरांस पाठवलेले पत्र, ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात संत पौल देवाच्या मंडळीला ख्रिस्ताच्या शरीराची उपमा देतो व ‘तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहे’ असे सांगतो. तर लुककृत शुभवर्तमानात येशू त्याच्या मिशन कार्याची सुरुवात करत असता ‘परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दीनांस सुवार्ता घोषवण्यास त्याने माझा अभिषेक केला आहे’ असे जाहीररित्या घोषित करतो.
     ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा संस्कार स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याठायी अभिषिक्त असते. ह्या ‘दयेच्या पवित्र वर्षात’ देवराज्याची सुवार्ता शब्दाने व कृतीने म्हणजेच पोप महशयांनी सांगितलेले ‘दयेची कृत्ये’ योग्य त्या रीतीने आपण कृतीत उतरावीत यासाठी प्रभूकडे कृपा व शक्ती मागुया.

सम्यक विवरण:
शुभवर्तमान: लूक १:१-४; ४:१४-२१.

          १. दीनांचे शुभवर्तमान:

दीनांसाठी दीन होऊन दीनांमध्ये अवतरलेला ‘दीनांचा एकमेव कैवारी’ म्हणजे ‘येशू’ अशी ख्रिस्ताची ओळख करून देणारे लुकलिखित शुभवर्तमान संत महंताचे प्रेरणास्थान आहे.  “जे दीन ते धन्य कारण, स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” (६:२०); अशा शब्दांत येशूने दीन दुबळ्यांना आशा दिली. स्व-शापीत भावनेतून त्यांना मुक्त केले आणि नव्या जोमाने स्वर्गराज्य मिळविण्यासाठी प्रेरित केले. ‘दीनांना सुवार्ता सांगण्यास परमेश्वराने मला अभिषिक्त केले आहे, धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यांना दृष्टीलाभ व ठेचले गेलेल्यांना मुक्त करण्यासाठीच मी आलो आहे’ (४:१८) असं जाहीर घोषित करणारा ख्रिस्त उभे आयुष्य दीनांसाठी अर्पितो.
ख्रिस्त स्वत: दीन झाला. गुरांच्या गोठ्यात उघड्यावर, कुडकुडणाऱ्या थंडीत जन्मला आणि टेकडीवरील क्रुसावर उघड्यावरच मरण पावला. मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायला जागा नव्हती (९:१८). अशा अवस्थेत ख्रिस्ताने दारिद्रयाच्या सर्वच सीमारेषा ओलांडल्या म्हणून तो प्रवक्तांचा प्रवक्ता आहे असे हे शुभवर्तमान सांगते.

२.      ‘दीन’ ह्या शब्दाचा व्यापक अर्थ:

दीनांची व्यथा लुक सर्वशोषित वर्गाशी करतो. केवळ आर्थिक दारिद्र्याने असलेले दीन नव्हे, तर पारंपारिक जात्यात भरडत असलेल्या स्रिया, प्रामुख्याने विधवा व वांझ स्रिया (१:७,७:१२) वर्णभेदाखाली दडपल्या गेलेल्या, कनानी आणि शमरोन्यासारख्या कनिष्ठ जातीतही (१०:३३) महारोगी, अनाथ, अपंग असे अनेक लोक दीन समजले जात. थोडक्यात शारीरिक, आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दारिद्र्याने पिडलेले सर्व लोक ख्रिस्तानुसार दीन आहेत ही लूकच धारणा होती.

३.      देवाने मला पाठवले आहे:

प्रत्येक विश्वासणाऱ्या, नवा जन्म घेतलेल्या व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचे आहे. येशू ख्रिस्त ह्या जगात याच प्रकारे जगला. त्याचे जीवन आपणाकरीता एक मूर्तिमंत उदाहरण आहे. देवाच्या कृपेचे कार्य करण्यास तो आला होता. तो मुक्त करणारा व दृष्टी देणारा होता. तो देवाच्या कृपेची घोषणा करत होता असे या वाचनात लिहिले आहे (४:१८,१९), (गलती ५:२५). यहुदी लोकांच्या सभास्थानात नियमशास्रांचे वाचन व अभ्यास, स्तोत्रे गाणे आणि प्रवचने होत. येशू ख्रिस्त एखाद्या गावात गेला म्हणजे तेथील सभास्थानात शिक्षण देई. लोकांनी या गोष्टी कधीच ऐकल्या नव्हत्या. त्याच्या मुखातील शब्द दयेने व प्रीतीने भरलेले होते. आज देवाला याविषयी कळवायचे आहे. ख्रिस्ताद्वारे देव कृपा करतो; पापाच्या व मरणाच्या बंधनातून तो आपल्याला मुक्त करतो. आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिलो तर आपणही हाच संदेश कृपेने इतरांना देऊ शकतो.

बोधकथा :

१.    दीनदुबळ्यांना आधार:

     टूअर्स चा मार्टिन हा ख्रिस्ती रोमन सैनिक होता. तो ख्रिस्ती असल्याने देवाचे वचन नेहमी पाळत असे. एके कडक हिवाळ्याच्या दिवशी तो एका शहरात जात होता, तेव्हां एका भिकाऱ्याने त्याला थांबविले व मदतीसाठी हात पुढे केला. थंडीमुळे तो भिकारी नीळा झाला होता व कुडकुडत होता. मिलिटरी नियमाप्रमाणे सैनिकाचा कोट दुसऱ्यांना देता येत नाही. तरीही, मार्टिनने त्या कोटाचे दोन तुकडे केले व अर्धा कोट त्या भिकाऱ्याच्या अंगावर टाकला.
त्या रात्री मार्टिनला स्वप्न पडले. स्वर्गात ख्रिस्त अर्धा कोट घालून फिरताना त्याला दिसला. देवदुतांनी ख्रिस्ताला विचारले, ‘तुम्ही अर्धा कोट का घालता, तुम्हाला हा असा अर्धा कोट कोणी दिला?’. त्यावर येशूने उत्तर दिले, ‘हा अर्धा कोट मला माझा सेवक मार्टिन ह्याने दिला आहे’.
तात्पर्य: देवाच्या सुवार्तेकरिता ऐहिक सुख त्यागनाऱ्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते.

. संत फ्रान्सिस असिसिकर हा फार श्रीमंत मनुष्य होता, परंतु तो समाधानी नव्हता. त्याचे म्हणणे असे होते कि, ‘एवढी श्रीमंती असून जीवन हे अर्धेच आहे, त्यात समाधान कोणतेच नाही’. एके दिवशी फ्रान्सिस घोड्यावरून जात असता, त्याच्या नजरेस एक कुष्ठरोगी पडला. त्याने कुष्ठरोग्याला मिठी मारली आणि आख्यायिका सांगते की, तो कुष्टरोगी ताबडतोब बरा झाला, त्या कुष्ठरोग्याचा चेहरा बदलून फ्रान्सिसला ख्रिस्ताचा चेहरा दिसू लागला. हा चमत्कार त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. तद्नंतर फ्रान्सिसचे परिवर्तन झाले आणि ख्रिस्ताची शुभवार्ता घोषवण्यास त्याला पाचारले गेले आहे ह्याची त्याला जाणीव झाली.
तात्पर्य: ज्याने ख्रिस्ताठायी व सुवार्तेसाठी जीवनाचा त्याग केला आहे, त्याला शंभर पटीने प्रतिफळ मिळेल अशी प्रभू येशूची शाश्वती आहे.

