Reflections for the Homily of 2nd Sunday in Ordinary Time (17/01/2016) By: Valerian Patil.
सामान्य काळातील दुसरा
रविवार
दिनांक: १७/०१/२०१६
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: १ करींथ १२:४-११
शुभवर्तमान: योहान २:१-११
त्याच्या शिष्यांनी
त्याच्यावर विश्वास ठेवला!
प्रस्तावना
आज देऊळमाता सामान्य काळातील दुसरा
रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशूवरील असलेली आपली श्रद्धा
वृद्धींगत करण्यासाठी पाचारीत आहे
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया म्हणतो, ‘युवक जसा
युवतीशी विवाह करतो तसा तुला घडविणारा तुझ्याशी विवाह करील, वधूमुळे वर जसा आनंदित
होतो, तसा तुझा देव तुझ्यामुळे आनंदित होईल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथीकरांस पाठविलेल्या
पत्रात सेवा, ज्ञान, विद्या, शक्ती ह्या पवित्र आत्माच्या दानांविषयी सांगत आहे,
ही सर्व दाने तो स्वत:च्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देत असतो. तसेच आजच्या
शुभवर्तमानात संत योहानाने कानागावी केलेल्या लग्नाचे वर्णन आणि येशुने ‘पाण्याचा
केलेला द्राक्षरस’ ह्याविषयी ऐकावयास मिळते.
गालीलातील काना गावी येथे घडलेल्या अलौकिक कृत्यामुळे
येशूच्या शिष्यांची त्याच्यावरील श्रद्धा अधिक बळकट झाली. आजच्या ह्या
मिसाबालीदानात भाग घेत असताना आपण देवाकडे त्याने आमची सुद्धा श्रद्धा अधिकाधिक
बळकट करावी म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६२:१-५
वधूसारखी नटलेली सुंदर सियोनेपासून
सुरु झालेल्या व मधे समाप्त होणाऱ्या काव्यमालिकेतील ही आणखी एक कविता आहे. यात
आपल्या पतीची व मुलीची उत्कटतेने प्रतिक्षा करणारी स्री आणि सियोन ह्यांची तुलना
केलेली आहे. येथे एक होण्यामध्ये देवाच्या बाजूवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या
इच्छेतील उत्कट जोम, सियोनाविषयीच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची आणि
व्याप्ती, तिला परिपूर्ण करण्यात त्याला वाटणारा अभिमान, बहिष्कृत केले त्यांना
स्वगृही आणण्यामधील त्याचा आनंद आणि या सर्वांचे केंन्द्रस्थानी असलेले रहस्य हे
काही लोकहितार्थ कार्य होत नाही, तर त्यांच्या मुळाशी उत्कट ‘प्रीतीच’ आहे असे
येथे लेखक आपणांस सांगू इच्छितो.
‘सियोनाची मुले’ या शब्दांनी जे
सात्विक आहेत, त्यांना माता नगरीने उत्पन्न केले असले तरी ते या नगरीशी संलग्न
आहेत आणि नगरीची पुन:स्थापना हा देवाप्रमाणे त्यांच्याही आनंदाचा विषय आहे.
दुसरे वाचन: करिंथ १२:४-११.
विविध प्रकारची दाने एकाच उगमापासून म्हणजेच देवापासून येतात
व पवित्र आत्मा आपल्याला ती वरदाने देतो. ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत.
तोच आत्मा प्रभू व देव ह्याकडून विविध प्रकारची दाने, कृपादाने, देणग्या सेवा आणि
कार्ये होत असतात. पौलाचा दाखला समोर ठेवून मंडळीनेही या तीनही संज्ञा वापराव्यात,
हे स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:साठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी
आत्म्याने प्रकटीकरण होते. जगातील जीवनात हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते.
जगातील जीवनात दुसऱ्याचे कल्याण करण्यासाठी दानधर्म केला जाई. प्रत्येकाला दिले
आहे ते दुसऱ्यासाठीच आहे यावर भर देण्यासाठी पौलाने तोच शब्द वापरला आहे.
करिंथ शहरातील प्रतिष्ठीत नागरिक
आपला मान, शक्ती, संपत्ती, वैगेरेचा दिमाख मिरवीत. कारण यामुळेच आपले महत्व आणि
दर्जा वाढतो, असा त्यांचा समज होता पण ख्रिस्ताकडे वळल्यावर आणि सेवा कार्यातही
अनेकदा ही चुकीची कल्पना काही बाबतीत डोके वर काढताना दिसते. आत्म्याकडून मिळणारे
विविध दाने, ज्ञान, विद्या, विश्वास, निरोगी करणे अदभूत कार्यशक्ती आत्मे
ओळखण्याची शक्ती हे सर्वच आत्म्याकडून प्राप्त होते आणि प्रत्येक व्यक्तीला कोणते
वरदान द्यायचे ते सर्वस्वी आत्म्याकडेच आहे, त्याचा निर्णय सार्वभौम आहे.
शुभवर्तमान: योहान २:१-११
या अध्यायामध्ये अनेक चिन्हांचा उल्लेख केला आहे. पाण्याचा
द्राक्षरस करणे हे त्यातील पहिले चिन्ह आहे. योहानाने नमूद केलेल्या बहुतेक
चिन्हांतून पुढे त्यांच्याशी संबधित विषयाचे विवेचन केलेले आढळते. ही चिन्हे या
शुभवर्तमानाच्या एकंदर रचनेचा अदभूत भाग असल्याचे स्पष्ट दिसून येते.
या पहिल्या चिन्हांचा परिणाम म्हणून ख्रिस्ताचे गौरव दिसून
आले असे योहानाने आवर्जून सांगितले आहे आणि उर्वरित चिन्हे समजून घेण्याची रीत आणि
वाट यातूनच दाखवली आहे. कारण यातूनच काना येथील चमत्कार एका सप्ताहाच्या काळाच्या
अखेरीस घडला हे लक्षात येते. येशूच्या सेवा-कार्याच्या पहिल्या सप्ताहात घडलेल्या
घटना सांगण्याचा योहानाचा मानस असावा. येशू व त्याची आई त्यांच्या समाजातील दोन
बाबी लक्षात घ्याव्यात. द्राक्षरस संपल्याने यजमानावर लाजीरवाणा प्रसंग येणार हे मरीयेच्या
मनात होते. तर ‘येशूच्या’ मनात त्याच्या ‘मुख्य कार्याचा विचार’ होता. त्याचा
निर्देश येथे ‘वेळ’ या शब्दाने शब्दांकित केला गेला आहे.
जेव्हा मरीयेने येशूला विनंती केली, तेव्हा येशू
ज्याप्रकारे आपल्या आईशी बोलला ते चमत्कारीक वाटेल तथापि तो पित्याखेरीज इतर
कोणाचेही ऐकतो असा गैरसमज होऊ नये हाच त्याचा स्पष्ट उद्देश ह्यात होतो.
मनन चिंतन
प्रभू येशूने केलेल्या निरनिराळ्या चमत्कारांचा उल्लेख
चारही शुभवर्तमानात आहे. पण योहानाच्या शुभवर्तमानाचे वैशिष्ट हे आहे की, त्यात ‘चमत्कार’
ह्या शब्दाऐवजी ‘चिन्ह’ हा शब्द वापरलेला आहे. येशूने काना गावी पाण्याचा
द्राक्षरस करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला आणि आपले वैभव प्रकट केले. येशूने
केलेल्या सात चिन्हांची वर्णने योहानाच्या शुभवर्तमानात आहेत. पण तो त्याच्या
वाचकांसाठी लिहितो की, “ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे
येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा
पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने
तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे” (योहान २०:३०-३१). येशू ख्रिस्ताने
वधस्तंभावरील मरण आणि पुनरुत्थान दाखवलेले सर्वात मोठे चिन्ह आहे.