मनन चिंतन

‘अभिषेक’ किंवा ‘अभिषिक्त’ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे दैवी कृपा ( स्तोत्र २३:५; ९२:१०), किंवा देवाचा संकल्प सिद्धीस नेण्याकरिता एखाद्या व्यक्तीची केलेली खास नेमणूक. जुन्या करारामधील आब्राहम व मोशे, दावीद  आणि शलमोनासारखे राजे, तसेच यशया आणि यिर्मया सारख्या संदेष्ट्यांना परमेश्वराने अभिषिक्त केले होते. त्यांच्याद्वारे परमेश्वराने आपले संकल्प पूर्णत्वास नेलेले आपण पाहतो. परमेश्वराची दैवी कृपा म्हणजेच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा व दानांचा वर्षाव झाल्यामुळे देवाचे कार्य अनेक माणसांद्वारे स्वत: परमेश्वर पूर्णत्वास नेतो. हिब्रू भाषेतील शब्द ‘मसिहा’ आणि ग्रीक भाषेतील शब्द ‘ख्रिस्त’ याचाच अर्थ अभिषेक केलेला असा आहे.
प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र होता आणि पवित्र आत्म्याठायी सर्व सामर्थ्याने व कृपेने परिपूर्ण होता, म्हणूनच त्याने त्याच्या जीवनाद्वारे क्रूसावरील मरणापर्यंत पापी जनांचे कैवार घेतले. रंजल्या-गांजलेल्यांना देवाची शुभवार्ता सांगितली, आणि स्वर्गीय राज्याची घोषणा केली. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेले आपण सर्वजण ‘ख्रिस्तासमान’ म्हणजेच ‘अभिषिक्त’ आहोत. देवाच्या तारणकार्य योजनेत आपणा प्रत्येकावर सुवार्ता पसरविण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. पवित्र आत्म्याठायी देवाचा शब्द जाणण्याचे आणि प्रेम, बंधुता ह्याचा समेट करून दुर्बलांची मुक्तता करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला अभिषिक्त करण्यात आले आहे.
     गोरगरीब, दीनदुबळे, निरक्षित, आंधळे पांगळे अशा लोकांचा कैवारी असलेला येशू हा स्वत: दीन झाला आणि दीनांना शुभवार्ता देणे, हीच त्याची कार्यदिशा होती, असे लुक सांगत आहे . दीनांनी येशूकडे वळावे; ह्या जगात एकच त्यांचा कैवारी आहे म्हणून त्यांनी आशावादी रहावे. समाजातील श्रीमंतांनी गरिबांकडे लक्ष द्यावे असे अप्रत्यक्षपणे लुक सुचवीत आहे.
     देव सर्वांचा रक्षणकर्ता आहे. येशुख्रिस्त हा एक सामान्य मनुष्य असून सुद्धा, परमेश्वराला अग्रस्थान दिल्यामुळे तो एक ‘असामान्य’ व ‘आदर्श’ व्यक्ती बनला. आपले पावित्र्य आबाधित राखून त्याने परोपकारी वृतीने गरजवंताची सेवा केली. आंधळ्यांस दृष्टी, धरून नेलेल्यांची सुटका, दीनांस सुवार्ता, भुकेल्यांस अन्न, उघड्यांना वस्र अशी ही ‘दयेची कृत्ये’(पोप महाशयांनी ह्या दयेच्या पवित्र वर्षात जोपासण्यास सांगितले आहे) येशूने स्वत:च्या कृतीतून इतरांना दाखवून दिले. निराश्रीतांना निवारा देणारा प्रभू अन्याय करणाऱ्यांची दाणादाण करी. परमेश्वराचा आत्मा त्याचावर आला; देवपुत्र प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व ज्ञानाने परिपूर्ण झाल्यावर सुवार्ता कार्यास त्याने प्रारंभ केला. दीन, दलित, दु:खी-कष्टी, अन्यायग्रस्त, अंध, पंगु व बंदिवान अशा सर्वांना मुक्तता देण्यासाठी तो ह्या जगात आला असल्याची घोषणा त्याने केली. परमेश्वराच्या तारणकार्याच्या योजनेची सुरुवात प्रभू येशूने गालीली प्रांतात, विशेषत: नाझरेथ ह्या त्याच्या गावापासून केली.
      ख्रिस्तामध्ये स्नानासंस्कर व दृढीकरण संस्कार स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती पवित्र  आत्म्याठायी अभिषिक्त असते. ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताचे अनुकरण करून देवाची सुवार्ता पसरवणे हे त्याचे आद्य आध्यात्मिक कर्तव्य आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणसाला अभिषिक्त  करून देवराज्याची सुवार्ता पसरवण्याचे आवाहन ख्रिस्ताने केलेले आहे. आपल्याला मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा योग्य तो उपयोग करून दीनांना सुवार्ता सांगण्यास आपण पुढाकार घ्यायला हवा. प्रभू येशूने दीन, दुबळे, बंदिवान, अवास्तवग्रस्त व आजारी माणसांना आपल्या वचनाद्वारे नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्याने त्याच्या शब्दाने व स्पर्शाने अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले. तसेच आपणही ‘दयेच्या ह्या पवित्र वर्षात’(८ डिसें ’१५ – २० नोव्हें ‘१६) ‘दयेची कृत्ये’ इतरांप्रती दाखवावीत म्हणून आज देऊळमाता आपल्याला आमंत्रित करत आहे.
      आपल्या सर्वांच्या ठायी प्रभूच्या वचनांचे सामर्थ्य आहे व पवित्र आत्म्याद्वारे आपण सुद्धा इतरांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. मात्र प्रथम आपण आपल्या स्वत:मधील कृपादानाची योग्य ती जोपासना करूया व सुवार्ता पसरविण्यासाठी ख्रिस्ताकडे प्रेरणा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: सुखी ठेव तू सर्वांना, देवा आमुची हिच प्रार्थना.

१.ख्रिस्त आपणा प्रत्येकासाठी व जगातल्या प्रत्येक माणसासाठी शांतीची सुवार्ता घेऊन पृथ्वीतलावर अवतरला, ही शांतीची सुवार्ता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी परमेश्वराने ख्रिस्तसभेचा प्रभावी साधन म्हणून वापर करावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया.
२. संपूर्ण जगात गरिबांवर होणारे अत्याचार, अन्याय थांबून त्यांना माणूस म्हणून       सन्मानाने जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. देवाच्या हृदयात प्रवेश मिळतो तो फक्त नम्र हृदयाच्या लीन व्यक्तींना. परमेश्वराने आपणा सर्वाना नम्र व मनाने धनवान बनण्याचे दान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज अनेक पती-पत्नी ‘देवाने जे जोडले आहे ते मानवाने तोडू नये’ ह्या आज्ञेचा भंग करून घटस्फोटाचा विचार करतात, कारण विवाहाचे पावित्र्य त्यांस समजलेले नाही. जी दांपत्ये लग्नाच्या बंधनात आहेत, त्यांनी विवाहाचे पावित्र्य जपून ठेऊन एकमेकांबरोबर एकनिष्ठेने व विश्वासाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आजच्या युगात वृद्ध आई-वडिलांवर दुर्लक्ष होऊन त्यांचा अपमान केला जात आहे, ह्या नवीन पिढीला परमेश्वराने चांगली सुबुधी द्यावी व त्यांच्या आई-वडिलांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी कर्तव्यबुद्धीने पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.





Wednesday, 13 January 2016

Reflections for the Homily of 2nd Sunday in Ordinary Time (17/01/2016) By: Valerian Patil.










सामान्य काळातील दुसरा रविवार



दिनांक: १७/०१/२०१६
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: १ करींथ १२:४-११
शुभवर्तमान: योहान २:१-११


त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला!





प्रस्तावना

     आज देऊळमाता सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशूवरील असलेली आपली श्रद्धा वृद्धींगत करण्यासाठी पाचारीत आहे
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया म्हणतो, ‘युवक जसा युवतीशी विवाह करतो तसा तुला घडविणारा तुझ्याशी विवाह करील, वधूमुळे वर जसा आनंदित होतो, तसा तुझा देव तुझ्यामुळे आनंदित होईल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथीकरांस पाठविलेल्या पत्रात सेवा, ज्ञान, विद्या, शक्ती ह्या पवित्र आत्माच्या दानांविषयी सांगत आहे, ही सर्व दाने तो स्वत:च्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देत असतो. तसेच आजच्या शुभवर्तमानात संत योहानाने कानागावी केलेल्या लग्नाचे वर्णन आणि येशुने ‘पाण्याचा केलेला द्राक्षरस’ ह्याविषयी ऐकावयास मिळते.
गालीलातील काना गावी येथे घडलेल्या अलौकिक कृत्यामुळे येशूच्या शिष्यांची त्याच्यावरील श्रद्धा अधिक बळकट झाली. आजच्या ह्या मिसाबालीदानात भाग घेत असताना आपण देवाकडे त्याने आमची सुद्धा श्रद्धा अधिकाधिक बळकट करावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६२:१-५
     वधूसारखी नटलेली सुंदर सियोनेपासून सुरु झालेल्या व मधे समाप्त होणाऱ्या काव्यमालिकेतील ही आणखी एक कविता आहे. यात आपल्या पतीची व मुलीची उत्कटतेने प्रतिक्षा करणारी स्री आणि सियोन ह्यांची तुलना केलेली आहे. येथे एक होण्यामध्ये देवाच्या बाजूवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या इच्छेतील उत्कट जोम, सियोनाविषयीच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची आणि व्याप्ती, तिला परिपूर्ण करण्यात त्याला वाटणारा अभिमान, बहिष्कृत केले त्यांना स्वगृही आणण्यामधील त्याचा आनंद आणि या सर्वांचे केंन्द्रस्थानी असलेले रहस्य हे काही लोकहितार्थ कार्य होत नाही, तर त्यांच्या मुळाशी उत्कट ‘प्रीतीच’ आहे असे येथे लेखक आपणांस सांगू इच्छितो.
     ‘सियोनाची मुले’ या शब्दांनी जे सात्विक आहेत, त्यांना माता नगरीने उत्पन्न केले असले तरी ते या नगरीशी संलग्न आहेत आणि नगरीची पुन:स्थापना हा देवाप्रमाणे त्यांच्याही आनंदाचा विषय आहे.

दुसरे वाचन: करिंथ १२:४-११.
विविध प्रकारची दाने एकाच उगमापासून म्हणजेच देवापासून येतात व पवित्र आत्मा आपल्याला ती वरदाने देतो. ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत. तोच आत्मा प्रभू व देव ह्याकडून विविध प्रकारची दाने, कृपादाने, देणग्या सेवा आणि कार्ये होत असतात. पौलाचा दाखला समोर ठेवून मंडळीनेही या तीनही संज्ञा वापराव्यात, हे स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:साठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी आत्म्याने प्रकटीकरण होते. जगातील जीवनात हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते. जगातील जीवनात दुसऱ्याचे कल्याण करण्यासाठी दानधर्म केला जाई. प्रत्येकाला दिले आहे ते दुसऱ्यासाठीच आहे यावर भर देण्यासाठी पौलाने तोच शब्द वापरला आहे.
     करिंथ शहरातील प्रतिष्ठीत नागरिक आपला मान, शक्ती, संपत्ती, वैगेरेचा दिमाख मिरवीत. कारण यामुळेच आपले महत्व आणि दर्जा वाढतो, असा त्यांचा समज होता पण ख्रिस्ताकडे वळल्यावर आणि सेवा कार्यातही अनेकदा ही चुकीची कल्पना काही बाबतीत डोके वर काढताना दिसते. आत्म्याकडून मिळणारे विविध दाने, ज्ञान, विद्या, विश्वास, निरोगी करणे अदभूत कार्यशक्ती आत्मे ओळखण्याची शक्ती हे सर्वच आत्म्याकडून प्राप्त होते आणि प्रत्येक व्यक्तीला कोणते वरदान द्यायचे ते सर्वस्वी आत्म्याकडेच आहे, त्याचा निर्णय सार्वभौम आहे.

शुभवर्तमान: योहान २:१-११
या अध्यायामध्ये अनेक चिन्हांचा उल्लेख केला आहे. पाण्याचा द्राक्षरस करणे हे त्यातील पहिले चिन्ह आहे. योहानाने नमूद केलेल्या बहुतेक चिन्हांतून पुढे त्यांच्याशी संबधित विषयाचे विवेचन केलेले आढळते. ही चिन्हे या शुभवर्तमानाच्या एकंदर रचनेचा अदभूत भाग असल्याचे स्पष्ट दिसून येते.
या पहिल्या चिन्हांचा परिणाम म्हणून ख्रिस्ताचे गौरव दिसून आले असे योहानाने आवर्जून सांगितले आहे आणि उर्वरित चिन्हे समजून घेण्याची रीत आणि वाट यातूनच दाखवली आहे. कारण यातूनच काना येथील चमत्कार एका सप्ताहाच्या काळाच्या अखेरीस घडला हे लक्षात येते. येशूच्या सेवा-कार्याच्या पहिल्या सप्ताहात घडलेल्या घटना सांगण्याचा योहानाचा मानस असावा. येशू व त्याची आई त्यांच्या समाजातील दोन बाबी लक्षात घ्याव्यात. द्राक्षरस संपल्याने यजमानावर लाजीरवाणा प्रसंग येणार हे मरीयेच्या मनात होते. तर ‘येशूच्या’ मनात त्याच्या ‘मुख्य कार्याचा विचार’ होता. त्याचा निर्देश येथे ‘वेळ’ या शब्दाने शब्दांकित केला गेला आहे.
जेव्हा मरीयेने येशूला विनंती केली, तेव्हा येशू ज्याप्रकारे आपल्या आईशी बोलला ते चमत्कारीक वाटेल तथापि तो पित्याखेरीज इतर कोणाचेही ऐकतो असा गैरसमज होऊ नये हाच त्याचा स्पष्ट उद्देश ह्यात होतो. 

मनन चिंतन
प्रभू येशूने केलेल्या निरनिराळ्या चमत्कारांचा उल्लेख चारही शुभवर्तमानात आहे. पण योहानाच्या शुभवर्तमानाचे वैशिष्ट हे आहे की, त्यात ‘चमत्कार’ ह्या शब्दाऐवजी ‘चिन्ह’ हा शब्द वापरलेला आहे. येशूने काना गावी पाण्याचा द्राक्षरस करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला आणि आपले वैभव प्रकट केले. येशूने केलेल्या सात चिन्हांची वर्णने योहानाच्या शुभवर्तमानात आहेत. पण तो त्याच्या वाचकांसाठी लिहितो की, “ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे” (योहान २०:३०-३१). येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण आणि पुनरुत्थान दाखवलेले सर्वात मोठे चिन्ह आहे.
येशूच्या चमत्काराला ‘चिन्ह’ किंवा ‘प्रतिक’ असे म्हटले गेले आहे. आपण पाहिले तर येशूच्या प्रत्येक चमत्कारात देव मानवाला संदेश देत असतो. तसेच कानागावी केलेल्या चमत्काराचे दोन अर्थ आहेत.
१. ज्यू धर्माचे रांजण रिकामे झाले होते. ते ख्रिस्ताने पाण्याने भरण्यास सांगितले; त्या पाण्याचे रुपांतर त्याने द्राक्षरसात केले. सि.एच.डोड ह्यांच्या मतानुसार हा द्राक्षारस ज्यू धर्मशास्राचे प्रतिक होता. ‘नवा द्राक्षरस’ म्हणजे ‘शुभवर्तमान’. तो जुन्यापेक्षा चांगला होता म्हणजे ज्यू धर्माशास्रापेक्षा ‘नवा करार’ श्रेष्ठ होता.
 २. काळाच्या अंती प्रभू आपल्या निवडलेल्या लोकांबरोबर सहभोजन घेईल आणि त्यावेळी भरपूर द्राक्षरस असेल म्हणजे आनंदाचा कळस गाठला जाईल, त्याचे हे ‘पूर्वचिन्ह’ होते.
‘येशू ख्रिस्त’ हा स्वत: एक ‘चिन्ह’ होता. त्याने ह्या भूतलावर येऊन मानवरूप धारण केले. तो देव असून माणूस झाला. यहुदी लोक चिन्हांवर विश्वास ठेवत असत. त्यांनी येशूला विचारले, ‘आम्हाला काही चिन्हे दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू’. हे विचारण्याचे कारण म्हणजे यहुदी लोकांनी येशूला पूर्णपणे ओळखले नव्हते. शास्री, परुशी आंधळे झाले होते. आज आपण सुद्धा देवाकडे काही ना काही गोष्टीसाठी चमत्काराची अपेक्षा करत असतो. देवा मला काही चमत्कार दाखव म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. चमत्कार पाहिल्याशिवाय मी नमस्कार करणार नाही अशी आपली भावना असते. तर माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण सुद्धा शास्त्री आणि परुश्यासारखे आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला आज विचारूया.
येशूने काना गावी आपल्या आईच्या शब्दाला ताबडतोब होकार दिला नाही. परंतु त्याने मरीयेचा शब्द मोडलाही नाही. मरीयेचा येशूवर विश्वास होता व येशूने मरीयेचा विश्वास पूर्ण केला. त्याने पाण्याचा द्राक्षरस केला व त्या लोकांना अडचणीत मदत केली. आपले जीवन हे कितीतरी दानांनी भरलेले आहे. त्यांचा वापर आपण दुसऱ्यांसाठी करावा. उदाहरणार्थ, दुसऱ्यांची सेवा करावी, त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करावी इत्यादी. हे सर्व चांगले कार्य करण्यासाठी आपण येशूकडे कृपा मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१.ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, सिस्टर्स आणि सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व तेच प्रेम त्यांनी जगात आपल्या कृतीने पसरवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जी कुटुंबं गैरसमज, शाब्दिक कलह, मतभेद अशा कारणांवरून उध्वस्त झाली आहेत, त्यांच्यामध्ये पुन्हा ऐक्याची भावना निर्माण व्हावी व ईश्वराचे प्रेम, सौख्य, शांती त्यांच्या कुटुंबात नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. पवित्र आत्म्याने आपल्याला अनेक दानांनी भरलेले आहे. त्या दानांचा आपण योग्य तो वापर करावा व त्या दानांनी आपण दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. येशू ख्रिस्त आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहिला व त्याने त्यांचा सन्मान केला. हे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेऊन आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचा मान-सन्मान करावा. त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.