येशूच्या चमत्काराला ‘चिन्ह’ किंवा ‘प्रतिक’ असे म्हटले
गेले आहे. आपण पाहिले तर येशूच्या प्रत्येक चमत्कारात देव मानवाला संदेश देत असतो.
तसेच कानागावी केलेल्या चमत्काराचे दोन अर्थ आहेत.
१. ज्यू धर्माचे रांजण रिकामे झाले होते. ते ख्रिस्ताने पाण्याने भरण्यास
सांगितले; त्या पाण्याचे रुपांतर त्याने द्राक्षरसात केले. सि.एच.डोड ह्यांच्या
मतानुसार हा द्राक्षारस ज्यू धर्मशास्राचे प्रतिक होता. ‘नवा द्राक्षरस’ म्हणजे ‘शुभवर्तमान’.
तो जुन्यापेक्षा चांगला होता म्हणजे ज्यू धर्माशास्रापेक्षा ‘नवा करार’ श्रेष्ठ
होता.
२. काळाच्या अंती प्रभू आपल्या
निवडलेल्या लोकांबरोबर सहभोजन घेईल आणि त्यावेळी भरपूर द्राक्षरस असेल म्हणजे
आनंदाचा कळस गाठला जाईल, त्याचे हे ‘पूर्वचिन्ह’ होते.
‘येशू ख्रिस्त’ हा स्वत: एक ‘चिन्ह’ होता. त्याने ह्या
भूतलावर येऊन मानवरूप धारण केले. तो देव असून माणूस झाला. यहुदी लोक चिन्हांवर
विश्वास ठेवत असत. त्यांनी येशूला विचारले, ‘आम्हाला काही चिन्हे दाखव म्हणजे
आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू’. हे विचारण्याचे कारण म्हणजे यहुदी लोकांनी येशूला
पूर्णपणे ओळखले नव्हते. शास्री, परुशी आंधळे झाले होते. आज आपण सुद्धा देवाकडे
काही ना काही गोष्टीसाठी चमत्काराची अपेक्षा करत असतो. देवा मला काही चमत्कार दाखव
म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. चमत्कार पाहिल्याशिवाय मी नमस्कार करणार नाही
अशी आपली भावना असते. तर माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण सुद्धा शास्त्री आणि
परुश्यासारखे आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला आज विचारूया.
येशूने काना गावी आपल्या आईच्या शब्दाला ताबडतोब होकार दिला
नाही. परंतु त्याने मरीयेचा शब्द मोडलाही नाही. मरीयेचा येशूवर विश्वास होता व
येशूने मरीयेचा विश्वास पूर्ण केला. त्याने पाण्याचा द्राक्षरस केला व त्या
लोकांना अडचणीत मदत केली. आपले जीवन हे कितीतरी दानांनी भरलेले आहे. त्यांचा वापर आपण
दुसऱ्यांसाठी करावा. उदाहरणार्थ, दुसऱ्यांची सेवा करावी, त्यांच्या अडचणीत त्यांना
मदत करावी इत्यादी. हे सर्व चांगले कार्य करण्यासाठी आपण येशूकडे कृपा मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१.ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, सिस्टर्स आणि सर्व प्रापंचिक
ह्या सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व तेच प्रेम त्यांनी जगात आपल्या
कृतीने पसरवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जी कुटुंबं गैरसमज, शाब्दिक कलह, मतभेद अशा कारणांवरून उध्वस्त झाली आहेत,
त्यांच्यामध्ये पुन्हा ऐक्याची भावना निर्माण व्हावी व ईश्वराचे प्रेम, सौख्य,
शांती त्यांच्या कुटुंबात नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. पवित्र आत्म्याने आपल्याला अनेक दानांनी भरलेले आहे. त्या दानांचा आपण
योग्य तो वापर करावा व त्या दानांनी आपण दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. येशू ख्रिस्त आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहिला व त्याने त्यांचा सन्मान
केला. हे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेऊन आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचा
मान-सन्मान करावा. त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात म्हणून आपण
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment